लग्न आणि सोहळे
गेला आठवडा तसा धावपळीचा होता...पण आठवड्याचा शेवट सुखद झाला. खरंतर गेल्या दोन महिन्यापासून लग्नांच्या अनेक आमंत्रणांची जणू स्पर्धाच लागल्यासारखे झालेय. दर शनिवार-रविवार लग्न आणि भोजनसमारंभ...एकाच वेळी एवढे ओळखीचे बोहल्यावर कसे काय चढतात म्हणून मला कोडं पडलं होतं. पण ते कोडं सोडविण्याचा वेळही मिळाला नाही... तारखेप्रमाणे पत्रिका टीपॉयवर लावून दिल्या...एक झालं की लगेच दुसरी पत्रिका हजर... लग्नासाठी ठेवणीतल्या जवळपास सर्व साड्या बॅगे बाहेर आल्या...लग्नसोहळा म्हटलं की त्या जेवणाच्या रांगा...बुफे...आणि हातात ताट धरुन खुर्ची पकडण्याची धावपळ...तिकडे नवरा नवरींनी एकमेकांना हार घातले की इकडे बुफेची लाईन सुरु....मग जेवणाची धावपळ....परत येऊन आहेरासाठी लाईन लावायची...हे सर्व आता सवयीचे झाले..मात्र गेल्या आठवड्यात एका लग्नात
ख-या मराठमोळ्या लग्नाला गेल्याचे समाधान मिळाले...
ख-या मराठमोळ्या लग्नाला गेल्याचे समाधान मिळाले...


खूप दिवसांनी अशी अंगत पंगत लग्नात अनुभवता आली...माझ्याबरोबर अनेकांचाही असाच अनुभव होता...सर्वांनी यजमानांचे यासाठी विशेष आभार मानले...जरा निवांत झाल्यावर यजमान बोलायला आले..मराठी पदार्थ लग्नात ठेवायचे म्हणून त्यांनी आग्रह केल्यावर काही कॅटरर्संनी विरोध केला...घरी तेच खाता...लग्नात पण तेच...असं म्हणत लग्नात जरा वेगळं ठेवा असं सुचवलं. मग थेट चायना, सिंगापूर, इटली पर्यंत खाद्ययात्रा घडवली...पंजाबी पदार्थ सादर झाले...दिल्ली चाट तर हवीच म्हणत भेळपूरी, शेवपूरी, पाणीपूरी आणि स्टाटर्सचे कुठले कुठले रोल चाखायला दिले...चटण्या, लोणच्याचे प्रकार झाले. सॅलडपण लागतं हल्ली म्हणत उकडलेले चणे, शेंगदाणे आले..बरं त्यांचही वेगळं बजेट आलं. पापड आणि तळलेले अन्य रंगीत संगीत पापड, वेफर्स वेगळेच...सुपारीसुद्धा चार प्रकारात आली... एकूण बजेट अव्वाच्या सव्वा वाढलं होतं. त्यातून मराठी पदार्थांना लग्नात फार भाव नाही असंही ऐकायला मिळालं. पण या सर्वांत आमच्या यजमानांनी मराठी पदार्थांची खिंड लढवली. आपल्या मराठी बाण्यावर ते ठाम राहिले.... आम्ही जे रोज खातो तेच आमच्या पाहुण्यांना द्यायचंय...देशी-विदेशी नको...असा पवित्रा घेतला...त्यामुळे दोन-चार बहुचर्चित कॅटरर्सनी त्यांना नकार दिला. शेवटी एक मराठी कॅटरर मिळाला. त्यानं दिलेली आपल्या पदार्थांची यादी पाहून या मंडळींचं समाधान झालं...चव आणि स्वच्छताही भावली...आर्श्चय म्हणजे या मराठी थाळीची किंमतही अत्यंत वाजवी होती...पण यजमानांच्या मनात धाकधूक होतीच...पाहुणे काय म्हणतील..ही भीती होती...पण सर्वांनी जेवणाची आणि लग्नातल्या साधेपणाची तारीफ केल्यावर त्यांना खूप आनंद झाला...इकडे स्टेजवर पैठणी साडी नेसलेली आमची वधूही सरेख दिसत होती...साधासा मेकअप आणि
मोग-याच्या गज-यांनी सजलेली तिची वेणी...साधी आणि सोज्वळ, छानच दिसत होती...या वधुवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत समाधानाने आम्ही हॉलमधून बाहेर पडलो...
मोग-याच्या गज-यांनी सजलेली तिची वेणी...साधी आणि सोज्वळ, छानच दिसत होती...या वधुवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत समाधानाने आम्ही हॉलमधून बाहेर पडलो...
हे इथे सांगायचे म्हणजे अशाच एका लग्नसमारंभाला अगदी महिन्यापूर्वी गेले होते...इथे सर्व थाट विदेशी...अगदी कपड्यांपासून...सर्व नेहमीचेच. पण लग्नात ओळखू येईनात. मेकअपची किमया....कपडेही विदेशी थाटाचे...हल्ली लग्नात हा ट्रेन्ड आहे असे समजले...जेवणाचा बेत तर विचारु नका...आल्याआल्या ज्युस, स्टार्टर असे सर्व येऊ लागले...या सर्वांनी भूक चाळावली म्हणून जेवणाच्या विभागाकडे गेलो...तिथे सुरुवात कुठून करावी हा पहिला प्रश्न पडला....मुलांनी पाणीपुरीचे काऊन्टर पकडले...मग चायनीजकडे धाव घेतली...आम्ही महिला मंडळींनीही पाणीपुरी घेतली...नंतर मुख्य जेवणाकडे वळलो तर भूक फार राहिली नाही...थोडा डाळभात घ्यावा, तर तो नाही...सर्व पंजाबी, चायनीज, सिंगापूरी पदार्थांची गर्दी...काहींनी तर सर्व घेतलेच पाहिजे या नियमाने सर्व पदार्थांची भेळ ताटात केली होती...अर्थांत यातील अर्धे अधिक पदार्थ थेट कचराकुडींत जात होते...जेवणात काय व्हरायटी आहे म्हणून कौतुक होत होतं...पण मागे पाहिलं तर बहुतेक मंडळी जेवली तरी जेवणाचे काऊंटर खाली झाले नव्हते...जेवणानंतर आईस्क्रीम आणि कुल्फिचेही असेच दोन-चार प्रकार...तिथेही तिच अवस्था...यजमान मात्र खुष होते. लग्नात साजेसा खर्च केल्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर होते. पण मला राहून राहून एक प्रश्न पडला होता, एवढे अन्न वाया गेले ते कशासाठी...या दाखवण्यासाठी असलेल्या समाधानासाठीच का..

आपल्या देशात खाद्यसंस्कृती किती संपन्न, विविधरंगी आहे, हे सांगायची गरज नाही..इथे एक घर ओलांडलं की नवीन पदार्थ मिळतो. प्रत्येक सण, समारंभ, ऋतू कशालाही आमच्याकडे पदार्थांची यादी तयार असते. साधी कोकणातल्या पदार्थांची यादी करायची म्हटली तरी एक कॉलम अपुरा पडेल..मग बाकीचे भाग आले की तर त्याचीच एक मालिका होईल, एवढी संपन्नता.. मग अशावेळी परदेशी पदार्थांचे ओझे कशाला बाऴगायचे...मला आठवतं आमच्या डोंबिवलीचे फोटोग्राफर मनोज मेहता यांच्या मुलीच्या, निकीताच्या लग्नात चक्क ज्वारी-बाजरी-नाचणीच्या भाक-या होत्या. सोबत भरली वांगी, खिचडी, मुगाचा हलवा, गुळाचा खडा, लोणी...असा आगळा मेनू...फक्कडच....आम्ही सर्व सहका-यांनी या मेनूवर आडवा हात मारला होता. गांवकरीमध्ये असतांना ठाण्याला एका सहका-याच्या बहिणीचे लग्न होते...मसालेभात, उसळ, पुरी, जिलेबी आणि कांदा, टोमॅटो, काकडीची कोशिंबीर....बस्स एवढंच...पापड, लोणचं, सॅलॅड वगैरे काहीच नाही...अर्थात गरजही नव्हती कारण त्या जेवणाची चवच तशी न्यारी होती.
असा माझ्यासारखा अनुभव तुम्हालाही आला असेल. ब-याचवेळा एकदम भारी खर्च केलेल्या समारंभात जाऊन जे समाधान मिळत नाही, ते समधान साधेपणाने केलेल्या समारंभात मिळेत. शेवटी सुखाची व्याख्या ही आपल्या मनात असते. कर्ज काढून, दुस-याला दाखवण्यासाठी केलेल्या समारंभापेक्षा हे सुख साधेपणात अधिक स्थिरावते असे मलातरी वाटते....तुमचे काय मंडळी....
काही खास
लग्नामध्ये किंवा काही समारंभामध्ये ब-याचवेळा जेवण उरते..वाया जाते. हे जेवण कुठे द्यायचे हे माहित नसल्याने फेकून देण्यात येते. यातून अन्नाचा अपव्यय होतो. हे अन्न गरजूंपर्यंत पोहचविण्याचे काम काही तरुण करीत आहेत. कुशल नेहते-8425822080, निलेश बच्छाव-8108560236, साई जाधव-9768241241 आणि योगेश शिंदे-8080779996 ही मंडळी डोंबिवली ते बदलापूर दरम्यान ही सेवा करतात. घरातील सण, समारंभ किंवा हॉलमध्ये झालेले लग्नासारखे सोहळे, यात अनेकवेळा अन्न उरते. ते अन्न या मंडळींना फोन करुन दिले तर ते भुकेल्या व्यक्तींच्या तोंडी लागते. यासाठी कुठलेही शुल्क घेत नाहीत. फोन आल्यावर ही मंडळी स्वत: उरलेले अन्न घेण्यासाठी येतात आणि गरीबांना वाटतात. त्यासाठी लागणार-या डीश, पेपर, चमचे या वस्तू ते स्वत:कडे नेहमी ठेवतात. आज या छोट्या गटाला दिवसभरातून एक तरी फोन येतोच येतो..लग्न सोहळे असतील तर फोनचे प्रमाणही वाढते. हा सर्व खर्च ही मंडळी स्वत: करतात. यासाठी फक्त अन्नाचा दर्जा चांगला असावा ही एक अट आहे. काहीवेळा अन्न कोणालातरी वाटायचे आहे, म्हणून शिळे असले तरीही या मंडळींना फोन करण्यात येतो. मात्र वाटायचे असले तरी ते अन्न चांगले असल्यासच वाटले जाते. त्यासाठी वाटणारे प्रथम स्वत: ते पदार्थ खावून त्यांचा दर्जा तपासतात आणि मगच ते गरजूंना देतात. याशिवाय ही मंडळी जुने कपडे, चादरी, भांडी, खेळणीही गोळा करतात. या वस्तूही ते गरजवंतांना वाटतात. आपल्याकडे वा आपल्या परिचितांकडे असे जास्तीचे अन्न शिल्लक राहिल्यास यापैकी कुणालाही फोन करावा. तसेच कपडे, खेळणी आणि वापरता येतील अशा वस्तू असल्यास नक्की फोन करावा. या वस्तू गरजवंतांपर्यंत पोहचविण्याचे काम ही मंडळी नक्की करतील.
सई बने
डोंबिवली
छान उपक्रम
ReplyDeleteधन्यवाद
Deleteस्तुत्य उपक्रम ! Wh. app वर माहिती आली होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. धन्यवाद सई !
ReplyDeleteहो मॅडम .पण मॅनपावर कमी असल्यामुळे आपण डोंबीवली ते बदलापुर पर्यंत जेवण घेतो .पुर्ण ठाणे,मुंबई,नवी मुंबई मध्ये किती जेवण उरत असेल याचा हिशोब लावला तर कमीत कमी दिवसाला दोन ते तीन लग्नाचे जेवण होऊ शकते .....
DeleteAana he purnabhrmaha Aahe thyachi Yogyakarta Dhakal yogya mansani ghetlyacha upkram changla Aahe.
ReplyDeleteSai block chya madhyama marfat hi mahiti milali dhynwad Khup subechya pudhil block sambhadi.
धन्यवाद...आपल्या शुभेच्छा कायम आशादायी असतात
DeleteNic work
ReplyDeleteधन्यवाद
DeleteAttached vachla tuza lekh kiti Chan shabdat mandles annache mahatva
ReplyDeleteधन्यवाद
DeleteGodG job madam
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान उपक्रम
ReplyDeleteधन्यवाद
Deleteतुम्ही लिहलेला लेख खुपच छान आहे .आणि या उपक्रमाला डोंबीवली मधुन खुपच छान प्रतिसाद आहे ....त्या साठी धन्तवाद ...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवाचुन खुप भुक लागली आहे मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था करावी
ReplyDelete