गावा.......
देवा....परमेश्वरा..अरे बापरे....देवा...वाचवा...माझा हा
देवाचा...परमेश्वराचा धावा कशासाठी चालला असेल...याबद्दल काही अंदाज आहे का..नक्की
अंदाज लावा...पण मी आधी सांगते...परमेश्वराचा हा धावा मी केला तो रस्त्यांवरील
खड्ड्यांपासून मला वाचवण्यासाठी.

गणरायाच्या दर्शनासाठी मी आणि नवरा हौशीने सकाळपासून मित्रपरिवार आणि
नातेवाईकांकडे निघालो. नवीन घेतलेली
इंदौरसिल्कची साडी घालून मी सुद्धा छान तयार झाले होते. शिवाय घरी केलेल्या मिठाईचे बॉक्स भरलेली मोठी
बॅग सांभाळत अॅक्टीव्हाच्या मागे बसले. पंधरा दिवसापूर्वी गाडी चालवतांना पाण्यांनी
भरलेल्या एका खड्ड्यात गाडी जोरदार आपटली...आणि गाडीसोबत मी सुद्धा...कंबरेतून जोरदार
कळ आली होती तेव्हा...त्यामुळे कंबरेला पट्टा लावून पंधरा दिवस घरातली कामं करावी
लागली...शिवाय गाडी आपटतांना शेजारुन मोठा ट्रक पास झाला. खड्ड्यांमुळे ट्रक अंगावर येतोय की काय अशी
परिस्थिती वाटली आणि कधी नव्हे ती गाडी चालवायची भीती वाटली. त्यामुळे नव-याकडे गाडी चालवायची जबाबदारी
आली. नवरा गाडी सांभाळून चालवतो, त्यात शंका नाही. पण रस्त्यावरींल खड्ड्यांनी मात्र तो बेजार
झाला. हा खड्डा चुकवला की पुढे दुसरा
खड्डा तयार...शिवाय कुणी हुशार माणसांनी हे खड्डे भरण्यासाठी म्हणून खडी
टाकलेली...या खडीतून गाडी दोनदा स्ली
प झाली.
मी त्या मिठाईच्या बॉक्ससोबत पडतांना अगदी थोडक्यात वाचले....सकाळी
गणरायाच्या दर्शनाला बाहेर पडतांना जो उत्साह होता तो कधीच संपला होता. बॉक्स हातामध्ये पकडायला नको म्हणून डीकीत ठेवले
आणि अजून सांभाळून बसण्याचा प्रयत्न केला.
पण उपयोग होत नव्हता. शिवाय ज्या
घरात गणपती दर्शनासाठी जात होतो. तिथे
गेल्यावर देवाला नमस्कार केला की गप्पांचा विषय थेट खड्ड्यांवर यायचा. गणरायाच्या मखराची सजावट...देखणी
मुर्ती...याबाबत बोलणी झालीच नाहीत....अशा गप्पांमध्ये यजमानही हिरारीने भाग
घेत...त्यामुळे आमच्या भागातील खड्डे जास्त की तुमच्या भागातील खड्डे जास्त अशा
गप्पाच जास्त झाल्या....पुन्हा त्यांचा निरोप घेतांना पुढच्या रस्त्यांवर किती
खड्डे आहेत...त्यातून कसे जायचे अशा टीप घेऊन आम्ही दुस-या ठिकाणी निघायचो. त्यात भरीस भर म्हणून गाडी पंक्चर झाली. नेमकी हायवेवर झाल्यामुळे अव्वाच्या सव्वा पैसे
देऊन ती दुरुस्त करावी लागली. दरवर्षी
पहिल्या दिवशी सर्व परिचितांकडे गणपतीचे दर्शन घ्यायचे...त्यांना मी बनवलेली
मिठाई-मोदक द्यायचे हा माझा शिरस्ता. पण
खड्ड्यांमुळे दरवर्षीचा उपक्रम बाजुला ठेवावा लागला. नवराही गाडी चालवून वैतागला. घरापासून लांब असणारे गणपती बघून झाल्यावर
त्यांनीही गाडी घरी घेतली. मग रिक्षाचा आधार घेऊन पुढचे गणराय बघून
झाले. पण सकाळी निघतांनाचा असलेला उस्ताह
पार संपला होता. पहिल्या दिवशी पाऊस
नव्हता. तरीही रिक्षात बसल्यावर आम्ही
आपसूकच बाजुला असलेले काळे पडदे ओढून गपचूप बसलो...खड्ड्यांतून उडणारी धूळ...कितीही सांभाळून रिक्षा चालवली तरी बसणारे खड्डे...आसपास असलेल्या गाड्यांतील लोकांची खड्डे सांभाळून चालण्याची धडपड...गणरायाची मुर्ती घरी नेतांना होणारी तारांबळ....हेच चित्र सर्वत्र होतं. आम्ही दरवर्षी पहिल्याच दिवशी आणि तेही सकाऴीच गणरायाचे दर्शन घ्यायचे हा नियम केलेला. हा नियम यावर्षी बाजुला ठेवला. काही गणपतींचे दर्शन घेऊन घर गाठलं...त्यात आम्ही ज्या रिक्षात होतो त्या रिक्षावाल्या काकांनी आणखी काही अनुभव सांगितले. पूर्वी ते आठ ते दहा तास रिक्षा चालवायचे....आता पाच तास जेमतेम रिक्षा चालवतात...सोबत एक पेनकिलरची गोळी. सकाळी घरातून निघतांना ही गोळी खाऊनच घर सोडावं लागतं. दिवसभर रिक्षा चालवून प्रचंड पाठ दुखतेय आणि आता हलकीशी चक्कर येऊ लागल्याचं त्यांनी सांगितलं....आमच्या शहरातील खड्ड्यांनी या काकांना नवीन दुखणं गिफ्ट केलंय...पण रोजचा व्यवहार या रिक्षाबरोबर जोडला गेलाय...त्यामुळे ती बंदही ठेवता येत नाही. त्यात डॉक्टरचा खर्च परवडेल का नाही याची धास्ती. मी त्यांना माझ्या ओळखीच्या डॉक्टरचा पत्ता दिला...तिथे दुपारच्या ठराविक वेळेमध्ये गरजूना अत्यंत कमी दरात औषधे देण्यात येतात...काका तो पत्ता घेऊन निघून गेले...आम्ही दोघेही निराश मनाने घरात आलो...रोज गाडीतून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी, वृद्ध, गरोदर महिला, आजारी व्यक्तीं यांची या खड्ड्यांनी काय अवस्था केलीय याची जाणीव होऊन अंगावर काटा आला....

हे सांगतांना खूप वाईट वाटतं....कधीतरी ज्या अतीहुशार
माणसांनी रस्ता तयार केला
आपल्य़ापैकीच सर्वांच्या शहरांची अशी दैना झाली
आहे....ही दैना दूर करण्यासाठी काही कायमस्वरुपी उपाय आहे का...मला एक वाटतं,
रस्त्याचं काम केलं की तो तयार करण्यासाठी जबाबदार असलेल्या पाच प्रमुख व्यक्ती,
म्हणजे स्थानिक लोकप्रतिनीधी, ठेकेदार, अभियंता...आदींचे कायमस्वरुपी नंबर त्या
रस्त्याच्या बाजुला बोर्डावर लिहिलेले असावेत...जाहिरातीचे बोर्ड कसे मध्ये
लावतात...तसेच....निदान आम्ही सामान्य नागरिक तरी त्यांना फोन करुन रस्त्यावर
खड्डे पडलेत..याची माहीती देऊ...मग ते यावर काय करतात ते राम भरोसे....मंडळी तुम्हाला
काय सुचतंय...नक्की सांगा...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खरंच खूप नुकसान होत आहे आपल्या बॉडीचे आणि गाडीचे
ReplyDeleteहो...हे खरं आहे. एकवेळ गाडीचे नुकसान भरुन निघेल..पण शारीरिक हानी होतेय त्याचं काय...असा प्रश्न नेहमी पडतो...
Deleteही परिस्थिती जरी अगदी खरी असली तरी ह्यावर उपाय कोणाकडे मागायचा कारण इथे सर्व कार्यसम्राट व्यक्ती आहेत...........
ReplyDeleteहेच तर आपलं दुर्दैव आहे. सर्वच कार्यसम्राट...
Delete