सोहळा ए मैत्री...


सोहळा

मैत्री...

मैत्रीची व्याख्या काय....हा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे उत्तर एकच असेल का...नक्कीच नाही....मैत्री ही कधीही एका व्याख्येत बसतच नाही.  मैत्री ही गोष्टच अशी आहे.  सुखात हवीशी वाटणारी...दुःखात न सांगता मदतीला येणारी.  कधीही नफ्या-तोट्याच्या तराजूत या मैत्रीला बसवता येत नाही.   आनंद...उत्साह... इथे मिळतो...तर राग..रुसवेही इथे होतात...पण प्रत्येकाची मजा वेगळी...हे नक्की....

असाच मैत्रीचा सोहळा आमच्या शाळेच्या ग्रुपचा नुकताच झाला.  तोही किल्ले रायगडावर.  माझी शाळा म्हणजे सरदार रावबहादूर तेंडूलकर विद्यालय, रेवदंडा.  कोकण एज्युकेशन सोसायटीची आमची शाळा.  दहावीच्या बॅचचे गेटटूगेदर गेल्या काही वर्षापासून होत आहे.  दरवर्षी हे संमेलन रेवदंडा-चौल या आमच्या गावी होते. साधारण मे महिन्यातले शनिवार-रविवार पकडायचे.  शनिवार दुपार पर्यंत गाव गाठायचे.  जेवण, जरा आराम....मग मिळेल तिथे भटकायचे.  दत्ताचे मंदिर, बिर्ला मंदिर, किल्ला आणि आमचा समुद्र....या आमच्या लहानपणापासूनच्या आठवणी साठवलेल्या जागी जायचे...आणि मनसोक्त गप्पा मारायच्या...रात्रीचे जेवणही समुद्रावर....पोपटी...मध्यरात्री केदारच्या रेस्टहाऊसवर परत.  थोडावेळ झोप...मग सकाळी आणखी काही मंडळी सामील व्हायची...पुन्हा गप्पांचा जोर....फोटोसेशन...दुपारचे जेवण झाले की मग सगळ्यांना घरची ओढ...मग टाटा-बाय बाय....पुढच्या वर्षीही असेच भेटण्याचे प्रॉमिस....हा आमचा ठरलेला कार्यक्रम...
मात्र या वर्षी या कार्यक्रमात जरा नाही तर चांगलाच बदल झाला.  आमचा वर्गमित्र प्रशांत झावरे याने रायगड किल्ल्यावर जाऊन महाराजांचे दर्शन घेऊया असे जाहीर केले.  दरवर्षी आपण सर्व भेटतो...आता एखाद्या किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांची गौरवगाथा आपल्या मुलांना प्रत्यक्ष दाखवूया, आणि आपणही अनुभव घेऊया हा त्याचा मुद्दा....बरं आमच्या ग्रुपमधली काही मंडळी रोडा-महाड येथे रहाणारी.  त्यांनी या परिसरात असलेल्या कडक उन्हाळ्याची कल्पना दिली.  शिवाय रायगड किल्ल्यावर वस्ती करायची होती.  किल्ल्यावर काही मोजक्या रुम उपलब्ध आहेत.  त्या असतील तरच जायचे हे ठरले.  पहिल्यांदा रुम सहज मिळालीही....पण आमचं काही ठरेना...मग हातची रुम सोडून दिली.  पण मंडळी रायगड म्हणजे शिवप्रेमींसाठी कुठल्याही तिर्थश्रेत्रापेक्षा वंदनीय... देवाला त्याच्या मूळ स्थानावर जाऊन बघायची मनापासून इच्छा केली तर ती पूर्ण होते. तसंच आमचं झालं.  रायगड किल्ल्यावर जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचंच हा निर्णय झाला होता.  तेही पौर्णिमेच्या रात्री...आमचा कार्यक्रम ठरला.  पण एव्हाना उशीर झाला.  आम्ही बुक केलेली रुम आता उपलब्ध नव्हती, असा मेसेज आला.  मनात थोडी हूरहूर लागली.  आणि अगदी थोड्या वेळातच फोन आला.  रुम आहे....बस्स....महाराजांचा आशीर्वाद मिळाला....आम्ही मावळे मग तयारीला लागलो....
रोहा...मुरुडला राहणारी मंडळी मार्गदर्शक म्हणून पुढे आली.  शिवाय आम्ही जी काही मंडळी मुंबई-पुण्यावरुन जाणार होतो.  ते सर्व भल्या पहाटे निघणार होतो.  मग दुपारचे जेवण महाडला...त्यानंतर थोडा आराम आणि साधारण चारच्या सुमारास किल्ला चढायला सुरुवात...असा ठोबळ कार्यक्रम तयार झाला.  किल्ल्यावर राहण्यासाठी रुम मिळाल्याने वेगळा अनुभव घेता येणार होता.  त्यामुळे दुबईला राहणारा आमचा मित्र प्रफुल्ल सोमण कुटुंबासह या रायगड स्नेहसंमेलनात येणार होता.  शिवाय आमची हेमांगी म्हात्रेही कुटुंबासह येणार होती.  माझ्यासोबत वरदही रायगड किल्ला म्हणून उत्साहाने सामील झाला..
एक-एक दिवस जाता आमचा प्रवासाचा दिवस आला.  प्रवासाला निघतांना आमच्या मित्रपरिवाराच्या महत्त्वाच्या सूचनाही मिळत होत्या...विशेषतः जास्त तापमानामुळे सर्वांना आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना केली होती.  आणखी एक म्हणजे आता सर्वांचीच चाळीशी पार...त्यामुळे सोबत आलेल्या काही दुखण्यांची औषधेही घेण्याची सूचना होती.  मी, वरद, प्रशांत, हेमांगी सावंत आणि राणी बापट हे पाचजण दिवा-रोहा ट्रेनने जाणार होतो.  रोह्यात काही मंडळी भेटून मग आम्ही सर्व महाडला आमच्या मित्राच्या, दिनेश गावंडच्या घरी भेटणार होतो.  वाटेत रोह्याचे आकार क्ले सेंटर बघायचे ठरले.  तिथेच पुण्याचा ग्रुपही सामिल होणार होता.  पण हा सोप्पा वाटणारा प्लॅन पहिल्याच टप्प्यात फसला.  आम्ही दिव्याहून जी ट्रेन पकडली,  त्या ट्रेनला तुफान आणि तुफानच गर्दी निघाली.  एवढी की, पाणीसुद्धा पीता येईना...खायची तर बातच सोडा.  त्यात वरद सोबत....त्याला गर्दीचा त्रास झाला....शिवाय वाढत्या तापमानाची झळा....पहिल्याच फटक्यात आम्ही बेजार झालो.  शेवटी याच ट्रेनने पुढे वीर स्थानकावर पोहचायचे ठरले.  रोह्याला ट्रेनमध्ये आमचा शिक्षक मित्र समीर जुवेकर चढला.  एव्हाना सकाळी नऊच्या सुमारास पोहचणारी ट्रेन चांगली साडेबारा नंतर वीरला पोहोचली...गाडी स्थानकात आल्यावर आम्ही एकमेकांना भेटलो.  कारण गर्दी एवढी की कोणाचाही कोणाला थांगपत्ता नव्हता.   स्थानकाबाहेर असलेल्या टमटम गाडीत बसल्यावर बाहेरच्या उष्म्याची जाणीव झाली. 
एखाद्या आगीतून गाडी चालावी अशा झळा बसत होत्या...त्यातच जवळपास साडेसहा तास उभ्याने आणि प्रचंड गर्दीत प्रवास केल्याने कधी एकदा आराम करतो असे झाले होते.  महाड स्थानकात आमच्या दोन स्वात्या...म्हणजेच स्वाती लोहार आणि स्वाती चौलकर भेटल्या....थोडं हायसं वाटलं...मग दिनेशचं घर गाठलं...त्याची पत्नी, दिप्नी हिने जेवणाचा छान बेत केला होता....पण प्रवासाचा थकवा एवढा होता की, थोडंसं जेवल्यावर सरळ दुपारची वामकुक्षी क काय म्हणतात ती घेतली....एव्हाना आमचा आणखी एक मित्र संतोष भगत कुटुंबासह आला...प्रफुल्ल दाखल झाला...पण पुण्याहून येणारे संदिप चांदोरकर आणि अजित खेडेकर ऐनवेळी आलेल्या कामामुळे अडकले.  साधारण चार वाजता आम्ही किल्ला चढणार होतो.  पण उन मी म्हणत होते....त्यामुळे दिनेशच्या घरी फोटोसेशन झाले.  आमच्या दोन स्वात्याही घरच्या लग्नकार्यामुळे निघाल्या...मग आम्ही गडावर चढायची तयारी सुरु केली.  दिनेश गडावर नेहमी चढून जाणारा.... आमचे सामान खूप होते...आणि लहान मुलेही होती...त्यामुळे त्याने रोपवेने जाऊन सामान रुमवर ठेवण्याची जबाबदारी घेतली....पाचडला, जिजाऊ आईसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले...तिथेच आमची आणखी एक मैत्रीण हेमांगी कुटुंबासह भेटली....पंधरा जणांचा आमचा ग्रुप होता...त्यातले आठ जण किल्ला चढून जाणार होतो.  आणि बाकीचे रोपवेने किल्ला गाठणार होते....
साधारण सहा वाजता किल्ला चढायला सुरुवात केली.  मंडळी खरं सांगू, पहिल्यांदा अगदी तासाभरात काम होईल असं वाटलं....पण जसजसं किल्ला चढू लागलो तेव्हा कळलं रायगड किल्ला म्हणजे काय ते....उभेच्या उभे कडे...दमछाक करणा-या पाय-या...पुढे पुढे तर दहा पाय-या चढल्या की वाटायचं आता आराम करावा...पण थोडं बसून देईल तर तो प्रशांत कसला....चला-चला...पाणी पिऊ नका..उठा चाला...असा घोशाच त्यानं लावला...अगदी फोटो काढायलाही थांबलं तरी हेच....सूर्यास्त झाला...त्यानंतर तर थकवा जाणवू लागला आणि आमच्या प्रशांतचा घोशाही वाढला...अखेर तब्बल दोन तासांनी आम्ही रायगड सर केला.  होळीच्या माळावर पोहचलो...तेव्हा चिक्कार दमलो होतो.  आता रुमवर जाऊन झोपायचं असाच बेत....पण होळीच्या माळावर पोहचलो आणि समोर पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन झाले....सगळा थकवा तिथेच संपला...आणि समोरच महाराजांची मुर्ती...बस्स...अगदी शांत पहात रहावं असं हे दृष्य...प्रशांनने केलेल्या हट्टाचे सार्थक झाल्याचे समाधान सर्वांना मिळाले.  तिथेच रोपवेने आलेली आमची इतर मंडळीही भेटली....त्या पौर्णिमेच्या रात्रीच जगदीश्वर मंदिरात शंकराचे दर्शन घेतले... महाराजांच्या समाधीचे दर्शन झाले....रात्रीचा मुक्काम गडावर....पहाटे पाच वाजता उठून तयार होऊन आम्ही पुन्हा होळीच्या माळावर...आकाशतला सूर्य आणि सूर्यासारखेच तेजस्वी शिवाजी महाराज यांची सकाळी पहिली भेट होते, ते दृष्य अभूतपूर्व असते...अनेकांनी या दोन सूर्यांच्या भेटीचा नजारा पहाच असा आग्रह केला होता...खरंच अप्रतिम दृष्य....पुन्हा गडाची भ्रमंती...सुनील शिंदे सारखा पंधरा वर्षाचा मुलगा गाईड म्हणून मिळाला....किल्ला फिरुन झाला...महाराजांवर रोज होणारा अभिषेक आम्हाला बघण्याची संधी मिळाली....आमच्या राणी आणि गार्गीने जिजाऊंवरील गाण्यावर नृत्य सादर केले....समीर आणि धनश्रीने महाराजांच्या शौर्याचे गीत म्हटले....आणि कितीतरी वेळा उत्स्फुर्तपणे शिवरायांचा जयजयकार झाला....तरीही मनाचे समाधान होत नव्हते....जायची वेळ ठरलेली...तरीही किल्ल्यावरुन पाय निघत नव्हता....शेवटी महाराजांना मुजरा केला...किल्ल्याची भव्यता पुन्हा एकदा नजरेत साठवण्याचा प्रयत्न केला....आणि जड मनाने रायगडाचा निरोप घेतला...
उतरांना रोपवेचा आधार घेतला...परत एकदा रायगड किल्ल्याच्या भव्यतेचा आणि आमच्या राजाच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आला.  बस्स...मग काय प्रत्येकाची आपापल्या वाटेने घर गाठायची लगबग सुरु झाली.  झाले गेटटूगेदर....एवढेच का...नक्कीच नाही...या एक-दीड दिवसांच्या सोबतीने आमची मने एकसाथ पुन्हा नव्याने जोडली गेली.  कुटुंब एक आली.  आणि न आलेल्या मंडळींचे काय...आमचे नेहमीचे सेनापती राजा देवकर, संकत जोशी, महेंद्र जैन, केदार ओक, स्वाती लोहार, स्वाती चौलकर...आणि असेच सर्व...या सर्वांना आपण सोबत जाऊ शकलो नाही याची हुरहूर लागली होती...पण आम्ही, विशेषतः मुली घरी निट पोहचलो की नाही याची काळजीही तेवढीच होती....फोनची बॅटरी संपलेली...त्यामुळे फोनवर बोलताही येत नव्हते...पण घरी पोहचल्यावर वॉट्सअपवर सुखरुप पोहचल्याचा मेसेज टाकला....आणि या मंडळींना दिलासा मिळाला....
यालाच मैत्री म्हणतात ना...समीर मामा सोबत हवा म्हणून रोपवेतही त्याच्यासोबत रमणारी आमची बच्चेकंपनी...सोबत नसलो तरी एकमेकांची काळजी...निट आहेत की नाही याची चौकशी आणि लगेच मदतीची तयारी...मंडळी माझ्या मित्रपरिवाराची हिच मैत्रीची व्याख्या...असा मित्रपरिवार मिळायला नशिब लागतं...धन्यवाद मंडळी...तुमच्या सोबतीने वर्षभराची एनर्जी मिळाली....

सई बने
डोंबिवली

-----------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

  




Comments

  1. आदरणीय सईजी नमस्कार
    आपन लिहलेला मैत्रीचा सोहळा अतिशय सुंदर लेख आहे त्यातील लहांनपणीच्या आठवणीना उजाळा दिलेला वाचला तो सुंदर शब्ध सुमनांच्या माळेत अपन आजपावेतो गुंफुन ठेवलाय हे विशेष

    ReplyDelete
  2. आदरणीय सईजी नमस्कार
    आपन लिहलेला मैत्रीचा सोहळा अतिशय सुंदर लेख आहे त्यातील लहांनपणीच्या आठवणीना उजाळा दिलेला वाचला तो सुंदर शब्ध सुमनांच्या माळेत अपन आजपावेतो गुंफुन ठेवलाय हे विशेष

    ReplyDelete
  3. Sai nice blog for Maitry 👏👏🙏

    ReplyDelete
  4. महाराजांचा रायगड मित्रांसोबत आणि पुढील पिढी सोबत प्रत्यक्ष अनुभवणे ही अतिशय स्तुत्य संकल्पना. आपण सर्वांनी ती प्रत्यक्षात उतरवली. सर्वांचे अभिनंदन. अनुभवाचे सुरेख शब्दांकन वाचून आनंद वाटला. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!!

    ReplyDelete
  5. shilpa khupch chan lekhan kel aahes ......I am Proud Of U


    ReplyDelete
  6. shilpa khupch chan lekhan kel aahes ......I am Proud Of U


    ReplyDelete
  7. खूपच सुंदर लिखाण आहे शिल्पा.तुझ लिखाण वाचल्यावर रागडावर जाउन महाराजांचे दर्शन घेतल्यासारखं वाटतेय.तिथे अनुभवलेले क्षण सुंदर मांडलेस . तुझ्या लिखाणाला सलाम.

    ReplyDelete
  8. Khupch Chan lekh Aahe.....I am proud of Sai... From Rajeshree

    ReplyDelete

Post a Comment