समाधानाचे रहस्य


समाधानाचे
रहस्य

काही माणसांचे चेहरे असे असतात की जे कधीही विसरता येत नाहीत...समाधान, शांतता यांचं अनोखं मिश्रण त्यांच्यात असतं...आणि मुख्य म्हणजे कधीही बघा, ही माणसं हसतमुख असतात...त्यामुळे अशा माणसांकडे बघितलं तरी आपल्यालाही समाधान मिळतं...साधारण आठ ते नऊ वर्षापूर्वी अशाच एका काका-काकूंची ओळख झाली....

वरद दुसरीला असतांना या जोडप्याबरोबर ओळख झाली...सकाळी त्याला शाळेत सोडतांना...शाळेला जायला तयार झाला की तो धावत सुटायचा...बसस्टॉपच्या मागेच मोठी बाग...त्यात असलेल्या झोपळ्यांवर आणि घसरगुंडीवर मुलांची धम्माल चालू असायची.  या बागेत सकाळच्या वेळी फे-या मारणा-यांचीही गर्दी...या गर्दीमध्येच हे काका-काकूही होते.  पहिल्यांदा नुसतं हसून सुरुवात झाली.  मग ही ओळख वाढली.  मुलाचे नाव विचारले...माझेही...मग नावानं हाका मारणं सुरु झालं...बोलण्यात मार्दव,  आपुलकी...दोघंही सकाळी सहा वाजता बागेत यायचे आणि तासभर फे-या मारायचे...सकाळी सहा वाजता आले तरी दोघंही कमालीचे टापटीप...काकू छान साडी नेसलेल्या...तसाच छान मॅचिंगचा ब्लाऊज....साधीशी वेणी...आणि त्यावर गजरा किंवा फुलं...काकाही त्यांना साजेसे...सकाळी चालायला आले असले तरी, कडक इस्त्रीच्या कपड्यात....दोघांनी साठी पार केलेली...या वयातही त्यांचे हे टापटीप रहाणेच मला बहुधा प्रथम आवडले....त्यांची चांगली ओळख झाली.  त्यांच्या या चालण्याचा सवयीबाबात मी विचारलेही एकदा, डायबेटीस आहे का...हसून दोघंही नाही म्हणाले...मुलं मोठी झाली, लग्न होऊन दुस-या शहरात स्थाईक झालीत.  या दोघांना मुलांचं शहर अद्यापही आपलंस वाटत नव्हत.  त्यामुळे वर्षातून एखाद-दुसरा महिना मुलांकडे काढल्यावर दोघंही मुळ घरात परत येत...त्यांचा छोटासा गृहउद्योग असल्याचे कळले...एकदा लेकाच्या वाढदिवसाला त्यांना बोलावलं होतं.  तेव्हा घरी बनवलेल्या वस्तू घेऊन आले.  वड्यांचे, आंबोळीचे पीठ आणि घरी केलेल्या चकल्या असा खाऊ...काकूंची या पदार्थात मास्टरी....त्यामुळे त्या हे पीठ बनवण्याचे काम करायच्या आणि काका त्यांना पॅकींगला मदत करुन हे पीठ दुकानांमध्ये विक्रीसाठी पोहचवायचे...चकल्या तर दोघंही मिळून करतात हे मला गप्पांमधून कळले...बरं सर्व पदार्थांची चव अप्रतिम...आंबोळीचे पीठ तर एकदम आईच्या हातासारखे...त्यामुळे मी महिन्याला त्यांना सर्वांची ऑर्डर द्यायचे...दोन-तीन महिन्यांनी त्यांनी मलाच घरी येवून पीठ नेण्यास सांगितले...
वन रुम किचनचा त्यांचा प्लॅट...आटोपशीर जागा...गेल्या वीस वर्षापासून ते दोघं इथं रहात होते...बिल्डींग जुनी...पण परिसर स्वच्छ...काकूंचे घर म्हणजे आरसाच जणू...घरातच पीठ करायसाठी घरघंटी...काकूंनी मला गरमगरम चकल्या खायला दिल्या...त्यांच्या मुलांच्या लग्नाचे अल्बम दाखवले...दोघंही मुलं सुखवस्तू....आपापल्या घरी या दोघांना बोलवतात...पण या दोघांचे मन या घरात होते...काकांना पेन्शन होती....पण नुसते बसून काय करायचे म्हणून काका-काकू हा छोटासा गृहउद्योग चालवतात...मुलं सोबत असतांना काकूंचा सगळा वेळ त्यांच्या मागे जायचा...मुलं मोठी झाली.  त्यांची लग्न झाली.  नोकरीनिमित्त अन्य शहरात गेल्याने त्यांना मोकळा वेळ मिळायला लागला...बरं अर्ध आयुष्य मुलांच्या मागे धावण्यात गेलं....त्यामुळे त्यांच्या
मैत्रिणी फार कमी...नातेवाईकही गावाला...वाचनाची आवड...पण किती वाचणार...आणि देव-देव करायचं म्हटलं तर त्याची फार आवड नाही...अगदी दिवाबत्ती आणि फुलं वाहीली की पुजा झाली...मग करायचं काय...तर काकूंनी हे पीठ करायची सुरुवात केली.  अगदी दोन किंवा तीन प्रकारचे पीठ करायला सुरुवात केली...चव छान...मग खप वाढू लागला...पैसे मिळवण्याचा उद्देश नव्हताच...प्रश्न होता वेळेच्या वापराचा....काकाही त्यांना मदत करु लागले...अगदी हिशोब ठेवण्यापासून ते चकल्या तळण्यापर्यंत...मुलं आली की किंवा काका-काकू मुलांकडे रहायला गेले की हा गृहउद्योग बंद असायचा..मग ते जिथे पीठ द्यायचे त्यांना सांगून जायचे....काही जण मग आधीच जास्तीच पीठ घेऊन ठेवायचे...सगळा असा आटोपशीर व्यवहार...मला कौतुक वाटलं...कुणाच्या अध्यात-मध्यात नाही...दोघांचे समाधान आगळे होते...पुढे मला जेव्हा काही हवे असेल ते घ्यायला मी त्यांच्या घरीच जायचे....
साधारण चार वर्ष आमचा चांगला संपर्क होता....नंतर काकांच्या बिल्डींगचे काही काम निघाले...शिवाय त्यांचा मुलांचाही आग्रह वाढू लागला...दोन्ही मुलांची मुलं मोठी झाली होती...नातवंडही आजी-आजोबांकडे आवडीने येत होती...पण खोल्या लहान असल्याने अडचण व्हायची...म्हणून दोन्ही मुलांनी नवीन ब्लॉक घेण्याचा आग्रह केला...काका-काकूंनी त्यांचा गृहउद्योग काही महिन्यांसाठी बंद केला...मोठी सून सुट्टीमध्ये मुलांसह आली...ती दोन महिने राहीली...त्या दरम्यान तिने नवीन घर शोधायची मोहीम चालू केली...मग शहराबाहेर होत असलेल्या मोठ्या कॉम्प्लेक्समधील मोठा ब्लॉक तिला पसंत पडला...मुलांसाठी तो सोयीचा होता...एकतर तीन रुमचा ब्लॉक होता...शिवाय कॉम्प्लेक्स मध्ये सर्व सुविधा होत्या...अगदी वेळपडल्यास हॉस्पिटलही...मग मुलं आली.  पैशाचा व्यवहार झाला...आणि ब्लॉक नक्की झाला...मी घरभरणीची पूजा होती त्याला गेले...तेव्हा काका-काकूंनी भेटायला ये असं सांगितलं...पण त्यांचे नवीन घर माझ्याघरापासून खूप लांब...त्यामुळे इच्छा असून जाणे झाले नाही...काही दिवस सकाळी खाली उतरले की बागेत आपसूक नजर जायची....काकूंची आठवण यायची....पण काही दिवसांनी त्यांच्या नसण्याची सवय झाली...आठवणी विरळ झाल्या....
आता महिन्यापूर्वी काकूंचा चेहरा बाजारात दिसला...लांबूनच त्या दिसल्या...कितीतरी वर्षांनी त्यांना पाहिलं...मी आजूबाजूला पाहिलं, काका नव्हते...काकू एकट्याच होत्या...तशाच...प्रसन्नचित्त...छान साडी नेसलेल्या...टापटीप...मोग-याचा गजरा...मोठी टीकली...आणि मोत्यांच्या टपो-या कुड्या...मी काकूंना आवाज दिला...भर बाजारात आम्ही दोघींनी अगदी गळाभेट घेतली...काकूंनाही आनंद झाला...मग त्यांना बाजूला करुन गप्पा सुरु झाल्या...पहिल्यांदा काकांची चौकशी...मग पीठ करता की नाही...चकल्याचं काय...त्यांच्या हाताच्या चवीचं कौतुक...मुलांची चौकशी...माझा प्रश्नांचा ओघ जरा ओसरल्यावर काकू हळूच म्हणाल्या, काका गेले...होय, काका गेले...नव्या घरात गेल्यावर वर्षभरातच त्यांचं निधन झालं...एक दिवस झोपेतच हृदयविकाराचा झटका आला...झोपेतच गेले...मुलं आली...त्यांचं कार्य झाल्यावर सर्वांनी आग्रह केला आता मुलांकडे रहा म्हणून...एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटी कशी रहाणार...पण काकू तयार झाल्या नाहीत...मुलं आई ऐकत नाहीत म्हणून वैतागली...मग सुनांनी पुढाकार घेतला...त्यांनी सासूच्या भावना समजून घेतल्या...एक सुवर्णमध्य निघाला...आता नातवंडंही मोठी झालीत.  त्यापैकी मोठ्या मुलाची मुलगी कॉलेजसाठी म्हणून काकूंकडे रहायला आली...ती त्यांच्यापासून जवळच्या कॉलेजमध्ये जाते...त्यातून दोन्ही सुना ठरवून दोन-दोन महिने त्यांच्याजवळ रहातात...आणि मुलंही मग सण –समारंभासाठी आईकडे येतात...एकूण काय काकू एकट्या नाहीत...त्यांचा गृहउद्योग सुरु आहे...फक्त तळण्याचे काम त्यांनी कमी केलंय...आता तर त्यांच्यासोबत नात कायम असते...आणि ती फूड टेक्नॉलॉजी संदर्भात काही अभ्यास करतेय...त्यामुळे तिच्या सोबत त्यांची छान गट्टी जमलीय...ती त्यांना नवीन पदार्थ शिकवते...आणि काकू तिला पारंपरिक पदार्थांचे धडे देतात...
मुख्य म्हणजे काकू पहिल्यासारख्याच रहातात...काका गेले म्हणून गजरा...टिकली...मंगळसूत्र..त्यांनी दूर केले नाही...काकांना अशीच मी आवडायचे हे सांगतांना त्यांचे डोळे पाणावले....थोडावेळ त्या थांबल्या...काकांची बहुधा आठवण झाली...माझेही डोळे पाणावले...काकू ब-याच सावारल्या होत्या...आता त्यांच्याकडे मोबाईलही आलाय...त्यामुळे आम्ही आमच्या नंबरची आदलाबदल केली...त्यांनी माझ्या लेकाची आपुलकीने चौकशी केली...आणि आम्हा सर्वांना घरी यायचे आमंत्रण दिले...मी सुद्धा त्यांना नातीला आणि सुनेला घेऊन घरी बोलावले...आणि त्यांच्या घरी जाण्याचेही मान्य केले....
आम्ही दोघीही आपापल्या घराकडे निघालो...मनात विचार आले, काही माणसं आपल्याला न बोलता बरचं काही शिकवून जातात...छोट्याश्या घरात राहून काकूंनी संसार केला...अनेक अडचणी आल्या असतील,  पण त्याचा त्यांनी कधीच उल्लेख केला नाही...काका गेले तेव्हा तर त्या एकट्या होत्या...किती मोठा धक्का होता तो...पण त्याबद्दलही कोणाला दोष नाही...की दुःखाचा बाऊ नाही...जे-जे होईल ते-ते आनंदाने स्विकारायचे...आणि पुढे जायचे...बहुधा त्यांच्या चेह-यावरच्या समाधानाचे हेच रहस्य असावे....


सई बने
डोंबिवली

--------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

Post a Comment