
दान....
काल तिला पहिल्यांदा
जवळून पाहिलं...पाठमोरी उभी होती...स्वतःबरोबर हसत होती...आपला चेहरा तिने
बागेच्या दरवाज्याच्या झडपेतून आत घातला होता...कितीतरी वेळ ती तशीच राहीली...आपल्या,
खेळणा-या मुलाला कौतुकानं बघत होती...मग अचानक काहीतरी आठवण झाली आणि मुलाच्या नावाने
आत बघून ओरडू लागली....काही वेळ थांबली...पुन्हा हाक मारत सुटली...तरीही मुलगा
येईना तेव्हा कंटाळली आणि माझ्या बाजुच्या बाकावर बसली....
कोण ती...उत्सुकता वाटली ना...ती म्हणजे दर आमावस्येला
येणारी....आमावस्या दे ग....म्हणून दर आमावस्येला म्हणजेच आमावस्या संपल्यावर ती हाका
मारत येते...तांदूळ, उडीद, मिठ यांच्या वेगवेगळ्या पिशव्या आणि तेलासाठी एक
बाटली...सोबत एक पिशवी...कोणी या धान्यासोबत जुने कपडे दिले तर त्यासाठी. वास्तविक आता या धावपळीत कधी आमावस्या आहे की
पौर्णिामा हे लक्षात रहाणे कठीण...मात्र या बाईची हाक आठवणीने ऐकू
येते. कधी
खिडकीजवळ असेल तर वाकून बघते...मुलाला कडेवर घेऊन डोक्यावरची टोपली सांभाळत ती एक
एक बिल्डींग पार करत फिरत असते. काल
परवा मात्र एवढया दिवसांनी तिला अशी समोरा समोर पाहिली...
पाच सहा वर्षाचा असेल...तिने लगेच दहा रुपये देऊन त्याला बाजुच्या दुकानातून बिस्कीटचा पुडा आणायला सांगितले...तेवढ्या वेळेत ही मिळालेले धान्य आवरायला लागली...मी बघत होते..धान्यासोबत काही कपडेही होते....घडी करुन आवरुन सोबतच्या पिशवीत ठेवीत होती...त्यातला एक टी शर्ट तिला मुलाच्या मापाचा मिळाला. तिचा मुलगाही तेवढ्यात आला बिस्कीट घेऊन. तिने त्याला पुढ्यात ओढलं. त्याच्या निळ्या काळ्या बनियानवर ते टी शर्ट चढवलं. ती आणि तिचा मुलगा दोघेही खुष...तो आनंदाने बिस्कीट खात बसला...त्याच्या आईचे कपडे आवरुन, भरुन झाले. हळूच म्हणाली, ताई तुमचा मुलगा आहे का, मला पुढच्यावेळी त्याचे जुने कपडे द्याल का, मी अशीच पुढच्या आमवस्येला येईन...मी तिला सांगितलं माझा मुलगा मोठा आहे...ती बरं म्हणाली...मी हळूच तिचं नाव विचारलं...नाव कळलं, सुगंधा...आमावस्या कशाला मागतेस, मी सहज विचारलं...मग सुगंधा बोलू लागली...माझी आई पण मागायची....ती साता-यातल्या खेडे गावातील...आईबाबा पोटापाण्यासाठी पुण्याला आले...वडील भाऊ मोलमजुरीची काम करायची...आईही मिळेल ते काम करायची...आमावस्या-ग्रहण असेल तर घरोघरी फिरुन दान मागायची...त्यात बरेचसे तांदूळ...डाळी...कपडे मिळायचे...का मागतात हे तिला माहित नाही, पण लोक देतात. त्यातून कधी कधी महिन्याभराचं धान्य मिळतं...शिवाय कपडेही...ग्रहणाला तर दे दान सुटे ग्रहण करत फिरायचं...आपल्यावरचे ग्रहणाचे दोष जातील म्हणून कपडे, धान्य अनेकजण देतात. मी हळूच त्या छोट्याकडे पाहिलं...तो बिस्कीटं तोंडात कोंबून परत बागेत खेळायला जायच्या विचारात होता...कोणी तरी दिलेले कपडे...ते ही आपल्यावरचे काही संकंट, आपल्या वरचे दोष जावेत म्हणून मिळालेले...असे धान्य आणि कपडे आनंदाने स्विकारुन ती आपल्या छोट्या लेकराला वाढवत होती...बाकीच्या दिवसात मिळेल ते काम करायचं...वरुन म्हणाली...तो हाय ना...काय होत नाय...
तिच्या या तो हाय ना या डायलॉगवर मी सुन्न
झाले...एक क्षण मला तिचा हेवा वाटला...काय होतं तिच्याकडे...दारोदारी पोट
भरण्यासाठी फिरत होती...लोकांनी दिलेले कपडे-धान्य स्विकारत होती...त्यावर तिची
गुजरण चालली होती...पण तिचं ते तत्व...मोठं वाटलं मला....तो हाय ना...काय होत
नाय....कसला आशावाद हा....तो म्हणजे ती मानते तो देव....त्या देवानचं तिला असं
जीवन दिलेलं...काबाडकष्ट...मुलाला घेऊन घरोघरी फिरायचं...दुस-याच्या मुलांवरुन
ओवाळून टाकलेले कपडे आपल्या लेकाला लाडाने घालायचे....किती दुःख होत असेल
तिच्यातील आईला...पण या दुःखाला ती कुरुवाळत बसली नव्हती....कितीतरी आशावाद
तिच्यात होता. क्षणभर मी माझी आणि तिची
तुलना केली....आज अचानक त्या मैत्रिणीचा येतेय म्हणून फोन आला तेव्हा माझी किती
धावपळ...त्रागा...त्यात दुधवाला उशीरा आला...नव-यानं आयत्यावेळी सांगितलं डबा
नको...आदी...किती बारीक सारीक गोष्टी...पण मी नको तेवढी चिडचिड केली होती..आता या
सुगंधाच्या बोलण्यातला आशावाद बघितला...मला तिचा आशावाद नक्कीच सरस वाटला.
आमावस्येला अशा काही बायका घरोघरी फिरुन धान्य
गोळा करतात...कदाचित फार कमी लोकांना हे माहित असेल. पण ग्रहणाच्या दिवशी मात्र या
बायकांची हाक ऐकू येते. दे दान सुटे ग्रहण
करुन घरोघरी फिरत असतात....जे जे मिळेल ते गोळा करतात...कोणा गरजवंतांना गरजेच्या
वस्तु देणं नक्कीच चांगलं...पण आपल्यावरचं काही वाईट असेल तर ते निघून जावं म्हणून
देणं कितपत योग्य आहे...मला नेहमी हा प्रश्न पडतो. जुन्या कपड्यांच्या रुपात आपल्यावरील पिडा
निघून जाते, मग ते कपडे जो स्विकारतो त्याला आणि घालतो त्याला ती पिडा लागते
का....मला हा प्रश्न नेहमी पडतो....खरं तर कुठल्याही गरजवंताला देण्यासाठी ग्रहण किंवा
आमावस्येचा मुहुर्त काढायला नको. ब-याचवेळा
दानाच्या निमित्ताने नकोशा वस्तू दिल्या जातात...आपल्या घरात अडगळ ठरत असलेल्या
वस्तू वाटल्या जातात. याने खरोखर दान
दिल्याचे समाधान कसे मिळत असेल...आज आपल्या आसपास अशा अनेक संस्था आहेत ज्या
कुठलाही स्थार्थ न ठेवता समाजातील उपेक्षितांसाठी काम करत आहेत...जिथे कमी तिथे
आम्ही असा त्यांचा भाव कायम असतो...आदिवासींसाठी काम करणारे आमचे डॉ़. अरुण पाटील,
मनुष्य मन माणुसकी हे ध्येय समोर ठेऊन आदिवासी आणि वृद्धांचा सहारा झालेले विजय
देशमुख, गड किल्ल्यांवर जाणारे आणि त्या किल्ल्यांच्या आसपास राहणा-यांसाठी विविध
उपक्रम राबवणारे चैतन्य राजगुरु...ही काही मंडंळी माझ्या परिचयाची आहेत. आपल्या सुट्टीच्या, हक्काच्या दिवशी ही मंडळी
आपला वेळ कुठल्या पार्टी वा मॉलमध्ये फिरण्यात घालवत नाहीत...तर आपल्या आवडत्या कामात
व्यग्र असतात. घरापासून दूर असलेल्या
आदिवासी पाड्यांमध्ये, वाड्यांमध्ये फिरुन त्यांच्या गरजा जाणून घेतात आणि आपल्या
परिने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
प्रश्न दानाचा नसतो तर त्या मागील भावनेचा
आहे. माझ्या सोकॉल्ड प्रगतीच्या आड येणारे
अडथळे दानाने दूर होतील असा समज काहींचा असतो.
अशांसाठी सुगंधाचा आशावाद ठोस उत्तर आहे.
कोणी कशा भावनेनं देतं यापेक्षा तो घेणारा ते कसं वापरतो हेच महत्त्वाचे आहे...आपल्या भावना काय याला
महत्त्व आहे. मनात चांगले विचार
ठेवा...तसेच विचार आचरणात आणा...चांगले होईल आणि चांगलेच होईल...हा आशावाद मला
सुगंधाने दिला....आता मी सुद्धा पुढच्या आमावस्येची वाट पाहतेय..तिच्या लेकासाठी
चित्रकलेची वही आणि रंग घेतले आहेत....शिवाय बॅट बॉलही...काही दान बिन
नाही...सुंगधाने मला एक धडा दिलाय...त्याबद्दल मी तिला ही फी देतेय...
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
कृपया
आपला अभिप्राय खाली नोंदवावा
Tucheble. Really vichar karayala lavanari ghatana ahe.
ReplyDeleteKhup chaan !!!!👍👍👍
ReplyDeleteदानाचे महत्त्व जाणून लिहीलेला छान ललित लेख
ReplyDeleteतुझी फी देण्याची संकल्पना सर्वानी अंमलात आणली तर वा देशात आनंद आणि मज्जाच मज्जा आपले मनःपुर्वक अभिनंदन
ReplyDeleteTrue importance of DAAN . Mastach
ReplyDeleteखूप छान सई, हा प्रश्न मलाही लहानपणी पडायच
ReplyDeleteपण त्यावेळी माझ्या आईने मला सांगितले की हे फक्त निमित्त आहे,त्या कारणाने तरी देण्याची सवय लागेल, लेख अतिशय सुरेख लिहिला आहेस, माझ्या डोळ्यासमोर आमच्या लहानपणी येणारी बाई ऊभी राहिली, अप्रतिम वर्णनं
आदरणीय सईजी
ReplyDeleteआपण हा विषय अतिशय मुद्देसूद मांडलाय त्यातिल बारकावे विस्रुत पणे अपल्या लिखाणातून वास्तवाची जान वाचकास पट्कन करुन देतात...
धन्यवाद
नित्तीन पाटिल(दादा)