तेरड्याने सजले रान


तेरड्याने

सजले 

रान

काही जागा अशा असतात की ज्यांच्यापासून तुम्ही कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केलात तरी ते शक्य नसतं.  त्या गावाचा....तिथल्या प्रत्येक कणाचा आणि आपला जन्मापासूनचा ऋणानुबंध असतो...हा संबंध कधीही दिसत नाही...जाणवत नाही...पण त्याचे अस्तित्व असते.   या गावाने आणि तिथल्या गुरुजनांनी दिलेले संस्कार आपल्यात सामावलेले असतात...या आठवणी नेहमी सोबत असतात.  त्यांचा गवगवा करायचा नसतो.   त्या आठवणी तेवढ्याच प्रेमाने जपायच्या असतात...अशा माझ्या सदैव आठवणीत असलेलं म्हणजे आमचं गांव रेवदंडा-चौल...आणि आमचे गुरुजी...वार्डे गुरुजी...

एरवी निसर्गाची भरभरुन देणगी मिळालेल्या या गावांना श्रावण महिन्यात तर अनोखा  बहर येतो...सर्वत्र हिरवाई...आणि त्यातून डोकावणारी रानफुलं...तेरड्याचे तर रानच....किती रंगांचे हे तेरडे....प्रत्येकाच्या दारात रंगांची उधळण करणारी तेरड्याची फुलं....याशिवाय सोनटक्का...चाफा...गुलाब...अशी कितीतर फुलं...त्यांची मोजदाद नाही....तर कमळांची तलावंही तशीच बहरलेली....या गावांमध्ये मंदिरांची कमी नाही....प्रत्येक नाक्यावर मंदिर...आणि त्यांचा अगदी पांडवकालीन इतिहास...त्या मंदिरांसमोर पोखरण...आता पावसाळ्यात या पोखरणी पाण्यांनी काठोकाठ भरलेल्या....मंदिरात श्रावणी उत्सव...कधी भजन तर कधी कीर्तन...शिवाय देवाला फुलांचा अभिषेक...या फुलांच्या मंद सुवासांनी दरवळणारे गाभारे म्हणजे मनशांत करण्याची हक्काची जागा...आपण किती आणि कशा दगदगीमध्ये असतो.  दिवसाचा सगळा वेळ घडाळ्याच्या काट्यावर जातो....ही दगदग कमी करायची असेल तर आपल्या अशा हक्काच्या गावाला भेट द्यायलाच हवी...मीही तसेच केले.  गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस, रस्ते, ट्रॅफीक अशा अनेक अडचणी लक्षात घेऊन रेवदंडा-चौलचा दौरा टाळत होते.  पण ते फार दिवस शक्य़ झालेच नाही.  कारण रोज नव्या दिवसाला आठवण यायची...आज तिथे कसं वातावरण असेल...दारात शहाळवाला आला की जाणवायचं, आपल्या गावच्या नारळाच्या पाण्याची चव या पाण्याला नाही...बाजारात दहा रुपयाला पाच चाफ्याची फुलं घ्यायची पण त्याला तो गावच्या फुलांचा सुवास
नसायचाच....ट्रेनमधून प्रवास करतांना तेरड्याची रोपटी दिसायची....त्यांच्यां फुलांचा बहर दिसला की जाणवायचं आपल्या गावासारखा रंगीबेरंगी तेरडा कुठे दिसत नाही.....मग लक्षात यायला लागलं होतं की आता निदान एक फेरी तरी गावी व्हायला हवी....मग ती धावती भेट का असेना....पण जायलाच हवं....
अशी एक धावती भेट चौल-रेवदंड्याला झाली.  आधीच रस्त्यांची आणि त्यावरील खड्ड्यांची धास्ती...अनेकांनी सांगितलेले अनुभवाचे बोल...त्यामुळे अगदी पहाटे निघायचा बेत होता.  पहाटे नाही पण सकाळी सहा वाजता निघाले...लेकाला वेळ नाही...त्यामुळे मी आणि नवरा....पनवेल जाईपर्यंत ट्रॅफीक...खड्डे...हा विषय गाडीत होता.  पण पनवेल सोडलं की ती गावची ओढ लागते ना, तो अनुभव येऊ लागला...एकतर मला गाडीचा त्रास होतो...त्यातून त्या एसी असलेल्या काचाबंद गाडंयामधून बाहेरचा निसर्ग कधी बघताच येत नाही...त्यामुळे पनवेल नंतर अगदी लहान मुलांसारखे खिडकी उघडी ठेऊन निसर्गाचा बहार बघण्याचा प्रयत्न करत होते.  किती रंग...किती छटा...ही निसर्गाची उधळण त्या एसीमध्ये शक्य नसतं...जेवढी जमेल तेवढी ही निसर्गाची श्रीमंती अधाशासारखी टीपून घेण्याचा प्रयत्न करत होते.  वास्तविक आलिबाग पर्यंत सर्वंच रस्त्यांचे काम चालू आहे.  बहुधा आणखी वर्षभरात हे काम होईल अशी अपेक्षा आहे...आम्ही अगदी सकाळी निघाल्यामुळे या कामांचा आणि ट्रॅफीकचा त्रास झाला नाही.  पेण नंतर या रस्त्याच्या दुतर्फा फक्त राज्य आहे ते हिरव्यागार भातपिकाचे आणि रंगबीरंगी रानफुलांचे.  त्यातही तेरड्याच्या फुलांचा तोरा जरा जास्तच...मध्येच उन सावलीचा खेळ...हलकासा पावसाचा शिडकावा....बाहेरच्या या मोहक वातारवणात अधिक अधिक भर पडत होती.  कार्लेखिंड पार केल्यावर काही मिनीटावर गाव आल्याची खूण पटली....नाक्या नाक्यावर बाजार दिसू लागले...गणपती अगदी जवळ आल्याने चिबूड...पपनस...काकड्या...सोललेले नारळ...दोडके..आणि लाल माठ भरलेल्या टोपल्या...सोललेल्या सुपा-या आणि जायफळं....किती घेऊ आणि किती नाही...शिवाय चाफ्याची फुले...सोबत गावठी सुवास असलेला गुलाब...गावाला पोहचण्याच्या आधीच सोबतच्या पिशव्या या गावच्या मेव्यानं भरुन गेल्या...याचसाठी तर सर्व अट्टाहास केलेला असतो...
गावच्या या मेव्यासाठी जसा अट्टाहास होता...तसाच अट्टाहास आमच्या गुरुंच्या भेटीसाठी...आमचे वार्डेगुरुजी...या गुरुजींनी आम्हाला काय दिलं हा प्रश्न कधी पडलाच नाही.  कारण गुरुजींनं जे दिलं त्याची पोचपावती त्यांना कधी देणं शक्य होणार नाही.  लहान वयात संस्कार दिले...गुरु..शिक्षक म्हणून ज्ञान दिले...समाजात वावरण्याचे बळ दिले...पडत्या काळात या गुरुजींनी असामान्य असा आधार दिला.  जेव्हा जगाने पाठ फिरवली तेव्हा ते आमच्या सोबत होते.  त्यांच्या आधारात हा पडता काळ कधी सरला हे समजलं नाही.  त्यामुळे गुरुंजींची आठवण आल्याशिवाय आताही एक दिवस जात नाही.  आता ते आमच्या मुलांचे गुरुजी आबा झाले.  त्यांच्यावरही तेवढीच माया आणि आशीर्वाद...या आगळ्या ओढीमुळे त्यांना भेटायला, त्यांच्याबरोबर बोलायला सदैव तयारी असते.  ओढ असते...गावाला जाण्याचा मुख्य हेतू मुळात गुरुजींची भेट घेणे हाच असतो...त्यामुळे गेल्या गेल्या गुरुजींची भेट झाली....आता गुरुंजींचे वय झालेले...पण आवाज तसाच कडक...काय ग कशी आहेस...अशीच नेहमीची साद...त्यात ओरड्यापेक्षा आपलेपणाचा ओढाच अधिक....त्यांच्याबरोबर कितीही बोललं...तरी समाधान होत नाही.  त्यांच्याबरोबर बोलून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा परतीच्या वाटेवर निघाले...
वार्डेगुरुजींच्या घरासमोरच रामेश्वराचे मंदिर....भलीमोठी पोखरण...या रामेश्वर मंदिराला पांडवकालीन इतिहास...संपूर्ण दगडाचे बांधकाम...मंदिरासमोर मोठा नंदी...कधीही
जा...अगदी भर मे महिन्यात गेलं तरी हे मंदिर अगदी गार...थंड हवेनं भरलेलं असतं...या महादेवाचे दर्शन घेतलं...मग भरलेली पोखरण खुणावत होती...अगदी काठोकाठ भरलेल्या पोखरणीत बघावं तिथे छोटे-छोटे मासे दिसत होते.  मध्येच कासव ही दिसलं...बराच वेळ या पाण्याकडे बघत राहिले...शेवटी न राहून थोडा वेळ पाण्यात पाय सोडून बसले...लहानपणींच्या कितीतरी आठवणींचा आरसा या पोखरणीमध्ये दिसला....पाठीवर सुगड बांधून पोखरणीत मारलेली डुबकी आठवली...आणि श्रावणी सोमवारी आईबरोबर पुजेसाठी केलेली तयारीही आठवली...मंदिरासमोरचे दिपस्तंभ लागल्यावर त्या दिव्यांच्या उजेडाकडे बघतांना वाटलेला आनंद आठवला...कितीतरी वेळ निशब्द बसून राहीले...पण किती वेळ...शेवटी नव-याने निघायची खूण केली...घरी लेकाला एकटाच सोडून आलेले...शिवाय त्या ट्रॅफीक नावाच्या नव्या राक्षसाची धास्ती...त्यामुळे पुन्हा एकदा रामेश्वराला नमस्कार केला आणि परतीचा प्रवास सुरु झाला.
खरतर रेवदंडा-चौल मध्ये अगदी नाक्यानाक्यावर मित्र-मैत्रिणींची घरं...पण ही फेरी
फक्त वार्डेगुरुजी आणि त्यांच्या आशिर्वादासाठी होती...त्यामुळे या सर्व मित्र-मैत्रिणींना मनातल्या मनात स्वारी बोलून परतीच्या वाटेवर निघाले...पुन्हा तिच हिरवळ...आपल्या शेजारच्याबरोबर रंगांची स्पर्धा करणारी तेरड्याची फुलं...तेच सजलेले बाजार....नकळत पुन्हा काही ठिकाणी गाडी थांबून थोडी खरेदी....आणि आपल्या घराची वाट...जातांना पेण नंतर गावची ओढ लागली होती.  आता परतीच्या वाटेवर पेण सोडलं आणि ट्रॅफीकचे रंग दिसू लागले...उन्हाचे चटके आणि धुळीचे लोट गाडीत येऊ लागले...मग काय, काचा नकळत वर गेल्या...एसीचा गारवा सुरु झाला...अर्थात तो शरीराला लागत होता...मनात मात्र तो रामेश्वराच्या मंदिरातला गारवा साठला होता आणि आमच्या वार्डे गुरुंजींचे बोल...आता पुढच्या काही महिन्यांसाठी हा साठा पुरेसा आहे...


सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------


ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

  1. सुंदरच !

    very nicely written. actually we sarrounded by nature. but we have built a selfe centered life so we just ignore such beautiness of nature.

    regards
    Ved

    ReplyDelete

Post a Comment