किंमत, व्हॅल्यू... आणि बरंच काही...


किंमत,
व्हॅल्यू...
आणि
बरंच
काही...

दोन दिवसांपूर्वी माझ्या अॅक्टीव्हाला दुस-या अॅक्टीव्हाने मागून हलकीशी धडक दिली....माझ्या गाडीवर माझा जाम जीव...अगदी नव-यानेही चालवतांना खड्यात आपटली तरी मी चिडते....या अशा गाडीला दुसरी गाडी मागून हलकीशी घासली...किती राग आला एका क्षणांत....मागे वळून काही बोलणार इतक्यात शेफाली दिसली...तिचीच गाडी माझ्या गाडीला थोडी घासली होती...मैत्रिणीने गाडी ठोकली म्हणजे सगळा राग नाईलाजाने का पण गिळावा लागला...त्यात शेफाली म्हणजे माझी गाडी चालवण्यातली गुरु...काही वर्षापूर्वी जेव्हा  केवळ भीतीपोटी मी गाडीला हातही लावत नव्हते, तेव्हा तिनेच मला धीर देऊन गाडी चालवायला प्रवृत्त केले.  ती स्वतः अॅक्टीव्हा आणि बाईकही उत्कृष्ठ चालवते...मग आज काय झालं...नेमकं माझ्याच गाडीला ठोकायचं होतं....मी मनात हे म्हणते न म्हणते तोच बाई sorry…..sorry....म्हणत पुढे आली.... sorry बोलतंच तिने माझी गाडी बघितली....फार नाही पण नंबर प्लेटला तिची गाडी घासली होती...तिने ते बघितलं आणि पुन्हा sorry सुरु झालं....मी तिला ओके म्हटलंही पण ते ऐकण्याचा तिचा मुड नव्हता बहुधा....अग आजचा दिवसच खराब आहे...मी गाडी ठोकली आणि ती सुद्धा नेमकी तुझी....ए...खरचं sorry हं...शेफाली कुठून तरी आली होती.  माझं घर जवळच होतं...आणि नशिबाने मला मोकळा  वेळही होता.  त्यामुळे मी तिला जाऊदे चल, तुला शिक्षा देते म्हटलं...ती अजूनही वैतागलेली होती...त्यातून माझ्या शिक्षा या शब्दाला तिने पकडलं...अग बाई sorry म्हणते ना तुला परत....माझा आजचा दिवसच खराब आहे ग...मी काय करु...म्हणत ही माझी मैत्रीण मला आर्जव करु लागली....तिची अवस्था बघून मला हसूही येत होतं..पण माझ्या हसण्याला आवर घालत मी तिला गाडी घराच्या जवळ पार्क करायला सांगितली आणि काहीशा वैतागलेल्या या शेफालीला जरा ओढतच घेत घर गाठलं...
.
मैत्रिण घरी आली की जे करतात तेच मी करायला घेतलं...कॉफी...शेफालीसारखी मी सुद्धा अनेकवेळा वैतागते...कधीतरी कोणाचा राग कोणावर नकळत निघतो...उगीचच डोक्यावर नको तेवढा ताण दिला जातो...अशावेळी एकच उपाय मला दिसतो, तो म्हणजे कॉफी...आज शेफालीला मी घरी घेऊन आले होते, तिच्याकडे बघून कळत होते की ती सुद्धा कोणावर तरी प्रचंड वैतागली होती.  माझी गाडी तिने त्याच विचारात ठोकली होती.  घरी आल्यावर मी कॉफी करेपर्यंत तिने पंख्याचा स्पीड एवढा वाढवला की, जणू पंख्याची हवा तिच्या डोक्यातील सर्व प्रश्न संपवणार होती...
कॉफीचा मग तिच्यापुढे करत मी म्हटलं, ही घे तुझी शिक्षा...शेफालीने गरम कॉफीचा घोट घेतला आणि म्हणाली, मी त्या..त्या...नातेवाईकांकडे गेले होते ग....मी समजले...शेफालीचे हे जवळचे नातेवाईक...लहानपणी तिच्या आईवडीलांना त्यांनी खूप मदत केली होती.  त्यामुळे शेफाली त्यांचा खूप आदर करत असे....त्यांच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमाला शेफाली अगदी सकाळपासून हजर असायची...सगळी उठबस...जेवणाचे प्रकार...मग होणारी आवरा आवर...साफसफाई...शेफाली न सांगता करायची, अगदी न सांगता...पण अलिकडे तिच्या लक्षात येऊ लागले होते की, काही कार्यक्रम असल्याशिवाय या घरात गेलं की तिच्याकडे लक्ष देण्यात येत नसे...काहीवेळा घरची मुख्य बाई तिच्या खोलीतून बाहेरही येत नसे.  मुलांचा अभ्यास घेत आहे, किंवा कपडे आवरते आहे, असे कारण सांगून ती स्वतःच्या खोलीत बसलेली असे.  बरं कार्यक्रमाला शेफाली गेली तरी कामापुरतं तिच्याबरोबर बोललं जायचं, पण कोणी पाहुणे आले की तिची ओळखही करुन देण्यात येत नसे...तसं पाहिलं तर शेफाली ही सुखवस्तू घरात नांदणारी.  नवरा, दोन मुलं...नवरा चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर...मुलंही चांगल्या शाळेत शिकत होती.  स्वतः शेफालीही सुग्रण असल्यामुळे काही ग्राहक पेठांमध्ये आपला स्टॉल वगैरे लावतेही...सर्व स्तरावर एवढं चांगलं वातावरण असतांना या घरातून
मिळणा-या वागणुकीमुळे ती काही महिने अस्वस्थ होती. 
तशी शेफाली मोकळ्या मनाची...अगदी समोरच्याला वाईट वाटले तरी चालेल पण स्पष्ट बोलणारी.  पण या नातेवाईकांबाबत तिने तिच्या  स्पष्टपणाला आवर घातला होता.  काही भावना असतात की ज्या दुखावता येत नाही.  तिचीही मानसीक बांधिलकी या घराबरोबर अशीच झाली होती.  भले त्यांना तिची किंमत असो वा नसो.  शेफाली मात्र त्या नातेनाईकांना खूप मान देत असे.  पण तरीही ती मनातून नाराज झाली होती.  आपला फक्त काही कामासाठी वापर होतोय.  माझी त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही.  फक्त त्यांनी हसून माझ्याबरोबर थोडं बोललं तरी खूप झालं...एवढेच तिचे म्हणणे असे.  गेल्या गणपतीच्यावेळीही अशीच नाराज झालेली शेफाली मला भेटली होती.  पण रडत बसणा-यांच्यात ती नव्हती.  तिने स्पष्टपणे मला तिची भूमिका सांगितली होती....कोणी माझा राग करु दे...मला काय करायचंय...मी काही केलंय का...नाही ना...मग मी तिथे जाणार...हक्काने...हवी ती मदत करणार...कोणी माझ्या बरोबर बोला....अथवा नको...मला फरक पडत नाही...तेव्ही मी शेफालीचे कौतुक केले होते...असा मनाचा खंबीरपणा खूप कमी पहायला मिळतो.  पण आता जवळपास वर्षभराने शेफालीचा हा खंबीरपणा कुठेतरी कमी झाल्याचे दिसत होते.
आज शेफाली त्या नातेवाईकांकडे गेली होती.  मध्यंतरी तिने त्यांच्याकडे जाणेयेणे कमी केले होते.  त्यात त्यांच्याकडचा एक कार्यक्रमही तिने मिस केला.  आज जेव्हा ती त्यांच्याकडे गेली तेव्हा पहिल्यांदा त्या घरातील कर्त्या महिलेने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले.  ब-याचवेळानंतर बाहेर आल्यावर कार्यक्रम किती छान झाला...किती मोठी लोकं आली होती....त्यांनी आणलेल्या भेट वस्तू याची यादी वाचून दाखवली....पण शेफाली का आली नाही, तिची कमी जाणवली हे काही त्यांनी सांगितलं नाही....एवढ्यानं आमच्या शेफालीबाई नाराज झाल्या....
आमची कॉफी पिऊन झाली...माझा अनुभव पुन्हा कामी आला...कॉफी उपचाराचा फायदा झाला.  कप खाली ठेवत शेफाली म्हणाली छान झाली होती....आपण किती कोणाला गृहित धरतो ना...त्या नातेवाईकांना मी आवडत नसेन...त्यांनी माझ्याबरोबर कसे वागायचे हा त्यांचा प्रश्न...आणि मी त्यासाठी माझा मुड कशाला खराब करुन घेऊ....अशी शहाणपणाची वाक्य येऊ लागली, तेव्हा मी समजले शेफालीबाई पुन्हा ताळ्यावर आल्या....पण एवढ्यावरच तिचे समाधान झाले नाही.  शेफाली फिल्टर कॉफी छान करते....अगदी अण्णा स्टाईल...माझ्या किचनचा ताबा घेत तिने कॉफी केली...मग या कॉफीच्या स्वादाबरोबर हसत-हसत sorry बोलून शेफाली गेलीही...
ती गेल्यावर मला जाणवलं, आपण आपल्या मनावर किती ओझं घेऊन वागतो.  आपल्याला बरोबर जे छान बोलतात, वागतात त्यांची काळजी आपण फार घेत नाही, त्यांना गृहीत धरतो.  आणि जी माणसं आपल्याला टाळतात...आपला वापर फक्त कामापुरता करुन घेतात...अशांनी छान-छान वागावं अशी अपेक्षा ठेऊन असतो.  त्यांनी एकदा तरी हसून बोलावं म्हणून झुरत असतो.  असं माझ्याही बाबतीतही होतंच की...प्रत्येकाच्या मनात असा हळवा कोपरा असणारी माणसं असतात...त्यांना आपली किंमत असो वा नसो पण आपण त्यांना खूप जपत असतो...पण या सर्वात नकळत जी आपल्यावर माया करीत असतात...आपली काळजी करत असतात...अशी माणसं दुर्लक्षीत होतात....हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं म्हणतात ना ते हेच...

सई बने
डोंबिवली
---------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा



Comments

  1. शिल्प खूप छान लेख आहे. कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हे ओझे घेऊन आपण रोज फिरत असतो तुझ्या लेखामूळे हे ओझे कमी होईल.

    ReplyDelete
  2. सुरेख आणि समर्पक वर्णन

    ReplyDelete
  3. पंख्याची हवा जणूकाही तिचे प्रश्न........ मस्त......... अपेक्षा ठेवणे सोडले पाहिजे ....मस्त......
    Control आणि patience खुप जरुरी असतात.....

    ReplyDelete
  4. Mast aahe lekh... suresh ... muddesud likhan

    ReplyDelete

Post a Comment