आयत्या बिळावर...


आयत्या

बिळावर...


गेले काही दिवस आमच्या घरात चाललेल्या चर्चा वजा वादविवादात माझा छोटा का होईना पण विजय झाला.  मुलगा आणि नवरा एका पार्टीत आणि मी एका....या दोघांवरही मी अगदी निग्रहाने मात केली...वाद कसला होता तर, घरात नवीन सिस्टीम आणायची होती.  हे साधन आणलं की आपल्याला म्हणे काही हालचाल करायला लागत नाही.  एका जागेवर बसून त्या सिस्टीमला ऑर्डर द्यायची...बस्स...काम झालं....आपल्याला हवं ते टीव्ही चॅनल, आवडीचं गाणं, वेळेचा गजर, लाईट, एखादा फोन, बातम्या, ऑनलाईन शॉपिंग...असं काहीही सांगायचं, मग आपण करायच्या ऐवजी ही सिस्टीम ते काम करणार...मग आपण काय करणार...आणखी आळशी होणार...याच एका मुद्यावर आमच्या घरात काही दिवस वाद चालला होता.  पण अखेर मी नाही म्हणजे नाहीच...असा टोकाचा पवित्रा घेतला आणि सध्या काही दिवस किंवा महिन्यांपूरता म्हणाना...माझा छोटासा विजय झाला....

आपल्या सोयीसाठी या लेबलखाली आलेल्या या अशा अनेक सिस्टीम बाजारात गेली अनेक वर्ष आहेत.  फक्त आपण त्याकडे कसे पाहतो यावर त्या घरात येतात की नाही हे अवलंबून असते.  आता साधा कच-याचा डबा घ्या...पायाने पॅडल दाबले की आपोआप झाकण उघडणारा डबा असतोच की...
आमच्याकडेही मध्यंतरी असा डबा आणला होता.  का तर, वाकायला नको....तसंच रिमोटवर चालणारा फॅनही आला....मध्येच कमी जास्त स्पिड हवा असेल तर बसल्या जागेवरुन त्याच्या वेगावर नियंत्रण रहावे म्हणून....पण या सर्वांत आपली हालचाल कमी होऊ लागली हे जाणवलं...शिवाय या सोयी खरोखर हव्याच का असा प्रश्नही पडला...असा कितीवेळा कचरा डब्यात टाकायला लागतो आणि कचरा डब्यात टाकायला इनमीन किती वेळ लागतो...काही सेकंद...तेवढंही वाकता येऊ नये...आणि पंख्यांचा रेग्युलेटर गाठायला किती वेळ लागेल...आपल्या घराचे हॉल, किचन असे किती मोठे असतात...त्यामुळे दोन पावलं चालायला कितीसा वेळ लागणार...हा हिशोब मग मनात आला...सुदैवाने नंतर त्या पंख्याचा रिमोट काम करेना...आणि तो पॅडलवाला कच-याचा डबा साफ करायला त्रासदायक ठरला.  त्यामुळे दोन्हीही वस्तू नंतर बाद झाल्या...
अशा अनेक साधनांनी आपण व्यापलो गेलेलो असतो.  जी साधनं असली की काहीसा सुस्तपणा येतो.  काहींना या साधनांचा मोठेपणा वाटतो.  काही महिन्यापूर्वी एका परिचितांकडे गेले होते.  त्यांचं घर मोठं...छान सजवलेलं...त्यात पडदेही रिमोटनी उघड-बंद होणारे...शिवाय लाईटही तसेच...घरातील झुंबर रिमोटनुसार रंग बदलायचे...एसीमध्ये हिटरचीही सोय होती...शिवाय गॅस शेगडीही आधुनिक...फ्रीजही मोठा...नवीन पद्धतीचा...आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर हे सगळं रिमोटचं काम बघण्यातच बराच वेळ गेला.  टिव्ही आणि फ्रीजमध्ये खूप काही नवीन तंत्रज्ञान...हे सर्व दाखवण्याची यजमानांही खूप हौस...त्यामुळे या रिमोटच्या करामती आणि तंत्रज्ञान दाखवण्यात आणि त्याचं कौतुक करण्यात वेळ गेला...ते कसं आणलं...त्याचे उपयोग काय...कसं वापरायचं...गॅरेंटी...परदेशातलं तंत्रज्ञान...या विषयावरच गप्पा झाल्या...बाकी आपण कसे आहोत...मुलं कशी आहेत...मुलांचा अभ्यास...पाहुणे आदी नेहमीच्या गप्पांना फारसा वेळ मिळाला नाही...फ्रीजमधलं गारेगार सरबत पिऊन आम्ही परतलो...

तंत्रज्ञान कधीही चांगलं...पण त्याची गरज असेल तरच त्याचा वापर करावा असं मला नेहमी वाटतं.  आता आपल्या हातात सदैव असलेला फोन...हे एक तंत्रज्ञानच की...पण सध्या त्याच्या अतीवापरामुळे होणारे वाईट परिणाम सामोरे येत आहेत.  या मोबाईलच्या अती वापरामुळे झालेल्या दुर्घटना रोज ऐकण्यात येतात.  काही वर्षापूर्वी मलाही अनेक फोन नंबर तोंडपाठ असायचे...पण स्मार्ट फोन आला आणि ही पाठांतराची सवय गेली.  आता तर कुटुंबातल्या व्यक्तींचे फोनही पटकन सांगता येत नाहीत...त्यासाठी पुन्हा त्या फोन मेमरीचा आसरा घ्यावा लागतो....
असे अनेक छोटे वाटणारे परिणाम आपल्यावर या वाढत्या तंत्रज्ञान प्रेमाने झाले आहेत.  पण ते लक्षात येत नाहीत.  छान सोय झाली म्हणून त्यावर एक आनंदाची चादर ओढली जाते.  पण नकळत आपण त्या सोयींच्या चक्रात अडकतो...नंतर काही वेळेसाठी जरी त्या सोयी मिळाल्या नाहीत तर मग हा फरक जाणवतो.  काही तासासाठी नव्हे तर काही मिनीटांसाठी तरी मोबाईल आपल्यापासून दूर ठेऊन बघा...हा फरक म्हणजे काय त्याची कल्पना येईल.
या आयत्या जगात मला माझ्या आईचं नेहमी कौतुक वाटतं... तंत्रज्ञान अवती भोवती असतांना निग्रहाने त्याला ती टाळते...शारीरिक कष्टाची सवय आहे म्हणून नाही तर ते कष्ट केल्याने शरीर निरोगी रहाते, हे ती नेहमी म्हणते.  त्यामुळे अशा आयत्या गोष्टींना ती नेहमी फाटा देते.  जवळपासच्या सर्व जागांवर ती चालत जाते.  त्यातून व्यायाम होतो असा तिचा नेहमीचा संदेश...एका मैत्रिणींने असाच तिच्या वडीलांचा किस्सा सांगितला...त्यांच्या फोनवर एकही नंबर सेव्ह नाही.  सर्वांचे नंबर तोंडपाठ...त्यामुळे कधीही कोणाला फोन लावायचा असला तर ते सर्व आकडे किपॅडवर डायल करुनच लावणार...मेंदुला होणारा हा ही एकप्रकारचा व्यायामच आहे ना...
तंत्रज्ञानला आपलंस करुन ते शिकण्यात काहीही गैर नाही.  पण त्याच्या पूर्ण आहारी जाण्यात नक्कीच तोटे आहेत.  आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या शरीराला आराम द्यायचा आणि नंतर घाम गाळायला म्हणून जीममध्ये जायचं...असं मी अनेकांच्या बाबतीत बघितलं आहे.  घरात सगळं आधुनिक...अगदी साधी लादी पुसायलाही नवीन सोयी...खाली वाकायला नको...कपडे-भांडी यांच्यासाठीही मशीन...जवळपास जायचं असेल तरी गाडी...आणि या सर्वांतून आलेली सुस्ती घालवण्यासाठी जीम...या आयत्या बिळांनी आपल्याला नको त्या चक्रात अडकवून टाकलं आहे. 
आताच गणपती बाप्पा घराघरात होते.  लवकरच नवरात्र येईल...अशा मंगल दिवसात आपण देवापुढे दिवा लावतो.  कितीही लायटींग असेल किंवा चोवीस तास मिणमिणत्या उदबत्यांसारख्या दिसणा-या लायटींगच्या उदबत्त्या असोत...आपण लावलेलं निरांजन...आणि त्यातील शांत पेटणारी ज्योत देवघराला शोभा आणते....तसंच आपलंही आयुष्य असतं असं मला नेहमी वाटतं.  शांत आणि तेजस्वी.... तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे फक्त या तेजस्वीतेची धार कमी झाली आहे एवढंच....

 
सई बने
डोंबिवली

------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

  1. Well said Sai. All of us need to think seroiusly about excessive use of technology. Keep writing. Keep posting.

    ReplyDelete
  2. आदरणीय सई जी आधुनिक ते कड़े अपन वळलेच् पाहिचे परिवर्तन हां प्रगती चा पहिला नियम आहे
    नवनवीन तंत्रज्ञन मानवी जीवना साठी जितके महत्वाच् आहे तितकेच त्याचे दुष्परिणाम पण आसु शकतील यात् शंका नाही मात्र कोणतीही गोस्ट अपन कितपत वापरावी हे जो पर्यन्त अपन निश्चित करीत नाही तो पर्यन्त ही भीती राहिलच
    अपन अतिशय सुंदर आणि समर्पक शब्ध रचनेत मांडले त्या बद्दल तुमचे स्वागत
    धन्यवाद
    नित्तिन पाटिल

    ReplyDelete
  3. Nice Blog on advance Technology ✌

    ReplyDelete
  4. छान लेख आहे.शेवटी जून ते सोन हेच बरोबर आहे.आधुनिक युगात माणूस प्रगती बरोबर आळशी बनत चाललाय व रोगांना आमंत्रण देऊन स्वतःला कमजोर बनवत चाललाय. एकीकडे प्रगती तर दुसरीकडे अधोगती.

    ReplyDelete

Post a Comment