तुम्ही कुठले....


तुम्ही 
कुठले....
थिएटरमध्ये चित्रपट बघायला जायचं...हे माझ्यासाठी मोठं कसरतीचं काम....किती तरी अॅडजेस्टमेंट...तारांबळ...कधीकधी याला कंटाळून तो चित्रपट टीव्हीवर येईल तेव्हा बघू....म्हणत मी अनेक चांगले चित्रपट घरी बसून टीव्हीवरच्या जाहीरातींच्या जंजाळात बघितले आहेत...पण काही चित्रपट मनापासून बघायचेच असतात.  मग मनात असेल तेव्हा कशीही अॅडजेस्टमेंट होतेच...नुकताच प्रदर्शित झालेला ''वेडिंगचा शिनेमा' हा त्या रांगेतील दर्जेदार चित्रपट....या चित्रपटाचा पहिला टीझर आल्यापासून उत्सुकता वाढत होती.  एक तर त्याची स्टारकास्ट आपली वाटावी अशीच आहे... मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे हे आपलेसे वाटणारे कलाकार आहेत.  शिवाय शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी कशी आहे, याचीही उत्सुकता होती...त्यातही आणखी आकर्षण म्हणजे "चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही" म्हणत आपलेसे करणारे सलील कुलकर्णी हे चित्रपटाचे सर्वेसर्वा....त्यामुळे एक दर्जेदार चित्रपट असणार अशी खात्री होती...अनेक अडचणी पार करत आम्ही हा चित्रपट पाहिला, आणि ब-याच दिवसानंतर चांगल्या कौटुंबिक चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले.

मराठी चित्रपट बघायचा असेल तर थिएटरमध्ये जाऊनच...हा माझा बाणा असतो...पण त्यासाठी तयारीही मोठी असतेच...मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायचा म्हणजे तो कुठे आहे आणि शो कितीचा आहे याची शोधाशोध प्रथम करावी लागते...आम्हीही तशीच केली...त्यातून बहुधा सगळेच शो दुपारी तीन किंवा चारचे...बर काही ठिकाणी मंगळवार हा शेवटचा वार होता..त्यामुळे डोंबिवलीतील थिएटर टाळून संध्याकाळी सातचा शो म्हणून कल्याणच्या मॉलमधील शो ची तिकीटं बुक केली...त्यादिवशी मी आणि वरद पाच वाजल्यापासून तयार...पण सहा वाजले तरी नव-याचा पत्ता नाही.  शेवटी पाच-सहा मिनीटात तो आल्यावर समजलं डोंबिवलीत नेहमीप्रमाणे ट्राफीक जॅम आहे.  ओलाची रिक्षा बुक केली...तीही ट्रॅफीक मध्ये अडकली.  दहा मिनीटानंतर रिक्षा आली....रिक्षाचालकांनी कुठल्या कुठल्या रस्त्यांनी नेलं काही कळलं नाही...पण शेवटी कितीही टाळलं तरी ट्रॅफीक लागायचं ते लागलंच...फरक एवढाच की आम्ही कल्याणमध्ये पोहचलो होतो. मॉलच्या आसपास होतो...शेवटी अर्ध्या रस्त्यात रिक्षा सोडून धावत थिएटर गाठलं...आम्ही पोहचलो आणि वेडींग....सुरु झाला....
गीतकार म्हणून प्रसिद्ध असणारे सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्व आघाड्यावर नंबर वन कामगिरी केली आहे.  वेडिंगचा शिनेमा बघतांना प्रामुख्याने जाणवले की,  ही कथा आपल्या आसपास घडणारी आहे.  जशी कथा परिचयाची तशीच ती पात्र सुद्धा...यातील प्रत्येक पात्र आपल्या घरात सापडेलच...त्यातही मोठी गोष्ट म्हणजे आपले भाऊ कदम.  भाऊ हे प्रत्येकाला आपलेच वाटतात.  या चित्रपटातही त्यांनी अत्यंत लाघवी माणूस साकारला आहे... ख-या भाऊंचा जसा स्वभाव आहे, तसाच तो चित्रपटात दिसला..
काय आहे या सिनेमात..एक डॉक्टर मुलगी साध्या मुलाच्या प्रेमात पडते.  या मुलाचं मोबाईलचं दुकान...पण या डॉक्टर मुलीला मुलाच्या बिझनेसपेक्षा त्याचा साधा आणि सरळ स्वभाव अधिक आवडतो.  मुलगा सासवडचा आणि मुलगी मुंबईची...मुलगा भरल्या कुटुंबातला आणि मुलगी त्रिकोणी कुटुंबातील.  त्यामुळे लग्न करायचा निर्णय, त्यावर घरच्यांच्या प्रतिक्रीया...आणि मुलीचा लग्नापूर्वीचं शूट करण्याचा आणि त्याची फिल्म करण्याचा हट्ट...या हट्टातून हा चित्रपट साकारला आहे...दोन्ही कुटुंबाचं मनोमिलन या शूटमधून होतं. फार काय या दोन प्रेमी जीवांच्या मनातील वादळही या शूटच्या माध्यमातून बाहेर येतं आणि संपतही...कुठेही आरडाओरडा नाही....मारामारी नाही...डायलॉगचा अतिरेक नाही...की उगाच नको तेवढ्या मेकअपच्या आड लपलेली आणि नको त्या कप़ड्यामध्ये लपेटलेली पात्र नाहीत...अगदी सर्व साधं आणि सोप्प...मगाशी म्हटलं ना अगदी आपल्या आसपास घडतंय असंच वाटेल असं..

त्यातही मला या चित्रपटातील काही वाक्य अगदी मनापासून भावली....मुलीची आई आणि बाबा दोघेही डॉक्टर...आईचं स्वतःच हॉस्पिटल...साहजीकच ती आपल्या मुलीला भविष्यात आपल्या जागी बघत असणार...ते सर्व सोडून मुलगी साध्या मुलाच्या प्रेमात पडते आणि मुंबईपासून दूर राहण्याचा विचार करते हे आई म्हणून तिला पटलेलं नसंत...उलट मुलीचा बाबा..कूल मॅन...आई त्याला विचारते, आपली मुलगी अॅडजेस्ट होईलना मुंबईच्या सुखसोयींपासून दूर गेल्यापासून...बाबा सुखसोई बघत नसतो...त्याची सुखाची कल्पना थोडी वेगळी असते...तो माणसं बघतो...आणि सांगतो ती माणसं चांगली आहेत...आपली मुलगी सुखी राहील...आईलाही ते पटतं...ती सहज बोलून जाते, आपण मेट्रोमध्ये राहणारी माणसं उपनगरात राहणा-या माणसांबद्दल असा विचार का करतो....
या चित्रपटातल्या आईचे या आशयाचे वाक्य माझ्या मनाला चांगलेच भावले...तिने जणू शहरी आणि ग्रामिण समाजाच्या वर्मावर बोट ठेवलं आहे...आज आपण सोकॉल्ड शहरात राहतो...पण त्यातही शहर-उपनगर असा भेदभाव आहेच की...साधं काय आपण मध्य आणि पश्चिम असा भेद आपल्यात करुन ठेवला आहे....काल परवा मी डोंबिवली लोकल पकडली...त्यात मुलींचा ग्रुप होता...त्यातल्या बहुतांश मुलींनी जिन्सच्या हाफपॅन्ट घातल्या होत्या....मात्र काही बायकांना त्यांचा हा पोशाख सहन होतचं नव्हता...तिकडे सातांक्रूज, कफपरेडला असे कपडे चालतात...इथे कशाला...अशी त्यांची कूजबूज चालली होती....म्हणजे आपण आपल्या-आपल्यात सुद्धा किती फरक करुन ठेवला आहे, हे जाणवते...दादरला राहणा-या माणसाला वाटते डोंबिवली म्हणजे उपनगर...त्यामुळे तो दादरकर म्हणून भाव खावून घेतो...आणि डोंबिवलीत राहणारे बदलापूर..शहाडच्या लोकांपुढे भाव खावून घेतात...कसारा-कर्जत भागात राहणा-या आदिवासी बायका जेव्हा दादर किंवा ठाण्यात जंगलातला रानमेवा विकायला येतात तेव्हा ट्रेनमधील काही प्रतिक्रीया बोलक्या असतात...या आदिवासी बायका कधीही बसायला सिटवर जात
नाहीत...त्या अंग चोरुन दरवाज्याच्या बाजुला बसलेल्या असतात...तरीही काही बायका आपल्याला त्यांच्यांपासून दूर ठेवण्यासाठी किती खटाटोप करतात...हे बघितलं की जाणवतं आपण किती दरी निर्माण केली आहे...इथल्या इथे आपण शहरी आणि उपनगरी असा भेद इतका केला आहे...पुढे शहरी आणि ग्रामिण तर बोलायलाच नको....
ती सिनेमातील आई बरोबर बोलत होती...शहरात राहतांना, घड्याळामागे धावतांना आपण गावातल्या माणसाच्या मनातील ओलावा विसरत चाललो आहोत...एकूण काय सलील कुलकर्णींच्या वेडींगने आनंद दिला आणि मनाला काही प्रश्न विचारायला भागही पाडलं....

सई बने
डोंबिवली
--------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा





Comments

  1. सिनेमाची उत्तम समीक्षा केली आहेस त्या बरोबर एका वेगळ्या प्रश्र्नावर खरं लिहीलं आहेस.अग,मुंबईच्या मुली डोंबिवलीच स्थळ नाकारतात.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की बघा...निखळ आनंद आहे...

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. खूप छान पद्धतीने माणसातील दुरावा मांडला आहेस. आतातर सिनेमा बघावाच लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की बघ आशिष...उत्तम, दर्जेदार चित्रपट आहे...

      Delete

Post a Comment