भाऊच्या धक्याची सफर...
मासे...असं कोणी हलकेच म्हटलं तरी माझ्या लाडक्या लेकाचे कान टवकारतात. एरवी आठवड्याचे वार त्याच्या लक्षात रहात नाहीत...पण त्याच आठवड्यात कुठल्या वारी
आपल्या घरी मासे केले जातात, हे त्याच्या
पक्कं लक्षात असतं. माशांचा बेत असला की
त्याचं जेवणही राजेशाही थाटात....बरं ताटात कितीही मासे वाढले, तरी एवढेच....हा
त्याचा पहिला शब्द....थोडी अजून कोलंबी का नाही आणलीस...ही नेहमीची तक्रार...त्याची
फर्माइश पुरी करायला मला आवडतं....पण त्या नादात घराचं आर्थिक बजेट सांभाळता
सांभाळता कसरत करावी लागते. त्यात
नुकत्याच झालेल्या वादळांमुळे माशांचे दर बघूनच समाधान मानायची वेळ आली होती. असे स्थानिक बाजारात माश्यांचे दर वाढले की मी
एक छानशी सफर करते....ती म्हणजे भाऊच्या धक्याची सफर.....
काही वर्षापूर्वी माझ्या एका परिचीतांनी मला या
माझगांव डॉक जवळील भाऊच्या धक्याला नेलं होतं. तिथे समुद्रातून
येणा-या माश्यांच्या बोटी लागतात. अगदी
पहाटे. या बाजारात मोठ्याप्रमाणात मासे
घ्यायचे असल्यास नक्की फेरी मार, असं सांगून या परिचितांनी हा माश्यांचा खजिना मला
दाखवला. आमच्या घरात सगळेच पट्टीचे मासे
खाणारे...त्यामुळे वर्षातून किमान दोन आणि जास्तीत जास्त कितीही वेळा या खजिन्यावर
धाड टाकायला मला आवडतं. गेल्या शनिवारी मी
नव-यासोबत अशीच या माश्यांच्या खजिन्यावर धाड टाकली. या भाऊच्या धक्यावर जायला घरातून पहाटे पाच-साडेपाचच्या
दरम्यान तरी निघायला लागतं. कारण
डोंबिवलीहून साधारण एक ते दीड तास प्रवासात जातो.
सोबत मासे आणण्यासाठी मोठे प्लॅस्टीकचे डबे, पिशव्या आठवणीने घ्याव्या लागतात. ट्रेनने भायखळा स्टेशनवर उतरायचे. बरं या स्टेशनच्या बाजुलाच मोठा भाज्यांचा आणि
फळांचा बाजारही अगदी सक्काळी भरतो.
त्यामुळे नाही म्हणायला तिथेही थोडं रेंगाळायला होतं. पण माश्यांची ओढ न्यारी. त्यामुळे अगदी वरवरची भाजी आणि फळं घेतली की
टॅक्सीला भाऊचा धक्का सांगायचे....एरवी मुंबईतून सक्काळी सहाच्या सुमारास फेरफटका मारण्याची
ही चांगली संधी असते. फार गजबज नसल्याने
सर्व बघत बघत जात असतांनाच माझगांव डॉक येतं.
येथे बोटी तयार होतात. शांत परिसर....थोडं पुढे गेलं की भाऊचा धक्का येतो. मग
एक वेगळाच वास जाणवायला लागतो.
समुद्राच्या खा-या वासाची झुळूक येते.
शहरात असणारी शांतता विसरायला लावणारी गाड्यांची गर्दी येथे जाणवते. सलग माश्यांच्या टोपल्या भरलेले टेंम्पो दिसू
लागतात. मध्येच मासे नेण्यासाठी आलेल्या
कोळी मावश्यांची गाडी दिसते. मग समुद्राचे
दर्शन होते....आणि त्यावर तरंगणा-या असंख्य बोटी दिसतात....त्यातच जाणवतं, अजूनही
शांत असलेल्या शहराच्या कुशीत असलेला हा भाऊचा धक्का कधीच जागा झालेला आहे....
मासे नेण्यासाठी आलेल्या टेंम्पोंमुळे ट्रॅफीक
किती झालंय, यावर टॅक्सीवाला आपल्याला
कुठपर्यंत नेतो हे अवलंबून असतं. मग पाच
मिनिटांची पायपीट केली की या माश्यांच्या खजिन्यात थेट उडी मारली की काय असा अनुभव
येतो. या चार-पाच मिनिटांच्या
पायपीटीमध्येच खरंतर आपल्याला या खजिन्यातला किती वाटा मिळणार आहे, याचा अंदाज
यायला लागतो. रस्त्यात काही माश्यांनी
भरलेल्या हातगाड्या उभ्या
असतात...माश्यांनी भरलेल्या मोठ्या टोपल्या घेऊन
जाण्याची कोळी बांधवांची लगबग चालू असते.
तर कोणी अगदी चार फुटाचा मासा हातात घेऊन फोटो काढत असतो. मुख्य बाजारात जाण्याच्या वाटेवरच अन्य कोळी
बांधव मासे विक्रीसाठी बसलेले असतात. पापलेट,
कोलंबी, सुरमई, हलवा, बांगडे, खेकडे, रावस, बोंबील, वाम, शिंपल्या, मांदेली....असे
कितीतरी प्रकारचे मासे कोळी महिला विक्रीसाठी बसलेल्या असतात. एक दोघींकडे सुकी मासळीही असते. अगदी सकाळी सहा-साडेसहाचा सुमार असला तरी
माश्यांकडे आणि या कोळणींकडे बघितलं तरी फ्रेश वाटतं. मग अगदी थोडं पुढे, मुख्य बाजार. येथे सगळं होलसेल बाजारासारखं वातावरण. तुम्ही शंभर-दोनशेची बातच करायची नाही. पण सांभाळून,
कारण सर्वंत्र माश्यांचे पाणी, आणि मासे भरलेल्या टोपल्यांची ने-आण करणारे
विक्रेते....त्यामुळे आपले कपडे सांभाळत मासे बघायला सुरुवात करायची.
आपल्याला काय आणि किती मासे घ्यायचेत हे ठरलं
की मग खरेदी सुरु करायची. प्रत्येक कोळणीकडे
वेगवेगळ्या माश्यांचे वाटे लावलेले असतात.
त्यांचा आकार आणि प्रकार यावर त्यांची किंमत असते. खरेदी करतांना अर्थात बिंधास्त भाव करायला हवा...अगदी त्या मावशीनं भली
मोठी दहा पापलेटं तीन हजाराला सांगितली तरी तुम्ही थेट पाचशे रुपयांपासून बोली
लावली तरी चालते. ती मावशी रागवत
नाही...मग थोडी घासाघीस....फार तर सातशे ते आठशे रुपयांपर्यंत आपल्याला पसंत
असलेला माश्यांचा वाटा मिळतो. बोटी किती
आल्यात आणि त्यात काय मासे आहेत, यावर हे भावाचं गणित अवलंबून असतं. काहीवेळा ठराविक मासा जास्त असतो, मग त्याची
किंमत कमी...पण पापलेट, सुरमई हे मासे जेव्हा जावं तेव्हा तो-यात असतात....त्यांची
किंमत
फार कमी होत नाही. अर्थात या दरात आणि आपल्या शहरातील दरात खूपच फरक असतो. असो,
घासाघीस फार करावी लागत नाही. कारण
आपण खूप कमी किंमत केली तर ही मासेवाली मावशी सरळ जा...नाही होणार सांगून मोकळी
होते. आवाक्यात असेल तर मग थोडी किंमत
वर-खाली करण्याची तिची तयारी असते.
त्यातही गम्मत असते. तिथे टोपल्या
भरुन मासे विकणा-याही असतात. आपल्याला
किती घ्यायचंय यावर हे अवलंबून असतं. कारण
टोपलीभर मासे विकणारी मावशी अख्या टोपलीची बोली करते. तिला तुम्ही 100 रुपयांचे दे...200 रुपयांचे
दे...असं सांगितलंत तर ती तुमच्याकडे बघतही नाही. असो, घासाघीस करुन आपल्याला
आवडलेली सुरमई किंवा पापलेटचा वाटा आपल्या पिशवीत यायला आणि एका नवीन मावशीनं
त्यावर झडप घालायला एकच वेळ होते. आपली बोली ठरली की मधूनच कोणी अन्य मावशी येऊन
थेट तुमच्या माश्यांचा ताबाच घेते. नवीन
असाल तर बावचळायला होतं. माझंही
पहिल्यांदा असंच झालं होतं. कारण मी
घेतलेली सुरमई माझ्या मासेवाल्या मावशीकडून या दुस-या मावशीनं थेट खेचूनच घेतली. बरं, तिथे एवढा कल्ला असतो की विचारु नका. कितीतरी गर्दी येथे असते. कधीकधी आपल्यासोबत असलेले सुद्धा गायब झाले तर शोधायला मुश्किल येते. अशावेळी कोणीतरी आपले मासे स्वतः घेऊन जायला लागलं की तारांबळ होते. मग घाईघाईनं एकानं पैसे द्यायचे, आणि दुस-यानं त्या नव्या मावशीच्या मागे जायचं...मग कळतं की ही नवीन मावशी आपल्या माश्यांना साफ करुन देते. बरं या मावशीची नजर एवढी तेज असते की येवढ्या गोंधळातही ती तुम्हाला शोधून काढतेच. एकदा का तिने तुमचे मासे साफ करुन कापायला घेतले की तुम्ही तिच्याशी बांधिल झालात. मी, सुरमई, पापलेट, कोलंबी, बोंबील असे मासे वेगवेगळ्या मासेवाल्यांकडून घेतले. पण प्रत्येकवेळी ही मासे साफ करुन देणारी मावशी आमच्या आधी हजर असल्यासारखी त्या माश्यांचा ताबा घ्यायची.
सगळे मासे साफ करुन झाले की तिथेच बर्फ विक्रेते बसलेले असतात. त्यांच्याकडून बर्फ घ्यायचा. मग माश्यांची घरी
जाईपर्यंत काळजी मिटली. अर्थात कितीही
मासे घेतले तरी समाधान होत नाही. मी नेहमी
सर्व खरेदी झाली तरी पुन्हा एक फेरी मारतेच.
तेवढंच डोळ्यांचं समाधान....तेव्हाच पुढच्या वेळेचं गणितही मांडलं जातं.
हा बाजार पहाटेपासून गजबजलेला असतो.
माश्याचा बाजार असल्याने सर्वत्र
मासळीबाजारातला ठराविक वास भरलेला
असतो. शिवाय विक्रेते आणि ग्राहकांची
गर्दी...मासे भरलेल्या टोपल्या वाहणारे कोळी बांधव...त्यातून पडणारे पाणी...आपल्या
समोरुन अगदी ओढून नेले जाणारे मोठे मासे...ढिगाने पडलेली कोलंबी...आणि त्याच्याच
बाजुला तेवढाच मोठा कोलंबींच्या सालांचा ढीग...त्यातच अगदी आपल्या चाक लागेल की
काय, इतक्या जवळून जाणा-या माशांच्या हातगाड्या... आरडाओरडा...असे संमिश्र वातावरण
इथं असतं. त्यामुळे कोणाला स्वच्छतेचा फार
बाऊ असेल तर जाऊच नये...शिवाय...हे हायजेनीक आहे का....मासे ताजे आहेत का....असले
फालतू प्रश्न विचारण्यांनी तर जाऊच नये....
मासे खरेदी झाली की फार रेंगाळत न रहाता आपलं ठिकाण गाठावं. याच नियमाने आम्हीही परत फिरलो. पुन्हा भायखाळा स्टेशन...शनिवार असल्याने फार
गर्दी नव्हती. डोंबिवली गाठेपर्यंत
सव्वाआठ झालेले. पंधरा मिनिटात घरी. घरी लेक खूष....एरवी नाष्ट्याला पोहे खातांना
रडारड...पण त्यादिवशी निमूट खाल्ले...सर्व मासे साफ करुन डीप फ्रिजमध्ये गेले. दुपारी छान बेत झाला आणि सोबत दुस-या दिवशीच्या
जेवणाचा मेनूही ठरला.

सई बने
डोंबिवली
-----------------------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
ReplyDeleteFishers are really hardworking people nice job you did here telling their struggle story.