एक तेजस्विनी...
डोंबिवली महिला महासंघाच्या एका उपक्रमांतर्गत एकदा कळवा येथील सखी वन स्टॉप सेंटरला भेट देण्याची संधी मिळाली होती. महिला व बालविकास विभागांतर्गत येणा-या या सखी वन स्टॉप सेंटरमध्ये गरजू महिलांना आवश्यक ती कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करण्यात येते. तसेच समुपदेशनाचे कार्यही चालते. या केंद्राच्या केंद्र प्रशासक म्हणून एक तडफदार युवती काम करत होती. तिच्या कामाचे स्वरुप व्यापक होते. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी. दांडगा अभ्यास. वक्तृत्वावर कमान. ज्या पदावर ही युवती आहे, त्यासाठी तिनं केलेला अभ्यास आणि तिची या पदावर असलेली निष्ठा, तिच्या बोलण्यातून जाणवत होती. मी जेव्हा पहिल्यांदा या युवतीला भेटले, तेव्हाच तिच्या या तडफदार व्यक्तिमत्वाची मोहीनी मला पडली. ग्रामिण भागातून येऊन शहरी भागात आपल्या कामाचा ठसा उमटवणा-या या युवतीचे नाव आहे, तेजस्विनी प्रतिभा लखीचंद पाटील. तेजस्विनी या महिला व बालविकास विभाग अंतर्गत येणा-या सखी वन स्टॉप सेंटरची केंद्र प्रशासक आहेत. वास्तविक आपल्याला या पदाबद्दल फारशी माहिती नसते. एमएसडब्ल्यू ही पदवी प्राप्त केल्यावर तेजस्विनीनं हा वेगळा मार्ग स्विकारला. इथे कामाचे स्वरुप व्यापक आहे, आणि त्याला वेळेचे बंधन नाही. समाजाप्रती आपलं काही देणं लागलं, त्यासाठी या दोन्हीही कठीण असणा-या गोष्टी तेजस्विनीनं आनंदानं स्विकारल्या आहेत. आज अनेक तरुणींना या तेजस्विनीच्या प्रवासातून नवा मार्ग दिसणार आहे.
जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील अडावद या गावात तेजस्विनी पाटील यांचे शिक्षण झाले. राज्यशास्त्र या विषयात त्यांनी पदवी घेतली. यात त्या महाविद्यालयात प्रथम आल्या होत्या. त्यानंतर समाज कार्याची आवड म्हणून समाजकार्य क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. हे शिक्षण तालुका स्तरावर पूर्ण केले. तेजस्विनी यांचे मोठे बंधू, धनंजय घनश्याम मंगरुळकर हे GST अधिकारी आहेत. जळगाव वस्तु व सेवा कर विभागात ते कार्यरत आहेत. त्यांच्यासारखाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तेजस्विनी यांनी करावा म्हणून घरच्यांचा आग्रह होता. मात्र तेजस्विनी यांना शिक्षणाच्या माध्यमातून महिलासाठी समाजकार्य करण्याची ओढ होती. त्यांच्या या निश्चयाला त्यांचे मोठे काका, घनश्याम विक्रम पाटील यांनी कायम पाठिंबा दिला. घनश्याम पाटील हे मुख्याध्यापक होते. त्यामुळे आपल्या पुतणीनं वेगळा मार्ग निवडल्यावर ते तिच्या पाठिशी उभे राहिले. मोठा भाऊ आणि काका यांनी तेजस्विनी यांच्या अन्य कुटुंबियांनाही त्यांची भूमिका समजावून सांगितली. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, त्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे, हे तेजस्विनी यांचे ठाम मत होते. त्यामुळेच एमएसडब्लू अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला. त्यांच्यासारख्या ग्रामीण भागात वाढलेल्या मुलीसाठी हा वेगळा अनुभव होता. हा अभ्यासक्रम करतांना त्यांना आदिवासी पाड्यावर जावे लागे, शिवाय ग्रामिण भागातही त्यांचा सर्वे चालत असे. शहरी भागातही त्यांना काम करावे लागले. यातून समाजाच्या या वेगवेगळ्या स्तरावरील महिलांच्या समस्याही वेगळ्या असल्याची जाणीव त्यांना झाली. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांना समाजकल्याण विभागातर्फे महिलांसाठी काही विभाग करण्यात आले आहेत, तिथे काम करण्याची संधी असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी नायर रुग्णालयात येथे मानसिक
आजार यावर सर्व्हे केला. नंतर सखी वन स्टॉप सेंटरच्या कामाबाबत त्यांना माहिती मिळाली. येथे केंद्र प्रमुख म्हणून मुलाखतीसाठी येतांना तेजस्विनी यांनी आधी स्वतःच्या मनाची पक्की तयारी केली होती. ग्रामीण भागातील एका तरुणीसाठी स्वतःचे कुटुंब सोडून शहरी भागात नोकरीसाठी येतांना जे मानसिक दडपण येते, तेच दडपण तेजस्विनी यांनाही जाणवले. त्यातही त्यांच्या कामाचे संपूर्ण स्वरुप वेगळे होते. येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 असा ठराविक नोकरीसाठी वेळ निश्चित नव्हता. कुटुंब मागे ठेऊन शहरात येतांना आपलं इथे कोणी ओळखीचं नाही, पण आपलं काम हिच आपली ओळख होईल हा निश्चय करत तेजस्विनी या सखी वन स्टॉप सेंटर, ठाणेच्या मुलाखतीसाठी आल्या आणि त्यांचे अवघे जीवनच बदलून गेले. 2023 मध्ये त्या सखी वन स्टॉप सेंटर ठाणे येथे मुलखातीसाठी आल्या. तेजस्विनी यांनी आधी केलेल्या कामाच्या अनुभवावरुन त्यांना या पदासाठी निवडण्यात आले. आता त्या ठाणे शहराच्या सखी वन स्टॉप केंद्राच्या केंद्र प्रशासक आहेत. महिलांच्या आणि बालकांच्या समस्या निराकरण करण्याचे काम त्या करतात. समुपदेशक म्हणून त्या रोज अनेक महिलांना भेटतात. त्यांना बोलतं करतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एखाद्या मैत्रिणीसारख्या मागे उभ्या रहातात.
या कामाच्या अनुभवातून तेजस्विनी खूप काही शिकल्या आहेत, आणि रोजच्या अनुभवातून शिकतही आहेत. या सेंटरच्या माध्यमातून महिलांना अनेक प्रकारे मदत मिळवून देण्यात येते. अनेकवेळा महिलांना आपल्यावर अत्याचार झाल्यास कुठे मदत मागावी, याची माहिती नसते. त्यामुळे अनेक महिला कौटुंबिक अत्याचाराला बळी पडतात. हुंडाबळीसारख्या घटना आजही घडत आहेत. पण या महिलांना आपल्यावर होणारे अत्याचार हे कौटुंबिक हिंसाचार आहेत, याची जाणीवही नसते. या घटना गंभीर स्वरुपात घडल्यावर या महिला हतबल होतात. बहुतांशी महिला पोलीसांकडे तक्रार करण्यास घाबरतात. त्यांना त्यांचे दुःख समजून घेणारी एक मध्यस्थ संस्था हवी
असते. ही मध्यस्थ संस्था म्हणून सखी वन स्टॉप सेंटर काम करते. येथे येणा-या प्रत्येक महिलेला मोफत सेवा देण्यात येते. या सेंटरमध्ये जेव्हा महिला येतात, तेव्हा त्या प्रचंड मानसिक तणावाखाली असतात. अशावेळी या महिलांना, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देण्यात येतो. तेजस्विनी या महिलांचे समुपदेशन करत त्यांच्यामधील हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा करतात. महिलांना वैद्यकीय मदत केंद्रातर्फे मोफत दिली जाते. काहीवेळा या महिलांना गंभीर अशी मारहाण झालेली असते. अशावेळी महिलांना विश्वासात घेऊन पोलीसांमध्ये तक्रार करण्यात येते. तेजस्विनी या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून अनेक अत्याचारग्रस्त महिलांपर्यंत मदतीचा हात घेऊन पोहचल्या आहेत. दर महिन्याला या केंद्रात किमान 70 महिला मदतीसाठी येतात. यातील बहुतांश महिलांना त्यांचा संसार वाचवायचा असतो. पण आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचाही फोडायची असते. अशावेळी तेजस्विनी या महिलांसोबत उभ्या रहातात. त्यांना आवश्यक अशी मदत त्या मिळवून देतात. इथे आलेल्या महिलांना त्यांच्या घरातून हाकलावून देण्यात आलेले असते. माहेर आणि अन्य नातेवाईकांचीही दारे त्यांच्यासाठी बंद होतात. या महिलांच्या रहाण्याची व्यवस्था करण्यात येते. महाराष्ट्र शासनाच्या शक्ती सदनमध्ये अशा महिलांना निवारा मिळवून देण्यात येतो. तसेच काही एनजीओच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना त्यांच्या पायावर उभं करुन मानसिक आधार दिला जातो. या सर्व सुविधा मोफत असतात. पण इथे फक्त सुविधा मिळवून देणे महत्त्वाचे नसते, तर त्या महिलेला विश्वास वाटणे महत्त्वाचे असते. यात तेजस्विनी यांची आत्मियता मोठी आहे. त्यामुळे आज अशा संकटातून पार झालेल्या अनेक महिला, आवर्जून त्यांना भेटायला येतात आणि आभार व्यक्त करतात.
आज शहरी आणि ग्रामिण भागात तेजस्विनी काम करतात. या दोन्हीही भागात काम करतांनाचा अनुभव वेगळा
आहे. शहरी भागातील महिलांवर अत्याचार झाला
तर त्या आपल्याला न्याय कुठे मिळेल, अशा ठिकाणी पोहचू शकतात. मात्र ग्रामिण महिलांमध्ये अद्यापही याबाबत
जागरुकता नसल्याचे तेजस्विनी सांगतात. तेवढी
साधनं त्यांच्याकडे नाहीत. अशाच
महिलांसाठी केंद्र सरकारनं मिशन शक्ती अँप लॉन्च केलं आहे. हे अँप प्रत्येक महिलेच्या मोबाईलमध्ये असणे
गरजेचे असल्याचंही तेजस्विनी सांगतात.
तेजस्विनी जेव्हा ग्रामिण भागात जातात, तेव्हा त्यांना गावपातळीवर काम
करतांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. ग्रामिण भागातील महिला एका चौकटीत रहातात. कितीही अत्याचार झाला तरी त्या आपल्या कुटुंबाच्या विरोधात बोलत नाहीत. या महिलांपर्यंत पोहचण्यासाठी अंगणवाडी ताईंची मदत घ्यावी लागते. या अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण देण्याचं काम तेजस्विनी करतात. यात मुख्यतः बालविवाह रोखण्याचे अवघड काम आहे. शहरी आणि ग्रामिण भागात आजही बालविवाह होतात. हे बालविवाह रोखण्यासाठी अनेकवेळा माहितीच्या आधारावर तेजस्विनी आपल्या पथकासह दाखल झाल्या आहेत. हा प्रसंग मोठा बाका असतो. अनेकवेळा संपूर्ण गाव तिथं उपस्थित असतं. काहीवेळा त्यांच्यावरच हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे पोलीसांची मदत घ्यावी लागते. पोलीसपथकासह तेजस्विनी अशा लग्नघरात दाखल होतात. प्रथम ज्यांचा विवाह होणार आहे, अशा वधु-वरांच्या आईवडिलांबरोबर त्या एकातांत बोलतात. बालविवाह झाल्यास काय परिणाम होतील याची कल्पना दिली जाते. काहीवेळी कुटुंब मान्य करतात, मग त्यांच्याकडून पोलीसांच्या उपस्थितीत एक पत्र लिहून घेण्यात येते. मात्र काहीवेळी त्यांनाच दमदाटी करण्यात येते. लग्नावर होणा-या खर्चाचे दाखले देण्यात येतात. अशावेळी या बालविवाहास उपस्थित असणा-या सर्वांवरच गुन्हा दाखल करण्याचे धाडसही तेजस्विनी यांनी दाखवले आहे. हे बालविवाह रोखण्यासाठी आता त्या अंगणवाडीमधील ताईंना प्रशिक्षण देत आहेत.
यासोबत तेजस्विनी या विटभट्ट्यांवर काम करणा-या महिला कामगारांच्या
आरोग्याबाबत आणि हक्काबाबतही सजग आहेत.
त्या अनेकवेळा अशा विटभट्टी कामगार महिलांच्या छोटेखानी सभा घेतात, आणि
त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देतात.
शिवाय काही अडचण असेल तर मदतीचा हात पुढे करतात. तेजस्विनी या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात
रममाण असतांना घड्याळ्याला मात्र बाजुला ठेवतात.
कारण इथे 11 ते 5 ही वेळ फार कमी वेळ असते. बहुतांशवेळा घरी जातांना एखाद्या महिलेचा फोन
येतो, तिला मदतीची गरज असते, मग त्या आपली सुट्टी बाजुला ठेऊन त्या महिलेल्या
मदतीला पुढे जातात. आज तेजस्विनी या
कुटुंब म्हणजे काय, आणि ते कसे जपावे याबाबत समुपदेशन करतात. त्यांच्याकडे अनेक महिला आणि मुले येतात,
ज्यांना ही कुटुंबाची व्याख्या समजावून सांगावी लागते. काहीवेळा आई वडिलांचा घटस्फोटाचा खटला चालू
असतो, अशा पालकांच्या मुलांची मनस्थिती बिघडते, या मुलांना तेजस्विनी आधार देतात,
शिवाय त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करतात.
अशी अनेक कुटुंब तेजस्विनी यांनी पुन्हा जोडली आहेत. ही मंडळी त्यांना आवर्जून फोन करतात, भेटायला
येतात. एका क्षणीक रागामुळे आम्ही आमचे
कुटुंब तोडत होतो, पण तुम्ही आम्हाला पुन्हा एक केलंत, अशा शब्दात आभार व्यक्त
करतात.
तेजस्विनी यांचा कामाचा आवाका खूप मोठा आहे. त्यांच्याकडे येणा-या प्रत्येक पालकांना त्या मुलांसोबत संवाद साधण्याचे आवाहन करतात. त्यातूनच कुटुंबाचा पाया भक्कम होईल, याची जाणीव करुन देतात. या सर्वात तेजस्विनी या क्षेत्रात मोठ्या संख्येनं तरुणींनी यावे यासाठीही मार्गदर्शन करतात. कारण या क्षेत्राचा आवाक मोठा आहे. आपण आपल्या समाजाप्रती काही देणं लागतो. समाजात आजही अनेक रुढी, परंपरा आहेत, ज्यामुळे महिला हुंडाबळीसारख्या कुप्रथांना बळी पडत आहेत. यावर जनजागृती हा उपाय आहे, आणि अशी जनजागृती करण्यासाठी मोठ्या संख्येनं तरुणींनं या क्षेत्रात यावे, असे आवाहन तेजस्विनी करतात. विवाह नंतर बऱ्याच महिलांना घर, कुटुंब सांभाळण्याचा आग्रह केला जातो. घरात शिक्षित सून हवी असते, पण तिला तिच्या पसंतीची नोकरी करण्याचे स्वातंत्र्य नसते. पण महिलांना स्वातंत्र्य दिले तर त्या जेवढ्या सक्षमतेनं त्यांचं घर सांभाळतात, तशाच कुशलतेनं नोकरीही करु शकतात. म्हणून, प्रत्येक स्त्री ने आपण नोकरी, किंवा व्यवसाय करुन आत्मनिर्भर होणार असा निश्चय करणं गरजेचं असल्याचं तेजस्विनी सांगतात.
तेजस्विनी सारख्या तरुणी फार कमी आहेत. आज महिलांना फक्त अत्याचारापासून मुक्ती
देण्यापर्यंतच त्या मर्यादित नाहीत. तर
महिलांना त्यांच्या पायावर उभं करुन स्वयंपूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे. फक्त शिक्षणच नव्हे तर समर्पण वृत्तीनं हे सर्व
कार्य तेजस्विनी करतात. त्याच्या या
कार्यातील तेजाला सलाम आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Proud of you madam👏👏
ReplyDeleteधन्यवाद..तेजस्विनी मॅडमचे काम खूप मोठे आहे.
Delete
ReplyDelete"तेजस्विनी मॅडम, तुम्ही दाखवलेला आत्मविश्वास आणि जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे. अशा कामगिरीमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा पसरते. तुमच कौतुक करावं तितकं कमीच आहे!"भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👏👏🥳🥳
धन्यवाद...तेजस्विनी यांच्यामुळे अनेक तरुणींना प्रेरणा मिळत आहे...
Deleteग्रामीण भागात जन्म झाला म्हणून काय झालं. इच्छा व प्रामाणिकपणा असेल तर तेजस्विनी ताईंच्या कार्यातून पुढे भविष्यात अनेक तेजस्विनी पुढे येतील. ताईंच्या कामाला सलाम
ReplyDeleteनक्कीच...धन्यवाद...
DeleteProud of you dear sister
ReplyDeleteछान लेख 👍
ReplyDeleteधन्यवाद..
Deleteछान लेख आहे.
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteत्या क्षणाचे साक्षीदार आपण होतो हे आपले अहोभाग्य.
ReplyDeleteधन्यवाद...भाग्यवान आहात....
Deleteहा लेख वाचून खूपच आनंद झाला, मला ही असच काहीतरी काम करायच आहे, अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रियांसाठी, बालविवाह रोखण्यासाठी. कारण मी सुद्धा या गोष्टींना सामोरं गेले आहे.. आणि आज ही अनेक स्त्रिया अत्याचार सहन करत आहेत, मी बघत आहे पण काही करू शकत नाहीये, बोलायला गेले की माझे घरचे माझ्याशी भांडतात की मी नाही बोलावं, म्हणून गप्प बसावं लागतं. पण तेजस्वी ने मॅम सारख्या स्त्रिया आहेत, ह्या अत्याचारांना रोखण्यासाठी, हे बघून खरच खूप आनंद झाला..☺
ReplyDeleteधन्यवाद....नक्कीच, असे प्रेरणादायी काम करण्याची सध्या गरज आहे...
DeleteGreat Work keep it up
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूप छान लेख आहे
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान ताई वाचून खूप छान वाटलं
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteअभिनंदन ताई❤️ तुम्हाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
ReplyDelete👍 Keep it up.
ReplyDeleteखूप छान माहिती
ReplyDeleteतेजस्विनी ह्या नावातच जे तेज आहे, ते ह्या तरुणीमध्ये सामावलेले आहे, म्हणूनच सुखी संसाराची सोपी पायवाट सोडून ही इतरांसाठी मार्गदर्शक दीप बनून आपल्या तेजाने अनेकांचे जीवन उजळत आहे. तिच्या कर्तृत्वाला सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏💐
ReplyDelete... सौ.मृदुला राजे
तेजस्विनी मॅडमच्या समाजकार्याला सलाम
ReplyDeleteसमाजासाठी हे अत्यंत उपयुक्त काम तर आहेच पण अनेकांसाठी ते प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. सयीताई तुम्ही सुंदर लिहिले आहे.
ReplyDeleteतेजस्विनी ताईंच्या कार्याचा खूप खूप कौतुक आहे. त्यांच्या या कामासाठी खूप धाडस लागतं. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम
ReplyDelete