रानभाज्यांचे सौदर्य


रानभाज्यांचे 
सौदर्य
पावसाळा म्हणजे मस्त हिरव्या आणि पोपटी रंगाच्या रानभाज्या....या भाज्यांची चव काही खासच असते.  या भाज्या बाजारात आल्या की किती घेऊ आणि किती नको असं होऊन जातं.  बाजारात गेल्यावर टाकळ्याचा कोवळा पाला आणि कुलूची मस्त पोपटी-हिरव्या रंगाची भाजी मी घरी आणली.  एरवीही आमच्याकडे पालेभाज्यांचे प्रमाण खूप चांगलं आहे.  पालक, मेथी या तर रोजच्याच...अगदी शेपू वगळता सर्व भाज्या घरी येतात...त्यामुळे चिरंजीव प्रचंड नाराज असतात.  रोजरोज हिरव्या भाज्या खाऊन मी हिरव्या रंगाचा होणार....असा बोअर जोक तो नेहमी मारतो.  मी त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करते.  त्यादिवशीही तेच झाले.  अद्याप कॉलेज-क्लास पूर्णवेळ सुरु झाले नसल्यामुळे मुलगा घरी होता.  भाजीच्या पिशवीतून कुलूची कोवळी पात वर दिसताच त्याचे सुरु झाले....आता ही अजून नवी भाजी का आणली...दुस-या भाज्या मिळत नाहीत का...त्याच्या नेहमीच्या या डायलॉग बाजीकडे मी लक्ष न देता माझ्या पुढच्या कामाकडे वळले.  लेकाला माझी सवय माहित होती.  अर्थात कितीही नाही म्हटलं तरी आई जेवणात पालेभाजी करणार याचा त्याला विश्वास होताच.

पालेभाजी...रानभाजी...हा शब्द ऐकला तरी आपल्यापैकी अनेकांची नाकं मुरडली जातात...लहानमुलांची तर पहिली.  मला आठवतं माझं बालपणही काही वेगळं गेलं नव्हतं.  माझ्या गावी, म्हणजेच रेवदंडा येथे तर पालेभाज्यांचा सुकाळ....पावसात तर या भाज्यांना बहर येतो.  यात कुलू, भारंगी, माचाळ, तेरी आळू, पालेबिरडं, टाकळा, कुर्डू, कौला, आंबटवेल असे कितीतरी प्रकार असायचे.  आई या भाज्या यायची वाटच बघायची...भाज्या बाजारात आल्या रे आल्या की आमच्याकडे हप्ता सुरु व्हायचा.  आता माझा लेक जशी नाकं मुरडतो तशी माझी अवस्था असायची.  त्यातल्या ब-याच भाज्या मला आवडायच्या नाहीत...आता समजतं मी त्यांचा मनापासून आस्वाद घ्यायचा कधी प्रयत्नच केला नाही.  ताटात वाढलेल्या या भाज्या पाण्याबरोबर पोटात ढकलल्या जायच्या.  त्यातल्या त्यात भारंगीची भाजी तर सर्वात नावडती. आई या भारंगीच्या पानांना वालाच्या दाण्यांसोबत उकळायची. मग तो काळपट हिरव्या रंगाचा काढा मला आणि माझ्या भावाला प्यायला मिळायचा.  या काढ्याने म्हणे पोटदुखी, जंत होत नाहीत.  त्यामुळे आई पावसात हा काढा नेहमी द्यायचीच.  तो टाळण्यासाठी आम्ही ना ना बहाणे शोधायचो.  अर्थात त्याचा कधीही उपयोग झाला नाही.  नाही म्हणायला या पावसाळी भाज्यांमध्ये मिळणारी पालेबिरडं नावाची भाजी माझी अत्यंत आवडती.  ही भाजी ताटात कितीही असली तरी ती फस्त व्हायची.  प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात ही भाजी होते.  या भागात वालाचे उत्पादन अधिक.  वालाची उसळ किंवा हिरव्या मिरचीवर होणारी वालाची कोरडी भाजी प्रत्येक घरी दर दोन दिवसांनी होतेच.  या वालामध्ये जे दाणे भिजत नाहीत, कडक रहातात, त्यांना वेगळं काढून ठेवतात. 


 हे दाणे वर्षभर साठवायचे.  मग पावसाची चाहूल लागली, पहिला पाऊस झाला, की घराच्या बागेमध्ये एका वाफ्यात दाणे रुजवायला टाकायचे.  जमिनीच्या उबीत हे वालाचे दाणे फुटतात.  अगदी बोटभर वर आले की काढायचे.  छान धुवून, थोडं चिरून तेल, लसूण, मिरची आणि ब-यापैकी कांद्यावर परतायचे.  भाजी तयार झाली की वरुन ओल्या खोब-याची पेरणी.  या भाजीची चव अप्रतिम.  तांदळाची भाकरी आणि ही भाजी यासाठी मी कधीही नाही म्हणाले नाही.  खरंतर आजही घरी मी हे पालेबिरडं करते.  स्टॉबेरी मिळणारे डबे त्यासाठी साठवते.  मग पाऊस लागला की त्यात वाल पेरायचे.  तिच पद्धत.  पण मातीची चव म्हणतात ना.  अद्याप काही गावच्या आणि त्यातल्या त्यात आईच्या हातच्या पालेबिरड्याची चव आली नाही.  असो. 


दुसरी आवडणारी भाजी म्हणजे कुर्डू आणि कौला यांची.  कौला म्हणजे चिंचेसारखी बारीक पानांची भाजी.  पिवळ्या रंगांची फुले त्या पानांवर येतात.  त्यात भाजीचा रंगही पोपटी. मनात भरणारा.  त्यावर पिवळ्या धम्मक रंगाची फुले.  अशा सुंदर भाजीची चवही तेवढीच छान असणारच.  या कुर्डू कौल्याची भाजीची तशीच करायची.  लसूण, मिरची आणि कांद्याच्या साथीने.  वर पांढ-या खोब-याची बरसात.  तांदळाची भाकरी आणि ही भाजी प्रत्येकवेळी न कुरकुरता खाल्ली आहे.  या भाजीला आमच्या रेवदंडा-चौल भागात गौरीची भाजी म्हणूनही ओळखलं जातं.  गौराई घरी आली की तिला या भाजीचा आणि तांदळाच्या भाकरीची नैवेद्य दाखवला जातो.  आजही आमची आई गणपतीमध्ये या भाजीचा नैवेद्य गौरी आगमनाच्यावेळी सायंकाळी करते.  या भाजीची चव ही विशेष असते.  पालेभाजी वर्गातील भाजी असूनही माझा लेक ही गौरीची भाजी आवडीनं खातो,  त्यावरुनच भाजीच्या
चवीचा अंदाज येतो. 
खरंतर या रानभाज्या बहुगुणी असतात.  त्यांचे हे गुण आता मला जसे कळले  आहेत, तसेच तेव्हा माझ्या आईलाही माहित होते.  त्यामुळे आपल्या मुलांनी सकस खावे हा तिचा आग्रह असायचा.
  कशाही खा, पण पालेभाजी ही पोटात गेलीच पाहिजे असा नियम...मग आवडीच्या भाज्या वगळता... कुलू, भारंगी, माचाळ, टाकळा, आंबटवेल या भाज्या बहुधा पाण्याबरोबरच पोटात जात...आता मात्र परिस्थिती बदलली आहे.  मी आणि वरद यांची या व्हिटॅमीन, कॅलशियम याबाबात जेव्हा चर्चा वजा वादावादी होते तेव्हा अर्थात लेकाची सरशी होते.  कुठून कुठून तो असे काही दाखले शोधतो...ते मला खोडता येत नाहीत.  या भाज्यांशिवाय आपल्याला व्हिटॅमिन कशातून मिळेल याची तो लिस्ट देतो....मग माझा नाईलाज होतो.  पण मीही आईच आहे.  आज या भाज्यांपासून अनेक पदार्थ तयार करता येतात.  अनेक कटलेट, पॅटीस, कोफ्तावर्गीय भाज्या तयार करता येतात.  ज्यामुळे या पावसाळी भाज्या पोटात जातात, पण खाणा-यांना ते कळतही नाही.  असे अनेक प्रकार मी बनवते...लेकाच्या वॉव फॅक्टरमध्ये ते मोडतात...म्हणजेच खातांना वॉव...मस्तच....अजून एक...म्हणत लेक त्याचा फडशा पाडतो.  आजकाल या पावसाळी भाज्यांच्या बाबत अनेक महोत्सवही होतात.  ग्रामिण भागात काम करणा-या काही संस्थाही या भाज्यांचे महत्त्व अधिकाधिक समजावे म्हणून प्रयत्न करीत आहेत.   डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टतर्फे गेली पाच वर्ष असा पावसाळी
रानभाज्यांचा उत्सव करण्यात येतो.  विक्रमगड तालुक्यातील भोपोली भागात हा खाद्य उत्सव होतो.  यात पावसाळी भाज्या आणि त्यांचे वैद्यकीय दृष्टीकोनातून महत्त्व तसेच या भाज्या बनवण्याची पद्धती याचेही लाईव्ह प्रात्यक्षिक होते.  ठाण्याच्या सीकेपी मंडळातर्फेही पावसाळी रानभाज्यांपासून विविध पाककृतींची स्पर्धा घेण्यात येते.  खूप छान खाद्यपदार्थ स्पर्धा असते ही...मी इथे नक्की जातेच.  आपण विचारही करु शकणार नाही अशा अनेक नवीन पाककृती या प्रदर्शनात पहायला मिळतात.  त्या बनविणा-याच्या कल्पकतेला आणि आयोजकांच्या तत्परतेला इथे सलाम करावासा वाटतो.
मंडळी आपल्यापैकीही अनेक असेच रानभाज्यांचे प्रेमी असणार...आणि जर या भाज्या कधी केल्याच नसतील तर त्या नक्की आणा आणि करुन बघा...त्यांची चव आणि त्यातील औषधी गुणधर्म यामुळे पुढच्यावेळी आवडीने या भाज्या घरात आणाल याची खात्री बाळगा....
  
सई बने
डोंबिवली
-----------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा




Comments

  1. खुपच छान..... मी खुप मिस करत आहे 3 वर्षा पासुन. मी ही सगळ्या भाज्या आवडी ने खाते.

    ReplyDelete
    Replies
    1. आता डोंबिवलीचा बाजार रानभाज्यांना फुलला आहे

      Delete
  2. मी कुंडीत वालाचे दाणे पेरले आहेत. गेल्या वर्षी टेकडी वरुन ताजा टाकळा खुडुन आणलेला.

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा.. छान... मोड आले की फोटो नक्की पाठव

      Delete

  3. , खुप छान लेख.

    ReplyDelete

Post a Comment