तिची किंमत.....


तिची किंमत.....
कालपरवा भर उन्हात मी नेहमीप्रमाणे लेकाला स्टेशनवरुन आणण्यासाठी बाहेर पडले...गाडीवरुन जायचे असल्याने ओढणीचे शेवटचे टोकही वाया जाणार नाही असा चेहरा झाकून घेतलेला आणि डोळ्यावर गॉगल....दोन-अडीचच्या सुमारत्यामुळे गल्लीचा रस्ताही मोकळाच होता...जरा गाडीचा स्पीड वाढवला आणि ती नेहमीची, परिचयाची हाक ऐकू आली...काय ग...एवढ्या भर उन्हात कुठे निघालीस....मी गाडीचा वेग कमी केला....झाडाची सावली बघून गाडी थांबवली...तेवढ्यात ती आली...धापा टाकत...ती म्हणजे सगुणा...नावाप्रमाणेच सगुणा...मी कितीही चेहरा झाकून तिच्या समोरुन गेले तरी ती ओळखतेच...कशी...ते मात्र माहीत नाही....मग लगेच हाक मारणार...बरं हाक मारतांनाचा तिचा आवाज एवढा प्रेमळ की, कितीही घाई असली तरी पुढे जाता येणार नाही....आजही तसेच झाले....मी गाडी लावली..त्या गाडीला टेकून ती उभी राहीली...तिच्या वयाने आता पन्नाशी पार केली असेल...नवरा गेल्यावर खंबीर उभी राहिली...हाताला चव...आणि स्वभाव प्रेमळ...त्याला प्रामाणिकपणाची साथ...त्यामुळे जेवणाची कामे मिळाली...काही मंडळींनी तर तिच्या हाताची चव आणि लाघवी, निटनिटका स्वभाव बघितला आणि सर्व घराच्या चाव्याच तिच्या हाती दिल्या.  मग त्यांच्या मुलांना शाळेत सोडणे, आणणे मुलांच्या फर्माईशीनुसार डबे करणे, त्यांचे आवरुन देणे,  फार काय शाळेच्या वहीमध्ये बायोलॉजीचे डायग्रामही तिच्याकडून काढून घेतले जाऊ लागले...या मंडळींनी घरची एक व्यक्ती म्हणून तिला वागणूक दिली...काहींनी तर बाहेरगांवी जातांनाही तिला आणि तिच्या मुलांना सोबत फिरायला नेलंय...एकूण काय अशी अनेक घरं सगुणानं आपली केली आहेत...नाही म्हणणे नाही...हे तिचे सूत्र...पण माझ्याबरोबर जेव्हा बोलायला लागली, तेव्हा थोडी नाराज वाटली.

माझ्या गाडीला टेकून उभ्या राहिलेल्या सगुणाने बाटलीतील पाणी एका दमात संपवले...मला उन्हात फिरतेस म्हणून ओरडणारी सगुणा स्वतः मात्र अशीच फिरत होती...जरा डोक्यावर पदर तरी घे...ऊन बघ किती आहे...म्हणत मीच तिला दाटवले....तिने पदराने घाम पुसला...माझ्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत माझी, घरातील सर्वांची अगदी सासर-माहेरच्या सर्वांचीच चौकशी केली...वेळ मिळाला की भेटायला येईन, सांग सर्वांना हा तिचा हक्काचा निरोप तिने उभ्या उभ्या ऐकवला....एका घरातून जेवण बनवून ती आता दुस-या घरी जात होती.  त्यांच्या चाव्याही तिच्याकडेच...ते दोघेही नवरा-बायको कामावर जाणारे...तर मुलं कॉलेजमध्ये....मुलं आज दुपारचं जेवण बाहेरुन जेऊन येणार होती, त्यामुळे सगुणा आज जरा आरामात होती...मी तिच्याशी बोलतांना तिला बघतही होते...चाळीतल्या घरात तिचा संसार थाटलेला होता...कधीही तिच्याकडे गेले तरी तिचं छोटं घर लखलखित दिसतं...मला याचं नेहमी आर्श्चय वाटतं...तिला मी याबद्दल कितीवेळा विचारलंही...दरवेळी हसत म्हणते...त्यात काय एवढंसं तर आहे...कितीसा वेळ लागतो...त्या एवढंसं आहे, मध्ये कुठेही नाराजीची भावना नसते...उलट ते नसल्याचं समाधानच जास्त दिसत....नवरा गेल्यावर या सगुणाने दोन्ही मुलांचे शिक्षण केले...ती दोघेही आता कामाला आहेत...आता बाई मोठ्या मुलाच्या लग्नाच्या खटपटीत आहेत.  मुलांनी किती तरी वेळा सगुणाला घरी बसायला सांगितलं...तरी जोपर्यंत जमेल तोपर्यंत काम करायचं...हे तिचं नेहमीचंच वाक्य...आताही मी तिला सांगितलं...कशाला एवढ्या उन्हात फिरतेस....घरी बस...आराम कर....पुन्हा तेच वाक्य...शिवाय त्रास कसला...मला कोणी परकी समजत नाही...हातांनी सर्व घ्यायला सांगतात...हे विश्वासाचे बोल...मला माहिती आहे...तिचा स्वभाव तसाच आहे...कोणी तिला या स्वभावामुळे टाकून बोलत नाही,  आणि बोललं तरी या कानाने ऐकायचे...दुस-या कानाने सोडून द्यायचे...हे या बाईंचे आणखी एक तत्त्वज्ञान....ही छोटी-छोटी तिची वाक्यच तिला दुःखाच्या अनेक प्रसंगात साथ देतात असे मला नेहमी वाटते...पण आज बोलतांना ही सगुणा कधी नव्हे ती निराश दिसत होती...काय झालंय का..असं दोन-तीन वेळा विचारल्यावर पहिल्यांदा मला उशीर होईल म्हणून ती टाळू लागली...
गेल्या अनेक वर्षापासून मी सगुणाला ओळखते....मला ती दुखावल्यासारखी वाटली...तिला घरी बसून बोलू म्हटलं...तरीही नकोची री चालू होती...शेवटी कसंतरी कारण सांगितलं...एका ठिकाणी नवीन काम लागलं आहे...सुरुवातीला नवरा-बायको अशा दोघांचं एकवेळचं जेवण बनवायचं असं सांगितलं...त्यानुसार पैसे ठरले..काही दिवस सुरळीत गेले...नंतर जेवणाची माणसं वाढायला लागली...रविवरची पाहुणी आणि चार प्रकार नेहमीचे झाले...शिवाय जादाची वाटणं, भाज्या साफ करणे, भांड्यांची सफाई, दुस-या दिवशीच्या सकाळच्याही भाज्या कापून ठेवणे, फ्रीजची सफाई करणे आदी कामांची यादी वाढायला लागली. 
घराची मालकीण ऑफीसला जातांना टेबलावर कामांची यादीच लिहून ठेवते...
सगुणाने तिच्या ऑफीसला फोन करण्याचाही एक दोनदा प्रयत्न केला.  पण मिटींगचे निमित्त काढून मालकीणीने फोन बंद केला.  रविवारी बोलण्याचा प्रयत्न केला, पण पाहुणे आहेत, नंतर बोलू म्हणून सगुणाला टाळण्यात आलं...त्यात एक दिवस सगुणाने सुट्टी घेतली.  मग त्या एक दिवसाचा पगार कापून त्यांनी पहिला पगार दिला...सगुणाला याचा राग आला होता..एक दिवस सुट्टी घेतली...ती सुद्धा आधी सांगूनच...म्हणाली ते दोघंही ऑफीसला जातात ना...त्यांना आठवड्यातून एकदा सुट्टी असते, मग मला नको का...मी तर महिन्यात एकदाच सुट्टी घेतली...त्याचे पैसे कापावे...मग माझ्याकडून किती जास्तीचं काम करुन घेतात...त्याचे वाढीव पैसे का नाही....सगुणा तावातावाने बोलत होती.  मी पहिल्यांदा तिला एवढं चिडलेलं पाहिलं...म्हणून विचारलं...त्यांना सांगितलंस का हे तुझं म्हणणं....अर्थात तिनं सांगितलं नव्हतच...म्हणाली, दोघं तशी लहानच आहेत की...अजून जग कुठे बघितलंय त्यांनी, म्हणून अशी वागत असावीत...काय बोलणार मी....तिच्या समोरच माझ्या डोक्यावर हात मारुन घेतला....अग त्यांनी जग पाहिलं किंवा नाही हा मुद्दा कशाला हवाय...ते कमी पैसे देऊन तुझ्याकडून काम करुन घेत आहेत,  हे समजतंय ना तुला...मी पोटतिडकीनं तिला विचारलं...तेव्हाही तेच...जाऊदे...मे महिन्यात आठवडाभर गावी जाईन...तेव्हा सांगते जमत नाही म्हणून...प्रश्न काम करण्याचा होता, त्यापेक्षा त्या मंडळींना कळलं पाहिजे, की ते चुकीचं वागत आहेत...त्यांना तू काही गोष्टी स्पष्ट का सांगत नाहीस....मी पुन्हा आर्जव करीत सगुणाला सांगितलं...पण फरक नाही...तिला बहुधा व्यक्त व्हायचं होतं...कुणा तरी हक्काच्या माणसाला आपल्या मनातली सल सांगायची होती...ती तिने सांगितली, आणि मोकळी झाली...पुन्हा इकड-तिकडची चौकशी केली आणि मार्गस्थ झाली....मी तिच्या पाठमो-या आकृतीकडे बघत राहिले...

त्या चांगल्या कमवत्या जोडप्यापेक्षा हातावर पोट असणारी सगुणा नक्कीच मला भारी वाटली...सच्ची होती...प्रामाणिक होती....आपण फसवले जातोय हे जाणूनही क्षमाशील होती...काय आहे तिच्याकडे....फ्लॅट नाही, कार नाही, मोठा बॅंक बॅलन्स नाही...लौकीक अर्थाने सुख नाही...या गरमीतही तिच्याकडे टेबल फॅन...मुलांनी नोकरी लागल्यावर या वर्षीच कुलर घेतला...तेव्हा कोण आनंद झाला तिला...घरात एक सजीव सदस्य आल्यासारखी ती त्या कुलरची काळजी घेतेय...
आणि त्या जोडप्याचं काय...आपण कोणाला तरी फसवत आहोत,  याची जाणीव तरी त्यांना होती का...हा प्रश्न मला पडला...बहुधा आपण काय करतोय याची जाणीव त्यांना होतीच....मला त्यांचा राग आला होता...पण सगुणाचा विचार मध्ये आला आणि या जोडप्याची कीवच अधिक वाटली...आज सगुणासारखी जेवण करणारी महिला त्यांच्यावर उपकारच करीत होती...त्यांच्या दृष्टीने तिची किंमत शून्य किंवा सामान्य कामवाली बाई एवढीच होती...पण सगुणाने तिची आणि त्यांचीही किंमत वाढवली होती...वॉटस्अपवर कधीतरी एक व्हिडीओ बघितला होता...एक मालक आपल्या ड्रायव्हरसाठी शर्ट घ्यायला जातो, तेव्हा तो अगदी कमी किंमतीमधला शर्ट घेतो...आणि त्याचा ड्रायव्हर आपल्या मालकासाठी शर्ट घ्यायला जातो तेव्हा मालक वापरतो तसा भारीतला शर्ट घेतो...असाच वैचारिक फरक इथेही आहे...आणि यात सगुणाचा विजय झाला आहे.  कारण कष्ट कितीही पडले तरी समाधान तिच्याच पदरात पडलं आहे.

सई बने
डोंबिवली
--------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा



Comments

  1. खुपच छान लेख मैडम

    ReplyDelete
  2. घरात काम करणाऱ्या स्रियांना फारच गृहीत धरलं जातं.त्यांच्या इतकीच किंबहुना जास्तच गरज आपल्याला आहे ह्याच सर्वांनी भान ठेवलं पाहिजे हे समजवणारं लेखन

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मॅडम...खरं तर या महिला आपल्या ख-या मैत्रिणी असतात...नेहमी मदत करतात...

      Delete
  3. खुप छान लिहिलं सई

    ReplyDelete
  4. Lekh chhan ahe just like real story

    ReplyDelete
  5. सुंदर निखळ प्रामाणिकपणा , मानसिक समाधान, आणि जगण्याची उमेद फार छान सगुणाच्या रूपांनी मांडली आहेस. समाधान आणि वैचारिक फरक सुंदर लिहलेस. खूप छान.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....मनापासून धन्यवाद आशिष..

      Delete
    2. अभिनंदन

      Delete
  6. चारुशीला16 June 2019 at 22:04

    खुप छान लिहितेस सई

    ReplyDelete

Post a Comment