निराशा....
नाही, नाही आलंय...आता पुढच्या महिन्यात या...चला पुढे....बस्स एवढ्या
सौजन्यपूर्ण वाक्यावर माझी दीड-दोन तासांची प्रतीक्षा संपली...माझी फाईल आवरुन मी पुन्हा निराश मनाने त्या
कार्यालयातून बाहेर पडले....गेले सहा महिने एका प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्र
जमवण्याचा मी प्रयत्न करतेय...पण अद्याप त्यात यश आले नाही. आता पुन्हा या सहा
महिन्यात आणखी एक महिना जोडला जाणार आहे.
गेल्या सहा महिन्यापासून देशाची आर्थिक राजधानी म्हणून गौरवलेल्या
आपल्या मुंबईच्या एका सरकारी कार्यालयात मी शब्दशः खेटे घालतेय...साधारण जूनच्या
पहिल्या आठवड्यात मुलासाठी लागणा-या एका प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. तेव्हा त्यासोबत नव-याचेही काही प्रमाणपत्र
आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. ती
प्रमाणपत्र नसल्याने मग त्यासाठी अर्ज आणि हा खेटा घालण्याचा प्रकार सुरु झाला.
त्याचबरोबर देशाच्या आर्थिक राजधानीच्या प्रमुख कार्यालयात चाललेल्या कारभाराने
डोक्यावर हात मारायची वेळ आली....जून-जुलै महिन्यापासून एक प्रमाणपत्र
मिळवण्यासाठी मी काही दिवस रोज, नंतर आठवड्याच्या अंतराने, मग पंधरा दिवसानंतर आणि
आता महिन्याने फे-या मारत आहे. खरं तर
खाजगी किंवा सरकारी कोणतंही कार्यालय असो,
आपण जिथे काम करतो, तिथे आपल्याला नेमून दिलेल्या तासामध्ये प्रामाणिकपणे
काम करावं अशी अपेक्षा
असते. मात्र मला येत असलेला अनुभव वेगळा
आहे. अगदी जून महिन्यात केलेला साधा
अर्ज....पण अद्यापही त्याचा पाठपुरावा करण्यात वेळ जात आहे. बरं संबंधित कामासाठी जी विशेष खिडकी करण्यात
आली आहे, तिथेही सकाळची ठरावीक वेळ...त्यामुळे समझा अगदी दहा मिनिटे जरी उशीर झाला
तरी आपली फेरी वाया गेली असंच.
पहिल्यांदा मी जेव्हा गेले तेव्हाही असंच
झालं. मुंबईचं कार्यालय गाठायचं म्हणजे
ट्रेनशिवाय पर्याय नाही. त्यादिवशी ट्रेन नेमक्या उशिरा होत्या....मी अगदी दहा मिनिटे
उशीरा पोहचले...पण तो विभाग बंद झाला होता. मी सहज म्हणून तिथे काम करणा-याला विनंती
केली...डोंबिवलीहून आलेय ...प्लीज जरा एवढा अर्ज घ्या ना...तर त्याने मला सुनवलं,
मी कल्याणहून येतो....तुमच्या डोंबिवलीचं काय कौतुक....ही पहिली सलामी होती....मग
मला हळूहळू या कारभाराचा परिचय होऊ लागला....चार ठिकाणी रांगा लावून समजलं की अगदी
दोन रुपयांचे शुल्क भरुन मला पुढचा टप्पा गाठयचा होता. पण जिथे हा फार्म भरायचा तिथले प्रिंटर
बंद...पुन्हा पंधरा दिवसांनी या...मी गेले...तर पुन्हा तेच...मग शेवटी अडून बसले. मग एकाने मार्ग काढला, तुमच्याकडे पेनड्राईव्ह असेल तर आम्ही ऑपरेट
करुन देणार, तुम्ही बाहेरुन प्रिंन्ट आऊट काढा....नशिबाने लेकाच्या पेपरच्या प्रिंन्टआऊट
काढायच्या असल्याने पेनड्राईव्ह होता. मग
संबंधित फॉर्म ऑपरेट करुन घेतला...बरं हे करतांना त्या बाईंनी नावात चार स्पेलिंग
मिस्टेक केल्या होत्या...त्या मीच दुरुस्त केल्या...मग बाहेर जाऊन प्रिंटआऊट...मग
पुन्हा ते जमा करण्यासाठी रांग...मग कळलं
की जीथे या सर्वांचे पैस भरायचे होते, तिथला प्रिंटआऊट बंद...काय हे...माझ्यासारखेच
अनेक जण फक्त पावती घेण्यासाठी बसले होते.
त्यातील बरेचसे वयस्कर...आजी...आजोबा...मुलं, सुना कामावर गेल्यावर बीलं भरण्यासाठी
आलेले....पैसे भरुन प्रिंटआऊट येण्याची वाट पहात बसलेले...मलाही त्याशिवाय पर्याय
नव्हता...कारण ती बीलाची प्रिंन्टआऊट दाखवल्याशिवाय आणखी पुढचा टप्पा पार होणार
नव्हता...पण तासाभराने काहीही न झाल्यावर दुस-या दिवशी येण्यास सांगण्यात
आले. ते मला शक्य नव्हते. मग काही विनंत्या करुन त्या कागदांवर पैसे
भरल्याची नोंद करुन ती मी जमा केली...पुन्हा त्याची झेरॉक्स...मग या जमा झालेल्या
अर्जाचा पाठपुरावा...महिन्यातून दोन वेळा फेरी मारायची....त्यादिवशी सकाळी लवकर
बाहेर पडायचं...ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेत धक्के खात, ते कार्यालय गाठायचं....आणि
त्या खिडकीसमोर जाऊन रांग लावायची...बरं त्याच्यासमोर आणि बाजुलाच सार्वजनिक
स्वच्छतागृह...त्यामुळे नाकाला रुमाल...किमान दोन तास तो वास सहन केल्यामुळे
होणारी प्रचंड डोकेदुखी...आणि मग येणारं उत्तर...पुन्हा महिन्यांनी या....
गेल्या आठवड्यातही असाच अनुभव....त्यात माझ्या
पुढे एक आजोबा होते...त्यांच्या मुलानं त्यांना या प्रमाणपत्राच्या कामगिरीवर
पाठवले होते...त्यांची बहुधा पहिलीच फेरी होती...सर्व कागदपत्रांची मुळ प्रत घेऊन आलेले. वय झालेले, पहिल्यांदा येणारे जसे वागतात तसेच
ते वागत होते....हात थरथरत होते...पेपरचा गोंधळ उडाला होता..पण ज्यांच्याकडे हे
पेपर द्यायचे होते, त्यांच्या चेह-यावरची माशीही उडत नव्हती...हे काय...हा पेपर
कुठेय...याची मुळ प्रत हवी...नीट लावता येत नाही का...काय पसारा केलाय...अशा
शब्दांचा मारा त्या आजोबांवर होत होता....नाईलाजानं मी आवाज चढवला...पुढे झाले. त्या आजोबांना मदत केली...अर्थात त्यांनाही
महिन्यांनी येण्याचे फर्मान संबंधितानं काढलं होतं...
मी सुद्धा त्या आजोबांच्या पाठोपाठ बाहेर
पडले...ते तर माझ्या पुढे जाणार होते.
त्यांची काही मुळ कागदपत्र गहाळ झाली होती. ती मिळवण्यासाठी आता धडपड करावी लागत होती. पण या पहिल्याच अनुभवानं ते हडबडले होते. त्यांच्यामानाने माझ्याकडे ब-यापैकी अनुभव
होता. त्यांना समजवलं...मग आम्ही दोघेही
ट्रेन पकडण्यासाठी निघालो...वाटेत दोघेही निःशब्द...मी मनात या कार्यालयातील कारभाराबाबत
विचार करत होते. बहुधा ते आजोबाही तोच
विचार करत होते. फक्त एका पेपरसाठी किती
फे-या मारायच्या...ट्रेन पकडली आणि आम्ही दोघांनीही घरचा रस्ता पकडला.
घरी आल्यावर सहज म्हणून टीव्ही लावला. तिथे खुर्चीचा खेळ चालू होता. न्यूज चॅनेलच्या अॅंकर आपापल्या परीनं बदलत्या
राजकीय स्थितीचे विश्लेषण करीत होते. पत्रकांरांची
पळापळ...नेत्यांची भूमिका...कोणीतरी आमची मतं आम्हाला न विचारता दुस-याच पक्षाच्या
पदरात टाकलेली...प्रत्येकाला मुख्यमंत्रीपद हवं....मोक्याची खाती हवी...त्याची न
संपणारी वादावादी...नकोसं वाटलं...मध्येच एका शेतक-याच्या आत्महत्येची बातमी
आली. काही मिनिटांसाठी सर्व राजकीय बातम्या
थांबल्या...शेतक-याचा फोटो काही क्षण स्क्रीनवर झळकला...त्याची लहानगी मुलं
दिसली...बस्स...काही सेकंदानंतर पुन्हा राजकीय ड्रामा सुरु...मी वैतागून टिव्ही
बंद केला...दुपार कधीच उलटून गेली होती. नव-याचा फोन झाला...त्याचा पहिलाच प्रश्न, काम
झालं...मी पुन्हा नाही...मग दोघंही निःशब्द...
मनात आलं, एवढ्यासाठीच मी न चुकता मतदान करते
का...एवढ्या वर्षात कधीही मतदान मी चुकवलं नाही.
पण या मतदानाचा आदर तेवढ्यापुरताच का असतो. अगदी एक दिवसाचा राजा...नंतर मात्र त्याला कोण
विचारतो... क्षणभर निराश झाले. पण नाही, मग
आठवलं की सगळेच असे नसतात. मतदानामध्ये
आपल्या शहरी भागापेक्षा ग्रामिण भागातील नागरिक सरस ठरले आहेत. त्यांन किती सोयी सुविधा मिळतात...पण ते न
चुकता मतदान करतात...निदान त्यांना सलाम म्हणून तरी मतदान केलेच पाहिजे...आणि माझ्या
कामाचं काय...ते तर मी करणारचं....मनातली मरगळ झटकली...कॅलेंड़र घेतलं...आणि त्यावर
पुढची तारीख लिहीली....
सई बने
डोंबिवली
--------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteछान! जीवघेण्या अनुभवाचं सुरेख शब्दांकन. महा सत्ता होऊ म्हणणाऱ्या देशाच्या आर्थिक राजधानीअसलेल्या शहरात ही अशी वास्तविकता. बऱ्याचदा असे अनुभव येतात. संबंधितांनी हा ब्लॉग प्रातिनिधिक तक्रार म्हणून समजावा असा आहे. सार्वजनिक कार्यप्रणालीत पुढे सुधारणा व्हावी ही अपेक्षा.
ReplyDeleteअतिशय वास्तववादी लेख ! प्रत्येक शासकीय कार्यालयात असाच अनुभव येतो.कर्मचाऱ्यांमध्ये सौजन्य अजिबात नसते.महिला कर्मचारी जरा जास्तच बोलणाऱ्या असतात.(अपवाद आहेत हे मान्य आहे) हे असं का होत ? खाजगी कार्यालयात असा अनुभव क्वचितच येतो. बँके मधील कर्मचार्यांचाही चांगला अनुभव नाहीय.या मागील अनेक कारणापैकी कांही कारण म्हणजे पर्मनंट नोकरी, संघटनेचे कवच, कारवाईची शक्यता कमी,
ReplyDeleteप्रामाणिकतेचा अभाव,नागरिकांची अशा कर्मचार्याविरोधात तक्रार न करण्याची वृत्ती,चुकीच्या गोष्टीला ठामपणे विरोध न करण्याचा व आहे ती परिस्थिती स्वीकारण्याचा स्वभाव यामुळेच अशा कर्मचाऱ्यांच फावत.ही परिस्थिती बदलायची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे.
- विनायक जाधव
ReplyDeleteखुपच छान लेख
ReplyDelete