उपवास.... आपला... त्यांचा....


उपवास....
आपला...
त्यांचा....

ब-याच वेळा आलेले छोटे अनुभव खूप काही शिकवून जातात...लेकाच्या कॉलेजमधील काम करून मी ठाण्याहून येत होते.  तेव्हाही असाच एक अनुभव आला...दुपारची ट्रेन...त्यामुळे फार गर्दी नव्हती...ठाण्याला तर आम्ही अगदी दोन-चार जणी ट्रेनमध्ये चढलो.  बसायलाही मिळालं...कधीतरी नाही, नेहमी अशीच ट्रेन असावी अशी मनात इच्छा आली.   गाडी चालू झाल्यावर आजूबाजूला बघितलं तर महिलांचा एक ग्रुप बसला होता. 

बहुधा मुंबईला कुठेतरी देवीला नमस्कार करायला गेल्या होत्या...छान साड्या नेसलेल्या....तशाच छान तयार झालेल्या...काहींच्या पायात चप्पला नव्हत्या...नवरात्रीचे उपवास आणि आपले हळदीकुंकू...पूजा...यावर त्यांची चर्चा चालू होती....मी कशी करते...तू कशी करते...कसा उपवास...काय फराळ...मग हळदीकुंकू कसं होतं...कोणाला बोलवतेस...आदी विषयावर चर्चा चालू होती.  माझ्यासोबत ठाण्याला बहुधा कॉलेजला जाणा-या दोन मुलीही चढल्या होत्या...त्यांना या गप्पांचं काहीही देणं घणं नव्हतं...जागा मिळाल्याचा त्यांनाही आनंद झाला...पण त्याचं कारण वेगळं होतं...दोघींनी
लगेच सोबत आणलेली खाऊची पिशवी काढली...त्यात समोसे होते...त्या समोस्यांसोबत असलेल्या चटण्यांच्या पिशव्या उघडल्या...आणि गपागप खायला सुरुवात केली.  मी बघितलं...त्या समोरच्या महिलांच्या ग्रुपमध्ये काही क्षण शांतता पसरली.  लगेच एक महिला म्हणाली, मी अगदी शाळेपासून उपवास करतेय...आईनं तसंच शिकवलं....आमच्या घरात सगळ्यांचाच अगदी कडक उपवास असतो....दुसरीनं लगेच सांगितलं..मीपण शाळेपासूनच धरला उपवास...आमच्याकडे तर देवी बसतात...त्यामुळे सर्व सोवळ्यात होतं...बाहेरचं अन्न तर या दिवसांत अगदीच व्यर्ज्य....तिसरीनेही या दोघींना पाठींबा दिला...आणि आपला अनुभव सांगितला....क्षणभर माझी आणि त्या बायकांची नजरानजर झाली...मी समजले त्या महिला अप्रत्यक्ष त्या मुलींची आणि स्वतःची तुलना करत होत्या...आणि त्यांना काही बोध द्यायचा प्रयत्न करत होत्या...पण नशिबाने त्या मुली आपल्यातच होत्या...त्यांनी त्यांचा खाऊ संपवला...चटण्या निट बांधून ठेवल्या...बहुधा त्यात आणखी खाऊ होता...त्या पिशवीला घट्ट गाठ बांधली...पिशवी बॅगेत ठेवली...एकीनं हॅन्ड सॅनिटायझरची बाटली काढली...दोघींनी मिळून हात स्वच्छ केले...पाणी प्यायल्या...आणि बॅगेतून त्यांची पुस्तके काढली...बहुधा निटची तयारी करत असाव्यात...कारण बायोलॉजीची मोठी पुस्तके होती...आणि त्यांच्या त्या परत आपल्या विश्वात गडप झाल्या...
इथे या उपवासाची चर्चा करणा-या बायका त्यांची चर्चा सोडून या मुलींनाच बघत होत्या...डोंबिवली स्टेशन जवळ येत होतं...मधल्या स्टेशनवर एक छोटी मुलगी तिच्यापेक्षा लहान मुलाला घेऊन ट्रेनमध्ये चढली...तिचा भाऊ असावा...ती त्याला कडेवर कसंतरी बसवून भिक मागायला लागली...पहिली ती गेली ती या महिलांच्या ग्रुपकडे...काही क्षण थांबली पण तिला काही मिळालं नाही...एरवी देवीला पुजणा-या या महिलांनी तिची बोळवण केली...ती या मुलींपुढे आली...त्या पुस्तक वाचणा-या दोन मुलींची नजरानजर झाली...कोणीही बोललं नाही...पण मग जीच्याबॅगमध्ये खाऊची पिशवी ठेवली होती, तिने गपचूप ती पिशवी काढली आणि त्या छोट्या मुलीला दिली....केवढीशी होती ती मुलगी...आनंदली...शिवाय, चटनी भी है...खायेगी क्या...खोलके दे दू...म्हणत तिला आपुलकीनं विचारलंही...ती मुलगी म्हणाली दीदी मै खोलके लेगी...लगेच ती ट्रेनच्या दरवाजा जवळ असलेल्या जागेत आपल्या भावाला घेऊन बसली...आणि तो खाऊ खाऊ लागली....एव्हाना डोंबिवली आलं होतं...त्या दोन मुली बहुतेक पुढे उतरणार होत्या...त्यांचा अभ्यास चालू होता...त्या महिलांच्या ग्रुपमधील काहीजणी डोंबिवलीला उतरणार होत्या...काही पुढे जाणार होत्या...त्यांचे बाय बाय आणि दुस-या दिवशीचे बेत चालू झाले...कोण काय आणणार यावर चर्चा चालू होती...मी उतरता उतरता त्या अभ्यास करणा-या मुलींवर नजर टाकली...त्यापैकी एकीने त्यांच्याजवळील पाण्याची बाटली त्या छोट्या मुलाच्या हातात दिली होती...माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं...उपवास करुन कधी देवीला आपण साकडं घालू शकत नाही, असा विचार नकळत माझ्या मनात आला...त्यासाठी मनापासून काहीतरी करावं लागतं...या मुली भले उपवास करत नसतील...नसतील झेपत...त्यांचं रुटीन वेगळं आहे...पण त्यांच्यात माणूसकी जिवंत आहे...आपल्या सारख्या असलेल्या माणसाला आणि त्यांच्यातल्या निरागसतेला त्या जपतात....देव काय बघतो...त्याला अशी माणूसकी जपणारी माणसं तर आवडतात...तुम्ही कडक उपवास केले आणि किती जोरदार आरती म्हटली म्हणजे तुमची भक्ती चांगली...तुम्ही देवीचे उपासक...असा अर्थ कधी निघतो का...नक्कीच नाही...मला नेहमी वाटतं की खरी भक्ती ही त्या मुलींनी दाखवून दिलेल्या छोट्या उदहरणातून अनुभवता येते.  मी काहीवेळा भक्तीमार्गाला दिखावू वृत्तीच्या माणसांनी व्यापलेलं पाहिलं आहे.  पोटात असलेली मुलगी नको म्हणून डॉक्टरांकडून पिशवी साफ करुन आल्यावर चूकून अॅबॉरशन झाले असं सांगणा-या महिला देवीच्या उत्सवात कुमारीका पुजनाचा घाट घालतांना पाहिलं की मस्तकात चिड जाते...हा शुद्ध भोंदूपणा असतो...पण काहीवेळा बोलता येत नाही...असो...प्रत्येकाची भक्ती वेगळी आणि प्रत्यकेची वाटही वेगळी...
खरतर आपले सण...उत्सव...पूजा...हे नितांत सुंदर सोहळे आहेत...आपल्या भारतीय संस्कृतीचे सार...त्याचे महत्त्व सांगणारे हे सण आहेत.  पण आपण ते साजरे करतांना त्यांचा अर्थ निट समजून घेतला पाहिजे.  आपल्या परंपरा जोपासाव्यात...पण त्यांसाठी अट्टहास करु नये...आणि आपलीच पूजेची पद्धती किती श्रेष्ठ आहे,  हे तर दुस-याला दाखवण्याचा अजीबात प्रयत्न करु नये असं वाटतं...मध्यंतरी मी एका पुजेला गेले होते.  मी माझ्या पद्धतीनं नमस्कार आणि पुजा केली...तर तिथे असलेली एक परिचीत महिला लगेच पुढे आली...हे काय, तुला पुजा करता येत नाही...मग माझ्या चुका काढायला सुरुवात केली.  मी कशीही पुजा केली असली तरी देवाला मनापासून नमस्कार केला होता.  ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं...तर या महिलेसाठी पुजा किती वेळ केली हे महत्त्वाचं होतं...अर्थात अशांना चारचौघात काही सांगावंस वाटलं तरी आपल्याला आवर घालावा लागतो, कारण त्यांची तेवढी ऐकण्याचीही क्षमता नसते...आपण फोन जुन्या पद्धतीचा वापरतो का...नक्कीच नाही...काळाबरोबर नवीन,  पुढारलेला...नवीन अॅप असलेला फोन वापरतो...का...कारण तो अधिक सुलभ पडतो...जास्ती उपयोगी असतो...आपल्याला चांगली सुविधा देणारा असतो....मग असा पुढारलेला पणा आपण पुजापद्धतीमध्ये दाखवायला काय हरकत आहे...नवरात्रीमध्ये मी एका ठिकाणी गेले होते तेव्हा तिथे कुमारीका पुजनाला त्यांनी मुलीच्या वर्गामधल्या मोठ्या घरातल्या मुलींना बोलवलं होतं...अर्थात त्यांच्या आयाही होत्या...सर्वचजणी गाडंयामधून आलेल्या...अशा आया आणि मुली पुजेला आल्यावर त्यासाठी असणारा खाऊचा
बेत भारी असणारच...अर्थात तसाच होता...आणि त्यांना दिलेल्या भेटवस्तूही तशाच भारी होत्या...या अशा पुजनातून देवीला खूष करण्यापेक्षा ज्यांना गरज असेल तिथे पूजा केली तर...आज असे अनेक आश्रम आहेत जिथे गरजेच्या वस्तूही निट मिळत नाहीत...त्या आश्रमांना भेटी देऊन त्यांमधील मुलींच्या गरजेच्या वस्तू दिल्या तर पुजेचं उद्दिष्ट साध्य होणार नाही का...
असो....शेवटी प्रत्येकाची श्रद्धा वेगळी....मला नक्कीच कोणाच्या श्रद्धेची तुलना करायची नाही...पण या श्रद्धेच्या नावावर कोणी दुस-याची तुलना करु नये एवढीच अपेक्षा...


सई बने
डोंबिवली

------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

  1. Khup chhan lekh. Dev mansat asto devala shodhnyachi garaj naste . Dusryala dilyane devaparyant khara upwas pohchto.

    ReplyDelete

Post a Comment