संस्कार आणि

 आमचा शिनचैन
हे काय...तू पण शिनचैन बघतेस....अग काय हे...किती उद्धट मुलगा आहे तो...मुलगा तर मुलगा तूही...खरं तर तू आता वरदला टीव्हीपासून दूर ठेवायला हवंस...ते राहीलं दूर..इथं तर तुम्ही थेट शिनचैन बघताय...कमाल झाली...
माझ्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या...त्यावेळी माझा आणि वरदचा टीव्ही टाईम चालू होता...आमचा लाडका शिनचैन टीव्हीवर चालू होता....आम्हा दोघांचाही या शिनचैनचा प्रत्येक एपिसोड पाठ झाल्यासारखा आहे...तरीही प्रत्येक वेळी तो नव्याने बघतोय, असंच आम्हाला हसू येतं...वरद अभ्यासापासून रिलॅक्स होण्यासाठी...आणि मी, थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर डोकं शांत करण्यासाठी नेहमी पहिला पर्याय म्हणून या शिनचैनला पसंती देतो.  तसंच चालू होतं...अचानक माझ्या मैत्रिणींचा घोळका घरी आला....त्यांनी आम्हा दोघांना या सोकॉल्ड असभ्य मुलाची मालिका बघतांना पकडलं आणि वरील डायलॉग बाजी चालू झाली...
वरद लहान असल्यापासून या शिनचैनचा चाहता आहे...अनेक मुलं असतात...आणि शिनचैनचा चाहता असल्यावर अनेक पालकांना जी चिंता पडते ती मलाही पडली होती...ती म्हणजे शिनचैनवर लागलेला असभ्य मुलाचा शिक्का...हा शिनचैन पालकांना उलट बोलतो....मित्रांना काहीबाही बोलतो....शिक्षकांना अगदी त्रस्त करुन सोडतो...असे अनेक किस्से या शिनचैन नावाच्या अवघ्या पाच वर्षाच्या मुलाचे आहेत.  त्यामुळे त्याची ही किर्ती मी सुद्धा ऐकून होते.  त्यात मुलगा जेव्हा शिनचैन बघण्याचा हट्ट करु लागला, तेव्हा मलाही काळजी वाटणे साहजीकच होते.  पण तो काही ऐकेना...थोडा वेळ...खूप चांगला आहे तो...अशा मुलाच्या वाक्यांनी माझा पाडाव झाला...आणि आमच्याकडे थो़ड्या वेळासाठी आलेला शिनचैन चांगलाच स्थिरावला.
..
असं काय आहे त्या शिनचैनमध्ये...हा प्रश्न साहजिकच आहे...मलाही असाच प्रश्न पडला. मुलांना या शिनचैनचे आकर्षण का वाटते...आणि समस्त पालकवर्ग त्याचा राग का करतात हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला.  त्यासाठी साहजीकच मलाही मुलाबरोबर ही मालिका बघावी लागली...जपानमधल्या एका कुटुंबातील मुलाची ही कथा आहे.. शिनचैन हा पाच वर्षाचा मुलगा,  त्याची छोटी बहिण हिमावरी,  आई मिक्सी आणि वडील हिरोशी नोहरा...असे चौकोनी कुटुंब...याशिवाय शेजारी,  आई-वडीलांचे आई वडील,  आईच्या बहिणी, वडीलांचे ऑफीसचे सहकारी, झालेच तर त्यांचे बॉस, शिनचैनचे शाळेतील शिक्षक आणि त्याचा मित्रपरिवार, त्याची ननॅको दीदी, शिवाय त्याचा लाडका कुत्रा शिरो...असा या मालिकेतील पात्रांचा गोतावळा...अर्थात मुख्य पात्र शिनचैन...हा मुलगा नाना खोड्या करतो...त्या खोड्यांचे सर्व चित्रण या मालिकेत आहे...खरंतर त्याचे हे पात्र वास्तवात होते.  जपानमध्ये हे नोहरा कुटुंब खरोखर होते.  कामाला जाणारे बाबा आणि घर, मुलांना सांभाळणारी आई.... शिनचैनच्या आईला शॉपिंगची आवड होती.  एक दिवस ती मुलांना घेऊन शॉपिंगला गेली...छोट्या, रांगणा-या बहिणीची, हिमावरीची जबाबदारी या पाच वर्षाच्या मुलावर आली.  आई शॉपिंगमध्ये छोटा शिनचैन मॉलमध्ये रंगला...थोड्यावेळानं त्याला बहिणीची आठवण झाली...तोपर्यंत ही छोटी रस्त्यावर रांगत आली होती...तिला उचलायला हा भाऊ गेला आणि एका कारने दोघांनाही उडवले...हा खोडकर मुलगा आणि त्याची बहिण कार अपघातात मरण पावले....त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आईला धक्का बसला...आपल्या मुलांच्या आठवण काढतांना ती त्यांची चित्र काढत असे...काही दिवसांनी या आठवणींची डायरीच तयार झाली..जपानची कार्डून रायटर योशिता ओतसोइला ही बातमी समजली.  त्यांनी या शिनचैनच्या आईच्या डायरीवर आधारीत कार्टून मालिका केली...हिच मालिका आता शिनचैन नावाने जगभर बघितली जाते. 
अर्थात ही सर्व माहिती मला मुलाच्या माध्यमातून मिळाली...मुलं खरंच खूप हुशार असतात.  आपल्य़ासा हवं ते कसं मिळवावं याची त्यांनी माहिती असते. तशीच माझ्या मुलालाही आहे...आपल्या आईला अगदी ठोस कारण दिलं की ती काही बोलू शकत नाही याची त्याला पूरती खात्री...त्यामुळे त्याने या शिनचैनची पूर्ण माहिती काढली...तो एक चांगला मुलगा आहे...तू चांगल्या नजरेतून त्याला बघ असा वरुन मला सल्लाही दिला...त्यामुळे मी या मालिकेकडे ओढले गेले.  आणि आता हे मान्य करावे लागेल की या शिनचैनच्या मीही प्रेमात पडले...मी माझ्या नजरेतून त्याची आणि आपल्याकडील काही मालिकांची तुलना करायला लागले.  आता बघा ना... शिनचैन जेव्हा बाहेरुन घरी येतो तेव्हा वेलकम बॅक मॉम, म्हणतो...त्याचा हा डागलॉग चुकीचा असला तरी तो हे बोलतांनाच आपले शुज घराबाहेर काढतो आणि मगच घरात येतो.  सध्या ज्या काही हिंदी किंवा मराठी मालिका चालू आहेत त्यातील पात्र सर्रास चपला-शुज घरात घालून वावरतात...एका तर मालिकेत मी स्वयपांक घरात महिला मोठ्या हिल्स घालून वावरतांना पाहिलं....दुसरा मला मोठा फरक जाणवला तो म्हणजे शिनचैन कितीही मस्तीखोर असला तरी तो अन्नाचा मान ठेवतो.  त्याला सिमला मिरची आवडत नाही.  ताटात आईने वाढलेली सिमला मिरची न खाण्याचे तो अनेक बहाणे शोधतो,  पण आईच्या पुढे त्याचे काही चालत नाही..नाईलाजाने तो ती खातो...पण ताटात टाकत नाही...त्याच्या मित्र-मैत्रिणींकडे गेल्यावर तो मागून खातो...कधी कधी समोरच्याला ते आवडत नाही...पण हा मुलगा ताटात अन्न टाकत नाही...आणि आपल्या कोणत्याही मालिकेमध्ये कधी जेवतांनाचे दृष्य आठवा...काहीतरी वाद होतो अन् भरलं ताट तसंच सोडून ही मंडळी निघून जातात...ते नाट्य रुपांतर असेल हे मान्य...पण तरीही त्यात वाईट नाही का....मुलाच्या सांगण्यावरुन मी शिनचैन मालिका बघायला लागले...ही मालिका बघतांना आजची मुलं आणि शिनचैन याची तुलनाही केली.  थोडा वेगळा विचार केला तेव्हा वाटलं की हा खरा आजच्या काळात असायला हवा असा मुलगा आहे...हा पाच वर्षाचा मुलगा गरज असेल तर एकटा प्रवास करतो...त्याच्या वडीलांच्या ऑफीसपर्यंत जाऊ शकतो...बरं कोणी याला पळवण्याचा जरी प्रयत्न केला तरी पोरगं असलं चौकस की पळवणारा चांगल्या भेटवस्तूसह यालाच याच्या घरी परत करेल...त्याची बहिण कितीही मस्तीखोर असली तरी त्याची ती लाडकी आहे...तो तिची काळजी घेतो. एका श्रीमंत घरातील मुलगी त्याच्याशी मैत्री करण्यासाठी जंगजंग पछाडते...पण हा पठ्या काही तिला दाद लागू देत नाही...बरं खाण्यापिण्याच्या बाबतीत नाटकं नाहीत...अगदी भाजलेली रताळीही आवडीने खातो...त्याच्या वात्रट खोड्याकड़े न बघता त्याचे गुण मला दिसले आणि दिसतातही...त्यामुळे आता आमच्याकडे ही मालिका आनंदाने लावली जाते आणि बघितलीही जाते...
आपण प्रत्येतजण या मालिका जगाचे नकळत मेंबर झालो आहोत.  अमूक-तमूक मालिका बघितल्याशिवाय आमच्याकडे जेवण जात नाही, असे सांगणारे बरेच आहेत.  काही निवडक मालिका सोडल्या तर अन्य मालिकांमध्ये किती संस्काराच्या गोष्टी असतात....ब-याचशा नाहीतच...बघावं तेव्हा एकाचा पाय दुसरा ओढत असतो...आणि दुस-याचा तिसरा...कोणाची किती लग्न झाली हा तर शोधाचा विषय....हॉरर मालिका म्हणजे तर निव्वळ डोकेदुखी...(एकमात्र खरं की या हॉरर मालिकांमुळे व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट आणि मेकअप आर्टीस्टचे सुदीन आले आहेत) त्याच्यावर आपण कधी आक्षेप घेत नाही...मध्यंतरी एक मालिका माझ्या बघण्यात आली....दोन शेजारी एकमेकांच्या बायकांवर लाईन मारतात...त्यांच्यावर इंप्रेशन मारण्यासाठी कायकाय करतात...अगदी दारुही पितात...भाषाही तशीच...कोणी अशा मालिकेवर आक्षेप का घेत नाहीत हा मला नेहमी पडणारा प्रश्न....आपण वास्तवात असे वागतो का....बरं मालिका या अशा आणि त्यामध्ये दाखवण्यात येणा-या जाहीरातीही ब-याच वेळेला डोक्याला हात लावाव्या अशाच असतात...आता एका नूडल्सच्या जाहीरातीमध्ये मुलगी आईला तिच्या मित्र-मैत्रिणींसाठी काही बनवू नकोस असं तिच्याच तोंडावर सांगते...आणि दरवाजा लावून घेते...मग आई या शाळकरी वाटणा-या लेकीला पटवण्यासाठी नूडल्स बनवून नेते... मग हे नूडल्स खावून मुलीला कळतं की आई चांगलं काही बनवू शकते....देवा...नूडल्समुळे आईची पारख होते...शिवाय आईला उलट बोलणारी ही मुलगी कशी चालते...एका टू व्हीलरची जाहीरात बघून तर माझी डोकेदुखी वाढते...काय तर ती कमी पिते...एका टूटपेस्टच्या जाहीरातीत शिक्षकांच्या दातात अडकलेला पालक एक छोटा चारचौघात सांगतो....हे आपण नेहमी बघतो...आपली मुलंही बघतात..यावर आपला आक्षेप का नसतो...पण आपण कधी याबद्दल नापसंती व्यक्त करीत नाही...आणि असंस्कारी म्हणून त्या शिनचैनला लेबल लावलं जातं...आपण मालिका कुठलीही बघावी, पण त्यातून काय बोध घेतो हे महत्त्वाचे असते... लहान मुले काय बघतात हे पहाणे आणि ब-याच वेळा त्यांच्याबरोबर त्यांना आवडते ते पहाणे गरजेचे असते...आपण यापेक्षा मुलं टीव्हीसमोर बसली की आपली कामं हातावेगळी करायला लागतो..त्यामुळेच मुलं काय बघतात...त्यामागे त्यांची दृष्टी काय असेल... मालिका मुलांना कशामुळे आवडते हे जाणणे गरजेचे आहे...मी शिनचैन बघायला लागल्यापासून मला त्यात दिसलेल्या चांगल्या गोष्टी मुलाला सांगितल्या...शिवाय टूडी कार्टून म्हणजे काय...त्यासाठी बनवण्यात येणारे स्केचेस...अशा सर्वांवर आम्ही चर्चा करतो...मुख्ये म्हणजे ती किती बघायची याचं टाईमलिमीटही ठरलेलं आहे...मालिका फक्त दाखवतात तशी बघण्यापेक्षा त्या मालिकेच्या थो़डं मागे,  तिच्या मेकींगमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करायला हवा...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर आणि आपल्या संस्कारावरही थोडा विश्वास ठेवावा...एखादी मालिका बघितली की मुलं बिघडतील अशी फ्लेक्झी मुलं असतील तर त्यात मुलांची चूक की आपली...याचाही विचार व्हायला हवा, नाही का....
सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------------------------------------
 कृपया आपला अभिप्राय खाली नोंदवावा




Comments

  1. Interesting point of view! I liked the part where you compared it with the flawed daily soaps.

    ReplyDelete
  2. True that we get too much involved in tv serials which mostly are brainless . Children and we adults get swayed by advertisements.
    It is high time that we establish social checks on such media content.
    You have very good style of writing

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...सर आपल्या सूचना असल्यास नक्की सांगा..

      Delete
  3. खूपच छान... माझ्या दोन छोट्या मुली आहेत... याचा फायदा नक्कीच होईल...

    ReplyDelete

Post a Comment