आम्ही.... स्पायडरमॅनचे वंशज.....


आम्ही..

स्पायडरमॅनचे

वंशज...

गेल्या काही दिवसात पावसाचे धुमशान चालू आहे.  आपल्या राज्याच्या काही जिल्ह्यांची तर पार दैना झाली आहे.   मुंबई, ठाणे येथेही मोठ्याप्रमाणात पाऊस झाला.  जनजीवन विस्कळीत झाले.  पावसाच्या पाण्यात अनेकांचे संसार उद्धस्त झाले.   त्या भागातील छायाचित्र बघतांना अंगावर काटा आला.  अशाच काही छायाचित्रांत ठाण्यातील एक दृष्य चटका लावून गेले. 

गेल्या आठवड्यात आपल्या प्रत्येकाच्या वॉट्सअपवर एक छोटा व्हिडोओ फिरत होता.  एक तरुण ट्रेनमध्ये चढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.  पण ट्रेनमधून उतरण्याच्या आणि चढण्याच्या लोंढ्याच्या मध्ये अडकल्याने कात्रीत सापडल्यासारखी या तरुणाची अवस्था  झाली होती.  शेवटी ना घर का ना घाट का असा झालेला हा तरुण सरळ वर उचलला जातो,  आणि त्याच गर्दीतून तसाच बाहेर फेकला जातो.  गेल्या आठवड्यात या व्हिडीओला मुंबईचा स्पायडरमॅन म्हणून बरेच लाईक्स मिळाले.  अर्थात व्हिडीओ आहेच तसा....पण हा व्हिडीओ, जे नेहमी प्रवास करतात त्यांनी त्या तरुणाच्या जागी स्वतःला बघितले असेल हे नक्की...
आज लोकल सेवा म्हणजे समस्त मुंबईकर आणि उपनगरात राहणा-या नागरिकांचा आत्मा आहे.  ही सेवा नसेल तर ही शहरे ठप्प होतात.  सर्व व्यवहाराची भीस्त या लोकल सेवेवर...असे असतांना नेहमीच्या एका धास्तीने त्रस्त असतो.  टीव्ही लावला की पहिल्या बातम्या लावल्या जातात....का तर लोकल निट आहे का ते बघा....उपनगरातल्या प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती तरी लोकलचा प्रवास करतो.  मात्र या व्यक्तीबरोबर घरातील प्रत्येकजण या प्रवासात असतो.  कारण लोकल निट वेळेवर असल्या तरी त्या प्रवासात अनेक अडचणी असतात.  गर्दी तर पाचवीला पुजल्यासारखी.  तुम्ही या गर्दीच्या रेट्यामधून आत चढलात की मोठी लढाई जिंकल्याचा आनंद असतो.  पण डब्यात आधीच असलेल्या गर्दीत आपली जागा करायची हे पुढचे आव्हान असते.  कधी कधी आम्ही नेहमीचे...या कॅटॅगरीतल्या लोकांनी जागा अडवल्या असतात....त्यांच्यात वाट करत आपल्याला उभं राहण्यासाठी आणि जमलं तर हातातली बॅग रॅकवर ठेवण्यासाठी आजूबाजुच्यांना विनंत्या कराव्या लागतात.  बरं गाडीत चढण्याची जशी घाई करावी लागते, तशीच उतरायचीही...हे सर्व करतांना आपल्या चिजवस्तूंची आपण काळजी घ्यायची...मोबाईल, पाकीट कधी गायब होईल याचा नेम नाही.  हे सर्व सांभाळून उतरलात की पुन्हा घाई करावी लागते, ती जिना पकडायची.  आता बहुतेक स्थानकावर एस्केलेटरची सुविधा असली तरी त्याच्या पहिल्या पायरीवर आपले पाऊल ठेवण्यासाठी पुन्हा रेटारेटी....बरं थोडं थांबावं म्हटलं तरी पुढची गाडी यायची वेळ होतेच...पुन्हा त्यातील गर्दीची भीती....तमाम लोकलवीरांना अशाच अनुभवातून जावे लागते.  या येवढ्याच अडचणी आहेत असंही नाही.  गाडीत चढल्यावर वा उतल्यावर तुम्ही पडणार नाहीत ना...गाडीत गर्दीने घुसमटणार नाहीत ना...किंवा जिन्यावर चढतांना चेंगराचेंगरीत सापडणार नाहीत ना याचीही काळजी आहेच की....
आता पावसात तर या अडचणी दुपटीने वाढतात.  पाणी ट्रॅकवर आलं की रेल्वे रेंगाळतात.  मग त्या किती वेळ रेंगाळतील याची साधी सूचनाही नाही.  गेल्याच आठवड्यात बदलापूरला राहणा-या माझ्या मैत्रिणीने रात्री साठेआठला ठाण्याहून ट्रेन पकडली.  अंबरनाथ स्थानकाहून गाडी पुढे गेली आणि तिथेच थांबली.  तब्बल दोन-अडीच तास ती आणि तिच्यासारख्या अनेक महिला डब्यातच...काहीही सूचना नाही.  मदत नाही.  बाहेर चांगले गुडगाभर पाणी साचल्याने अंधारात उतरायचाही धीर नाही.  शेवटी ज्या काही महिला होत्या त्यांनी आपापल्या घरातून कोणाला तरी बोलावून घेतले.  रात्री बारानंतर मग त्यांनी घर गाठले. 
आज लोकलने प्रवास करणा-या प्रत्येकालाच या अनुभवातून कधी ना कधी जावेच लागते.  मी गेल्या चार वर्षापासून लेकाला घेऊन ठाण्यापर्यंत प्रवास करते.  मुलगा सोबत असल्याने पहिल्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला.  का तर त्याला गर्दीचा त्रास नको म्हणून....त्याच्या क्लासच्या वेळेत त्याला सोडणे एवढेच काम.  नंतर रात्री तो वडीलांबरोबर येणार.  हा चार वर्षापासूनचा शिरस्ता ठरलेला.  पण या प्रवासातही अनेकवेळा आलेले अनुभव अंगावर काटा आणतात.  एकदा दिव्याला डब्यात एक छक्का चढला.  दारुमुळे त्याचा तोल जात होता.  तो सरळ अंगावर पडेल की काय इतका जवळ आला.  मुलगा आणि मी घाबरलो, आणि कसेबसे तिथून उठून डब्याच्या पार टोकाला जाऊन बसलो.  नशीब एवढंच की 182 ही रेल्वेची सेवा खूप चांगले सहकार्य करते.  थोडी भीती कमी झाल्यावर त्यांना फोन केला...नंतर त्यांनी फोन करुन कळवलं की त्याला घाटकोपरला उतरवलं...दोन वर्षांपूर्वी नवरा आणि मुलगा रात्री परत येतांना नेहमीची ठाण्याहून सुटणारी लोकल चुकली.  त्या दोघांना तब्बल एक तास कुठलीही गाडी पकडता आली नाही.  पाऊस मी म्हणत होता.  शेवटी रात्री दहा वाजता दोघांनीही उलटा प्रवास करीत मुलुंड गाठलं.  आणि तिथून लोकल पकडून डोंबिवली गाठलं.  ही दोघंही घरी येण्यासाठी असा खटाटोप करीत असतांना इथे डोंबिवलीत माझ्या जीवात जीव नव्हता...ही अशी अवस्था आज प्रत्येक आईची असते. 
आज माझं लेकरु मोठं झालं.  एकटं प्रवास करु लागलं.  तरीही तो त्याच्या ठरलेल्या स्थळी जाईपर्यंत जीव टांगलेला.  अशा किती आया असतील...बरं आमची काय अपेक्षा असते...बसायला
ऐसपैस जागा...मोकळी जागा...अगदी दोन मिनीटात येणा-या लोकल...या सर्व अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत...कारण गर्दीचा रेटाच एवढा असतो.   पण निदान प्रामाणिकपणे पास वा तिकीट काढून प्रवास करणा-याला निट उभं राहता येईल येवढी तरी जागा असावीच की.  त्याच्या सुरेक्षेसाठी तरतूद असावी.  स्वच्छतेची साधनं असावीत....एवढी तर अपेक्षा आम्ही करु शकतो ना...मी आणि माझ्यासारखे लाखो जण महिन्याचा पास कधी संपतो हे कॅलेंडरवर आठवणीने लिहीतात....आणि पास संपला की त्या तारखेला किंबहुना त्याच्या आधी एक-दोन दिवस आठवणीने काढतातही...पण या बदल्यात काय मिळतं याचा विचार केला तर काहीच नाही...हे उत्तर....आम्ही रोज फक्त एका कोंडवाड्यातून प्रवास करतो....
कालपरवा हीट ठरलेला तो स्पायडरमॅनचा व्हीडीओ ही खरी प्रत्येक प्रवाशाची शोकांतिका आहे.  आज लोकल सेवेला किती वर्ष झाली...आमच्या प्रत्येक दिवसाचा ठराविक वेळ तिच्यासाठी असतो...तिच्यामुळे असतो....पण हिच लोकल सेवा कधी सोप्पी...सुटसुटीत आणि सुरक्षित होईल तो खरा सुदीन असेल....

सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा




Comments

  1. लोकल व मुंबईकरांची सत्यता स्पाइडर मॅन. लोकल प्रवासी मुंबईकर मनातील धुसफुस या लेखातून कागदावर अभिनंदन

    ReplyDelete
  2. खूप छान लेख धकाधकीच्या जीवनावर सुटकेचा श्वास कधी मिळणार यावर प्रकाश टाकणारा लेख

    ReplyDelete

Post a Comment