ए
दिवाळी
दिवाळी....काय सण आहे ना हा...काहीही होऊदे...पण दिवाळी सण साजरा केला
नाही असं होत नाही. या दिवाळीत काय नसतं...उत्साह...गोडधोड...पै-पाहुणे...सजावट...फटाक्यांची
आतीषबाजी...आणि दिव्यांचा लख्ख प्रकाश...अर्थात घराला कितीही महागडा रंग
लावला...नवीन इंटेरिअर केलं...लाखमोलाची खरेदी केली...नवीन दागिने केले...महागडे
कपडे घेतले...अगदी नवीन गाडी घेतली असं काहीही असलं तरी दिवाळीची खरी शान आहे ती
पणतीमध्ये...खरं आहे ना...मातीची साधीशी पणती दारी लावली की ख-या अर्थानं दिवाळी
सुरु झाल्याची जाणीव होते. तिच्या मिणमिणत्या
उजेडाने मग आपण सजवलेल्या घरावर...आपल्या खरेदीवर मांगल्याचे अनोखं आवरण चढतं...
या अशा लाखमोलाच्या पणत्या आता बाजारात आहेत. पण या पणत्यांचे मेकींग बघण्याची अर्थात पणती
प्रत्यक्ष बनवतांना
बघण्याची मजा काही वेगळी असते. मुंबईच्या
धारावीमध्ये असलेल्या कुंभारवाड्यात अशा लाखो पणत्या केल्या जातात. हा कुंभारवाडा म्हणजे अनोखी कलानगरी आहे. या कलानगरीला भेट देणं म्हणजे माझ्या आनंदाचा
विषय...
साधारण सहा वर्षापूर्वी एका मैत्रिणीला पणत्या घ्यायच्या होत्या...आणि
पणत्यांसोबत मातीच्या काही कलाकुसरीच्या वस्तुही घ्यायच्या होत्या...आमच्या
आसपासच्या दुकानात फिरलो. पण भाव बघून परत
आलो. थोडी चौकशी केल्यावर समजले की या
सर्व वस्तू धारावीच्या कुंभारवाड्यातून आणल्या जातात. तिथे गेल्यावर ब-यापैकी स्वस्त दरात पणत्या
आणि अन्य वस्तू मिळतील. पहिल्यांदा
धारावीला जायचं म्हणून आम्ही नकोच म्हटलं.
कारण धारावीचं वर्णन ब-याच वेळा ऐकलं होतं ते भीतीदायक वाटावं असंच होतं. काहीजणांनी तर मुलीमुली जाऊच नका...पैसे
सांभाळा..इथपासून ते साधे कपडे घाला...असेही सल्ले दिले. त्यामुळे आम्ही या कुंभारवाड्यात जाणंच
टाळलं. पण नंतर काहींनी हा गैरसमज दूर
केला. जाऊन तर बघा. नाही आवडलं तर लगेच परत या. असा धिराचा
सल्ला दिला. मग मनाचा हिय्या करुन मी आणि माझ्या मैत्रिणीने
या कुंभारवाड्याला जायचा बेत केला. डोंबिवली
पासून ट्रेनने सायन गाठलं आणि तिथून टॅक्सी...पहिल्यांदा जात असल्यामुळे
कुंभारवाडा नेमका कुठे आणि किती आहे हे माहित नव्हतं. टॅक्सीवाल्याला कुंभारवाडा असं सांगितलं आणि
त्यानं अगदी कुंभारवाड्याचं पहिलं दुकान सुरु होतं तिथं आम्हाला सोडलं. आम्ही उतरलो समोर मातीच्या भांड्यांची रास
लागलेली...हळूहऴू एका दुकानातून दुस-या दुकानात....अगदी सुरुवातीला विंडो शॉपिंग
करतात तसं फिरत राहिलो. आणि खरं सांगू
पहिल्याच भेटीत या कुंभारवाड्याच्या कलाकारीमध्ये हरवून गेलो. कितीतरी प्रकारची मातीची भांडी. बरं
प्रत्येक दुकानाची खासियत वेगळी.
एका दुकानात जेवण करायला वापरतात तशी मातीची भांडी. दुसरीकडे मातीच्या कुंड्या. तिसरीकडे शोपीस. पुढे मातीचे कलाकुसर केलेले मोठाले
दिवे. आणखी पुढे गेलो तर भातुकलीच्या
भांड्याची गर्दी...आम्ही फक्त पणत्या आणि काही भेटवस्तू देण्यासाठी लागतील अशा
वस्तू घेण्यासाठी गेलो होतो. पण प्रश्न
होता नेमकं काय घ्यावं...कारण कुठल्याही दुकानात गेल्यावर तिथल्या वस्तू घ्याव्यात
अशाच...शिवाय पणत्यांचे तर केवढे प्रकार.
बहुधा प्रत्येक दुकानात पणत्या मिळतातच.
पण त्यातही अगदी खास कलाकुसरीच्या पणत्या मिळतील अशीही दोन-चार दुकानं आहेत. त्यात गेल्यावर तर ही घेऊ की ती घेऊ असं होऊन गेलं होतं. तिथे असलेल्या पणत्यापैकी सर्व पणत्यांचा नमुना म्हणून एक-एक पणती मोठ्या लाकडाच्या फळीवर लावलेली...आणि मोठ्या पणत्यांची तर गणनाच नव्हती. कुठे फळीवर लावलेल्या तर कुठे मोठ्या हा-यामध्ये ठेवलेल्या या पणत्या पाहून हरखून गेल्यासारखे झाले.

या कुंभारवाड्यात येतांना ठराविक वेळेचं बंधन आम्ही ठरवलं होतं. पण हे बंधन केव्हाच मागे पडलं. अगदी छोट्या गल्लीबोळात ही कुंभारवाड्याची
वस्ती. प्रत्येक घरात मातीच्या वस्तूंचा
खच. खरंतर तेच त्यांचं उदरनिर्वाहाचं
साधन. घराच्या मागच्या बाजुला तशाच छोट्या
भट्ट्या...त्यात पणत्या, शोभेच्या वस्तू या भाजून तयार होतात. माझ्यासाठी तर हे सगळंच आश्चर्यकारक होतं. आतापर्यंत धारावीच्या बाबतीत असणारी भीतीही दूर
गेली होती. आम्ही जसं नवख्यानं फिरत होतो,
तसंच मुंबई दर्शन म्हणून येणारे काही ग्रुपही होते. त्यात परकीय पाहुण्यांचा समावेश प्रामुख्याने
होता. ही मंडळी या कुंभारवाड्यातून
फिरतांना मनसोक्त फोटोग्राफी करत होती.
तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू,
त्यांची मांडणी, दुकानाबाहेर
असलेले पणत्यांचे ढिग, कुंभारवाड्यातील घरे,
भट्ट्या, अरुंद गल्ल्या असे अनेक
फोटो ही मंडळी काढत होती. आम्ही आत
गल्लीबोळातून फिरुन आल्यावर काही जेजे स्कूलचे विद्यार्थीही तेथे चक्क चित्र
काढण्यासाठी आले होते. तर काही विद्यार्थी
फोटोग्राफी करत होते. ज्या भागाबद्दल मी
मनात अनेक शंका ठेवल्या होत्या त्या भागात ही मुलं नित्यनियमानं त्यांच्या
अभ्यासासाठी येत होती.
मी तेव्हा या कलानगरीचा तेवढ्यापुरता निरोप घेतला. तेवढ्यापुरताच....कारण त्यानंतर प्रत्येक
दिवाळीच्या आधी मी या भागाला हमखास भेट दिली आहे.
अगदी एकटीनेही. कसलाही किंतू मनात
न ठेवता या कुंभारवाड्याच्या दुकानांमधून आणि तिथल्या गल्ल्यांमधून भटकंती
केली
आहे. इथे आल्यावर एक आगळा नाद लागला. वर्षातून किमान दोनवेळा या भागाचा दौरा
करायचा. सगळ्या दुकानातून फिरायचं. जे जे वेगळं दिसतं ते खरेदी करायचं आणि कोणा
परिचितांकडे गेलं की त्यांना ते सजवून, भेटवस्तू म्हणून द्याचयं. मोठाली कपबशी,
लामणदिवा, घर, पणत्यांचे ताट, कासव अशा कितीतरी वस्तू मी खरेदी केल्या आहेत. प्रत्येकवेळेला सोबत नेलेल्या पिशव्या आणि
बास्केट भरलं तरी मन मात्र भरत नाही हा हमखास येणारा अनुभव. आता दिवाळीच्या तयारीवर शेवटचा हात फिरवतांना
आणि पणती लावतांनाही मन त्या कुंभारवाड्यातील कलाकुसरीमध्येच अधिक गुंतल्यासारखं
आहे. मंडळी तुमच्याही घरात दिवाळीची तयारी
सुरु असेल. पणत्या सजवल्या असतील. आणि या साध्याशा पणत्या कशा तयार होतात हे
पहायचं असेल तर नक्की या कुंभारवाड्यात फेरफटका मारा...अगदी आता नाही...वर्षाचे बाराही महिने या कुभारवाड्यात आपल्यासाठी मातीच्या पणत्या होत असतात...ते काम बघण्यासारखे असते. नक्की बघा. आणि त्यांना दाद द्या....यातच त्यांची दिवाळी असते.
सई बने
डोंबिवली
------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Superb......
ReplyDeleteखुपच छान लेख
ReplyDeleteMast.....
ReplyDelete