तुझ्या आई....
गेल्या रविवारी मदर्स डे साजरा झाला. सर्वत्र म्हणजेच सर्वच सोशल मिडीयावर आई आणि
तिच्या लेकरांच्या फोटोंचा दिवस साजरा झाला.
आईचा स्वभाव, तिची मेहनत, परिश्रम, झालंच तर स्वयंपाक घरातील कौशल्य अशा
अनेक बाबींवर चर्चा झाली. खरतर
प्रत्येकालाच आपली आई ही सुपर पॉवर लाभलेली व्यक्ती वाटत असते. आणि ते खरंही आहे. कारण आई या शब्दातच सुपर पॉवर आहे. त्यामुळे हा आईपणाचा गौरव मिळाला की ही सुपर
पॉवर आपोआपच मिळते. सध्या वाढलेल्या सोशल
मिडीयाच्या वापरामुळे हे नवनवीन दिवस कळू लागले आहेत. आयुष्यातला प्रत्येक दिवस हा आईचा आणि आईमुळेच
असतो. पण एक खास दिवस तिला देऊन
तिच्यासाठी आणि तिच्यासोबत साजरा करायला कोणाला नाही आवडणार....
फेसबुक आणि वॉट्सअपवर हे आईप्रेम आलेले भरते काहींना आवडले नाही. पण खरं सांगू मला त्यात काहीही गैर वाटलं
नाही. सध्या आपण आपल्या घरात, घरातील
व्यक्तींबरोबर किती वेळ बोलतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा....या
प्रश्नाच्या उत्तरादाखल असे दिवस साजरे करण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं तर वावग
ठरणार नाही. असो...मदर्स डे मलाही
भावला... पण तो का साजरा करतात, हे मात्र माहीत नव्हतं. त्यामुळे आपले गुगल बाबा परत मदतीला आले....त्यातून
मिळालेल्या माहितीनुसार वर्जिनियामध्ये एना जार्विस नावाच्या महिलेने मदर्स डेची सुरुवात
केली. एनाच आपल्या आईवर फार प्रेम होतं. तिने कधीही लग्न केलं नाही आणि आईच्या निधनानंतर
तिने तिच्याप्रती आदर म्हणून या मदर्स डे ची सुरुवात केली. दुसरी माहीतीही मिळाली. त्यानुसार, ग्रीसचे लोक आपल्या आईचा फार सन्मान
करतात. या दिवशी ते आईची पूजा करतात
अशा एक ना दोन अनेक
गोष्टी मला गुगलबाबावर मिळाल्या...आणि ते बरोबर आहे, आईच्या नावातच इतकी महती आहे की, प्रत्येक
देशात, देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात मदर्स डे साजरा करण्यासाठी वेगवेगळी गोष्ट
असणारच. टीव्हीवरही काही चांगले व्हीडीओ
त्यानिमित्ताने बघायला मिळाले. सर्वच
चांगले होते. पण एक अगदी मनातला
होता. मॉलमध्ये फिरायला गेलेली महिला तिथे
लावलेले तेरी मॉं की...या शब्दांवर वार करीत होती. आपण आईला शुभेच्छा देतो. तिची पूजा करतो. पण त्याच आईवरुन सर्वाधिक
शिव्या देतो. कधी कोणी विचार केला आहे, की
हे जी आई ऐकत असेल तिला काय वाटत असेल. या
व्हिडीओ मधून हेच दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
कुठल्याही महिलेला आपल्या आई या सन्मालाला ठेच लागेल असे अपशब्द ऐकण्याची
इच्छा नसते. पण आजकाल आईवरच्या शिव्या
अगदी भाषेचा भाग असल्याच्या थाटात बोलल्या जातात.
अशावेळी एका आईच्या मनात येणारी भावना या व्हिडीओ मधून व्यक्त झाली
आहे. या महिला मॉं शब्दाला पडलेलं हे
अपशब्दांचे कुंपण हातोड्यानी तोडून टाकतात.
किती सहजपणे यात आईच्या मनातली भावना व्यक्त झाली आहे. मला हे खरोखर आवडलं. ही कल्पना ज्यांनी मांडली त्याला सलाम....
आईला या एक
दिवसासाठी प्रेम द्या किंवा नका देऊ ती आपल्या लेकरांना सदैव प्रेमच करते...तेही
कुठल्याही खास दिवसाची प्रतीक्षा न करता.....आईचा फोटो शेअर करुन वा तिला काही खास भेटवस्तू
देऊनच मदर्स डे साजरा होऊ शकतो असे कधीच
नाही. आपण आपल्या भोवती जरा कान उघडे ठेऊन
फिरलो की,...ब-याच वेळा काही मंडळी उगाचच आईवरुन असलेल्या शिव्या वापरुन संवाद
साधतांना दिसतात. अशा या मंडळींना
आवरण्याचा प्रयत्न कोणी केला आहे का....फार कमी वेळा असं होत असावं. कारण समोरचा कसा वागेल याचा भरवसा नाही. उगाचच
कशाला कटकट म्हणून आवडलं नाही तरी टाळलं जातं.
हल्ली काही ग्रुपमध्ये तर आईवरुन नवनवीन शिव्या देऊन बोलायची जणू स्पर्धाच
लागली असते. वाईट वाटतं की आपण काही
चुकीचं बोलत आहोत हे या मंडळींना कळतच नाही...
मध्यंतरी
मी मुलाला जवळच्याच मैदानावर सकाळी सहाच्या सुमारास धावण्याच्या सरावासाठी घेऊन
जायचे. सकाळी सहाची वेळ म्हणजे प्रसन्न
वातावरण...मैदानावर झाडेही ब-यापैकी असल्याने पक्षीही होते. या छान वातावरणात मैदानावर काही मुलं क्रिकेट
खेळायला येत होती. अगदी पहिला बॉल पडला की
आईचा उद्धार होणारी बोली सुरु व्हायची....मग फिल्डींगला जरा चूक झाली की आली
आई...विकेट गेली की आली आई...सिक्स..फोर गेला की पुन्हा आई...नाराजी असो वा
खुशी...अगदी प्रत्येक वाक्य सुरु करतांना आईवरुन दिलेल्या शिव्या आणि वाक्याच्या
शेवटीही आईचा उद्धार....शेवटी मला ते असह्य झालं....मी त्या मुलांना असं आईवरुन
बोलू नका म्हणून सांगितलं. पण त्यांना मी
काय बोलत आहे हे समजलंच नाही...त्यांनी मलाच विचारलं की, आमचं काय चुकलं....मी
डोक्यावर हात मारुन घेतला....शेवटी माझ्या मुलाने सराव आटोपता घेतला आणि आम्ही
निमुट घराकडे परतलो.

आपली
माय मराठी किती गोड आणि समृद्ध आहे.
मराठीच्या पुढेही आपण माय म्हणजेच आई लावतो. इतका तिचा दर्जा पूजनीय. असे असतांना संवाद साधतांना शिव्यांचा आधार
कशाला घ्यायचा. बरं ज्या आईंनं आपल्याला
जन्म दिला तिचाच उद्धार अशा शिव्यांनी करायचा.
मदर्स डे ही संकल्पना चांगली आहे.
तिचा व्यापक अंगांनी विचार करायला हवा.
अनेकांनी या दिवसाच्या शुभेच्छा देतांना जी मुले आपल्या आईवडीलांना
वृद्धाश्रमात ठेवतात त्यांना बोल लावले आहेत. या मुलांना मातृप्रेमाचे सल्ले दिले आहेत. याबरोबरच हा भाषाशुद्धीकरणाचा सल्लाही द्यायला
हवा आणि तो अंमलात आणायला हवा. कुठलाही
दिवस साजरा करायचा असेल तर भेटवस्तू, फुले, पार्टी...असा मौहोल असायला पाहिजे असे
बंधन नाही. कधी कधी यापेक्षा वेगळा
विचारही करायला हवा. आपण जिची पूजा करतो
त्या आईची चारचौघात मान खाली जाणार नाही, असे वर्तन जरी केले तरी खूप झाले की....
सई बने
डोंबिवली
--------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खरं आहे,'आई'शब्दाचा आदर केला तरी तो डे साजरा होईल.
ReplyDeleteअप्रतिम लेख ज्याला आई समजली त्यांचच आयुष्य सार्थकी लागत
ReplyDelete