सल्ले
सक्काळ सक्काळ धावपळ करायला कोण लावत असेल तर ती म्हणजे डोअरबेल...कधी
तरी असा दिवस असतो की सक्काळ पासून ही बाई काय मनावर घेते काय माहीत, सतत वाजत रहाते...शेजारी बाहेर गेले...त्यांचा
दूधवाला आला...मग असंच कोणी...फार काय टाटा बाय बाय करुन कामावर गेलेला नवराही
धावत धावत परत...का तर पाकीट विसरला...शेवटी ती स्थिरावली असं वाटलं...लेकाला
पोटभरुन खाऊ दिला...त्याचा अभ्यास सुरु...म्हणजे आता एक तास तरी मिळायला हवा...पेपर
वाचायला खूप झाला....मी कॉफी घेऊन पेपरची घडी उघडली आणि पुन्हा बेल...आता कोण....कपाळावर
आठी आली...बरं धीर धरा...जरा उठायलाही वेळ लागतो की...लगेच तीन-चार वेळा
बेल...जेवढ्या कपाळावर आठ्या काढता येतील तेवढ्या काढत मी दरवाजा
उघडला....मुद्दामच....समोर उज्ज्वला उभी...सर्व आढ्या एकसाथ गायब...माझी चांगली
मैत्रीण उज्ज्वला...अशा सकाळी आणि तिचा चेहरा बघून मी समजले, आज माझं वैचारिक
डस्टबीन होणार...काय ग... म्हणत मी दरवाजा उघडून तिला आत घेतलं....धाडकन खुर्चीत
बसली...तेव्हाच समजलं आज सॉलीड बिघडलं आहे बाईंचं....कशी आहेस...अचानक..अशी मी
सुरुवात केली....तर बाई माझ्यावर उखडल्या...लेकाची परीक्षा म्हणून काय फोन उचलायचेही बंद
केलेस का तू....अरे बापरे...मी मनात म्हटलं, बहुधा मोठा आ करायला लागणार...हो
का...सॉरी...म्हणत मी पडती बाजू घेतली...पाणी झालं...कॉफी दिली...सोबत
चकली-भाकरवडी आणि घरच्या खोब-याच्या वड्या...मात्रा हऴूहळू लागू पडत होती...घरच्या
ना...म्हणत उज्ज्वलानं कॉफीबरोबर खोब-याच्या वड्याही संपवल्या....मी हळूच
तिच्याकडे बघितलं...बहुधा सकाळचा नाष्टाही झाला नव्हता तिचा...दोन्हीही मुलांची बस
सकाळी साडेसहाला येते म्हणून डब्यासाठी तीही चारला उठते...मग नव-याचा डबा...घरातली
कामं....दुपारच्या जेवणाची तयारी....असं सर्वांसारखं तिचंही शेड्यूल व्यस्त...मग
आज काय झालं हा प्रश्न मला पडला....बहुधा माझा चेहरा बोलका असावा...तिने तो प्रश्न
लगेच वाचला...
मी थांबणार आहे थोडावेळ...तुला आणि वरदला चालेल
ना....त्याच्या अभ्यासात डिस्टर्ब नाही होणार....हळू बोलते....मी हो...हो...म्हणे
पर्यंत ती एकामागून एक पर्याय देत होती...शेवटी, अजून थोडी कॉफी घेऊया...मग चपात्या
करु....भाजी तयार आहे...जेवूनच जा...अशी माझी ऑफर ऐकून ती शांत झाली.
मी वाचत असलेला पेपर उज्ज्वलानं आवरुन
ठेवला. टेबलावरच्या डीशही आवरल्या. मी कॉफी कपात ओतेपर्यंत बेसीनमधली भांडीही साफ
झाली. माझ्याकडे थोडंसं बघून हसली. चला,
आता बोलायला हवं. मी मनात खूण बांधली.
उगाच इकडचं तिकडचं बोलण्यासाठी वेळ नव्हताच. मी सरळ विचारलं...काय झालं....बस्स मग गाडी
सुरु झाली. उज्ज्वला माझ्या पुढच्याच बिल्डींगमध्ये राहणारी. आमची मुलं एकाच शाळेत
जाणारी. त्यामुळे आमची बसस्टॉपवर मैत्री
जमली. पूर्णवेळ घर सांभाळणारी. लग्न
झाल्यावर लगेच सासू मुलीकडे रहायला गेली. तिला
नोकरी. त्यात नुकतेच दिवस गेलेले.
त्यामुळे सासूने या नव्या नवरीवर घर सोडून लेकीचं घर गाठलं. पुढे नणंदेचं बाळंतपण. तेव्हा उज्ज्वलालाही दिवस गेले. पण नणंद सासूला घेऊन गेली. नोकरीला गेल्यावर बाळाला कोण सांभाळणार...उज्ज्वलाची
आई गावाकडची. शेती सोडून ती लेकीकडे राहू
शकत नव्हती. त्यामुळे बाळंपणासाठीही ती
गेली नाही. आई पंधरा दिवस आली. लेकीचं बाळतंपण केलं आणि पंधरा दिवसाने गेलीही. सासू आली पण पहिल्या बाळतंपणाला आईनं घरी नेलं
नाही म्हणून रागावली. उज्ज्वलानं
नव-याच्या जेवणाचा प्रश्न मांडला. तेव्हा
मी होते ना.. असं उत्तरही आलं....पण मग आला का नाहीत हा तिचा प्रतीप्रश्न तिच्या
मनातच राहीला. पुन्हा नणंदेला मुलं
झालं. सासू तिच्या घरी पूर्ण अडकली. इकडे उज्ज्वलानं आपल्या लहानग्याला सांभांळत
घरही सांभाळलं. सण, समारंभाला शेजारी आणि
फोनवरुन आई, सासूबाईंचा सल्ला असं चालू झालं.
तिलाही दुसरं मुल झालं. अजून सासू
नणंदेकडे आहे. नाही म्हणायला आता मुलीला सुट्टी
असेल तेव्हा येते. नातवांना भेटायला. ती सुद्धा शाळेत जाऊ लागली आहेत. पण तरीही प्रश्न आहेच. मुलं आजीकडे प्रेमानं येत नाहीत, ही तक्रार. उज्ज्वलाच काही सांगत असेल, असा आरोपही. पण उज्ज्वला म्हणते, त्या असतात कुठे इथे. दोन दिवसांसाठी येऊन आणि मी आजी...मी आजी...असं
अधिकारानं सांगून कोणी प्रेम देतं का....पण हा प्रश्नही तिच्या मनातलाच बरं...आताही
दोन दिवसांसाठी सासू आली. या दोन दिवसांत सासूने या सूनबाईंना खूप कानमंत्र
दिलेत. आपले कुलाचार, गावच्या पूजा,
नातेवाईंकांकडे होणारे समारंभ हे तिने कसे केले पाहिजेत आणि नातवांनाही कसे शिकवले
पाहिजेत...वास्तविक उज्ज्वलाची दोनही मुलं अतिशय हुशार. सर्वात पहिली. क्लास नाही.
घरी अभ्यास. शिवाय दोघेही
खेळामध्येही राज्यस्तरावर खेळतात.
त्यांच्या व्यस्ततेमुळे ती फार कुठे जाऊ शकत नाही. अगदी गावी गेली तरीही नावाला अथवा नाहीच. आता हा मुद्दा तिच्या सासूला गावच्या
नातेवाईकांनी सांगितला. त्यांनी त्यातली
उज्ज्वलाची भूमिका न जाणताच तिलाच दोष दिला.
वास्तविक या सर्वात तिच्या नव-याने तिला खूप साथ दिली आहे. आम्हा मैत्रिणी ब-याच वेळा तिला यावरुन
चिडवतोही. पण इथे तोच वादाचा मुद्दा
झालेला. सकाळी सासूबाई लेकीकडे गेल्या. ती दहाला घर सोडते, त्याआगोदर त्यांना पोहचायचे
होते. त्यांना ओलामध्ये बसवून ही बाई थेट
माझ्याकडे आली...
सासूकथा संपल्यावर म्हणाली, आता हे सल्ले नकोसे
वाटतात ग....आम्ही कधी मागितले तेव्हा दिलेत का...मग आता कशाला...जेव्हा मदत हवी
वाटली तेव्हा कोणी आले नाही. आता मी अशी
वागते म्हणून सासूबाईंकडे तक्रार करावी आणि त्यांनीही मला न विचारता थेट
ओरडावं....म्हणजे मला माझी मतं नाहीच का...आम्ही कायम याला काय वाटेल....त्याला
काय वाटेल...या विचारानेच चालावं....का....या का
चं उत्तर माझ्याकडे कुठे होतं...मी काय....तुम्ही काय...असे अनेकजण या का
मध्ये भरडले गेले आहेत....मला प्रश्न विचारुन...माझ्यावर तिचा भार देऊन उज्ज्वला
थो़डी शांत झाली. व्यक्त होण्याचं समाधान
तिच्या चेह-यावर आलं. एव्हाना बारा वाजत
आले होते. माझ्या लेकरालाही भूक लागली
होती. त्याचीही चूळबूळ सुरु झाली. मी गपचूप भाजी चपातीची दोन ताटं भरली. एक लेकाला एक उज्ज्वलाला....सोबत ताक. एक वाजता तिच्या मुलांची बस येणार म्हणून तिही खाऊन
निघाली. निघतांना चल जाऊदे...हे सल्ले
देणारे काही सुधारणार नाहीत....आपण आपलं चालत रहावं...असं मलाच शहाण्याचे बोल
ऐकवून निघाली.

खरंतर अशावेळी सांगावसं वाटत अशा सल्ले
देणा-यांना मार दो गोळी....हम करे सो कायदा....पण नाही...मन आवरतं...तसेच शब्दही...ही
सल्लेदार मंडळीही आपलीच असतात की...ब-याचवेळा चार पावसाळे जास्त पाहिलेली... या
पावसाळ्यांचे व्याज त्यांना आपल्याला द्यायचे असते. त्यात आपण आपली मुद्दल जमवत असतो. त्यामुळे
हिशोबाचे वाद होणारच. मग यावर उपाय काय....मला तर वाटतं उपाय काही नाही...फक्त आपण
चार पावसाळे जास्त या कॅटेगरीत पोहचलो की आपले व्याज आपणच सांभाळावे म्हणजे
झालं...
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खरं म्हणजे फुकटात द्यायचा असतो म्हणून तर असे सल्ले दिले जातात.ते कितपत ऐकायचे ते आपलं आपण ठरवायचं.आणि हेच तू खूप छान लिहिलंयस.
ReplyDeleteहो ना...सल्ले देण्यासाठी काही मूल्य असतं तर चित्र वेगळं असतं...
Deleteखूप छान लेखन
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteKhup chaan
ReplyDeleteधन्यवाद मॅडम..
Deleteसल्ले देणारे खूप असतात ते मानणं आपल्या निर्णयावर अवलंबून असतं.घरातील कामात अडकलेल्या स्त्रीला स्वतःच असं आयुष्य कुठे असतं ?..आपला जन्म नवरा,मुलं, सासू,सासरे यांच्यासाठी व घरकामासाठी झालाय,तेच आपलं एकमात्र कर्तव्य आहे हे स्त्री जेंव्हा मनातून काढून टाकेल,स्वतःचा विचार करेल तेंव्हा कुठे खरं ती तीच आयुष्य जगेल.यात तिच्या जोडीदाराची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे,पण असे जोडीदार अभावानेच दिसून येतात.पण तरीही मला वाटत स्त्रीने इतरांशी गोडीगुलाबीने वागून आपल्या मनासारखं जगण्याचा प्रयत्न करावा.आयुष्य एकदाच मिळतं नाही का ?...लेख आवडला.
ReplyDelete