माझ्यासारखीच....
साधारण पंधरा दिवसांनी तरी आम्हा मैत्रिणींची चौकडी एकत्र येते.
तसा एक नियमच आहे. उगाचच फोनवर
तासन् तास गप्पा मारण्यापेक्षा समोरासमोर भेटून गप्पा ठोकणे हाच त्यामागचा उद्देश...अर्थात याचे
फायदेही बरेच असतात....मुख्य म्हणजे चेह-यावरुनच कोण कसं आहे याचा अंदाज
येतो. कोणी आजारी असेल तर तिला मदत
होते...शिवाय कोणाकडे काही खाऊ झाला असेल तर त्या खाऊचे वाटप...हा सुद्धा चांगला
आणि महत्त्वाचा फायदा...असो...फार नाही पण एक-दोन कप कॉफी असेल, तरी पुष्कळ...अशा
छानश्या कॉफी मिटींग म्हणजे आमच्या चौघींच्या रोजच्या रुटीनमधली खास वेगळा कप्पा
आहे...यावेळेची ही कॉफी मिटींग आमच्या संध्याबाईंकडे होती....ती गणपतीसाठी गावी
गेली होती...त्यामुळे चार दिवस मिटींग उशीरा झाली. माझ्या दोन मैत्रिणीं आधीच पोहचल्या
होत्या...यावेळी चर्चा काय तर येणा-या नवरात्रौत्सवात कुठे जायचं...मी दहा
मिनीटांनी संध्याकडे पोहचले...पाणी आणि गावावरुन आणलेला खाऊ समोर ठेऊन संध्या कॉफी
आणण्यासाठी आत गेली...आणि आमच्या तिघींची डोळ्यांची भाषा सुरु झाली....
आमची संध्या म्हणजे पॉझिटीव्ह एनर्जी...सळसळता
उत्साह...काहीही सांगावं बाई कधी नाही म्हणत नाहीत...अगदी अडल्यावेळी आमच्या मुलांना
सांभाळायला सांगावं...कोणी हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांना डबा हवा असेल, कोणाच्या
मुलांना शाळेत सोडायचे असेल, आणायचे असेल...असं कसलंही काम सांगितलं तरी बाई
हसतमुखाने, करते की, असं सांगणार...लोभस स्वभाव...त्यामुळे आम्हा सर्वांची
लाडकी. गेल्यावेळी आम्ही सर्व भेटलो होतो
तेव्हा तिनेच पुढची वेळ माझ्याकडे म्हणून जाहीर केलं होतं. वरुन प्रत्येकीला गावावरुन खाऊ आणि तिच्या गावी
मिळतो तो लाल तांदूळ आणण्याचे प्रॉमिस केले होते.
त्यामुळे तिच्याकडे जमल्यावर गावी गणपतीला तिने केलेल्या गमती जमती ऐकण्याची
आणि तिचे फोटो बघण्याची उत्सुकता होती. पण
संध्या त्यामानाने गप्प गप्प होती. दार
उघडल्यावर आरडा ओरड करत स्वागत नाही...सारं शांत शांत...म्हणून आमच्या डोळ्यांची
भाषा सुरु होती...काय झालं..तुला माहीत आहे का....नाही...मलाही नाही...एवढ्यात
संध्या कॉफीचे मग घेऊन आली. गेली अनेक
वर्ष आम्ही मैत्रिणी एकमेकींना ओळखतोय...त्यामुळे आपल्या मैत्रिणींना आपली काळजी
आहे, हे संध्यालाही माहीत होतं...आम्हा प्रत्येकीचे स्वभाव चांगले परिचित...त्यामुळे
तिचं म्हणाली सांगते...उगीचच डोळ्यांनी आणि खाणाखुणांनी बोलू नका...झालं...तिचं
गणित तिनंच सोडवायला घेतलं....आम्ही हलकेसं हसलो...
संध्या गणपतीसाठी गावी गेलेली. तिचं मोठं कुटुंब. कुटुंबात धाकटी असलेली संध्या यावेळी एकटीच
होती. तिच्या दोन्हीही जावांची मुलं दहावी
आणि बारावीला. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित
संध्याला सर्व साभांळायचं होतं. तिने
साधारण महिनाभर आधीच सर्व तयारी केली होती.
पाच दिवसाचे वेगवेगळे प्रसाद....आल्यागेल्यांसाठी घरी बनवलेले
लाडू-चिवडा...मुलांसाठी वेगळा खाऊ...असं एक ना दोन ती सोबत घेऊन गेली होती. शिवाय गणपती बाप्पाचे डेकोरेशन, पुजेचे
सामान...आपल्या दोन्हीही जावांना, घरातल्या मोठ्यांना विचारुन सर्व वस्तू आठवणीने
सोबत घेऊन गेली होती. आधी दोन दिवस जाऊन
तिने तयारी केली होती. हे सर्व छान होतं...मग
बिनसले कुठे...संध्याने सर्व मनापासून केले.
पण गावी काहीजणांनी मात्र तिची सर्व कामाची तुलना तिच्या घरातील महिलांबरोबर
केली. तिच्यासारखं नाही, तिने असं केलं
असतं...तिचं हे...आणि तिचं ते....संध्या या सर्वाला खूप वैतागली होती. वास्तविक
अगदी ठराविक जणांव्यतिरिक्त बाकी सर्वांनी तीचं कौतुक केलं होतं. गणपतीची सेवा तिनेही मनापासून केली. पण तिला दुस-यासारखं कस करता येणार...ती तिच्या
पद्धतीनेच करणार...आणि तिने तसंच केलं होतं.
याला कोणी नावं ठेऊन आपल्याला कमीपणा येईल असे बोल लावतील असे तिला अपेक्षित
नव्हते...त्यामुळे बाई मनात खट्टू झाल्या होत्या.
खरतर आपण कोणाची कॉपी करण्यापेक्षा आपलं
स्वतःचं करावं...जसं जमेल तसं...हे साधे सरळ सूत्र आपण शाळेच्या पहिल्या
वर्गापासून शिकलो. पुढे जीवनातही हे सूत्र
प्रत्येक टप्प्यावर कामाला आले. मग आपली
तुलना कशाला करतात....आणि मुख्य म्हणजे हे जेव्हा समोरचा जाणून बूजून करत असेल आणि
आपल्याला त्याला उत्तर देता येत नसेल तर ती घुसमट कशी बाहेर काढायची. गावी हौसेने गेलेली संध्या नाराज होऊन परतली
होती. तिच्या नव-याच्या लक्षात ही गोष्ट
आली. त्याने तिला समजावलं होतं...आता गावावरुन येऊन आठवडा झाल्यावर बाई पुन्हा तशाच
एव्हरटाईम चार्मिंग झाल्या होत्या...पण नेमका आजच सकाळी कोणी नातेवाईकानं फोन करुन
गावचा गणपती कसा झाला म्हणून चौकशी केली...आणि पुन्हा हे नव्हते...ते
नव्हते...त्यामुळे हवी तशी मजा आली नाही ना...म्हणून संध्याला दुखावलं...
आता या दुस-याला कायम आपल्यापेक्षा कमी
लेखण्याच्या प्रवृत्तीपुढे हात टेकले...आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा पहिला धडा
मिळतो तो हाच की दुस-याची कॉपी करुन पास होऊ नका...आपल्या हाताची बोटंही सारखी नसतात...त्यामुळे
प्रत्येकाचं वेगळं स्थान...अस्तित्व असतं...आणि ते महत्त्वाचं असतं. मग हा धडा आपण धडा दुस-याला जेव्हा कमी लेखतो
तेव्हा का विसरतो काय माहीत...ब-याचवेळा लक्षात येतं की अशी दुखवणारी माणसं यातच
आपला आनंद शोधत असतात. शेवटी आनंद कसा
मिळवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न...त्यामुळे त्यांनांही बोल लावता येत नाहीत...मग
काय करावे..तर अशा व्यक्तींना फार मनावर घेऊच नये...त्यांच्या आनंद शोधायच्या मोहिमेमुळे
आपण कशाला आपल्याला दुःखी करुन घ्यायचे...
हाच धडा आम्ही सर्वांनी मिळून संध्याला
दिला. कॉफीचा आनंद घेता घेता आम्ही तिच्या
या वाईट आठवणींना बाजुला सारलं...तिने गावी केलेली मजा विचारली...आणि मुख्य म्हणजे
तिचे आणि तिच्या मुलीचं खास फोटोसेशन बघितलं...गावी जायचं म्हणून तिने मुलीला
छानसे परकर पोलके शिवून घेतले होते.
तिच्या साड्याही त्याच रंगाच्या होत्या...गावी छान हिरवळ असणार म्हणून फोटोसेशनचा
तिने छोटासा प्लॅन केला होता.
शशांकने...तिच्या नव-याने अप्रतिम फोटो काढले होते....त्या फोटोमागची स्टोरी...आणि
गावच्या आठवणीत संध्या पुन्हा रमली...गावचा खाऊ खाऊन झाला...सोबत संध्याने सांगितल्याप्रमाणे
लाल तांदूळ आणि ब-याच छोट्या छोट्या पिशव्या दिल्या...पुन्हा पंधरा दिवसांनी भेटायचे
ठरले...नवरात्रीमध्ये
कुठे जायचे हे ठरले...मग संध्याला टाटा करुन आम्ही
निघालो...तर ती गळ्यात पडून थॅंक्यू म्हणत हळवी झाली....
खरचं ती अशीच आहे...संध्या...तिच्यासारखी
तिच...कोणीही, कधीही तिची कॉपी करु शकत नाही...असं प्रत्येकाचं असतं. प्रत्येक माणूस हा खास असतो. मध्यंतरी कोणीतरी माझ्या लेकाला अब्दुल कलाम
होणार का...असं विचारलं होतं...तेव्हा तो त्यांच्यासमोर काहीही बोलला नाही...पण
बाहेर आल्यावर म्हणाला, आई मी, मी होणार...अब्दुल कलाम मोठे आहेत...पण त्यांच्यांसारखे
तेच...मला त्यांच्यासारखं...किंवा कोणासारखंही होता येणार नाही...मी माझ्यासारखा
होणार...तेव्हा मी त्याला बरं म्हटलं होतं.
मला माहीत होतं, एरवी अब्दुल कलाम, किंवा कोणाही शास्त्रज्ञाची बातमी आली
की न सांगता वाचतो...त्यांची पुस्तकं वाचतो...पण म्हणून त्यांची तो कॉपी करणार
नाही...स्वतःचं वेगळं काही अस्तित्व करु पहातोय, म्हणून मला बरं वाटलं होतं....संध्याला
भेटून परत येतांना हा आम्हा मायलेकामधला किस्सा आठवला....ब-याचवेळा ही छोटी मुलं
मोठा धडा देऊन जातात....
--------------------------------------------------------------------
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
मैत्रिणी च्या मनातल ओळखुन तिला न दुखावता तिला कसा आनंद द्यायचा हे फक्त मैत्रिचे बंधच समजु शकतात.
ReplyDeleteतुलना कुणाचीच करू नये.वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्त्व, पूर्णतः वेगळे स्वभाव त्यामुळे स्वतःचं वेगळेपण जपलं जाणारच किंबहुना ते नैसर्गिकपणे जपलं जातंच. अशावेळी प्रत्येकाने केलेल्या कृतीच, केलेल्या कामातील वेगळेपणाच कौतुक मोठ्या मनाने केलं पाहिजे तसं करण्याच सोडून अशा प्रकारे तुलना करण्याचा स्वभाव माणसांनी सोडला पाहिजे.
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteKhupch Sunder lekh
ReplyDelete