अवयवदान... आई आणि मी





अवयवदान...
आई आणि मी
निवडणुकीमुळे सर्वत्र बातम्या म्हणजे फक्त राजकारणाच्याच....असा रेटा चालू आहे...या निवडणुकीव्यतिरिक्तही काही बातम्या घडतात, मात्र त्या फार अल्प प्रमाणात आपल्यापर्यंत पोहचतात...अशीच एक बातमी वाचनात आली... रक्तगट जुळत नसतानाही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या मुलाला जीवदान मिळाले. या मुलाला वर्षभरापासून कोणताही संसर्ग झालेला नसून वर्षभरात त्याच्या वजनात १० किलोने वाढ झाली आहे. परळ येथील ग्लोबल रुग्णालयात वर्षभरापूर्वी आठ वर्षांचा एक मुलगा मूत्रपिंडाच्या आजाराने दाखल झाला होता. त्याच्या मूत्रपिंडात जन्मत:च दोष होता. वारंवार जंतुसंसर्ग होऊन त्याचे उजवे मूत्रपिंड निकामी झाले होते.  कुपोषणामुळे या मुलाची वाढ खुंटली होती. त्यामुळे त्याच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे होते. त्या मुलाच्या आईचा आणि त्याचा रक्तगट जुळत नसल्यामुळे त्याला आईचे मूत्रपिंड बसवण्यात मोठी अडचण होती; परंतु या मुलाचे मूत्रपिंड बदलणे अत्यावश्‍यक असल्यामुळे डॉक्‍टरांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली, आणि त्यात त्यांना यश मिळाले...
आज किडनी विकारांनी लाखो रुग्ण बाधित आहेत.  या रुग्णांसाठी ही बातमी आशादायी ठरणार आहे.  मार्च महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारपासून जागतिक स्तरावर आठवडाभर किडनी आजार जागृती सप्ताह पाळला जातो. आज जगभर जवळपास ८५ कोटी जनता किडनीविकाराने ग्रस्त आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. त्यापैकी ८५ लाख जनता
क्रॉनिक किडनी अर्थात दुर्धर मूत्रपिंड आजाराने ग्रस्त आहेत.  यंदा जागतिक आरोग्य संघटनेने 'हेल्दी किडनी फॉर ऑल' अशी संकल्पना ठरवली आहे.   किडनी ही आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अंग आहे. लाइफस्टाइल आणि एखाद्या औषधाच्या दुष्परिणामामुळे अनेकदा किडनीमध्ये समस्या होऊ शकते. किडनी म्हणजेच मूत्रपिंडे, अशुद्ध रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. आपली बदललेली जीवनशैली या आजाराला कारणीभूत ठरत आहे.  अशावेळी अवयदान हा मोठा आधार या रुग्णांसाठी ठरु शकतो.  त्यामुळे अवयवदानाबाबतीतही जनजागृती करण्याचे आवाहन बातमीमध्ये करण्यात आले होते.

ही बातमी वाचून तीन ते चार वर्षापूर्वी माझा आणि माझ्या आईचा संवाद आठवला.  आईचा वाढदिवस होता.  माझ्याकडे दुपारी जेवायला आली होती.  वरदपण शाळेतून आलेला.  आजी आली म्हणून तोही खूष... आई आल्यावर त्या दोघांच्या गप्पा रंगल्या....जेवता जेवता आईनं माझ्यावर बॉम्ब टाकला...ती सहज म्हणाली, सर्वांचं चांगलं झालं...आता मी मरायला मोकळी...मी तिला थांबवलं, वाढदिवसाच्या दिवशी काय बोलतेस, म्हणून ओरडलेही...पण ती कशाला ऐकतेय...पुढे म्हणाली, मी गेल्यावर माझ्या शरीरातील काही अवयव कोणाला देता येत असतील तर नक्की दया, आणि उरलेलं शरीर वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करणा-या मुलांना लागतं ना अभ्यासाला त्याला द्या...बापरे...काय बोलतेय ही...माझा तर घासच अडकला...एक तर आईचं जाणं...याची कल्पनाही करवत नाही...आता मी सुद्धा वयाची चाळीशी ओलांडलीय...पण आईपुढे लहानचं की...अजूनही साधा खोकला-सर्दी झालं की, आईची आठवण होते...लगेच तिला फोन करायचा...ती सुद्धा वेळ काढून येणार...आणि तिच्या फक्त येण्यानेच सर्व आजार बरे होतात, हेही खरंच...असे किती प्रसंग आले...आईसारखी सोबत...आईचा सल्ला...हेच रामबाण औषध....खरं तर आई ही स्वतंत्र लेखनाचा विषय...दर शनिवारी तिची फेरी माझ्या घरी होते...का तर तिचा जावई तेव्हा घरी असतो.  मग जावयाने केलेला खास चहा आणि मारी बिस्कीट खात आई आणि जावयाची जोडी जगभरातल्या तमाम विषयावर चर्चा करते...माझा मुलगा तर आजी केव्हा येणार याकडे डोळे लावून बसलेला....तिच्या हातच्या पदार्थाची डीश हाती पडली तर चाटून पुसून खाणारा...आई बोलत असतांना हे सर्व विचार माझ्या डोक्यातून पास होत होते...आई काय बोलतेस तू...काय पण काय...मी रडकुंडीला आले तरी ती खंबीर होती...नेहमीप्रमाणे...मलाच अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगितले...आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मानवी देहाची किती गरज लागते हेही सांगितले...वरुन आपण जिवंत असतांना नाही तर मेल्यावर तरी कोणाच्या उपयोगी पडलो तरी खूप झाले...असे मोठे बोलही मला ऐकवले...

आई बोलली तेव्हा मी तुझं काहीतरीच...म्हणून तिला शांत रहायला सांगितले...पण मला नंतर आईचे खूप कौतुक वाटले...आमची आई म्हणजे चालता बोलता ग्रंथच....घरी साधी सत्यनारायणाची पुजा असेल, आणि भटजींनी एखादी उच्चार चुकीचा केला...वा थोडं जरी विसरले तरी आई लगेच त्यांना थांबवून, चुकीची दुरुस्ती करुन घेते...गणपतीची प्रतिष्ठापना करतांना आमचा दादा खास गुरुजींना आणतो...कारण गणपतीच्या एकवीस पत्री तिने कुठून कुठून गोळा केलेल्या असतात...त्या सांग्रसंगित बाप्पाला अर्पण करतांना वेळही तेवढाच लागतो.  तिची पूजा...मंदिराचे दौरे हा कधी कधी आमच्या गमतीचा विषय असतो.  असे धार्मिक विचार असलेली आई एकदम अवयवदान आणि शरीर दानाबाबत बोलायला लागली तेव्हा डोळ्यात पाणी आले...पण नंतर विचार केला तेव्हा जाणवले की आईने नकळत आपले डोळे उघडले आहेत. अवयव दान करणे हे बोलायला सोप्पे आहे. पण मंडळी ती म्हणजे मोठी जबाबदारीच नाही का...आपल्या शरीरातील अवयव दुस-याला द्यायचे, अर्थात आपल्या पश्चात...पण त्यासाठी आपले हे अवयव चांगले जपण्याची जबाबदारीही आलीच ना...त्यासाठी योग्य आहार...व्यायाम...हवा...शरीर सुदृढ हवे.  ही जबाबदारी मोठीच आहे ना...आज या वयातही आई रोज किती चालते याची नोंदच नाही...तिचा उत्साह तिला या चालण्यातून मिळतो...आता कालपरवा तिचा वाढदिवस झाला...वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षात तिनं पदार्पण केलं आहे.  पण सांगायला काहीच हरकत नाही आजही जरा डोकं दुखलं की ती सोबत असावी असं वाटतं...
असो...आईनं अवयवदानाचं महत्त्व सांगितल्यावर या विषयावर आमच्या चिरंजीवानंही आमची शिकवणी घेतली...बायोलॉजीच्या भाषेत मनुष्याचे अवयव तयार करणे किती अवघड काम असतं...त्यांचं वास्तविक आयुष्य किती आहे...आपण ते अजाणतेपणामुळे कसे कमी केले आहे...वगैरे वगैरे...वरुन आजी किती जाणती आहे...हेही बोल आलेच...एकूण काय मलाही या विषयाची माहिती शोधण्याची संधी मिळाली.  अनायसे त्यानंतर काही दिवसांनी आम्ही नवरा बायको वार्षिक आरोग्य तपासणी करायला गेलो होतो.  तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये अवयवदान दिन साजरा होत होता...13 ऑगस्ट रोजी हा दिन साजरा होतो.  नेमका तोच दिवस होता तो...तिथे समजलं एक देह सात जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरु शकतो.  आम्ही दोघांनी तेव्हाच अवयवदानाचा फॉर्मही भरला...

आज वैद्यक शास्त्र प्रगतीपथावर आहे.  पूर्वी डोळा बसवला इतपत बातम्या यायच्या. आता किडनी, ह्रदय, गर्भाशय याचे प्रत्यारोपण केले जाते.  पण हे करण्यासाठी असे अवयवही उपलब्ध लागतात.  त्यामुळेच ज्यांचे अवयव दान केले जातात त्यांच्या कुटुंबियांचे खरे तर कौतुक करायला हवे.  वास्तविक त्यांच्यासाठी तो दुःखद प्रसंग असतो.  पण आपले दुःख बाजुला ठेऊन दुस-याच्या आयुष्यात आनंदाचा अंकूर लावण्याचे काम ते करतात.  त्यांच्या धैर्यानेच अनेकांचे जीव वाचले आहेत. त्यामुळे मंडळी आपण आपल्यावर, आपल्या शरीरावर प्रेम करुया....मनुष्याच्या पश्चात काहीही रहात नाही.  हे वास्तव सत्यही बदलले आहे.  मनुष्याच्या पश्चात त्याचे सर्व अवयव कार्यरत राहू शकतात...दुस-या शरीरात ते नवा आशेचा किरण लावू शकतात...अर्थात त्यासाठी अवयवदानाच्या चळवळीला आपण स्विकारले पाहिजे हे नक्की....
सई बने
डोंबिवली
कृपया आपला अभिप्राय खाली नोंदवावा




Comments

  1. तुझ्यावरचे उत्तम संस्कार आईकडून झाले आहेत.हे वाचताना जाणवतं.तुझ्या आईला सप्रेम नमस्कार सांग

    ReplyDelete
    Replies
    1. मॅडम नक्की सांगते...आई म्हणजे आईच...अजून तिला वाचून दाखवायचंय...बघूया तिची काय प्रतिक्रीया येते ते...

      Delete
  2. अवयवदानाची चळवळ व्यापक बनली पाहिजे.तुझ्या आईचे विचार थोरच आहे.तुम्ही उभयतांनी अव्यवडणाची फॉर्म भरून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.ब्लॉग खूपच छान असेच लिखाण अपेक्षित आहे.best luck

    ReplyDelete
  3. अवयवदान श्रेष्ठदान janjagrutijanjagruti nice blogs.

    ReplyDelete
    Replies
    1. हो मॅडम....अवयवदान हे श्रेष्ठदान आहे...धन्यवाद

      Delete
  4. लेख छान आहे.अवयवदानाबद्दल जनजागृतीची गरज आहे.

    ReplyDelete
  5. आदरणीय सईजी अवयव दान हा विषय आपण अतिशय समर्पक रितीने मांडलाय
    आपण लिहलेल्या लेखातील प्रथम चरणाच्या टप्यातून आम्ही 2006सालीगेलेलो आहे,
    ऊधभ्वलेली परिस्थिती आणि त्यातून मार्ग काढताना झालेली दमछाक मी अनुभवलेली आहे,
    होता तो पाठिराखा म्हणून वेळेतच निदान होऊण प्रश्न निकाली निघाला
    मात्र त्या वेळी आम्हास अपल्याआताच्या लेखातील शब्ध न शब्ध अनुभूतीस आला हे मात्र नक्की
    आम्ही आपणास धन्यवाद देतोआणि अपल्या ह्या प्रयत्नास मोठा प्रतिसाद मिळो हीप्रार्थना करतो

    ReplyDelete
    Replies
    1. नितीनजी नमस्कार आणि धन्यवाद...आपल्याला अनुभव ऐकूनही अंगावर काटा येतो....या सर्वात आपण आणि आपल्या कुटुंबियांनी जे धैर्य दाखवले ते कौतुकास्पद आहे...

      Delete
  6. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ♥️♥️
    खूप छान अशी संकल्पना मांडली आहे ����
    अवयव दान ����

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गिरीश
      खरं आहे...आई हे दैवत आहे

      Delete
  7. My mother also donated her eyes at the age of 82.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप चांगला उपक्रम...आपलं माणूस कधीच आपल्या पासून दूर होत नाही. अवयवदानाच्या माध्यमातून कायम आपली माणसं आपल्यासोबत रहातात...

      Delete
  8. फारच सुंदर लेख आहे हा.तुमच्या पुढील लेखासाठी हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  9. चांगला लेख.अवयवदान केल्यानंतर देहदान करता येत नाही.अवयवदान फक्त मेंदू मृत स्थितीतच करता येते आणि अशी स्थिती फक्त ४% बाबतीतच असते त्यामुळे अवयवदान हे तेवढे आपल्या हातात नाही. बाकी ९६% बाबतीत देहदान करता येते ज्याचा उपयोग वैद्यकिय विद्यार्थ्यांना शरीररचना शिकण्यासाठी होतो.देहदानापुर्वी नेत्रदान आणि त्वचादानही जरूर करावे जे अवयवदानानंतरही करता येते. ही दोन दाने फारच सोपी असल्याने ती तरी निदान प्रत्येकाने जरूर करावीच.
    नुसती वाहवा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आगाशे सर धन्यवाद...आपलं देहदान आणि अवयवदानाबाबत जागृतीचं काम मोठं आहे. त्यामुळे आपला अनुभवही मोठा आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे, प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे.

      Delete

Post a Comment