अवघ्या
आयुष्याचा
स्मृतीगंध
या आठवड्याची सुरुवात थोडी
आनंदी आणि थोडी नाराज अशीच झाली...आठवड्याचा पहिलाच दिवस आणि माझ्या लेकाच्या
शाळेचा शेवटचा दिवस...त्याच्या आणि आमच्याही आयुष्यातील एक पान पुढे जाणार होते ही
जाणीव आनंद देणारी होती. मात्र त्यासोबत यापुढे शाळेत जायचे नाही...शाळेचा गणवेश
आज शेवटचा घालणार ही भावना त्याला आणि आम्हालाही दुखवणारी होती. त्याची दहावीची परीक्षा संपली...आणि शाळेच्या दिवसाचे, सोनेरी
आवरण हरपले...गेली तेरा वर्ष तो आणि त्याच्यामुळे आम्ही पालक ओंकार शाळेबरोबर
जोडलो गेलो...या वर्षात एक अनोखे बंध आमच्यात जोडले गेले..पहिल्यांदा असणारी
धाकधूक कमी झाली.
शाळा आहे ना...काही
टेन्शन नाही...असा थोडासा निर्धास्तपणा आणि त्याच्यात दडलेला विश्वास शाळेने
दिला. आज याच विश्वासाच्या आणि शाळेच्या
संस्कारावर माझा लेक शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यावर जाणार आहे.
शाळेत फक्त प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा पाया पक्का होतो या विचाराची
मी कधीही नव्हते. शाळा हे शिक्षणासोबत
संस्काराचे माध्यम आहे. या माध्यमातूनच
आत्मविश्वासाचा पायाही रचला जातो.
संस्कार, आत्मविश्वास यांच्या सोबतीने शिक्षणाची जोड आपल्याला भावी
आयुष्यात उज्ज्वल यशाकडे नेते. मला माझ्या
शाळेकडून, एसआरटी हायस्कूल, रेवदंडा मधून हे शिकता आले.
आपल्या मुलानेही फक्त गुणांच्या मागे न धावता सर्वांगीण विकास करावा ही अपेक्षा
होती. शाळेच्या पहिल्या दिवशी रडून रडून
गोंधळ घालणारा... नंतर कित्येक महिने शांत असणारा...शाळा नको असे म्हणणारा आज माझा
लेक जेव्हा शाळा संपली असे बोलले तरी हळवा होतो...तेव्हा जाणवते शाळेने त्याला काय
दिले....सोनेरी आठवणी दिल्यात...आणि त्याहुनही अमुल्य असे संस्कार दिले आहेत.
माझी शाळा....आपली शाळा....या शब्दांमध्ये आत्मविश्वास आहे....प्रेम
आहे....आदराची भावना आहे....आज शाळा संपून वीस वर्ष होऊन गेली तरी साधं एसआरटी
हायस्कूल म्हटलं तरी माझे कान टवकारतात...शाळेच्या नावाची जादू अशीच असते...मनाला
तरतरीत करणारी...शाळेचे माध्यम कुठलं....बोर्ड कुठला...हे मला दुय्यम मुद्दे
वाटतात...शाळा ही शाळाच असते...अभ्यास शिकवण्यापेक्षा तो करण्याची सवय लागते. ही सवय शाळाच लावते. आयुष्यभराचे मित्र-मैत्रिणी मिळतात ती ही शाळाच
असते. आणि आठवणींचा अमुल्य खजिना आपल्या
खात्यावर जमा करते ती बॅंकही शाळाच असते. आज
जेव्हा मी, माझा मुलगा अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पुस्तकही वाचतो असं अभिमानाने
सांगते. तेव्हा त्याच्या या आवडीमागे त्याच्या शिक्षकांनी दिलेले वाचनाचे
बाळक़डू अधिक असते. अगदी हॅरी पॉटरचा
कुठला भाग उत्सुकता ताणणारा आहे, ते मिचिओ काकू यांची पुस्तके या सर्वांची चर्चा
शाळेत मोकळेपणाने झाली. आम्ही कधीही फक्त
अभ्यास ऐके अभ्यास केला नाही. शाळाबाह्य
असलेल्या स्पर्धा परीक्षांची वरदला पहिल्यापासून आवड...अर्थात ती शाळेनेच
लावलेली. त्यामुळे ब-याचवेळा शाळेची परीक्षा
अगदी एक-दोन दिवसांवर आली की शाळेचा अभ्यास हाती घेतला जायचा...मला काळजी
वाटायची....पण आमचा लेक बिनधास्त...शाळेत व्यवस्थित शिकवतात आणि मी तेवढ्याच
चांगल्या पद्धतीने शिक्षक शिकवतांना समजून घेतो,
काही आलं नाही की लगेच विचारतो...मग कशाला काळजी करायची...असा त्याचा मला
कायम येणारा सल्ला आणि प्रतिप्रश्न असायचा....अगदी आता आता म्हणजे दहावीच्या परीक्षेचा...बोर्डाचा
अभ्यास करतांनाही हाच सल्ला कायम होता...हा आत्मविश्वास त्याला शाळेने दिला. त्यामुळेच आता बोर्डाचे पेपर असतांना
सुट्टीच्या दिवसांतही शाळेमध्ये, शिक्षकांसोबत अभ्यास करण्याला त्यांनी प्राधान्य
दिले.
शिशूवर्ग ते दहावी हा टप्पा पार करतांना अनेक
शिक्षकांचे सहकार्य लाभले. आमच्या
प्राचार्या अर्चना परुळेकर यांचा शांत, संयमी स्वभाव नेहमी मार्गदर्शक ठरला. ब-याच
वेळा शाळेत काही कुरबुरी झाल्या की मी तावातावाने शाळा गाठायचे...पण त्यांनी
तेवढ्याच संयमीपणाने मला दोन्हीही बाजुंनी आरसा दाखवला...शाळेची बाजू सांगितली...या गोष्टीमुळे मी नेहमी आपण त्या जागी असतो तर काय केले असते याचा
विचार करायला लागले...मग माझ्या तक्रारी आपोआप कमी झाल्या. त्यामुळे मुलाची शाळा ही आम्हा पालकांचीही
शाळा झाली. या सर्व प्रवासात आभार कोणाकोणाचे मानावेत...सर्व
शिक्षकांचे आभार मानण्यापेक्षा कायम त्यांच्या ऋणामध्ये रहाणेच मला आवडेल...तरीही
मुद्दाम उल्लेख करावा वाटतो तो भाषेच्या शिक्षकांचा...कारण हा विषय वरदच्या
नावडीचा...पण या भाषा शिक्षकांनी तेवढ्याच संयमीपणे त्याला समजून घेतले. काही वेळा त्याचे आणि या शिक्षकांचे वाद झाले.
मला ही घटना दुखवणारी ठरली. पण त्याचे
शिक्षक माझ्यापेक्षा सरस ठरले. त्यांनी
त्याला तेवढ्याच हळुवारपणे हाताळले. या
सर्वांचे आभार तर शब्दात कधी व्यक्त करता येणार नाहीत.

मंडळी हा माझा अनुभव झाला...आपल्यापैकी
प्रत्येकालाच असाच अनुभव आला असेल. शाळा
कुठलीही असली तरी ही आपलेपणाची भावना कायम असते. आज अनेक मंडळी शाळा सुटल्यावर आपल्या
सवंगड्यांना शोधून गेटटूगेदर साजरे करतात.
मीही त्यांच्यापैकीच. दरवर्षी हे
गेटटूगेदर साजरे होतांना शाळेने दिलेले मित्र मैत्रिणी भेटतात. पुन्हा त्या गोड आठवणींमध्ये मन रमते. त्यामुळेच शाळेचे संरक्षण हे फक्त त्या शालेय
वर्षापुरते कधीच नसते हे मी अनुभवाने शिकले. मंडळी आपला काय अनुभव आहे....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
विशेष....मी डायट आणि आई...या माझ्या लेखानंतर अनेकांनी देहदान आणि अवयवदानाचे
अर्ज कुठे भेटतात याबाबत चौकशी केली.
ठाण्यातील श्रीपाद आगाशे यांचे याबाबत मोठे कार्य आहे. देहदान, अवयवदान आणि
त्वचादानाबाबत ते जागृतीपर व्याख्यानेही देतात. 9969166607 हा त्यांचा फोन नंबर आहे.
शाळा ही अभ्यासा बरोबर बऱ्याच गोष्टी शिकवते वर्तणुक, शिक्षकांबद्दल आदर,
ReplyDeleteमित्र, मैत्रिचे घट्ट नाते, शिस्त. आपल्या शाळेच्या कँटिन मधले आवडीचे पदार्थ असो किंवा काही शाळेचा रस्ता मिस करणार असतो. असे असतानाही आपणाला पुढे जावेच लागते. कालांतराने नंतर वॉट्स अॅप वर गृप होणारच असो आयुष्यभर शाळा ही आपल्या मनात एक घर करून असतेच.
धन्यवाद कुंतल...
Deleteमी १९६५ मध्ये शालांत परिक्षा (११वी ) उत्तीर्ण झाले.
ReplyDeleteइंडियन एज्युकेशन मुलींची शाळा क्र. १ या शाळेत माझे
५वी ते ११ वी शिक्षण झाले. ' आयुष्यभराचा स्मृतीगंध'
ब्लाॅग वाचताना मनात दरवळला. सई , खूप सुंदर लिहिलंयस.
अशीच लिहिती राहा. शुभेच्छा !
मॅडम धन्यवाद...माझी आई सुद्धा शालांत परीक्षा 11 वी उत्तीर्ण...ती मुंबईच्या पोद्दारची विद्यार्थिनी...शाळेच्या गप्पा सुरु झाल्या की अशा सर्वांच्या शाळेच्या आठवणी निघतात...
Deleteमला माझ्या शाळेची आठवण झाली. मी परळच्या आर्.एम्.भट शाळेत शिकले ह्या लेखामुळे पुन्हा एकदा मन शाळेत जाऊन आले.
ReplyDeleteमॅडम धन्यवाद...शाळा आणि शाळेच्या मैत्रिणी हे मनाला नेहमी उर्जा देणा-या गोष्टी आहेत.
DeleteAll the best for future adventures Varad!!
ReplyDeleteThanks Atharva
Deletegood1
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteमुलावर आई,वडील,आजी,आजोबा यांच्यापेक्षाही जास्त संस्कार हे शाळेतील शिक्षकांकडून होतात.मनाची जडण घडण होणाऱ्या वयात शालेय शिक्षकच आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचं काम करीत असतात.त्यामुळे चांगली शाळा,चांगले शिक्षक मिळणं हे आपलं व आपल्या मुलाच भाग्य ठरतं !..ओंकार शाळा,तेथील शिक्षक असेच शेकडो मुलांचे भाग्यविधाता म्हटले पाहिजेत.शाळेची स्मृतिगंध डायरीची कल्पनाही सुंदर आहे.
ReplyDelete