मी........ माझं..... मलाच....


मी........
माझं.....
मलाच....
गुरुवारी आपल्या देशाचा स्वातंत्रदिन...त्यात रक्षाबंधन...हे दोन्हीही सोहळे अनेक घरात नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत साजरे करण्यात आले.  आमच्याकडेही तोच माहोल होता.  पंधरा ऑगस्टला क्षाबंधन असल्याने राख्यांवरही देशप्रेमाचा रंग चढला.  पै-पाहुणे....नातेवाईक....मित्रपरिवारासोबत एक छान दिवस साजरा झाला.  सकाळपासून पाहुण्यांच्या आणि छोट्यांच्या वावराने गजबजलेलं आमचं घर रात्री दहा नंतर शांत झालं.  घरी पुजाही झाली.  ही गडबड जरा शांत झाल्यावर, म्हणजे रात्री साडेदहाच्या सुमारास आशा काकू आली....बापरे....तिला बघितल्यावर एकदम दचकल्यासारखं झालं....कशी होती ती....आता....नकळत मी सुद्धा तिच्याबरोबर माझी तुलना करु लागले....

आशा काकू म्हणजे सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व...स्वयंपाकघर म्हणजे तिच्या आवडीची जागा...तिने काहीही बनवलं तरी ते चविष्ठ...अगदी आपल्या नेहमीच्या पदार्थांपासून ते पंजाबी, चायनीज, थाई...असं कोणत्याही प्रांतातल्या किंवा देशातल्या चवी तिला पाठ...तशी ती फार कुठे फिरली नाही... पण आशा काकूंना हे प्रांत...देश चवीने पाठ आहेत.  प्रत्येक पदार्थांत ती म्हणजे हुकमाचा एक्का....शिवाय तिलाही हौस भारी.  फक्त स्वयंपाकाची हौस नाही, तर घरही टापटीप हवं.  मला तर ब-याच वेळा शंका यायची हिला स्वच्छतेचा रोग झालाय की काय....एवढी टापटीप...घराच्या लाद्या चारवेळा पुसणार...पडदे दर आठवड्यांनी धुणार...चादरी, टॉवेल यांची स्वच्छता तर विचारायला नको....स्वयंपाक घर अगदी लख्ख...त्यासाठी ठरावीक दिवसांनी सर्व भांडी,डबे,रॅक यांची साफसूफ....बरं हे सगळं स्वतः करणार...तिला ब-याचवेळा मी आणि अनेकांनी कामाला कोणी ठेव असा आग्रह केला.  पण ती मानली नाही.  आपलं घर हे आपणच स्वच्छ ठेवायचं...मला सवय आहे...मला अन्य कोणाचंही काम पटत नाही....बाहेरची लोकं वरवर काम करतात...अशा अनेक सबबी ती पुढे करायची.  बरं तिने बनवलेली प्रत्येक गोष्ट खरोखर परफेक्ट असणार...त्यामुळे तिला कितीही विरोध केला तरी ती एखादा पदार्थ पुढे करायची...मग काय पुन्हा तिचं कौतुक...
पण या सर्वांतून आशाकाकूंनी स्वतःला नकळत आपल्याच भावविश्वात कोंडून घेतलं.  काकूला दोन मुलं.  काका सरकारी नोकरीत चांगल्या पदावर...त्यांना समाजसेवेची आवडही...मित्रपरिवारही मोठा...त्यांचे सर्व मित्र-नातेवाईक काही मिटींग असल्या की आवर्जून त्यांच्याच घरी येत.  दरवेळी मिटींग काकूंच्याच घरी...का तर काकूंच्या हातचं जेवण...शनिवार-रविवारी अगदी वीस-पंचवीस माणसांचं जेवण ठरलेलं.  त्यातही कितीतरी विविधता.  पाहुणेही अगदी रहायला येणार...हक्काने रहाणार...आणि काकूंकडून छान पदार्थ करुन घेणार...ब-याचवेळा त्यांच्या या स्वभावाचा अनेकजण फायदा घेतात हे समजायचे...त्यांना तसं सांगूनही झालं.  पण काकूंनी कधी ऐकलं नाही.  या सर्वांमध्ये कधीतरी आजारीही व्हायच्या...पण तातपुरते उपचार करुन पुन्हा काकू उभ्या रहायच्या...नंतर काकूंच्या मुलांनाही तिच सवय लागली. त्यांच्याही पार्ट्या घरी व्हायला लागल्या.  मुलांचे वाढदिवस, सण, सोहळे यात काकू पार गुतूंन गेल्या...पुढे दोघंही मुलं इंजिनीअर झाली.  एक परदेशात, तर दुसरा बंगलोरला नोकरी निमित्त गेलाय.  आता काका-काकू एकटेच रहातात.  दोघांचाही मित्रपरिवार अफाट म्हणावा असाच आहे.  शिवाय नातेवाईकही पुष्कळ...त्यात मुलांचंही कौतुक आहे.  नोकरीनिमित्त बाहेर असली तरी आईवडीलांची काळजीही तेवढीच घेतात....बंगलोरला असलेला ब-याच वेळा अगदी शनिवार-रविवारची सुट्टी असली तरी आईबाबांकडे रहायला येतो.  परदेशात असलेल्या मुलाचे वर्षापूर्वीच लग्न झालं...
सर्व तसेच असले तरी काकू मात्र प्रचंड बदल्यात...याला कारण ठरलं ते त्यांचं मी...माझं...धोरण...सर्व मीच करणार...घरातली सर्व कामं, स्वच्छता...आल्यागेल्यांचा पाहुणचार...सर्व कसं परफेक्ट झालं पाहिजे...या त्यांच्या अट्टाहासामुळे त्यांनी त्यांच्या आरोग्याची पार हेडसांळ केली.  जेवणासाठी तासंनतास उभं राहिल्याने आता पायाचे दोन्हीही गुडघे प्रचंड दुखतात...आता  पुजा करायची असेल तरी खुर्ची घेऊन बसायला लागते...ज्या स्वयंपाकघरातील ओट्यावर त्यांचे राज्य होते तिथे आता त्यांना जाताही येत नव्हते.   आईची गुडघे दुखी बघून मोठ्या मुलाने आणि सुनेनं ऑपरेशचा पर्य़ाय दिला.  मुलगा त्यासाठी भारतात आलाही...तो आठवड्याभरात परत गेला तरी सुनेनं त्यांची खूप काळजी घेतली....काकू थोड्याफार चालू लागल्या...पण गुडघ्यात पुन्हा इन्फेकशन झाले...पुन्हा दवाखाना आणि वेदना...पण या सर्वात काकूंचे दुःख वेगळं आहे....ज्या घरात त्यांचे राज्य होते ते आता दुस-या हातात गेल्यांचं त्यांना बघावं लागतंय....
मोठ्या मुलाच्या लग्नाच्या वेळीच काकूंना गुडघ्य़ातून असह्य वेदना होऊ लागल्या.  अनेक डॉक्टर झाले.  सर्वांनी जवळपास एकच निष्कर्ष काढला...काकूंच्या गुडघ्यावर खूप ताण येतोय...त्यांनी थोडा आराम करायला हवाय...शेवटी काकूंनी नेहमीचेच केले...तात्पुरते उपाय केले.  मोठ्या मुलाचे लग्न...त्यामुळे त्यांच्यात दुप्पट उत्साह आला...घर पाहुण्यांनी भरुन गेले.  घरात काम करायला आपण कोणी मदतनीस ठेऊया असा काकांनी खूप आग्रह केला....पण काकूंनी ठाम नकार दिला....आम्ही हक्कांनी काकूंकडे काम करायला जायचोही...पण काकूंचं लक्ष प्रत्येक कामात असायचं...अगदी साधं खोबर खिसायला घेतलं तरी काकूंच्या चार सूचना...ते असंच हवं...फार जाड नको...फार पातळ नको...कपडे असेच वाळत घालायचे....शेवटी या सूचनांना कंटाळून मदतीला आलेल्या काही नातेवाईकांनी त्यांच्याकडे  न जाणेच पसंत केले.  पण काकू थांबल्या नाहीत...लग्न...पुजा...सर्व त्यांनी पार पाडले....पण लग्नानंतर आठवडा भरातच त्यांचे पाय प्रचंड सुजले...उभंही रहाता येईना...स्वयंपाकघरात जायची तर गोष्टच नाही.  फिरायला गेलेला मुलगा आणि सून आल्या आल्या त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले.  डॉक्टरांनी काही दिवसांसाठी अॅ़डमिट करुन घेतलं.
 इकडे सर्व घर नवीन सुनेच्या ताब्यात गेलं.  अगदी स्वयंपाकघरही....तिने ते तिच्या पद्धतीनं सांभाळलं.  हॉस्पिटलमधून परत आल्यावर त्या पहिल्या स्वयंपाकघरात गेल्या...वस्तूंच्या बदलेल्या जागा बघून हैराण झाल्या...पण काहीही करु शकल्या नाहीत...कारण त्यांना फारवेळ उभंही रहाता येत नव्हतं...नव्या सुनेला त्यांची घालमेल समजली...तिने स्वयंपाकघरात त्या थो़डावेळ आराम करु शकतील असी व्यवस्था केली.  मग ती जेवण करतांना प्रत्येक गोष्ट त्यांना विचारुन करायची.  पण मुलाने तिलाही परदेशात बोलावून घेतलं...मग जेवण करायसाठी आणि घरातील कामं करण्यासाठी एक बाई ठेवण्यात आली.   
मी कधी काकूंच्या घरी गेले की, त्यांना नेहमी सांगायचे हे सर्व तुम्हीच तुमच्या हातांनी केलंत.  त्या तेव्हा हताशपणे हसायच्या....आणि म्हणायच्या,  हो ग, पण करतांना नाही समजलं...महिन्याभरात त्या चालायला लागल्या...पण आता काका, सून आणि मुलांनी घरच्या जेवणावळीवर बंदी आणली...जेवण करायला बाई...काकी तिला फक्त सूचना देतात...आता मन गुंतवण्यासाठी त्यांनी भरतकाम सुरु केले आहे.  पण इथे फार अट्टाहास नको...अशा सूचना त्यांना आम्ही आधीच देऊन ठेवल्या आहेत....
काकू जेव्हा माझ्याकडे रात्री पुजेसाठी आल्या तेव्हा मी त्यांना बघून म्हणूनच दचकले...काकू ब-याच रोडावल्या होत्या...खाली बसता येत नव्हतं...मी खूप आग्रह करुन त्या दोघांनाही जेवायला वाढले...काकू मनापासून जेवल्या...गप्पा मारतांना कळलं, काही महिन्यांसाठी त्या परदेशात जाणार आहेत....मुलाकडे...आणि मग अन्य ठिकाणी फिरायला...रात्री अगदी बारा वाजेपर्यंत होत्या...निघतांना म्हणाल्या, माझी आठवण ठेव नेहमी...फार मी...मी...करु नये...थोडा आरामही असावा...नाहीतर नंतर खूप त्रास होतो...मला एकदम गहिवरुन आलं...मी काय...प्रत्येकीचं हे असंच असतं...पण आता काकूंचा सल्ला ऐकायचं ठरवलंय...बघूया...
मला वाटतं गृहिणीनं समजलं पाहिजे की,  आपलं घर आहे....हॉटेल नाही...इथं थोडा पसरा चालतो...तो घराला घरपण देतो...शोभून दिसतो....कोणी आलं की,  आमच्याकडेना हा असा पसारा असतो...असं म्हटलं की त्यात तो लपून जातो....हॉटेलसारखी प्रत्येक वस्तू जागच्या जागी हवी, असा अट्टाहास केला की त्यात आपलेपणा येत नाही...नात्यामध्ये व्यवहाराच्या भींती आल्यात की काय अशी भीती वाटते.

सई बने
डोंबिवली

--------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
 


Comments

Post a Comment