सोनेरी
आठवणी
श्रावण महिना हा आपल्या सर्वांचा आवडता. नुसती गोडाधोडाची धमाल....पाहुणे...सण- समारंभ...हे सर्व करायला मस्त आणि छान वाटत असलं तरी घरच्या गृहिणीची मात्र यात
खूप तारांबळ उडत असते. घरी समारंभ, पाहुणे म्हणजे पहिला विचार येतो तो
साफसफाईचा...कितीही आणि कशीही साफसफाई केली तरी दर पंधरा दिवसांनी पुन्हा
प्रत्येकीच्या मनात विचार येतो तो या स्वच्छता मोहीमेचा....आमच्याकडेही दुसरे
चित्र नाही. श्रावणात पुजा..समारंभ...पाहुणे
असा संगम होणार हे माहीत असल्याने ही स्वच्छता मोहीम हाती घ्यावीच लागली. त्यातच यावेळी माळ्यावर असलेले बॉक्स साफ
करण्याचे धाडस मी केले. गेल्या अनेक स्वच्छता
मोहीमांमध्ये या माळ्यावरच्या वस्तु साफ करण्याचा निश्चय मी केला होता. पण वेळेचे बंधन आणि मुख्य म्हणजे कंटाळा यामुळे
ही मोहीम पुढे ढकलावी अर्थात टाळावी लागत होती.
मात्र आता जरा निवांत वेळ मिळाला. आणि
खास राखीव आणि गर्दी नको म्हणून माळ्यावर विराजमान झालेल्या सामानाची स्वच्छता
सुरु झाली. एरवी दोन तासात ही साफसफाई
झाली असती, पण या माळ्यावरच्या खास सामानांनी जरा जास्तच वेळ घेतला....अगदी दिवस
म्हटलं तरी चालेल...या सामानात मिळाला तो आठवणींचा खजिना...अगदी वय विसरायला
लावणारं काहीतरी....
लेक आणि नवरा आपापल्या कामाला बाहेर पडले आणि मी ही सफाई मोहीम सुरु
केली. पाऊसही चांगलाच पडत होता. सारेगम कारवांवर ओ पी नय्यरची गाणी सुरु
झाली...त्यामुळे कितीही किचकट काम असलं तरीही छान मु़ड लागला. माळ्यावरचे सर्व
बॉक्स काढून झाले. एवढ्याशा माळ्यावर आपण
किती सामान ठेवलं आहे, म्हणून मी माझं कौतुकही करुन घेतलं. यातील ब-याचशा सामानाला, भांड्यांना काही वर्ष
पाणीही लागलं नव्हतं. सफाईचा रोजचा त्रास
नको म्हणून ही जास्तीची भांडी वर ठेवली गेली, ती तशीच राहीली. काही
भेट स्वरुपात आलेल्या वस्तूही
त्यात होत्या...आणि असंच बरच काही, जे वापरात येणार
नव्हतं. उगीचच अडचण नको म्हणून त्यांना
थेट माळ्यावर बसवलं होतं. नशिब एवढचं की
हे सगळं सामान बॉक्समध्ये छान पॅकींग करुन ठेवलं होतं. त्यामुळे बॉक्सवर साठलेली धुळ साफ केली की माझं
काम लवकर होणार होतं. मी साधारण दोन तास
या कामासाठी लागतील असा हिशोब केला होता. सर्व
बॉक्स चांगल्या अवस्थेत होते. आता हे उगाचच
कशाला उघडायचे, असा एक आळसावलेला विचार मनात आला...वेळही वाचला असता. त्या वेळात दुसरे कामही झाले असते...
काय करु काय नको असा विचार चालू असतांना चला एक बॉक्स तर उघडून बघूया
असा विचार मनात आला, आणि मी तिथेच फसले. एक
बॉक्स उघडला. पितळेची भांडी निघाली. आता पितळेची भांडी कोण वापरणार...म्हणून चांगली
ही जाड बुडाची भांडी मी वर ठेवलेली. परात,
मोठी कढई, देवाच्या पुजेसाठी लागणारे ताट, समई, एक नक्षीकाम केलेली तांब्याची कळशी,
पिण्याच्या पाण्याचा एक तांब्याचा तांब्या आणि त्याचा पेला...बापरे किती छान होतं
सगळं. घासायचा त्रास नको म्हणून हा ठेवा
मी वर ठेवला, तो तिथेच राहीला. आता काहीतरी नव्यानं बघावं असं मी त्याला बघायला
लागले. किती सुरेख होतं हे सगळं
सामान. यातील काही भांडी आईनं मुद्दाम
दिलेली....पितळेची मोठी परात आणि कळशी....देवाच्या पुजेचं ताटही जुनच...ब-यापैकी
मोठ्ठ...त्यातच पंचपात्र, निरांजन आणि धुपारत....शिवाय ताटाभोवती सुबक अशी पाना
फुलांची नक्षी....मी हे कशाला वर ठेवलं...माझं मलाच आठवलं नाही. पाण्याचा तांब्याही तसाच सुरेख...एरवी
तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवायची...जुनी असलेली पद्धत नव्याने आलेली...मी सुद्धा
तांब्याचा पाण्याचा जग घेतलेला...किती महाग वाटलं होतं तेव्हा....पण आता डोक्याला
हात लावायची वेळ आली. त्या बोहेरुन
स्टीलचे कोटींग असलेल्या पाण्या्च्या जगापेक्षा माझ्या हातात असलेला नक्षीकाम
केलेला तांब्या सरस होता. मला आठवलं आई
नरसोबाच्या वाडीला गेली होती...तेव्हा तिने आठवणीने आणलेला. त्याच्यावर सुरेख नक्षीकाम...तसाच त्याचा
पेलाही...नकळत ही भांडीही आता आठवणींसह खाली आली.
एक बॉक्स खाली झाला. आता ही
तांब्या-पितळेची भांडी पुन्हा वर ठेवायची नाहीत.
रोज वापरायची असं नक्की केलं....
नंतर हळूच पुढचा बॉक्स उघडला...तर त्याच्या आत
अजून एक बॉक्स...त्याच्या चांगल्या पॅकींगसाठी पेपरही ठेवलेले....
असं काय मी ठेवलंय ते माझं मलाच आठवलं नाही....शेवटी वरची धूळ झटकत बॉक्स उघडला गेला. आणि मी त्या ठेव्याकडे पहात बसले. आईला विणकामाची, भरतकामाची खूप आवड. तिने केलेली तोरणं, रुमाल त्या बॉक्समध्ये ठेवले होते. मध्यंतरी आईनं आठवण म्हणून ही दारावरची तोरणं मला दिली होती. आणि आता ही तोरणं कोण बांधतंय...म्हणत मी ती वर माळ्यावर टाकली. पूर्वी तोरण म्हटलं की दारभर असायची..शिवाय घरची दारंही ऐसपैस...तशीच तोरणंही होती. आताच्या फ्लॅटच्या दाराच्या आकारापुढे ती खूप मोठी होती....त्यामुळे ती साफ करुन पुन्हा त्या बॉक्समध्ये गेली...पण रुमाल मात्र ठेवायला जीवावर आलं. पांढरे शुभ्र, रेशमाचे रुमाल पुन्हा बॉक्समध्ये ठेवायला जड गेलं...पांढ-या शुभ्र बारीक दो-यात विणलेले ते रुमाल अद्यापही छान होते. त्यामुळे त्यांना बाहेरची खेळती हवा लागली...किती जुने होते ते...जेवढे जुने तेवढ्याच आठवणी त्या रुमालासोबत जोडल्या गेल्या होत्या...अगदी आई ते करत होती, तेव्हापासूनच्या....त्यांचा दोरा गुंडाळण्यापासून ते त्यांचे गोंडे करण्यापर्यंत...पुन्हा मन हळवं झालं...आणखी एक बॉक्स उघडला...आता तर हद्दच झाली...त्यातही काही भांडी होती. जास्तीचे पाहुणे येणार म्हणून त्यातले मोठे टोप, ताटं, वाट्या थोड्यावेळासाठी का होईना बाहेर आल्या. त्या मोठ्या बॉक्समध्ये एक छोटा बॉक्स ठेवला होता. ग्लांसांचा सेट असेल म्हणून उघडला तर त्यात भातुकलीची भांडी मिळाली. किती मस्त....लहानपणीची मोठी आठवण...आईनं सांभाळून ठेवलेली. तशीच मला कधीतरी आणून दिली होती. मी ती हरवायला नको म्हणून त्या बॉक्समध्ये ठेवली, आणि मग कधीतरी ती माळ्यावर गेली. माझं मलाच खूप वाईट वाटलं.
खरं तर या सर्व माझ्या सोनेरी आठवणी..अगदी
प्रत्येक भांड्याची एक वेगळी आठवण.
भातुकलीमध्ये छोटा स्टोव्ह, भांडे, वाट्या आणि ताट...एक बादली...एवढचं
राहीलं होतं...पण तेही पुष्कळ होतं. या
सर्व वस्तूही पितळेच्या...उगाचच घासायला नको...म्हणत त्या कधी वर माळ्यावर गेल्या
हे कळलंच नाही. आता, काही वर्षांनी त्या
पुन्हा नजरेसमोर आल्या तेव्हा मनाला कितीतरी गारवा देऊन गेल्या. कंटाळा या शब्दाखातर या सोन्यासारख्या आठवणींना
मी काळोखात ठेवलं होतं. वास्तविक या
सगळ्या वस्तूंना आपलं स्वतःचं असं तेज आहे.
वरुन मी कितीही लखलखीत घासली किंवा धुतली असली तरी हे तेज कमी होणार
नाही. हे तेज आहे आठवणींचे...
माळ्याच्या सफाईसाठी काढलेले दोन तास केव्हाच संपले
होते. दुपारच्या जेवणाची वेळही टळून
गेली. पण भूक काही लागली नाही. आईनं विणलेल्या रुमालावरुन कितीतरी वेळा हात
फिरवून झाला. भरपूर समाधान मिळालं. परात, समई, तांब्या घासून झाले. समई आणि तांब्याला हॉलमध्ये जागा केली. आणि भातुकलीची भांडी....ती सावकाश घासायला
घेतली. ती साफ करता करता नकळत कितीतरी
वेळा हसायला आलं...बरच काही आठवलं...मैत्रिणींची साद ऐकू आली...हॉलमधल्या कपाटात
ती भांडीही नव्यानं दाखलं झाली. आता ती
कुठेही जाणार नव्हती..नजरेसमोर रहाणार होती.
खरतर ते एक टॉनिक होतं. काही वेळा
मन अशांत असतं. नाराज असतं....काहीतरी बिनसतं...तेव्हा मनाला
पुन्हा उभारी देण्याची ताकद या सामानात होती.
कितीतरी आठवणी त्यात होत्या....म्हणूनच बहुधा म्हणत असावेत जुनं ते
सोनं..
सई बने
डोंबिवली
--------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khupach Sunder Lekh ..Sai keep it up
ReplyDelete