आमच्या मॅडम


आमच्या 
मॅडम


युष्यात कधी कधी अशा असामान्य व्यक्ती भेटतात की, ज्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर असावा असं वाटतं...या व्यक्तींची सकारात्मक शक्ती आपल्यालाही चांगले विचार देते...त्यांचे बोल, साधे वाटणारे, पण आयुष्याचं सार सांगणारे विचार आपल्याला प्रेरणा देतात...या व्यक्तींच्या भोवती उत्साह आणि आनंदाचा प्रवाह एवढा जोरदार असतो की, त्यात निराशा जाऊच शकत नाही.  हिच गोष्ट त्यांच्या भोवताली वावरणा-यांनाही बळ देऊन जाते. 
माझ्या आयुष्यातही अशा काही व्यक्ती नक्की आहेत.  ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांचा अभिमान नेहमी वाटतो.  त्यापैकी प्रमुख म्हणजे आमच्या ओंकार शाळेच्या संस्थापिका श्रीमती दर्शना सामंत....आम्ही त्यांना मोठ्या मॅडम म्हणतो.  वयाने, अधिकाराने मोठ्या आहेत असं नव्हे तर ज्ञान आणि विचारानेही त्या आदर्शवत आहेत.
 
वरदच्या शाळा प्रवेशाच्या वेळी त्यांचा आणि माझा परिचय झाला.  ओंकार एज्युकेशन ट्रस्टची महाराष्ट्र बोर्डाची शाळा होती.  त्यांनी 2005 मध्ये आयसीएसई बोर्डाची शाळा सुरु केली.  या ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घे, असं मला माझ्या मावशीनं सुचवलं.  माझी मावशी कै. विजया तावडे आणि दर्शना सामंत या दोघी मैत्रिणी.  मावशीचा मैत्रिणीवर विश्वास...त्यामुळं तिने मॅडमचं नाव पुढे केलं.  माझं आणि नव-याचं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं....त्यामुळे मुलाला फारतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याची तयारी (मानसीक आणि आर्थिकही) आम्ही केली होती.  पण ज्या शाळेच्या नावापुढे इंटरनॅशनल लेबल लागलं आहे, तिथे प्रवेश घेतांना प्रचंड धाकधूक होती.  मुलाचा अभ्यासक्रम माझ्यासाठी नवखा आणि जादाचा आर्थिक भार पडेल याचीही काळजी होती.  यासाठी मुलाच्या शाळाप्रवेशाआधी मी किमान चारवेळा तरी नुसत्या चौकशीसाठी शाळेत गेले असेन.  2005 साली आयसीएसई बोर्डाची शाळा सुरु झाली तेव्हा अगदी मोजके वर्ग आणि विद्यार्थी होते.  मी प्रत्येक वेळा गेल्यावर मॅडमना तेचतेच प्रश्न विचारायचे.  अभ्यासाचं काय....फी किती वाढेल...यापासून ते आपले संस्कार होतील का...इथपर्यंत...साधारण तेरा-चौदा वर्षापूर्वीची ही गोष्ट...मॅडमनी पन्नाशी ओलांडली होती.  शांत, प्रसन्न चेहरा...कितीही आणि कसेही प्रश्न विचारले तरी त्यांच्या कपाळावर आठ्या यायच्या नाहीत...ब-याचवेळा छोट्या छोट्या गोष्टीतून समजवून सांगायच्या...त्यांच्या या हातोटीमुळे की काय त्यांच्याबरोबर बोलत रहावं असं वाटायचं....आणि नवनवे प्रश्न सुचायचे....पण ही बाई कधी चिडायची नाही....प्रत्येकवेळी तुम्ही अॅडमिशन घ्या, आम्ही मुलाला छान सांभाळू असं मात्र हक्कांनी सांगायच्या...शेवटी त्यांनी दिलेल्या या शब्दामुळे वरदचा ओंकार इंटरनॅशनलमध्ये प्रवेश झाला...आता वरद दहावी होऊऩ या शाळेतून बाहेर पडला...तब्बल तेरा वर्ष झाली.  वरद या शाळेतून फक्त पुस्तकी ज्ञान शिकला नाही.  त्याच्यावर झालेले संस्कार आमच्या ओंकार शाळेतूनच झाले.  फक्त तोच शिकला नाही तर त्याच्याबरोबर माझेही पालकत्वाचे शिक्षण झाले.  आज वरदची आई म्हणनू जी ओळख मिळाली ती या ओंकार शाळेतूनच....आणि या सर्वांमागे मोठा हात आहे तो आमच्या सामंत मॅडमचा.....

सामंत मॅडमचा स्वभावच असा आहे.  जिद्दी...आणि प्रेमळ...आपली शाळा मोठी होईल आणि शाळेचे विद्यार्थीही मोठे होतील....आयुष्यात यशस्वी व्यक्ती म्हणून नावाजले जातील, यासाठी सदैव धडपडणारी एक हाडाची शिक्षीका....एका फ्लॅटमधून सुरु केलेली शाळा आता भव्य वास्तूत रुपांतरीत झाली आहे.  मॅडमनीही वयाची पासष्टी ओलांडलीय...आणि खरं सांगू, वाढत्या वयाबरोबर त्यांची मोहीनी अधिक पडू लागली आहे....
दर्शना सामंत मूळ बेळगांवच्या...मंगला पाटकर...लग्नानंतर त्या दर्शना सामंत झाल्या.  गोरेगांवच्या कॉलेजमध्ये त्यांनी केमिस्ट्रीमध्ये बीएससी केलं.  नंतर बी.एड.  26 डिसेंबर 1972 साली लग्न झाल्यावर त्यांनी बांद्रे येथील शाळेत शिक्षीकेची नोकरी केली.  त्यानंतर त्यांनी डोंबिवलीच्या आदर्श विद्यालय, जोशी हायस्कूल आणि नंतर महात्मा गांधी शाळेत तब्बल अठरा वर्ष शिक्षीकेची नोकरी केली.  याचवेळी स्वतःची शाळा सुरु करण्याची त्यांची इच्छा होती.  अर्चना, अपर्णा, अनुजा या तीन मुली झाल्या....त्यांचे शिक्षण सुरु झाले.  कोणी बाई आपल्या स्वतःच्या संसारात रमली असती.  पण मॅडमचा स्वभाव वेगळा...आपलं काही स्वतःचं सुरु करण्याची धडपड मनात होती.  यातूनच 1985 साली एका फ्लॅटमध्ये शाळा सुरु झाली.  इनमीन दोन वर्ग...त्यानंतर पुढच्या वर्षी आणखी एक फ्लॅट घेतला...शाळेचे वर्ग वाढले...मग मंत्रालयात शाळेच्या जागेसाठी रितसर अर्ज केला.  साधारण 2000 साली ओंकार शाळेची स्वतंत्र इमारत डोंबिवलीच्या एमआयडीसी भागात सुरु झाली.  त्यानंतर 2005 साली आयसीएसई,  2009 साली केंम्रीज, 2013 साली सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या.  आज ओंकार शाळांच्या तब्बल तीन इमारती आहेत.  आणि हजारो विद्यार्थी यामध्ये भावी आयुष्याचे धडे गिरवत आहेत. 

मंडळी हा प्रवास जितका मला लिहायला आणि तुम्हाला वाचायला सोप्पा वाटतो, तेवढा मात्र नक्कीच नाही.  एकतर एका महिलेचा हा प्रवास....शिवाय ज्या वयात महिला शक्यतो आता झालं माझं, म्हणत मुलां-मुलींच्या संसारात रमतात....नातवंडांना सांभाळण्यात आनंद मानतात,  त्या वयात या बाईनं जिद्दीनं शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला.  नवीन वाटा शोधल्या.... त्या यशस्वी केल्या... हे करत असतांना अनेक महिलांना नोकरीही दिली.  आज ओंकारच्या चार शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या मोठी आहे.  शिवाय कार्यालयीन कामकाजही सर्व महिला मंडळ सांभाळत आहे. या सर्व महिला राज्याची राणी म्हणजे सामंत मॅडम...पण त्यांना याचा मी पणा नाही...शाळेच्या काही कार्यक्रमामधून त्यांची कार्यप्रणाली मला जवळून पहाता आली.  अनेकवेळा पायाच्या दुखण्यांनी त्या बेजार झालेल्या असायच्या...चालतांना कष्ट व्हायचे...पण आपल्या शाळेत पाहुणे म्हणून आलेल्या व्यक्तींबरोबर वावरतांना वेदनेचा लवलेशही त्यांच्या चेह-यावर येऊ देत नसत... जिभेवर साखर आणि सकारात्मक विचार हे त्यांचे वैशिष्ट्य....त्यामुळे या शाळा उभारणीच्या प्रवासात कितीतरी असे प्रसंग आले की, सामान्य महिला म्हणाली असती नको हा व्याप...नको मनस्ताप...पण सामंत मॅडमची बात काही वेगळी...त्यांना अडचणीच्या काळात...जिथे सर्व मार्ग थांबतात, तिथेच त्या प्रश्नांची सकारात्मक बाजू दिसते.  मग तो प्रश्न त्या सहज सोडवितात...ब-याच वेळा प्रश्न पडतो हा शांत आणि समंजस स्वभाव आला कुठून...मग मॅडम त्यांच्या मागे असलेल्या विठोबाच्या मुर्तीला नमस्कार करतात...त्या स्वतः वारकरी....यानेच एवढी शक्ती दिलीय, असं सांगून सर्व श्रेय विठोबाला देऊन मोकळ्या होतात....
आपल्या शाळेतील मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे म्हणून त्यांची सदैव धडपड चालू असते.  वेळप्रसंगी या मुलांच्या पालकांनाही प्रोत्साहन देण्याचं काम त्या करतात.  डोंबिवलीच्या प्रसिद्ध डॉक्टर वर्षा ठाकूर या मॅडमचा अनुभव सांगतात....
ठाकूर यांचा मुलगा मैत्रय दहावी झाल्यावर कोटा येथे शिक्षणासाठी गेला.  त्याच्यासोबत वर्षा ठाकूर यांनाही जावं लागलं.  त्या डॉक्टर.  मुलासाठी प्रॅक्टीस दोन वर्ष थांबवावी लागली.  बरं कोटा येथे गेल्यावर सर्व वातावरण वेगळं.  मुलगा क्लासला गेल्यावर अवघ्या तासाभरात कामं व्हायची...मग कंटाळा यायचा...हळूहळू हा कंटाळा त्रासदायक ठरु लागला.  सर्व सोडून परत यावसं वाटायचं.  अशावेळी त्यांनी मदत म्हणून दर्शना सामंत यांना फोन केला.  मॅडम त्यांच्याबरोबर तासभर बोलल्या...आईनं आपला त्रास न बघता आपल्या मुलाचं भविष्य बघावं...तुम्हीही मुलाचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे बघा, सर्व सुसह्य होईल हा मंत्र त्यांना दिला.  या तासाभरात त्यांनी एवढे सकारात्मक विचार ठाकूर यांना दिले की, त्यांना वाटणारा ताण निवळला.  पुढे मुलाचं कोटामधलं शिक्षण पूर्ण झालं.  आता तो आयआयटीमध्ये शिकत आहे.  याचं सर्व श्रेय त्या सामंत मॅडमना देतात.  त्यांच्यामते सामंत मॅडम म्हणजे उत्साहाचा झरा आहे.  फक्त शाळेत असतांना त्या मुलांची काळजी घेतात असं नव्हे, तर मुलांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपला ओंकारचा विद्यार्थी पुढे काय करतो,  त्याची प्रगती कशी होईल, याचीही मॅडम काळजी घेत असतात. 
मॅडमसोबत वीस वर्षापासून अधिक काळ असणा-या उषा रविशंकर यांना त्यांची एनर्जी भावते.  1996 पासून त्या दर्शना सामंत यांच्यासोबत काम करतात.  त्या सांगतात, मॅडम कोणालाही दुखवत नाहीत.  त्यांचा प्रत्येक दिवस नवा असतो.  नवी कल्पना सोबत आणतो.  आणि ती यशस्वी करण्यासाठी त्यांची धडपडही असते.  कितीही मोठी अडचण असली तरी त्याची त्रासदायक बाजू न बघता त्या चांगल्या बाजूचाच विचार करतात.  विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देतात...आज अवघ्या ओंकारचा परिवार त्यांनी कुटुंबासारखा जपलाय. यासोबत त्यांच्या कौटुंबिक जबाबदा-याही तेवढ्याच आत्मियतेने पार पाडत आहेत.  त्यांचा हा उत्साह आणि चांगले विचारच सर्वांना एकत्र ठेवतात, असे उषा रविशंकर अभिमानाने सांगतात.
मंडळी हे सांगण्याचं निमित्त म्हणजे मॅडमचा 26 मे रोजी वाढदिवस...मी त्यांना कोणत्या शब्दात शुभेच्छा देऊ हे समजत नव्हतं.  म्हणून हा छोटासा प्रयत्न केला.  आज माझ्या मुलाला आणि अशाच अनेक मुलांना घडविण्यात मॅडमचा मोठा वाटा आहे...मॅडम,  तुम्हाला वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा...तुमच्या भावी सर्व योजना यशस्वी होवोत हिच विठूरायाचरणी प्रार्थना.....

सई बने
डोंबिवली
--------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा





Comments

  1. Ya samant madam maza class teacher hotya mala tya khup awdaycha atta sudha avadtat tumche he karya baghun mala tyancha khup abhiman vatato asha madam sarvana milot. Thank you samant madam ����

    ReplyDelete
    Replies
    1. संगिता...तुम्ही खूप नशिबवान आहात....मॅडम तुमच्या शिक्षीका होत्या....त्यांचा स्वभावच त्यांची ताकद आहे

      Delete
  2. एका आदर्श व्यक्तिच उत्तम व्यक्तिचित्रण

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद....मॅडमचे काम खूप मोठे आहे...थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला...

      Delete
  3. आम्ही खूप नशीबवान आहोत की सामंत मॅडमचे मार्गदर्शन आम्हाला तसेच आमच्या वरदला लाभले. लेख खूपच छान व मार्गदर्शक आहे.

    ReplyDelete

Post a Comment