खरेदीच्या नावाने मनमुराद भटकंती


खरेदीच्या नावाने
मनमुराद भटकंती
दसरा झाला की चाहूल लागते ती दिवाळीची...दिवाळी म्हणजे माझ्यासाठी नाविन्यचा शोध....बाजारात काय नवीन आले आहे, याची कायम उत्सुकता असते....आणि दिवाळी म्हणजे या नवीन वस्तुंसाठी हक्काची बाजारपेठ...त्यामुळे आता काय नवीन, हा माझा शोध चालू होतो...शिवाय घरामध्ये काहीतरी नवीन वस्तू बनवायची...एखादे पेंटींग काढायचे...कागदाचे डेकोरेशन...मण्यांची तोरणं...पणत्यांची विविधता...असं काहीतरी मी नेहमी शोधत असते...आणि हा सर्व शोध थांबतो तो क्रॉफर्ड मार्केट परिसर आणि भुलेश्वरच्या गल्ल्यांमध्ये....
....
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत ट्रेनने प्रवास करायचा आणि उतरलं की सरळ चालत जाचयं....मग कधीच संपू नये असा खरेदीचा प्रवास चालू होतो...अरे हे काय...हे बघ किती छान आहे...व्वा...व्वा...किती स्वस्त...मस्तच...अशा उत्सुकता भरल्या शब्दांनी ही खरेदी यात्रा सुरु होते...अगदी सकाळी अकरा वाजता गेलं आणि सायंकाळी सात वाजले तरीही मन भरत नाही... क्रॉफर्ड मार्केटचे सध्याचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई असे आहे.  मुंबईतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तुंमध्ये या बाजाराचा समावेश होतो.  १८६८ मध्ये ही वास्तू बांधण्यात आली. मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांचे नाव या बाजाराला देण्यात आले. हा बाजार आणि त्याच्या आसपासचा परिसर म्हणजे नाविन्याचा शोध घेणा-यांसाठी अलीबाबाची गुहा आहे.  कितीही फिरलं तरी मन भरत नाही.  ब-याचवेळा मी  या बाजार आणि परिसराला भेट देते.  फक्त खरेदी करण्यासाठी नव्हे तर ब-याचवेळा इथल्या गल्ल्या परिचित करण्यासाठी सुद्धा भेट दिली आहे.  गेली दहा ते बारा वर्ष माझी ही शोध यात्रा चालू आहे.  आणि खरं सांगते पहिल्यावेळी जसं पाहिलं होतं तसाच हा परिसर मोहात पाडतो....
इथे काय मिळत नाही....घर सजावटीच्या वस्तू, भाज्या, फळे, सुगंधी द्रव्ये, सुकामेवा, प्रवासी बॅग, महिलांसाठी ड्रेसेस, कितीतरी प्रकारचे दागदागिने, ते दागिने घरी बनवण्यासाठी लागणा-या मण्यांचे लाखो प्रकार, त-हेत-हेच्या लेस, शिलाई कामातील साहित्य,  मुंलाना देण्यात येणा-या भेटवस्तू, चॉकलेट्स, खेळणी, कॉस्मेटिक्स, वेगवेगळ्या वस्तू, गिफ्ट रॅपर्स, निरनिराळ्या आकाराच्या पिशव्या, पर्फ्यूम्स, पडदे, सोफ्याची कापडं, दिव्याची तोरणं, कंदिल, पणत्या, देवपूजेचं सामान, आणि आरास....अगदी घरातील पायपुसण्यापासून ते घर सजावटीसाठी लागण्या-या भल्यामोठ्या झुंबरापर्यंत....किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक वस्तू येथे मिळतात.  अत्यंत वाजवी दरात या वस्तू येथे उपलब्ध असतात.  येथील बरीचशी दुकाने होलसेल विक्रीची आहेत.  तुम्ही अगदी एक-दोन डझन वस्तू खरेदी करायच्या आहेत असं सांगितलंत तरी ते दुकानदार स्पष्टपणे नाही असं सांगतात... याच परिसरात आहे मंगलदास मार्केट...
साधारण दीडशे वर्षांपासून कपडय़ांचे होलसेल मार्केटअशी ओळख असलेल्या मंगलदास मार्केटची रचना ब्रिटिशकालीन आहे. कपडय़ांचे मार्केट म्हणून मंगलदास मार्केट देशभरात ओळखले जाते.  हा भाग सतत माणसांनी गजबजलेला असतो. घाऊक व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मार्केटमध्ये सुरुवातीच्या काळात कॉटनची विक्री मोठय़ा प्रमाणात होती. मुंबईत जेव्हा कपड्यांच्या मील होत्या तेव्हा या बाजारात खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात देशभरातून व्यापारी येत असत.  आता या मील बंद झाल्यानंतरही या बाजारावर परिणाम झाला नाही.  उलट कपड्यांचे विविध प्रकार येथे उपलब्ध होऊ लागलेत...आता तर तयार कपड्यांसाठी
या बाजाराची ओळख झाली आहे.  त्यामुळे वर्षाचे चोवीस तास येथे गर्दी असते. 
याच परिसरात थोडी पायपीट केली की लागतो तो भुलेश्वरचा परिसर....हा भुलेश्वर परिसर म्हणजे मनाला भूल घालणारा परिसर...मी तर या भागात गेले की वेळेचं भान विसरते...भुलेश्वरच्या गल्ल्या आहेतच तशा...इमिटेशन ज्वेलरी करण्यासाठी लागणारे सर्व सामान येथे मिळते...किती प्रकारणे मणी, मोती, तारा आणि आणखी कितीतरी प्रकारचे सजावटीचे सामान...हे घेऊ की ते घेऊ...असं म्हणण्याची वेळ येते...बरं दुकानं केवढीशी आहेत..काही दुकानं तर माळ्यावर आहेत...हे लाकडी माळे चढेपर्यंत जाणवतं बापरे काय हे...किती गरमी...पण मग या माळ्यावजा दुकानत गेलात की हरवल्यासारखं होतं...कितीतरी प्रकारचे मण्याचे, टीकल्यांचे प्रकार येथे पहायला मिळतात...तशाच कितीतरी सजावटीसाठी लागणा-या काचा, मोती...सजावटीचे हे सामान पाहून अगदी हरवल्यासारखे होते...
तिथेच शेजारच्या गल्लीत फुलांचे मार्केट,  तर थोडं पुढे गेलं की लागते लेसची गल्ली...साडी, ड्रेसवर लावण्यासाठी असलेल्या लेसचे लाखो प्रकार येथे पहायला मिळतात.  मी ब-याचवेळा या दुनियेत हरवून जाते.  घड्याळाचा काटा येथे बाजुला काढून ठेवावा...असा प्रकार...पुढे प्रत्येक गल्लीचं एक वैशिष्ट...कुठे मुलांना देण्यात येणा-या वस्तू...तर कुठे भेटवस्तू देण्यासाठी वापरण्यात येणा-या पॅकींगच्या बॅगा...तर कुठे चॉकलेटच्या सामानाची गर्दी...कुठे बांगड्याचे हजारो प्रकार....एकूण काय ही दुनिया अदभूत..जातांना व्हीटॅमिन एम...अर्थात पाकीटात पैसे घेतले की ते कधी खाली होतात हे समजणार नाही अशी ही दुनिया...
बरं फक्त खरेदीसाठी हा परिसर बेस्ट आहे असं नाही...तर खरेदी करता करता अनेक असे पॉईंट आहेत जिथे तुम्ही पोटपुजेसाठी थांबणारच.., भेलपुरी, पाणीपुरी, सरबत विकणारे यांची भेट हमखास होते. सुकी भेळ तर प्रत्येक गल्लीमध्ये आहेच....परंतु या भागातील सर्वात चविष्ठ पदार्थ म्हणजे मसाला पापड......भाजलेल्या पापडावर तिखट चटणी, कांदा, टोमटो, कोथंबीर आणि वरुन भरपूर नायलॉन शेव...हे मिश्रण एवढं भन्नाट लागतं की कधीतरी खरेदीसाठी नव्हे तर फक्त या मसाला पापडाची चव बघण्यासाठीतर भलेश्वरच्या गल्ल्यांमध्ये नक्की भटकंती करावी...साधारण सायंकाळी पाच नंतर या मसाला पापडाच्या गाड्या दिसायला सुरुवात होते....बरं हा पापड म्हणजे आपला घरगुती पापड असतो तसा छोटुसा नसतो...असे घरगुती चांगले चार ते पाच पापड एकत्र केले की होईल एवढा मोठा पापड असतो...अशा भाजलेल्या पापडाचे ढीग या गाड्यांवर लागलेले असतात...या पापडावर त-हेत-हेच्या चटण्या,  कितीही महाग असला तरी भरपूर आणि बारीक केलेला कांदा, टोमॅटो, कैरीचे बारीक तुकडे(एकदा तर मी
त्याला विचारलं होतं, तुम्हाला कुठल्याही सिझनमध्ये कैरी मिळते कुठून..असो)...आणि तळलेले चणे, शेंगदाणे असे काही खास प्रकार...वरुन चाट मसाला...आणि वारेमाप शेव....हा पापड बनवायला घेतला की तोंडाला पाणी सुटतं...बरं एकट्याने शक्यतो संपत नाही....आणि संपला तर पुढचे दोन तास तरी पोटात कशाला जागा उरत नाही...एवढा भरपेट...तशीच बात भेळपुरीची...आणि सॅडविचची...एकूण काय अशी खरेदीच्या नावाने मी आणि
माझ्या बहिणीने मनमुराद भटकंती केली.  सायंकाळचे सात वाजून गेल्यावर घरुन फोन सुरु झाले...डोंबिवलीत तुफान पाऊस आहे...विजाही आहेत...आता आवरतं घ्या...आणि घरी या...तेव्हा किती वाजलेत याची जाणीव झाली...तरीही पुढचा तास आणखी काही खरेदीत गेलाच...शेवटी पुन्हा येऊया अशी मनाची समजूत काढून सीएसटीची वाट पकडली...शनिवार मुद्दाम निवडला होता...कारण ट्रेनला गर्दी कमी...आम्हा दोघींच्या हात बॅंगांनी भरले होते...ट्रेनमधली थोडीफार गर्दी या खरेदीच्या उत्साहापुढे फिकी वाटली...डोंबिवलीत उतरल्यावर पावसामुळे आलेला सुखद गारवा...मग काय सगळा थकवा गेला आणि पुन्हा लवकरच भुलेश्वरला जायचा बेतही झाला....


सई बने
डोंबिवली
-------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

Post a Comment