चवदार



दा





पावसाळी भाज्या हा गेल्या ब्लॉगचा विषय...या विषयावर अनेक बोलक्या प्रतिक्रीया आल्या...अनेक मैत्रिणींचे फोन आले.  काही जुन्या मैत्रिणी, ज्या फक्त वॉट्सअप माध्यमातून बोलतात...त्यांनी आवर्जून फोन केला.  आम्ही या भाज्या खातो...तू कशी बनवतेस असे रेसिपी विचारणारेही अनेक फोन आले...तर जेष्ठ लेखिका मीना गोडखिंडी यांनी या पावसाळी भाज्यांचा खास घरी बेत करण्याची गोड कल्पना दिली...खरंतर आतापर्यंतच्या सर्व ब्लॉगना खूप चांगला प्रतिसाद मिळाला....पण या पावसाळी भाज्यांनी बाजी मारली...खूप जणांना हा ब्लॉग आवडला...तर खूप जण नाराजही झाले.  नाराज का...तर पावसाळ्यात फक्त भाज्याच येत नाहीत...पावसाच्या सुरुवातीला येणारे मासेही फक्कड असतात...या पावसाळी माश्यावर काहीच लिहिलं नाही म्हणून अनेकांनी प्रेमळ नाराजी व्यक्त केली...म्हणून आजचा ब्लॉग हा या पावसाळी माशांच्या नावावर.


..
मासे एवढं बोललं तरी आमचं अख्ख घर हलतं...फक्त मासे तळल्याचा वास जरी घरात असेल तरी चिरंजीवांची स्वारी भलती खूष...आणि हेच तळलेले मासे जेव्हा ताटात येतात, तेव्हा आई म्हणजे आईचं...असो.  या पावसाळी भाज्या आणि मासे यांचा जेव्हा विषय चालू झाला तेव्हा जे काही फोन आले त्यात माझी मैत्रिण भावना सुळेचाही नंबर होता.  गेल्या लेखात शेवाळाच्या भाजीचा उल्लेख केला नव्हता म्हणून बाईंनी प्रेमळ नाराजी व्यक्त केली.  मग या शेवाळाच्या भाजीपासून होणा-या पदार्थांची जंत्रीच बोलून दाखवली.  खरं म्हणजे ज्यांनी ही शेवाळाची भाजी खाल्ली असेल तेच या भाजीबद्दल एवढ्या प्रेमाने आणि हक्कांनी बोलू शकतात.  ही भाजी गृहिणींची परीक्षा घेणारी असते.  तिची खटपटच खूप....पण ही भाजी तयार झाली की त्याचा दरवळ आणि स्वाद...अहाहा...शेवाळची भाजी आणि तांदळाच्या पांढ-या भाक-या म्हणजे एखाद्या फाईव्हस्टार हॉटेलमधल्या मेनूलाही फिका करणारा बेत आहे.  एवढी त्याची भन्नाट चव...माझ्या परिचयाच्या हरचेकर काकूंमुळे मी या शेवाळाच्या भाजीच्या प्रेमात पडले.  साधारण पंधरा वर्षापूर्वी...तेव्हा ठाण्याच्या बाजारपेठेतूनच ऑफीसला जायचे...तिथे पावसाळ्यात ही शेवाळाची भाजी,
सोबत आवळ्यांसारखी फळं आणि काही पानं विकायला आदिवासी बायकांची गर्दी झालेली असायची.  मी ही भाजी तेव्हा पहिल्यांदाच बघितली.  त्याबद्दल मी या हरचेकर काकूंना विचारलं...तेव्हा एखादी मोठी लॉटरी लागावी अशा आनंदात त्यांनी शेवाळची भाजी का...लगेच घेऊन ये...म्हणून मला सांगितलं होतं.  मी भाजी त्यांना दिली.  त्या बदल्यात त्यांनी  मला रेडीमेड भाजी दिली आणि भाकरीबरोबर खायची सूचना दिली.  खरं सांगते या भाजीचा पहिला घास खाल्ल्या आणि चटक म्हणजे काय याची अनुभूती आली.  तेव्हा ही भाजी आम्ही नवरा बायकोंनी चार दिवस पुरवून खाल्ली होती.  मी उत्सुकता म्हणून हरचेकर काकूंना रेसिपीही विचारली.  पण ही रेसिपी म्हणजे एका सुग्रणीची सत्व परीक्षाच...मी काकूंना मध्येच थांबवून हात जोडले आणि फक्त भाजीच्या चवीवरच समाधान मानंल...नंतर ही भाजी प्रत्येक पावसाळ्यात भेटत राहीली.  कुठल्याही खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनाला जा...या शेवाळच्या भाजीच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी...मग कळलं या शेवाळाच्या शेंगांपासून काय करता येत नाही... आमटी, भाजी आहेच.  पण भाजीच्या एवढ्या लाजवाब चवीवरही काहींचे समाधान होत नाही.  और थोडा...और थोडा....म्हणत
भाजीमध्ये मग मासे अॅड होतात...कोलंबी, जवळा, त्यात ओला आणि सुका हा प्रकारही आहेच बरं...शिवाय कालवं असे छोटे माशांचे प्रकार या भाजीत जिरवले जातात....मग आसपासच्या चार घरातही आज काहीतरी स्पेशल, अशी न सांगता जाहीरात होते....एकूण काय या शेवाळाचं काय काय करतात ते करणा-याच्या हौसेलाच ठाऊक...कटलेट....पॅटीस...कोफ्ता करी...असे आता सुग्रणींनी शोधलेले अनेक प्रकारही आहेत.  म्हणजेच या भाजीचं नाव कसंही असलं तरी शेवाळाच्या या भाजीवर अख्खा लेख लिहायचा म्हटलं तरी शब्दांची मर्यांदा संपेल, पण हे शेवाळ पुराण संपणार नाही.  एवढं चवदार....
या पावसाळ्यात मिळणा-यां माशांचा आणि माझा परियच झाला तो आमच्या रेवदंड्यातूनच.  ताजे, फडफडीत मासे खावे ते समुद्राशेजारीच असलेल्या आमच्या रेवदंड्याचेच.  पावसाळ्यात गावात शिवंडे नावाचे मासे मिळतात.  आई नेहमी या माशांचा सुका प्रकार करायची.  ब-यापैकी तेलावर लसूणाची फोडणी आणि तिखट, मिठ, हळद...बस्स एवढेच जिन्नस....साधारण शाळेतून सायंकाळी घरी आलं की आई या शेवडांचे सुकं आणि सोबत नाचणीची भाकरी असं ताट पुढे करायची.  खरं सागते आज मिळणा-या पिझ्झा, बर्गर, गार्लिक ब्रेड या प्रकारातील खाद्यपदार्थांना या भाकरी आणि शेवंडांच्या नखाचीही चव नाही.  एरवी नाचणीची भाकरी फार आवडायची नाही.  हे माहित असल्यामुळेच की काय आई या माशांसोबत नाचणीची भाकरी द्यायची.  मग या ताज्या शेवंडाचं सुक्याच्या वासापुढे भाकरी कुठली आहे ही गोष्ट नगण्य व्हायची आणि अख्खी भाकरी कधी संपायची हे कळायचंही नाही.  आमचं गावं सुटलं आणि या माशांची ताजी चवही मागे राहिली.  आता कधीही  नाचणीची भाकरी केली की या माशांची चव मात्र आठवते. 

या शेवंडांच्या जवळपास चवीचा मासा म्हणजे मळ्या मासा...कोकणात याला नदिचा मासाही म्हणतात.  पावसात नदिला पाणी आलं की हे मासे मोठ्या संख्येने येतात.  मग कंदिल, बॅटरीच्या उजेडात या माशांची शिकार केली जाते....हा मासाही फक्त तेल, मिठ आणि तिखटावर परतला जातो...चुलीवर...एवढाच जुमला असला तरी त्याची चव ही भन्नाटच असते. 
काही वर्ष मी पेणजवळील गागोदे खुर्द या गावी रहात होते.  हे गांव म्हणजे एक घरच होतं.  एवढा एकोपा.   या गावात मी अनेक उत्सव...सोहळे अनुभवले.  त्यातला एक म्हणजे, पावसाळ्यात खेकडे पकडण्याचा सोहळा.  हो, खेकडे पकडण्याचा सोहळा.  पहिला पाऊस झाला, किंवा पावसाची चाहूल लागली की गावात खेकडे पकडायची तयारी सुरु व्हायची.   मग कंदिल, बॅट-या, गॅसच्या बत्त्या, काठ्या यांची जमवाजमव व्हायची.   एका सायंकाळ वजा रात्री गावतले तरुण आणि अनुभवी मंडळी खेकडे पकडण्यासाठी नदिकाठावर जायचे.  इकडे घरातल्या महिला आपल्या कामाला लागायच्या...चुली पेटायच्या....एकीकडे तांदळाच्या भाक-या थापल्या जायच्या...तर दुसरीकडे खेकड्यामध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला तयार व्हायचा. 
रात्री उशिरा खेकडे घेऊन पुरुष मंडळी आली की, त्यांना साफ करुन तयार मसाल्यासोबत त्यांचा झणझणीत रस्सा तयार व्हायचा.  मग रात्रीचे किती वाजलेत याची फिकीर न करता भाक-या आणि खेकड्यांचा रस्सा फस्त व्हायचा.  किती छान दिवस होते ते.  ना कॅलरीजचे भूत मानेवर होते, की वजन वाढेल काय, ही उगाचची धास्ती मनात होती...


आता अगदी भल्या सकाळी ठाण्याच्या बाजारात गेलं तर हे पावसाळी मासेही पहायला आणि घ्यायला मिळतात...पण तरीही काहीतरी बिनसतं...एकतर लहानपणी जेव्हा हे मासे चाखले होते, तेव्हा ते चुलीवर तयार केले होते.  आणि दुसरं म्हणजे पुन्हा एकदा आईच्या हाताची चव...या दोन्ही गोष्टींना कधीच तोड नाही.....
एकूण काय भाज्या असो वा मासे...पावसाळा हा अस्सल खवय्यांचा आहे.  आता बघा ना, लवकरच श्रावण महिना सुरु होईल...मग गौरी गणपती....या प्रत्येक सणामध्ये खास रेसिपी....एखादी विशिष्ट भाजी...गोडाचा पदार्थ...मंडळी हेच तर वैशिष्ट्य आहे आपल्या खाद्यसंस्कृतीचं.  समृद्ध आणि संपन्न.  ही संपन्नता कितीही लिहिण्याचा प्रयत्न केला तरी आपण कमी पडू एवढी आहे हे नक्की....


सई बने
डोंबिवली

----------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा






Comments

  1. खूप चविष्ट ब्लाॅग! रेसिपीमुळे वाचताना छान वाटलं.

    ReplyDelete

Post a Comment