जांभूळ
आख्यान
सध्या निवडणुकीचे वारे आहेत...पण हवा मात्र एकच आहे...ती म्हणजे
तापलेल्या सूर्यदेवाची....काय गरम वातावरण आहे...कधी कधी सकाळचा मॉर्निंग वॉकही
सोडून द्यावासा वाटतो. झाडाची पानं
फेव्हीकॉल लावल्यासारखी बसलेली असतात...अशा गरम वातावरणात मला कायम दुपारचीच कामं
का निघतात हा मोठा प्रश्न आहे...बरं प्रत्येकवेळा गाडी नेण्याची सोय नसते...का तर
पार्कींगचा प्रश्न...नाईलाजास्तव चालत किंवा रिक्षाचा शोध घेत बाहेर पडावं लागतं...अशीच
भर बाराच्या उन्हात बाहेर पडले होते...एक नवीन पदार्थ करायला घेतला आणि नेमकं
त्यासाठी लागणारे विशिष्ट फ्लेवरचे इसेन्सच संपले...आता उपाय नव्हता...लेकाला थोडी
लाडीगोडी लावली...पण तुला जमेल तेव्हा जा...असा उलटा सल्ला मिळाला...मग उन्हाचा
आधार म्हणजे भली मोठी ओढणी आणि गॉगल घेऊन घराबाहेर पडले...
फुटपाथचा आधार घेत चालत होते...आमच्या भागात या
फुटपाथ लगत असलेल्या झाडांमध्ये जांभळाच्या झाडांची संख्या अधिक आहे...अगदी सकाळी
बाहेर पडलं तर रस्ता या जांभळाच्या फळांनी रंगवलेला दिसून येतो....अचानक या
जांभळाच्या झाडांनी माझ्यावर कृपा केली...एक अगदी टपोरं जांभूळ थेट डोक्यावर पडलं...पटकन
पकडलं...थोडंसं चेपलं गेलं...पण जांभूळ झाडावरुन थेट आपल्या हातात आलं याचा आनंद
तो किती...दुपार अगदी बाराचा सुमार होता...वर्दळ फार कमी...त्याचा फायदा मी
घेतला...कोण आपल्याला बघत नाही ना हे पहात जांभळाच्या झाडाखाली फेरी मारायला
सुरुवात केली....एकाला लागून अशी चार तरी जांभळाची झाडं आहेत...त्यामुळे त्यांच्या
भोवती फेरी मारली तर चांगली ओंजळभर जांभळं मिळाली...
जशी जांभळं मिळत गेली तसं तसं आजूबाजूला आपल्याला कोण बघतंय की काय, हा मनातला
संकोचही दूर झाला...बघितलं तर बघितलं...आपण काय चोरी करतोय...जांभळंच गोळा करतोय
ना...असं म्हणत पर्समधून पिशवी काढली आणि जांभळांचा खजिना गोळा करायला सुरुवात
केली...छान..टप्पोरी...जांभळं वा-याच्या झोताबरोबर पडत होती...खाली रस्त्यावर
पडल्याने ती फुटत होती...पण काही पानांमध्ये पडलेली जांभळं न फुटता मिळत होती...मी
ती गोळा केली...अगदी अर्धा किलो भरतील एवढी जांभळं मिळाली...साधारण अर्ध्यातासाची
कमाई होती ती...त्या अर्ध्या तासात मला गरमी लागली नाही...डोळ्यावरचा गॉगल निघाला
तरी उन्हाचा त्रास जाणवला नाही...चेह-यावरची ओढणी जांभळं गोळा करतांना अडचण ठरली,
म्हणून कधीच बॅगेमध्ये कोंबली गेली होती...एकूण काय जांभळाने माझी उन्हाची कुरकुर
पार गायब झाली...सोबत असलेली जांभळाची पिशवी मी सांभाळत रस्त्याने ऐटीने चालत
होते...दुकानात गेले...मला हवी ती खरेदी झाली...पुन्हा घराकडे वळतांना आणखी पाच
मिनीटं त्या झाडांखाली रेंगाळले...मग ती जांभळांची पिशवी सांभाळत घर गाठलं...घरी
आल्यावर जाणवलं, घामानं अंघोळ झालीय....पण आश्चर्यही वाटलं. जांभळं गोळा करतांना याची साधी जाणीवही झाली
नाही...घरी गेल्यावर लेकाला ती जांभळं दाखवली...बघ मी काय आणलंय...म्हणत त्याला
जमेल त्या उत्साहात मी कशी ती जांभळं गोळा केली हे सांगितलं...मात्र यावर चिरंजीवांच्या
चेह-यावर ठम्म शांतता...तू कशाला गेली होतीस, आणि हे काय घेऊन आलीस...एवढीच शांत
प्रतिक्रीया...अरे जांभळं आणलीत मी...मी गोळा केली ती...मी पुन्हा त्याच
उत्साहात...पण त्याच्यावर परिणाम नाही...मग नेहमीचेच संवाद...रस्त्यावर पडली ना ती मग हायजेनीक असणार का...त्यात किडे असतात...त्रास होईल का त्याचा....मी निमूट ती जांभळं उचलली...उगाच खाताना शंका नको म्हणून ती मिठाच्या पाण्यात भिजत ठेवली....नंतर सर्व कामं आटपून त्यांच्याकडे मोर्चा वळवला....थोडी तुरट..थोडी गोडं...आणि मिठाच्या चवीची जांभळं लहानासारखी खिडकीत बसून खाल्ली...मोठ्यांसारखी त्यांच्या बीया साठवल्या आणि कुंडीत टाकल्या...एवढ्या सर्व वेळेत मुलगा त्याचं काम करत होता...एक जांभूळ चवीला बघू म्हणून त्यांनी सांगितलं नाही...मी त्यातली बरीच जांभळं संपवली...मला लहानपण आठवलं, जिभेचा बदलेला रंग आरशात बघून घेतला...अर्थात लेकाने काय हे, म्हणत डोक्याला हात लावून घेतला...
मुलाला फळं आवडत नाही असं नाही...मग
त्याच्याकडे हा विनाकरण त्रासदायक वाटेल असा स्वच्छतेचा अट्टाहास आला
कठून...अर्थात आम्हा पालकांकडूनच...त्याला फळं आवडतात...पण ती निटनेटकी कापलेली...चाकू-सुरीने
खाण्यासारखी...कारण तशी सवय मीच तर त्याला लावली...बाजारातून फळं आणून स्वच्छ
धुवायची...मग छान कापून, ती डीशमध्ये सजवून मुलांसमोर ठेवायची...कधी नुसती फळं गोड
लागत नाहीत म्हणून त्यावर साखर किंवा मिठाचा आधार घ्यायचा, कधी तो चाट मसाला
भुरभुरायचा..बरं हाताने खायचं नाही....कारण ते जम्स....मग काटा वापरायचा...सगळं
असं छान छान...त्यामुळे या आपल्या रानफळांचा आणि मुलाचा संबंध पार तुटल्याचे मला
पहिल्यांदा जाणवले....करवंद खायचीही माहीत नाही...करवंद खातांना कोंबडा की कोंबडी
करतांना लहानपणी दुपार कधी जायची हे समजायचं नाही...पिवळ्या रंगाची राजणं खाऊन चिकाने भरलेले ओठ उघडझाप करण्याची
गम्मत माहीत नाही...की छोटी तोरणं खाण्यातली गोडी माहीत नाही...
मला आठवतं माझ्या लहानपणी ब-याचवेळा दुपारच्या
जेवणाची गरजच वाटत नसे...कारण हा रानमेवा खावून पोट भरत असे...शिवाय फळं धुवून
खा...हात धुवा...चिक सांभाळा...आदी सूचनाही कधी आई-वडीलांनी केल्या नाहीत... आता
मुलाकडे बघून वाटतं आपणच कमी पडतो की काय...त्या थेनॉस आणि कॅप्टन अमेरिका यांचे
आख्यान पाठ असणा-या मुलाला आपली साधी रानफळं माहीत नाहीत...त्यांची चव माहीत
नाही...आणि त्यांचा आस्वाद कसा घ्यावा हेही माहीत नाही...आंबा खाल्ला तरी अख्खा
खाण्यातली मजा माहीत नाही...तो सोलून सुरीने कापून, मग काट्याने खायची सवय किती
चुकीची आहे याची जाणीव मला झाली...ताडगोळे आणले तरी तेच...नाजूक पारीचे ताडगोळे
सोलतांना त्यातले पाणी पडले तर ते
हातावर घेऊन चोखण्यात किती समाधान मिळते...हे
समाधान कधी त्याला मिळालेच नाही...कारण ताडगोळे आणल्यावर ते सोलायचा त्रास नको
म्हणून एवढी वर्ष मीच तर त्याला सोलून देत आहे...
वास्तविक हा रानमेवा म्हणजे उन्हाळी वातावरणात
दिलासा देण्यासाठी एकदम सोप्पा उपाय असतो...पॅकेटबंद ज्युस पिण्यापेक्षा शहाळ्याचे
पाणी पिण्यात आणि कलींगडाची फोड खाण्यात और मजा आहे...पण ही आजची पिढी...त्यांना
यातली चव काय कळणार...म्हणून मात्र मी माझ्या चुकांचे खापर नव्या पिढीवर नक्कीच
फोडणार नाही...देर आये दुरुस्त आये...असं म्हणत मी त्याच दिवसापासून रानमेवा डे चा
संकल्पच घरी केला....यात आपल्याला बाजारात मिळतील ती रानातली फळं घरी आणायची आणि
त्याचे शास्त्रीय फायदे-तोटे त्याला गुगलबाबावर शोधायला सांगायचे, आणि मग त्यांची
चवही बघायची, हा पाठच आता रोजचा सुरु केला आहे...अर्थात यात रानभाज्यांचाही समावेश
करुन घेतलाय....त्यामुळे पुढच्या मे महिन्यापर्यंत हा रानमेवा अभ्यासक्रम ब-यापैकी
मार्गी लागेल हे नक्की....
सई बने
डोंबिवली
--------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छान आहे जांभूळ आख्यान,रानमेवा खाण्याबरोबर त्याच्या बिया पण जमवून रोपं करायला शिकवूया.लेख मस्त जमलाय.
ReplyDeleteललीता मॅडम धन्यवाद...
Deleteरानमेवाच्या आठवणीत बालपणात गेलो आपल्या लेखामुळे
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान आहे जांभूळ व्याख्यान.
ReplyDeleteअरुनाचल,आसामची सफरकरून कुटुंबीयांसमवेत २७ एप्रिलला घरी परतल्यावर बघतोतर घराच्या गच्चीत जांभळांंचा सडा पडलेला.
लगेच स्टूल घेऊन फांदीवरची पाटीभर जांभळे काढली, शेजार्यांना व बिल्डींग मधील सर्वानां वाटली व कुटुंबीयांंनी यथेच्छ खाल्ली. बीया एकत्र जमवून ईचलकरंजीला येताना ट्रेन मधून सफर करताना जंगलात, शेतात पखरण केली.
.......व्रुक्षवल्लीआम्हा सोयरी👌
Reply
ReplyDeleteरवींद्र देशमुख 5 May 2019 at 12:55
छान आहे जांभूळ व्याख्यान.
अरुनाचल,आसामची सफरकरून कुटुंबीयांसमवेत २७ एप्रिलला घरी परतल्यावर बघतोतर घराच्या गच्चीत जांभळांंचा सडा पडलेला.
लगेच स्टूल घेऊन फांदीवरची पाटीभर जांभळे काढली, शेजार्यांना व बिल्डींग मधील सर्वानां वाटली व कुटुंबीयांंनी यथेच्छ खाल्ली. बीया एकत्र जमवून ईचलकरंजीला येताना ट्रेन मधून सफर करताना जंगलात, शेतात पखरण केली.��
.......व्रुक्षवल्लीआम्हा सोयरी�� ,रवींद्र देशमुख
रविंद्रजी छान वाटलं वाचून...घरी जांभळांचा सडा पडतो म्हणजे क्या बात है...त्या बीया वृक्षारोपणासाठी ठेवल्यात ही आणखी एक चांगली गोष्ट...धन्यवाद...
Delete