मसाल्याचा सोहळा
फेब्रुवारी...मार्च
महिना सुरु झाला की घरातले साठवणींचे डबे वाजायला लागतात....माझ्याकडेही तसेच
आहे...एक एक डबा तळ गाठायला लागतो...मग मनाची चलबिचल सुरु होते...अरे बापरे हे
संपलं...हळद संपली...मालवणी मसाला संपला....गोड्या मसाल्याने तळ गाठला....ऐन परीक्षेच्या काळात पावभाजी मसालाही
तळाला गेला....पाणीपुरी....सांबार मसालेही दोन-तीन फे-यांसाठीच उरले...हे मसाले संपत
आले की घालमेल सुरु होते...छोट्या पाकीटात मिळणा-या मसाल्यांचे आणि माझे तेवढे छान
जमत नाही...घरी केलेले किंवा वर्षाकाठी साठवणीचे असलेले मसाले म्हणजे प्रत्येक
गृहिणीचा खजिना असतो...तसेच माझेही...पाकिटामध्ये मिळणा-या मसाल्यांची चव चांगली
असेल, पण त्याच्यात आपलेपणाची मजा येत नाही...त्यामुळे हे घरचे मसाले संपले की मला
स्वयंपाकघरात चुकल्यासारखं होतं...काय बनवायचं....हा प्रश्न पुढे उभा राहतो...बरं परीक्षांच्या
दिवसात लेकाचे जिभेचे चोचले वाढतात...ते पुरवतांना या घरच्या मसाल्यांची सोबत
लागतेच...पण ऐन परीक्षेमध्येच या मसाल्यांनी तळ गाठल्याने माझी अधिक धावपळ सुरु
झाली...

गेली अनेक वर्ष मावशी मसाले गल्लीमधील वालावलकर
मसाले यांच्याकडे मसाला बनवते...त्यामुळे माझाही मसाला तेथूनच होतो... अनेक वर्ष
त्यांचा फोनवर परिचय आहे. फोनवरुन मिरचीचा
दर काढायचा....मागच्या वर्षाचा पावती नंबर सांगायचा...मग त्यांनी त्या
पावतीप्रमाणे चालू वर्षाच्याही मसाल्याची यादी बनवायची....थोडे तिखटाचे प्रमाण
वाढवायचे असल्यास फोनवरुनच जिन्नसामध्ये फेरफार करायचा...मग मसाला तयार व्हायची
तारीख सांगायची...त्या तारखेला आमची मावशी लालबागच्या मसाला गल्लीत हजर
व्हायची....मग या स्पेशल मालवणी मसाल्यासोबत पावभाजी, पाणीपुरी, गोडा, काळा,
सांबार, मच्छी असे वर्षाचे मसाले घ्यायचे...आणि ट्रेनने डोंबिवली गाठायचे...मला
घरपोच मसाला आला की मी वर्षाचा मसाला झाला म्हणून तो शेजारी...नातेवाईक...मैत्रीणींना
द्यायचे...हा नेम चालू होता...पण मसाला गल्लीच्या आकर्षणामुळे आणि आणखी किती वर्ष
मावशीला त्रास देणार या भावनेतूनही मी स्वतः जाऊन वालावलकरांचे दुकान गाठायचे
ठरवले...


मला आठवतं माझी आई जेव्हा वर्षाकाठचा मसाला
बनवायला घ्यायची तेव्हा कितीही किचकट काम असलं तरी ते ती आनंदाने करायची...लाल
मिरच्या अंगणात वाळत टाकायच्या...त्या खडखडीत सुकल्या की त्यांची देठं मोडून बिया
काठायच्या...मग मिरच्या भाजायच्या पहिल्यांदा चुलीवर...मातीच्या खापरावर...नंतर
गॅसवर...सुके मसाले भाजायचे....हे सर्व मसाले भाजून झाले की मसाले कुटण्याच्या
गिरणीवर ते दळायला द्यायचे...बरं तो दळनवाला यात माहितगार...तरीही त्याला हजार
सूचना द्यायच्या...मग आपला मसाला दळून घरी आला की तो साठवण्याच्या बरण्यांमध्ये
भरण्याचाही एक सोहळा असायचा...चिनी मातीच्या या बरण्या मिरच्या वाळवतांनाच धूवून
उन्हात चांगल्या वाळवल्या जायच्या...मसाला आला की गल्लीत हक्कांच्या घरी तो वाटला
जायचा...मग या चिनी मातीच्या बरण्यांमध्ये हिंगांच्या खड्यासोबत तो बंदिस्त
व्हायचा...बरणी बंद करतांना पांढरा तलम कपडा वर लावला की ती मसाल्याचा छान वासही
त्यासोबत मुरला जायचा...हा सर्व सोहळा आई एनजॉय करायची...तेव्हा त्यातला तिचा आनंद
मला कधी जाणवला नाही...मिरच्या घरी आल्यापासून ते भाजेपर्यंत आई किती
शिंकायची...तिच्या अंगाची लाही लाही व्हायची...पण तिने कधी त्याचा त्रागा केला
नाही...आमच्या शेजारच्या जवळपास सर्वच घरात असेच वातावरण असायचे...या बायका कधी
मिरचीच्या ठसक्याने वैतागल्या नाहीत..उलट मसाला दळून घरी आला की त्यांचं छोटेखानी
हळदीकुंकू व्हायचे...आंबेडाळ...पन्हे...असा साधा पण श्रीमंत चवीचा बेत...किती आनंद
व्हायचा त्यांना आपल्या साठवणीच्या ठेव्याचा...लहान वयात या साठवणीचे महत्त्व कधी
कळले नाही...एवढा त्रास घेऊन कशाला तो मसाला करायचा...हा प्रश्न मात्र पडायचा...पण
पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही...तसेच संसारात पडल्याशिवाय या साठवणीच्या
पदार्थांचे महत्त्व कळत नाही...लग्नानंतर मी सुद्धा वर्षाचे मसाले करायला लागले
तेव्हा आईच्या मसाले सोहळ्याची आठवण नेहमी येत राहीली...आता घरात वाळवणे...देठ
मोडणी...किंवा भाजायलाही लागत नाही...त्यामुळे आईपेक्षा थोडी मी मागेच आहे...तरीही
मसाले गल्लीत गेले की या आठवणी नव्याने येतात...
मध्यंतरी मसाल्यासाठी लागण्या-या मिरच्यांच्या बाजारात
काम करणा-या महिलांवरील लेख माझ्या वाचनात आला...या मिरच्या सुकवायच्या, त्या
निवडायच्या, त्यांची वर्गवारी करायची...यासाठी अनेक महिला काम करतात...हे काम भर
उन्हात करायचे असते...भर उन्हात मिरच्या साफ करायचे काम या महिला कशा करत असतील हा
विचार मनात आला की अंगावर काटा उभा राहतो...बरं एखाद्या फुटापर्यंत मिरच्या
पसरलेल्या नसतात..तर मिटरभर त्यांची चादर असते...अशा वातारवणात काम करुन मिरचीचा ठसका
स्वतः सहन करणा-या या मर्दानींना खरा सलाम...हा लेख वाचल्यावर त्यांच्या अपार
कष्टामुळे आपले जेवण चवदार होते ही जाणीव झाली...आज माझ्या झणझणीत मसाल्याच्या
चवीमागे या महिलांचे कष्ट आहेत...शिवाय आई-मावशी आणि आमचे वालावलकर मसाले यांची
साथ आहे हे नक्की....
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
मसाल्याचा सुगंध इथ पर्यंत आला. मेहनत आणि समाधान याची जोड. मस्त सई.....
ReplyDeleteखूपच छान लेख
ReplyDeleteलेख खुप मस्त सजविला आहे आता मसाला पाठव झणझणीत जेवायची ईच्छा आहे
ReplyDeleteKhup khup manpurvak dhyanwad
ReplyDeleteKhup chaan lekh
ReplyDelete