
सुट्टीचे नियम
परीक्षा संपली आणि बाजारामध्ये आंबे दिसायला लागले की ख-या
अर्थानं सुट्टी लागली याची जाणीव होते...मुलांच्या शाळेला सुट्टी लागणं हे आईसाठी
सगळ्यात कसरतीचं काम असतं...एकवेळ शाळा सुरु असली की परवडतं....कारण ठरावीक वेळेसाठी
मुलं शाळेत जातात...अभ्यासाचा बराच ताण शाळेवर सोडला की चालतंही...पण शाळेला
सुट्टी लागली की कसलं वेळापत्रक नि कसलं काय...सगळा सावळा गोंधळ...
माझाही हा सावळा गोंधळ सुरुवातीला उडाला होता....लेकाला
सुट्टी...त्यामुळे सकाळी त्याला उठवायला गेलं, तरी सुट्टी आहे ना, झोपुदे...या
पासून सुरुवात....त्यामुळे दिवसाची सुरुवातच आळसात व्हायची....बाकी दिवसभर काय
करावं हा प्रश्न...पण गेल्या चार-पाच वर्षापासून आम्ही सुट्टीचंही छानसं शेड्यूल
बनवलं आहे...ते काही लिखित नाही...पण आम्ही दोघांनी काही नियम घालून घेतले
आहेत.
आताही त्या शेड्यूलनुसार परीक्षा संपली की, एकदोन दिवस असा आळस काढून लेकानं सकाळी लवकर उठून
आम्हाला मॉर्ऩिग वॉकला जॉईन केलं की जरा हायसं वाटतं...मग नेहमीपेक्षा थोडं लवकर उठून दर सुट्टीतील
आमच्या खास उद्योगाला सुरुवात होते...हा उद्योग म्हणजे आपल्या परिसरातील पक्षी
शोधायचा..एरवी घराच्या खिडकीमध्ये हक्कांनी येणारी चिमणी आणि नाष्टा, जेवणाच्या वेळा पाळणारा कावळा येवढे दोन पक्षी....आणि सतत घरटी करु बघणारे कबूतर सोडलं तर अन्य पक्षी बघता येत नाहीत...त्यामुळे सुट्टीचा हा आगळा छंद आम्ही लावून घेतला आहे....यंदा या छंदाची सुरुवातच चांगल्या शकुनाने झाली...अगदी थोड्या अंतरावर झाडात लपलेला सोनकावळा आमच्यासमोरच उडून दुस-या झाडावर बसला...या सोनकावळ्याला कधीही बघितलं की मला खूप आनंद होतो...लहान असतांना सोनकावळा बघितला की आई सांगायची आज काहीतरी छान होणार...बस्स, हे छान होणार मनात पक्कं बसलं...ते अजूनही आहे...आणि आता तर ते पुढच्या पिढीपर्यंतही पोहचलं आहे...सोनकावळा बघितला तसा मुलगा ओरडला आई सोनकावळा बघ....आज काय स्पेशल....त्याने त्याच्यापुरती छान होणार याची व्याख्या केलीय....छान होणार म्हणजे मला काहीतरी छान खाऊ करावा लागणार....मी मानेनेच होकार देऊन पहिल्यांदाच बघतेय असं त्या सोनकावळ्याला बघून घेतलं....तांबूस रंगाची त्याची शेपटी आणि लालबुंद रंगाचे डोळे....कावळा असला तरीही अंगावर....आणि नावामध्ये आलेल्या सोन्याने तो कितीतरी मोहक दिसत होता..नेहमीप्रमाणे मला तो जास्त दिसला की तुला, अशी माझी आणि लेकाची स्पर्धा लागली...त्याने शेपटीतून आणखी रंगाची छटा शोधल्या...अशाच पक्ष्यांच्या दुनियेत फिरायला गेलं की ही सुट्टी कारणी लागते....डोंबिवलीच्या टेकडीवर भल्या सकाळी गेल्यावर असे बरेच पक्षी पहायला मिळतात....पक्ष्यांची माळ असते...मग आपल्यापरीने त्या माळेतील पक्षी मोजण्याची स्पर्धा करायची...त्यांचे आवाज टिपायचे...जमलं आणि मिळालं तर एखाद्या पक्षाचं पिस घ्यायचं....
सुट्टीत करण्यासारख्या अशा अनेक गोष्टी मी
शोधून काढल्या आहेत...सुट्टीत करायचे काय हा मोठा प्रश्न असला तरी तो काही आजचा
नाही....माझ्या लहानपणी सुद्धा हेच प्रश्न
होते...त्याचे स्वरुप वेगळं होतं...पण सुट्टीत करायचं काय हा प्रश्न मात्र
होताच...जरा कळती झाल्यावर हा प्रश्न माझा मीच सोडवला होता...तेव्हा चांदोबाची
क्रेझ होती...चांदोबा हातात आला की पूर्ण केल्याशिवाय हातातून ठेवायचाच नाही....फार
काय पेपरवाले काका ज्या दिवशी चांदोबा घेऊन येणार असतील तेव्हा मी आणि दादा
त्यांची वाट पहात बसलेलो असायचो...मग ज्याचा हातात तो पहिला येणार तो पहिल्यांदा
वाचणार....नंतर सुट्टीमध्ये अशाच वाचनाच्या छंदामुळे कितीतरी आधार मिळाला....काही
पुस्तक आयुष्यात आली ती कायम घर करुन राहण्यासाठीच...त्यापैकीच एक म्हणजे, लुइसा मे अलकॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची ‘लिटल् वुइमेन’ ही कादंबरी...शांता
शेळके यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे...चारचौघी...‘लिटल् वुइमेन’ ही कादंबरी अठराशे
अडुसष्ट साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच ती प्रत्येक घरात जणू वाचली
गेली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. सहज, सोप्पी भाषा आणि आपल्या आसपास ती
पात्र वावरत आहेत इतका जिवंतपणा....हॉलिवूडतर या कादंबरीच्या प्रेमातच पडले...दोन
वेळा या कादंबरीवर चित्रपट निघाले... ‘लिटल् वुइमेन’ ही अमेरिकेतल्या ‘मार्च’ कुटुंबाची – विशेषत: त्यातल्या
मेग, ज्यो, बेथ आणि अॅमी या
चार बहिणींची कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण आणि आपल्या बहिणी
यांच्यावरूनच रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा
प्रेमळ नातू लॉरी यांनी गोष्टीला आणखी जिवंत केलं आहे. या चार बहिणी एकमेकींना
अतिशय जीव लावतात....त्यांची ही पात्र एवढी जिवंत वाटतात की, मी पहिल्यांदा आणि
आता केव्हाही वाचलं तरी या बहिणींपैकी कुठली बहिण
मी होऊ शकते याचा विचार करत बसते...
एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणी जीवनाचा अर्थ
सांगतात...माझ्या आयुष्यात या मार्च बहिणी केव्हा आल्या ते आता नक्की माहीत
नाही...पण जेव्हा आल्या तेव्हा त्या माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्या
आहेत...या सुट्टीच्या काळात एकदा तरी चारचौघी मी वाचून काढतेच....गेल्या अनेक
वर्षाचा हा अलिखीत नियम आहे...आता तर पुढे काय होणार...ज्यो रागवणार....मेगच्या
लग्नात धमाल होणार....नाजूक बेथचं आजारपण....आणि अॅमीची चित्रकला...हे सर्व पाठ
झालंय...पण सुट्टीमध्ये हे पुस्तक वाचलं नाही तर चुकल्यासारखं होतं....
वरदनेही असेच
वाचनाचे वेड घेतले आहे. सुट्टीमध्ये या वाचनाचा सुकाळ असतो...हल्ली त्याच्या
किंडलमुळे अनेक पुस्तके ब-याच कमी किंमतीमध्ये मिळतात... सुट्टी आहे ना, म्हणत
मध्यरात्रीही त्याला वाचतांना पाहून माझी चिडचिड होते...झोप आता म्हटलं तर तोही
मला पकडतो...तू पण वाचत बस ना....माझ्या मनातली इच्छा पकडतो...पण सकाळचे डबे
खुणावतात...मग त्याला थोडा वेळेचं बंधन घालून मी माझे बालपण आठवत झोपी जाते...
सुट्टीत
अलीकडच्या वर्षात मी आणखी एक नियम घालून घेतला आहे, तो म्हणजे पापड, फेण्या करण्याचा...खरं तर या
महिन्यात वाळवणाचे पदार्थ केले जातात, ही
आपली संस्कृती आहे...गावाकडे प्रत्येक घरात हे वाळवणाचे किती प्रकार केले जातात
याला गणती नाही...माझ्या लहानपणी आई सुट्टीची या वाळवणासाठी वाट बघायची...मग बटाट्याचे
वेफर्स, फेण्या, पापड, चिकोड्या, मिरच्या असे किती प्रकार आई करायची याची गणतीच नसायची...हे
पदार्थ बनवण्यासाठी आईचं नियोजन किती परफेक्ट असायचं...भल्या पहाटे उठून ती
या
सर्वांची तयारी करुन ठेवायची...मग एकदा पापड, फेण्या करायला सुरुवात झाली की त्या
उन्हात जाऊन वाळत टाकायला कधी कधी कंटाळा यायचा...पण नंतर रात्री जेवणात आपण
केलेला ताजा ताजा पापड तळून खातांना जो आनंद मिळायचा त्याची तुलना कधीच झाली
नाही...आता तयार पापड, फेण्या घेतांना माझ्या लेकाला हा आनंद कधी आणि कसा मिळणार
असा विचार माझ्या मनात आला आणि मी सुद्धा पापड, फेण्या करायचा घाट घरात घालू
लागले....अर्थात आईसारखे वर्षाला पुरतील एवढे नाही..पण निदान महिना निघाला तरी
चालेल...पण त्याला हे पदार्थ कसे करतात, त्यासाठी
मदत कशी करावी लागते, आणि ते करतांना त्यामागे किती कष्ट असतात याची जाणीव व्हावी
हा उद्देश मी ठेवते....
अलीकडे
सुट्टीतही अभ्यासासाठी त्याचा काही खास वेळ राखीव असतो...पण अन्य वेळी काय करायचं
याचाही नियम असला की सुट्टी कंटाळवाणी होत नाही....अनेक ठिकाणी चांगली व्याख्याने
होतात. काही नातेवाईक आणि मित्रमंडळींना
एरवी अभ्यासाच्या नावाखाली भेटता येत नाही, त्यांच्या भेटी. नेहरु सायन्स सेंटर, घारापुरी, प्रिन्स
म्युझियम, एशियाटीक लायब्ररी अशा अनेक
मान्यवर स्थळांना भेटी देणं हाही एक नियम आहेच...बरं या भेटी देतांना अख्खा दिवस
तिथे भटकंती करता येईल याचीही काळजी आम्ही घेतो...
शाळेच्या
सुट्टीकाळाबाबत काही वर्षापूर्वी एका मान्यवर शिक्षकांबरोबर माझी चर्चा झाली होती...ते
म्हणाले, दोन ते अडीच महिन्याच्या सुट्टीत मुलं काहीच अभ्यास करत नाहीत...त्यामुळे
जूनमध्ये शाळा सुरु झाली की पहिल्यांदा त्यांना गत वर्षाचे काही धडे द्यावे लागतात...माझ्या
मनात ही गोष्ट पक्की बसली...अभ्यासाचा काही वेळ राखीव ठेऊन मुलाच्या व्यक्तीगत
विकासासाठी ही सुट्टी फायदेशीर असल्याची मग मला खात्री होऊ लागली...आणि या
सुट्टीच्या नियमांची मजा वाढू लागली....बरं आता यावर्षी आमच्या नियमात भर पडली आहे...आता
लेकाचा किचनचा तासही सुरु केलाय...एकूण काय नियमांमध्ये सुट्टीची धमाल चालू आहे...
सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
वाचन,पक्षीनिरीक्षण,ह्याबरोबर स्वैपाकघराचे धडे सुरू केले आहेस ते छान आहे.
ReplyDeleteआदरणीय सई जी
ReplyDeleteसुट्टी आणि निसर्ग सानिध्य सोबत मुलांचे संगोपन या विषयी अपन अतिशय सुंदर लिखाण केलेलय...
ही निमित्ताने का होईना आज च्या सुट्या आणि मुलांचे टीव्ही मोबाइल याचे आकर्षणा पेक्षा अपन मांडलेला अतिशय सुंदर विचार हाच पालकांनी पाल्यास घडविन्याच्या दृस्टिकोणातुं अमलात आणावयास हवा
धन्यवाद
खूपच सुं द र लिहिलय.
Deleteमाझ्या मुलीं सहीत अनेकवेळा
वाचलेय मी.
खुप छान...
ReplyDeleteखूप छान लेख.
ReplyDelete