साधी माणसं...


साधी माणसं...
प्रवास हा माझ्यासाठी आवडता.  कुठेही का होईना,  पण प्रवासात मन प्रसन्न असते.  मोबाईल नावाचे व्यसन आपोआप दूर जाते.  त्यामुळे  ते मेडीटेशन की काय आपोआप साधले जाते.  नवीन माणसं भेटतात....ओळखी होतात...आणि मुख्य म्हणजे अनेक अनुभव मिळतात.  नुकताच आमचा इंदौरचा दौरा झाला.  गेल्या चौदा-पंधरा वर्षापासून इंदौरला वार्षिक सहल असतेच.  त्यामुळे बरेचसे रस्ते, खाऊगल्ल्या तोंडपाठ झाल्यात.  पण एवढ्या वर्षात प्रत्येकवेळी नवा अनुभव या सहलीत येतो.  यावेळीही तसेच झाले. 

खरंतर इंदौरचा दौरा धारसाठी होतो.  धारला आमची कुलदेवी.  त्यामुळे कुलदेवीला नमस्कार करण्यासाठी हा दौरा होतो.  या देवीच्या नावाने इंदौर आणि परिसरचा भाग फिरण्याचा मनाचा मोहही दरवेळी पुरवला जातो.  मुळात इंदौर हे खवय्यांचे शहर.  पण त्याशिवाय या शहरात बरेच काही असे आहे की, कितीही फिरलं तरी पुन्हा आपल्याला त्याचा मोह पडावा.  मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे शहर तापलेलं होतं.  पण यामुळे गर्दी कुठेही कमी झालेली नव्हती.  पहिलं बोलायचं तर रस्ते.  इंदौर ते धार हा रस्ता पूर्वी जो अडीच ते तीन तासाचा होता तो आता चक्क दीड तासापेक्षा कमी वेळेत आम्ही पार केला.  याला कारण मोठाले रस्ते...अगदी शहरातील रस्त्यांचेही रुंदीकरण झालेले.  इंदौर हे मंदिरांचेही शहर.  पण जुन्या रस्त्यांमधील मंदिराचेही स्थलांतरण सुबकरित्या झाले आहे.  शिवाय कुठेही खड्डे नाहीत.  उगीचच आहेत, असे गतीरोधक नाहीत.  हायवे तर अगदी स्वच्छ.  दोन्ही बाजुला आणि मध्यभागी आवश्यक असे पांढरे पट्टे...आपल्या इच्छित शहराचे अंतर सांगणारे फलक.  आवश्यक त्या सूचना.  जिथे मोकळी जागा असेल तिथे भव्य अशी चित्र...त्यामुळे गरमी कितीही असली तरी प्रवास सुसह्य...सुरेख नियोजन. 
याच हायवेवर असलेल्या टोलनाक्यावर तर एक वेगळा अनुभव आला.   धारमध्ये देवीचे दर्शन,  धारचा किल्ला...बाजार....असा फेरफटका मारल्यावर आम्ही परत इंदौरकडे निघालो.   आमचे ड्रायव्हर म्हणून महेंद्र नावाचे गृहस्थ होते.  त्यांना तब्बल पंचवीस वर्षाचा गाडी चालवण्याचा अनुभव असल्याचे त्यांच्याबरोबर बोलण्यातून समजले.  अशाच गप्पा मारत असतांना त्यांना काही तरी खटकले.  एका गावाच्या वळणावर आवश्यक तो फलक नव्हता.  दुचाकीस्वार चुकीच्या बाजुने येवून रस्ता ओलांडत होते.  या हायवेवर दोन्ही बाजुंनी शेती आहे.   त्यामुळे स्थानिक शेतकरी मंडळी दुचाकीचा आधार घेतांना दिसतात.  पण हे दुचाकीस्वार अचानक हायवेवर आल्याने अपघाताची शक्यताही असते.  असाच एक दुचाकीस्वार आमच्या गाडीच्या मार्गात आला.  महेंद्र या आमच्या गाडीचालकाने त्याला चुकवलं,  पण महेंद्र यांची चिडचीड झाली.  काही अंतरावर टोलनाका होता.  महेंद्रनी टोल भरला आणि त्यांच्याकडे तक्रारवहीची मागणी केली.  ही वही आणण्यासाठी टोलनाक्यावरील कर्मचारी गेलाही.  त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली.  आम्ही उगीचच त्याला म्हणत होतो.  (कदाचीत आपल्याकडील अनुभवाने...) तक्रार करुन काहीही होणार नाही.  चला तुम्ही,  आम्हाला उशीर होईल.  पण महेंद्र ऐकेनात.  तुम्ही आज आलात,  आम्ही रोज या रस्तावरुन ये-जा करतो,  काही बरेवाईट झाले तर त्याला जबाबदार कोण...म्हणत त्यांनी आम्हाला निरुत्तर केले.  त्यामुळे आम्ही त्या तक्रार नोंदणीसाठी असलेल्या वहीसाठी वाट पाहू लागलो.  दरम्यान त्या टोलनाक्यावरील कर्मचारी खरोखर वही शोधण्यासाठी प्रयत्न करत होते.  त्यातील एकाने महेंद्र बरोबर संवादही साधला.  त्यांची तक्रार तोंडी ऐकून घेतली.  पैसा लेते हो ना...फिर बोर्ड लगाना आपकी जिम्मेदारी है...अगर कोई दुर्घटना हो गयी तो आप जिम्मेदार होंगे....असा सज्जड दम महेंद्रने त्या कर्मचा-याला दिला.  आणि आश्चर्य म्हणजे त्या कर्मचा-यानेही शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून घेतले. 
बोर्ड लावण्याची सूचना मान्य असल्याचे सांगितले.  शिवाय ही तक्रार ऑनलाईनही करु शकतो म्हणून महेंद्रला टोलनाक्यावर मिळालेल्या पावतीवरील वेबसाईटही दाखवली.  वरुन आम्ही तक्रार वरिष्ठांना कळवतो,  तुम्ही ऑनलाईनही तक्रार करा....असा प्रेमळ आग्रहही केला.  या सर्व संवादात कुठेही आरडाओरडा नव्हता....दादागिरी नव्हती....काहीशा चिडलेल्या आमच्या महेंद्र या ड्रायव्हरला टोलनाक्यावरील कर्मचा-यांनी उडउडवीची उत्तरे दिली नाहीत...की तक्रार कर काहीही परिणाम होणार नाही, अशी मग्रुरीची भाषा वापरली नाही.  आम्हाला हा अनुभव अगदी नवीन होता.  आम्ही काहीही न बोलता फक्त एकमेकांकडे बघितलं.  इतकं सौजन्य....थोड्यावेळानं महेंद्र बरोबर पुन्हा संवाद साधला तेव्हा कळलं, की अशा तक्रारींचीही योग्य ती नोंद घेण्यात येते आणि त्यावर उपायही करण्यात येतात.  हायवेवर दुतर्फा हिरवळ होती.  संध्याकळची वेळ...आणि उन्हाच्या वाफाही कमी होऊन थोडा का होईना गारवा जाणवत होता.  या सुखद होऊ लागलेल्या वातावरणात टोलनाक्यावर आलेला अनुभव अधिक सुखद वाटला. 
इंदौरच्या सराफा बाजारावर आतापर्यंत कितीतरी लिखाण झाले आहे. इंदौरमधील सर्वात प्रसिद्ध भाग....सकाळी या भागात फेरफटका मारला तर अंत्यंत सुबक आणि राजेशाही थाटाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची कलाकुसर बघता येते.  शिवाय कपडे,  पापड, देवाच्या पुजेसाठी लागणारी भांडी,  जेवणासाठीची भांडी....अशा अनेक दुकानांची लाईन दिसते.  या सर्व गल्ल्या ज्याला फिरायची आणि नाविन्य शोधण्याची आवड असेल त्यांनी आवर्जुन फिराव्यात अशाच आहेत.  माझाही इथला फेरफटका ठरलेला....मुख्यतः या भागातील सोन्या-चांदीची दुकानं बंद झाली की इथे खवय्यांची तुफान गर्दी उसळते....अगदी इंदौरला स्थानिक असलेली मंडळी ते पै पाहुणे...आमच्यासाऱखे हौशी पर्यटक...नवशिके फोटोग्राफर...परकीय पाहुणे असे सर्व या सराफा बाजारात सायंकाळी लागलेल्या खाऊच्या ठेल्यावर आपल्या जिभेचे चोचले पुरवतांना दिसतील.... त-हेत-हेच्या कचो-या,  गोडाचे पदार्थ,  भुटटेका किस, भरल्या मिरच्या,  आणि अगणित असे फरसाणचे प्रकार....या खाऊ गल्लीत काय खाऊ नि काय नको असा प्रश्न पडतो...त्यात जोशी दहीबडा हाऊस मधला दहीवडा ज्यांनी खाल्ला असेल, त्यांच्या जिभेवर ती अप्रतिम चव अद्यापही असेल हे नक्की....मस्त गोडं दही, त्यात डुंबलेला वडा,  थोडा रवाळ...पण दह्यामध्ये पूर्ण विरलेला.  त्यावरून भुरभुरलेले मसाले...चाट पावडर..त्याला आमचूर आणि ओव्याच्या पावडरीची साथ...यात कमी की काय
जोशी यांचा बोलका स्वभाव....हे सर्व जमून आल्यावर या दहीवड्याचा पहिला घास जेव्हा तोंडात जातो तेव्हा बस्स...अहाहा...जोशी दहीवडा स्टॉलवर आल्यावर दहीवडा खाण्यासाठी जेवढी घाई असते तेवढीच जोशी य़ांचे कसब टीपायची घाई असते....त्यामुळे नकळत मोबाइलचे कॅमेरे सुरू होतात....मोठया द्रोणामध्ये वडे आणि वर पांढरं शुभ्र दही घातल्यावर रंगीत चटण्या आणि मग  दहीवडय़ाची प्लेट सफाईने हवेत भिरकवण्याचे त्यांचे कसब...हा भरलेला त्यांचा द्रोण पुन्हा झेलला की कॅमेरे टिपतात ते मसाल्याबरोबर होणारी गम्मत...या दहीवड्यावर किमान चार ते पाच प्रकारचे मसाले वर पेरण्यात येतात.  हे मसाले ते एकाच मुठीत घेतात...आणि प्रत्येक फेरीत वेगवेगळा मसाला भुरभुरले जातात...याशिवाय इथला भुट्टे का किसखाऊन पाहावा असा आहे.  यासर्वात वेगळा आणि साधा आहे या माणसाचा स्वभाव.  आतापर्यंत भारतातीलच नव्हे तर परदेशातील मान्यवर फूड चॅनेलवर जोशी यांची खासियत दाखवण्यात आली आहे.  देशातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या हातचा दहीवडा खाल्ला आहे.  पण या माणसाला त्याचा घमेंड नाही.  आपल्याकडे आलेला प्रत्येक ग्राहक त्यांच्यासाठी खास असतो.  आम्ही जेव्हा या खाऊ गल्लीत होतो.  तेव्हा रोजे चालू होते.  संध्याकाळची वेळ असल्यामुळे इफ्तारी...रोजे सोडण्याची तयारीही चालू होती...असंच एक मुस्लिम कुटुंब या जोशींकडे दहीवडा खाण्यासाठी आलेलं
होतं.  त्यांच्यातील लहान मुलींनं दहीवड्याची ऑर्डर दिली.  तिला दहीवडा देण्यासाठी कोणी मदतनीस न पाठवता स्वतः जोशी आपल्या जागेवरुन उठले.  आमच्या दुकानात इफ्तारीसाठी आल्याबद्दल धन्यवाद देत त्यांनी त्या छोट्या मुलीला स्पेशल दहीवडा दिला.  ती मुलगी आणि तिचे कुटुंबियही खूष झाले.  जोशी पुन्हा आपल्या कामात गुंतले.  कोणी नवखा फोटोग्राफर त्यांचे कसब टिपण्याची धडपड करीत होता.  त्याला हवा तसा शॉट देईपर्यंत ते दहीवडे करत होते.  कुठेही कंटांळा नाही की मी किती फेमस आहे हा आव नाही.  त्या तरुणाचे समाधान झाल्यावर त्यांचे आभारही मानले....
या प्रवासात भेटलेली ही दोन माणसं अत्यंत साधी...पण आपली कामं चोख करणारी...आपल्या शहराचे नाव राखण्यासाठी तत्पर असणारी...म्हणूनच मनाला अधिक भावणारी....
आता पुढचा दौरा वरद आखतोय...हे शहर एज्यकेशन हबही आहे...त्याच्या आवडतं राजा रमन्ना सेंटरही इथे आहे...बहुधा पुढच्यावेळी या सेंटरला भेट देण्याचा प्रयत्न करणार आणि तिथे असलेला बिगबॅंगचा प्रोजेक्टही बघणार....

सई बने
डोंबिवली

------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा








Comments

  1. आदरणीय सईजी
    आमच्या उत्तर महाराट्र बॉर्डर पासून सूरत आणि इंदौर जवळच आणि बाजारपेठा पाहिल्यात ना त आमच्या मते पुणे किव्हा मुंबई पेक्षा कितीतरी सरस ह्ह..
    धन्यवाद आपन आतशीय सुंदर वर्णन केल्या बद्दल

    ReplyDelete
  2. खूप छान प्रवास वर्णन.

    ReplyDelete
  3. घरात बसून इंदौरचा फेरफटका मारून आल्याचा आनंद मिळाला.

    ReplyDelete
  4. पुढील वेळेस मला पण घेऊन जा

    ReplyDelete
  5. खूपच छान लेख लिहिला आहेस.

    ReplyDelete

Post a Comment