ती येते तेव्हा..........




ती 
येते तेव्हा..........
गेल्या आठवड्यात ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला...सर्व सिनेरसिकांचे लक्ष या सोहळ्याकडे होते...भारतातील सिनेरसिकांसाठीही एक चांगली बातमी होती... उत्तर प्रदेशातील हापूर या गावातील महिलांवर बनवलेल्या एका माहितीपटाला शॉर्ट सब्जेक्टया विभागात सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे...मासिक पाळी हा या माहितीपटाचा विषय आहे...

भारतातच काय पण अन्य काही देशातही मासिक पाळी म्हणजे महिलांपुरता विषय म्हणून बघितले जाते.  या विषयावर खुलेपणान चर्चा होत नाही..खरंतर मासिक पाळी हा प्रत्येक महिलेच्या आरोग्याचा गाभा असतो...तो जपला पाहिजे, तिनेही आणि कुटुंबातील, समाजातील प्रत्येक व्यक्तीनेही...पण आपण त्याला कधी श्शी...पाळी आली...प्रॉब्लेम...कावळा शिवला...अशी नावं दिली आहेत...कधी सणाच्या दिवशी वा अन्य कार्यक्रमात जर मासिक पाळी आली तर स्वतः स्त्रीयाच आत्ताच यायला हवं होतं का....म्हणत उदास होतात...शहरी आणि ग्रामिण अशी विभागणी केली तरी मासिक पाळी हा नको असलेला विषय ठरतो..याच नकोशा विषयाला जागतिक प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.  पीरियड एंड ऑफ सेन्टेन्सहा माहितीपट डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्टया विभागात सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
पॅडमॅनम्हणून नावारूपाला आलेले अरुणाचलम मुरुगनंथम यांच्या कार्याने प्रेरित होऊन उत्तर प्रदेशातील गावात पॅड मशीन बसविणाऱ्या आणि त्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांची कहाणी यात आहे. उत्तर प्रदेशातील हापूर या गावातील महिला आणि मुलींनी मुरुगनंथम यांनी तयार केलेले सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करणारे पॅड मशीनगावात बसविले. त्यानंतर या महिलांना नेमके कसे अनुभव येतात, त्या सर्वांशी कशा संघर्ष करतात, या सगळ्याचे चित्रण या २६ मिनिटांच्या माहितीपटात आहे. गुणित मोंगा या माहितीपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. विविध पुरस्कार मिळालेल्या इराणी-अमेरिकी दिग्दर्शिका रायका झेहताबची यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. लॉस एंजेलिसमधील ओकवूड स्कूलच्या शिक्षिका मेलिसा बर्टन आणि त्यांचे विद्यार्थी यांनी स्थापन केलेल्या दी पॅड प्रोजेक्टया संघटनेने हा माहितीपट तयार केला आहे. मासिक पाळीशी निगडित अंधश्रद्धांमुळे या गावातील मुलींना सॅनिटरी पॅड्स मिळत नव्हती. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायचे आणि मुलींची शाळा सुटायची. गावात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसविल्यानंतर महिला स्वतःच पॅड्स तयार करायला आणि त्याचे मार्केटिंग करायला शिकल्या. त्यामुळे साहजिकच त्यांचे सबलीकरण झाले. फ्लायअसे त्यांनी केलेल्या पॅड्सचे नाव ठेवण्यात आले. या साऱ्याची गोष्ट माहितीपटात आहे.  अगदी ग्रामिण बोली भाषेत असलेला हा माहितीपट बघतांना आपल्या आसपास कथा होतेय असेच वाटते. 
मासिक पाळीच्या विषयावरील माहितीपटाला ऑस्कर मिळू शकतो, यावर माझा विश्वासच बसत नाहीये,’ अशी भावना दिग्दर्शिका रायका यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केली.  गुणित मोंगा यांनीही या पृथ्वीवरील प्रत्येक मुलगी ही देवता आहे, हे तिला कळलेच पाहिजे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे

या माहितीपटाचे विश्लेषण वाचतांना मला जाणवलं, हा माहितीपट खेड्यातील महिलांच्यावर केलेला आहे...पण आपल्या शहरी भागातील महिला तरी आज मासिक पाळीबाबत बोलू शकतात का....मला तर अजूनही तसा मोकळा अनुभव आलेला नाही....आपल्याच आसपास नजर टाका...आजही मासिक पाळीबाबत मोकळेपणाने बोलू शकत नाही...फार काय शहरी महिला पॅड वापरतात...पण किती महिला पुरुष दुकानदार असलेल्या मेडीकल शॉप वा अन्य दुकानातून मोकळेपणाने पॅडची मागणी करु शकतात...मैत्रिणींनो याबाबत प्रत्येकीचा एक काय अनेक अनुभव असेल, नक्कीच.  मध्यंतरी मी एका परिचितांच्या घरी गेले होते.  दोन दिवसांचा घरगुती कार्यक्रम...मला अचानक मासिक पाळी आली...मी त्या घरातील महिलेकडे पॅडची मागणी केली...तिने मला बाजुच्या रुममध्ये नेले. कपाटात एकदम कोप-यात लपवून ठेवलेला पॅड काढून दिला...सोबत घरात फार कुठे वावरु नकोस हा सल्लाही...मी सु्न्न झाले...एरवी आधुनिक म्हणून घेणा-यांची अशी विचारसरणी पाहिली की चि़डही तेवढीच येते....शहरात हा फरक तर गावात कसं असेल हा विचार तेव्हाही मनात आलाच होता...वास्तविक आपणच त्याला प्रॉब्लेम म्हणतो...पण मासिक माळी म्हणजे प्रॉब्लेम नाही तर ती न येणं म्हणजे प्रॉब्लेम असू शकतो,  हे कोणी सांगितले आहे का....
मला आठवतं...वरद सातवीत असतांना त्याला त्याच्या शाळेत बायोच्या शिक्षिकेनं Reproductive system  हा धडा शिकवला...त्या दिवशी शाळा सुटल्यावर तो घरात आला तेच मोठी प्रश्नवली सोबत घेऊन...तुला period येतात का...किती दिवसांनी...त्रास होतो का तुला...खूप त्रास झाल्यावर तू डॉक्टरकडे जातेस का....खरतंर मुलाने असे प्रश्न थेट विचारल्यावर माझी भांबेरी उडाली होती...पण नंतर मी सावरले...हळूच विचारलं...तुला कसं समजलं हे...तेव्हा कळलं शाळेत शिकवलं...धडाच आहे वेगळा period ची माहिती देणारा...आता पळण्याचा किंवा विषय टाळण्याचा काहीही मार्ग नव्हता...त्यामुळे त्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली...त्यांनी त्याला समजलेल्या भाषेत मला माझी या दिवसांत काळजी कशी घेतली पाहिजे हे समजावलं...वरुन अरे तू तुझी काळजी घेतली पाहिजेस...आराम कर...असा प्रेमऴ दमही दिली...बरं गाडी येवढ्यावरच थांबली नाही...रात्री नवरा ऑफीसवरुन आल्यावरही त्याच्यावरही अशाच काही प्रश्नांची सरबत्ती झाली... period च्या दरम्यान त्रास झाल्यास डॉक्टरचा सल्ला का घ्यावा...वरुन आईला आपण या दिवसात जपले पाहिजे हेही सांगून झाले...खरं सांगू मंडळी तेव्हा डोळ्यातून पाणी आलं...मासिक पाळीची वेदना स्त्रीच जाणू शकते...महिन्याची पाळी म्हणजे स्त्रीच्या आरोग्याची पावती असते...पण आपण तिला एका चौकटीत अडकवून ठेवलं आहे...मुलगा मला सर्व सांगत होता तेव्हा मी खरोखर त्या बायोच्या शिक्षिकेचे मनापासून आभार मानले...तिने मुलांना हा धडा शिकवला, पण त्यासोबत या विषयाचा जो संकोच समाजात आहे, त्यावरचा पडदा तरी दूर करण्याचा प्रयत्न केला...ही मुलं म्हणजे पुढची...या पिढीला मासिक पाळीचे शास्त्रीय महत्त्व समजले तरी खूप झाले....त्या प्रसंगानंतर जेव्हा जेव्हा मला मासिक पाळी आली तेव्हा माझ्या लेकानं त्याच्यापरीनं माझी काळजी घेतली, हे सांगतांना अभिमान वाटतो...आमच्या घरात आधुनिक वातावरण आहे...स्मार्ट फोन वापरतो...अमूक तमूक गाडी आहे...दरवर्षी परदेशातच फिरायला जातो...वगैरे....वगैरे...सांगणारे बरेच असतात पण वैचारिक आधुनिकपणा कधी घेणार हेही सांगायला हवे..नाही का...
काही वर्षापूर्वी माझी डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याबरोबर ओळख झाली...मितभाषी असलेल्या स्नेहलता मॅडम म्हणजे सरस्वतीचं दुसरं रुप...एवढं ज्ञान...समाजात असलेला मान...तरीही स्वभाव म्हणजे दुधावरची साय...त्यांच्याकडे गौरी गणपती असतात... मॅडमनी गणपतीला आवर्जुन बोलावले...शिवाय मासिक पाळी असेल तरीही ये हं...आमच्याकडे तसलं पाळत नाहीत...असंही सांगितलं...किती समाधान मिळालं असेल...बरेच वेळा आपल्याला आपलेच विचार अतिरेकी वाटतात...संघर्ष करावासा वाटतो...पण करता येत नाही...का नाही...हा प्रश्न मनात असतो, पण विचारता येत नाही...अशावेळी या सर्व संतापावर अशी, डॉ.स्नेहलता देशमुख यांच्यासाऱखी व्यक्ती भेटली की हलकेच पांघरुण घातलं जातं...किती सहज आणि सोप्प्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आणि स्विकारलंही...उगीचच कोणी मोठं होत नाही हेही खरचं...
वास्तविक या दिवसात महिला शारीरिक त्रास सहन करत असतात...वेदना होतात...थकवा...चि़डचिड...असे अनेक प्रकार...या काळात तिला समजून घेण्याची गरज असते...पण ब-याचवेळा तिची हेटाळणी होते...त्यामुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही पातळीवर तिला एकाकी लढा द्यावा लागतो...इथे शेतात काम करणारी महिला असो की ऑफीसमध्ये काम करणारी असो वा घरात असणारी असो सगळ्याच सारख्या पातळीवर येतात...
समाधान एवढचं की पीरियड एंड ऑफ सेन्टेन्सया माहितीपटाच्या मुळे पुन्हा हा विषय चर्चेत आला...मान्य आहे की काही प्रमाणात सुविधा येत आहेत.  सॅनेटरी पॅड सहज मिळतील अशी सोय होत आहे...पण सोयी बरोबरच मानसिकताही सुधारली पाहिजे...यासाठी आपण आपल्या घरातच पहिल्यांदा डोकावून पहाण्याची गरज आहे.  या आठवड्यात महिला दिन साजरा होईल...एका दिवसाच्या सोहळ्याला या विचाराचे कोंदण दिले तर महिला नक्कीच स्वतःला दीन समजणार नाहीत...

सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------
कृपया आपला अभिप्राय खाली नोंदवावा


Comments

  1. Very nice article on the subject "periods" keep it up.

    ReplyDelete
  2. TODAYS TOPIC IS VERY EMOTIONAL.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks...pls follow...its every saturday

      Delete
  3. आदरणीय सईजी महिला विषयक प्रश्न अतिशय छान आणि विस्तृत पणे आपण मांडलाय

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks...pls follow...its every saturday

      Delete
  4. अतिशय संवेदनशील विषय उत्तम मांडला आहेस.मुख्य म्हणजे डॉ.स्नेहलता देशमुखांनी गौरी गणपतीचे निमंत्रण इतकं वेगळं दिलयजे नक्की परिवर्तनाच्या दिशेने जाणारं आहे.खूप छान लेख!

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान मॅडम...सगळ्या महिलांचा विषय..पण तरीही मांडतांना धाकधूक होती...पण आपल्या सारख्यांच्या प्रतिक्रीयेमुळे पाठबळ मिळतं...धन्यवाद

      Delete
  5. मासिक पाळी हा विषय मांडलेला असलेल्या सिनेमाचं ऑस्कर आणि त्या वरून तुझा ब्लॉग छान आहे समाजमन अजूनही बदलतंय हे मात्र आहे

    ReplyDelete
    Replies
    1. हो...नक्की...पण वेळ द्यावा लागेल...धन्यवाद

      Delete
  6. Khupach kahitari ghan ahe as samjnaryana changlach dhada milel keep it up

    ReplyDelete
  7. Vegal ghan as samjnaryanache changlech dole ughadles keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks...pls follow...its every saturday

      Delete
  8. खुप छान, अप्रतिम...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...फॉलो नक्की करा प्रशांतजी...

      Delete
  9. खुप छान.आज समाजात या विषयावर अजुन लेखन होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  10. खुप छान सई . एका सवेदनशील विषयावर लेखन करून तो उत्कृषटरित्या मांडलास.

    ReplyDelete
  11. Period yaa vishayawar swata ani gharatil etar sadhsyani support dila pahije he tumchya family kadun Navin shiknyasarke aahe.
    Informative lekh

    ReplyDelete

Post a Comment