तिचा विश्वास


तिचा
विश्वास

गेला सगळा आठवडा वरदचे काही दाखले काढण्यासाठी झालेल्या धावपळीत गेला.  डोंबिवली ते कल्याण...कल्याण ते मुलूंड...मुलूंड ते ऐरोली...असा प्रवास एके प्रवास चालू होता.  त्यात पावसाची सोबत...पावसाळ्यात जसं असतं तसंच वातावरण.  कितीही स्वच्छतेचे आवाहन करणारे बोर्ड लावले असले तरी, त्याच्याखालीच खाद्यपदार्थांची रिकामी पाकीटं, चहाचे कप, कागदं...आणि बरच काही...सर्व पावसाच्या पाण्यात वाहत होतं...काही ठिकाणी कच-यात साठलेलं पाणी...मग या कच-यातून वाट काढत माझं काम चालू होतं.  नशीब एवढचं की पाऊस ब-यापैकी असूनही ट्रेन व्यवस्थित चालू होत्या.  याच ट्रेनमध्ये मला एक नवीन धडा मिळाला....

आपल्या लोकल ट्रेन आणि त्यातल्या त्यात महिलांचा डबा म्हणजे महिलांसाठी धावता शॉपिंग फेस्टीवलच असतो. बारा महिने हा उत्सव चालू असतो.  गेली अनेक वर्ष ही लोकल आम्हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे.  ती लेट असो वा गर्दीने तु़डूंब असो...तिला तेव्हा बोल लावले जातात...पण तरीही ती आपली आहे, ही भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात असते.  त्यामुळेच या गाड्यांमध्ये येणा-या फेरीवाल्या महिलाही अनेकींच्या परिचयाच्या असतात.  या फेरीवाल्या काय नाही विकत.... कानातले, बांगड्यां...टिकल्या....या  फॅशनच्या वस्तूंबरोबर अनेक गरजेच्या वस्तूही इथं मिळतात...अगदी साफ केलेल्या भाज्याही...नेहमी ठरावीक गाडीने प्रवास करणा-या महिला आणि या फेरीवाल्या महिलांचे अनोखे नाते झालेले पहायला मिळते.
मी सुद्धा लोकल प्रवास करते.  पण ठरावीक ट्रेन नाही...जेव्हा मिळेल ती आपली... त्यामुळे अशा नावाने परियच असलेल्या महिला विक्रेत्या माझ्या यादीत नाहीत.  तरीही नुसती तोंड ओळख अनेक जणींबरोबर आहे.  अशीच एक फेरीवाली महिला माझ्या गेल्या आठवड्याच्या प्रवासात योगायोगाने सोबत होती.  अगदी नंतर तिच्या सर्व वस्तू संपल्यावरही...त्यामुळे जरा गप्पा झाल्या...एरवी मी सुद्धा दाखल्यांसाठी लागणा-या सरकारी कागदपत्रांची जोड करता करता वैतागले होते.  त्या त्राग्यात या महिलेकडून विश्वास म्हणजे काय, हे शिकता आले... 
त्यादिवशी म्हणजे बुधवारी, कल्याणला जाण्यासाठी मी डोंबिवलीहून ट्रेन पकडली...त्यात बांगड्यांचा
मोठा हॅंगर घेऊन मला पहिल्यांदा ती दिसली.  खरंतर मी खूप महिन्यांनी तिला बघितलं होतं.  हसायचं तर कारण नव्हतंच.  पण तरीही नकळत ओठावर हसू आलं.  माझ्यापेक्षा तीच दिलखूलास हसली.  लोकल कल्याण होती, पण सकाळची वेळ असल्यानं डाऊन करणा-या महिलांची संख्या अधिक होती.  त्यामुळे काही महिला बांगड्या घेत होत्या.  काही जणी नेहमीच्या होत्या.  काहींनी आधीच काही आवडीच्या बांगड्यांची ऑर्डर दिली होती, तर काहीजणी किंमतीवरुन घासाघीस करीत होत्या....नेहमीचा व्यवहार चालू होता.  पण कुठेही अरेरावी नाही...ताई, माई, अक्का असा सगळा व्यवहार...कल्याण आलं म्हणून मी उभी राहीले.  तेव्हा तिने मला हाक मारली, ताई कल्याणला उतरता...तुम्ही नेहमी ठाण्यात चढता ना....आज कल्याणात आलात का....सगळं एका दमात...मी सुद्धा हो...हो....करत उतरले आणि गर्दीत मिसळले.  तरीही ती सोबत होती....विचाराने....मनात आलं, किती लक्ष असतं या बायकांचं...चढण्या-उतरण्याच्या जागा यांना माहित असतात...हा विचार करत जिथे काम होतं तिथे पोहचले.  पण ते काम कल्याणच्या सरकारी कार्यालयात होणार नव्हतं, हे दोन तास गेल्यावर समजलं.  मग मुलूंडचा पत्ता मिळाला.  पुन्हा लोकलचा आसरा.  नशीबाने कल्याणहून सुटणारी ट्रेन मिळाली.  गाडी सुटायला दोन मिनीटाचा वेळ होता.  मला जागा मिळाली.  हुश्श...हुश्श करत बसले तर समोर हिच बाई उभी...पुन्हा ओळखीचे हसू...माझे नकळत तर तिचे मनापासून...साधारण साडेबारा वाजल्याने गाडीही थोडी खाली होती.  माझ्या शेजारच्या महिलेने बांगड्यांचा ट्रे मागितला.  तिने सगळा ट्रे या महिलेच्या हातात दिला आणि डब्याच्या दुस-या भागात निघून गेली.  तिथे दुसरा ट्रे आणि बांगड्यांचा हॅंगर होता.  बरं माझ्या बाजुची महिला वरवर बांगड्या बघून डोंबिवलीला उतरली.  तो ट्रे तसाच...डोंबिवलीला चढलेल्या महिलेने ट्रे हातात घेतला आणि जागा पटकवली.  तेवढ्यात दुस-या भागातले ट्रे आणि हॅंगर घेऊन ही बाई पोहचली.  दुसरा ट्रे हक्काने
माझ्या हातात दिला.  आणि हॅंगर पिशवीत भरु लागली.  नकळत का होईना मी बांगड्या आणि गळ्यातल्या माळा बघू लागले.  चांगल्या होत्या.  पण आता माझा खरेदीचा मूड नव्हता.  मी बांगड्या बघते हे तिच्या लक्षात आले.  ताई हे पण बघा म्हणत तिने दुस-या ट्रेमधल्या बांगड्या आणि माळाही माझ्या हातातल्या ट्रे मध्ये ठेवल्या. एव्हाना ठाणे स्टेशन आलं.  माझ्या बाजुची महिला उतरली.  मग या बांगडेवालीला आपसूक जागा मिळाली.  सकाळपासून आता बसायला मिळालं...ती माझ्याशी किंवा आपल्याशीच बोलली असेल...मग माझी चौकशी सुरु झाली.  ताई कुठे उतरणार...मुलूंड...मी पण...आज दिवस चांगला आहे.  आत्ताच माल संपला.  आता अजून भरते.  मुलूंडला काही दुकानदार आहेत त्यांच्याकडून घेते आणि पुन्हा फेरी मारते.  मी तिच्या या संवादावर फक्त हो...हो..का...हं...एवढाच प्रतिसाद देत होते.  तिने बोलता बोलता सगळं मोठ्या पिशवीत भरलं आणि मुलूंडची वाट पाहू लागली.  आम्ही दोघीही मुलूंडला उतरलो.  योगायोगाने माझा आणि तिचा रस्ताही सारखाच होता.  मुलूंडच्या डाऊनच्या टोकाला आम्ही दोघी चालत होतो.  एकत्रच...पण काहीही बोलत नव्हतो.  मी तिला फक्त चेह-यांनीच तर ओळखत होते.  गेले अनेक वर्ष ही उंच, सावळी, बारीक अंगकाठी आणि कपाळावर मोठालं कुंकू लावणारी महिला मी ओळखते.  पण म्हणून काय तिच्याबरोबर गप्पा मारायच्या...माझ्या मनाला अजूनही ते पटत नव्हतं.  बहुधा माझ्या मनातला विचार तिने वाचला होता.  किंवा सामान भरायची घाई तिला होती.  तिही लगबगतेनं चालत होती. 
स्टेशनमधून बाहेर पडणार इतक्यात पावसाची जोराची सर आली.  सर येवढी जोरदार की आवाजानेच भीती वाटली.  मग काय, थांबावं लागलं.  ती सुद्धा थांबली.  माझ्याकडे पेपर होते, ते मी जपत होते.  तिच्याकडे तिच्या उत्पन्नाचं साधन...तिलाही ते जपायचं होतं.  त्यामुळे आम्ही दोघीही सारख्याच होतो की...अगदी टोकाच्या असलेल्या बाकड्यावर बसण्याशिवाय काही उपाय नव्हता.  दोघीही बसलो.  पण आमचे दोघींचे चेहरे काळजीने व्यापले होते.  मला पाऊस थांबेल का...माझं काम होईल का...ट्रेन बंद होतील की काय...अश्या नसत्या काळज्या वाटत होत्या...पण त्या मनातल्या मनात...माझ्यापेक्षा ती मनमोकळी होती....सहज बोलली...पाऊस जरा वेळानं आला असता तर दुकान गाठलं असतं.  मी माल भरेपर्यंत कोसळला असता तरी काळजी नव्हती...आता एक तास तरी वाया गेला ताई...मगाशी मोकळी असणारी ती आता काळजीत होती.  माझ्याबरोबर बोलत होती...पण नजर मात्र पावसावर होती...मला ट्रेनमधली तिच्या ट्रे ची आठवण झाली.  मी म्हटलं...तुम्ही नेहमी ट्रे काणाच्या न कोणाच्या हातात देता...कोणी त्यातलं सामान तुमच्या नकळत काढून घेतलं तर...ती हसली...म्हणाली, अहो ताई, आमचं पोट तुमच्या भरवश्यावर असतं बरं...आता तुम्ही कुठं रोज भेटता...आपली कुठं ओळख आहे...पण जेवा कधी भेटता तेव्हा हसता ना...मग बस...यावरच आमचा
भरवसा...असं ओळख ठेवणारी माणसं कधी फसवत नाहीत...
कसला खुलासा केला तिनं...पाऊसही कमी झाला होता...मी बॅगेतून छत्री काढेपर्यंत,  ताई मी येते म्हणत, ती तिच्या नेहमीच्या दुकानात निघाली...मी तिच्या मागे होते...मागेच...चालण्यातही आणि विचारातही.  एवढ्या वर्षात आमचे चेहरे एकमेकींना पाठ झालेले.  पण ती पुढे गेलेली...नेहमीच्या साध्या हसण्यावर तिचा विश्वास...या विश्वासावर आपल्या वस्तू दुस-याच्या ताब्यात देऊन ती निर्धास्त असते....आणि मी...मी विचार करत बसले होते, की हिला माझ्या चढण्या-उतरण्याच्या बाबत एवढी माहिती का असते याचा...मी नकळत मान्य केलं...तिने माझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत.  अनुभवाची चांगली शिदोरी तिच्याकडे होती...माझ्यासमोरच ती त्या होलसेलच्या दुकानात शिरली...मी पुढे ऑफीसमध्ये गेले....तिथे दोन तास घालवल्यावर कळलं पुन्हा दुस-यादिवशी यावे लागणार....वैतागले....मग लगेच विचार आला...कदाचित उद्याही ती भेटेल...आणि भेटली की पहिलं तिचं नाव विचारेन...आणि माझ्याकडून नव नातं जोडेन...विश्वासाचं....

सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा



Comments

  1. छान लिहिलंय शिल्पा!

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे च हा लेख ही सुंदर, धावती शाॅपिंग....... विश्वास 👍👌

    ReplyDelete

Post a Comment