घरचा मेंबर...


घरचा
मेंबर...

तुळशीविवाहानंतर लग्नांचा मौसम सुरु होतो.  तसा झालाही आहे.  याच मौसमात आमच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या मुलाचं लग्न आहे.  लग्न म्हटलं की पत्रिका आलीच.  लग्न अगदी पंधरा दिवसावर आलेलं.  त्यातच मुलगा अमेरिकेत रहाणारा...त्यामुळे अगदी महिन्याभरात लग्न ठरलं...आता मुलाच्या अनुपस्थित सगळी तयारी करायची होती.  एकूण काय यामुळे या  नातेवाईकांना पत्रिका वाटण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता.  त्यामुळे प्रत्येक भागात रहाणा-या नातेवाईक आणि मित्रमंडळींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली.  तुझ्याकडे गाडी आहे, लेक क्लासला गेला की तूही जरा पत्रिका वाट....असा फोन मलाही आला...आणि कुरिअरने पत्रिकाही.  मग काय पडत्या फोनची आज्ञा मानून मी पत्रिका वाटण्याचा मोहीमेवर निघाले.  या पत्रिका वाटण्याच्या पहिल्याच मुक्कामी मला प्राणीमित्र भेटले....आणि हे प्राणीमित्र खरोखर प्राणीमित्र असतात...की फक्त आव आणतात हा प्रश्नही पडला.
 
साधारण अकरा वाजता घराबाहेर पडले.. आमच्या शहराच्या एका टोकाला असलेल्या भागापासून पत्रिका वाटण्याचा कार्यक्रम सुरु करुया, असा बेत केला.  आमचे एक नातेवाईक या भागात मोठ्या बंगल्यात रहातात.  त्यांच्याकडे फार येणेजाणे होत नाही.  मी तर पाच ते सहा वर्षांनी त्यांच्याकडे जात होते.  बंगल्याजवळ गेले तर कुत्र्यापासून सावधान अशी मोठी पाटी लावलेली....मी ती पाटी वाचून थांबले...बाहेर बघितलं तर बंगल्याच्या गेटवर बेल नव्हती.  आली का पंचाईत म्हणून इकडे-तिकडे आशेने बघू लागले.  पण कोणीच बाहेर दिसले नाही.  शेवटी मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली.  दोन-तीन वेळा हाका मारल्यावर एका माणसाने दरवाजा उघडला...कोण पाहिजे...आपण कोण अशी चौकशी  केली आणि तो आत गेला...काही मिनीटात आमचे नातेवाईक बाहेर आले.  माझी ओळख त्यांना पटली.  आम्ही जवळपास पाच वर्षांनी भेटत होतो...त्यामुळे त्यांनाही मला पटकन ओळखता आले नाही....ओळख पटल्यावर त्यांनी मोकळेपणाने स्वागत केले.  घरात ये...बाहेर का थांबलीस म्हटल्यावर मी त्या सावधान लिहिलेल्या पाटीकडे बोट दाखवले....त्यावर त्यांनी हसून सांगितले...अग आमचा थॉर तसा शांत आहे, ये तू...काही नाही करणार....बापरे काय क्लासीक नाव...थॉर...मी मनात घाबरले होते.  कारण तो थॉर नावाचा कुत्रा कधी बांधत नाहीत...कारण त्याला बांधलेले आवडत नाही...हे मला पहिल्या मिनीटात, म्हणजे त्यांच्या बंगल्यात पहिले पाऊल टाकल्या टाकल्या कळले.....
थो़डी दबकतच मी त्या बंगल्यात गेले...इकडे तिकडे पहात कोचावर बसले....त्या काकींनी मला काही घाबरु नकोस, थॉर लगेच माणसं ओळखतो...असं सांगून मला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.  पण जिथे या काकूंनी मला ओळखायला थोडा वेळ घेतला होता, तिथे हे थॉर महाशय पहिल्यांदा भेटल्यावर कसे काय ओळखणार हा प्रश्न मला पडला...अर्थात तो बोलून दाखवण्याचे धाडस माझ्यात नव्हते.  पत्रिका द्यायची आणि लगेच बाहेर पडायचं...हे ठरवून मी पत्रिका असलेल्या पिशवीतून त्यांची पत्रिका शोधायला लागले.  त्यांना माझा येण्याचा उद्देश सांगितला आणि पत्रिका हातात ठेवली....तितक्यात तो थॉर आलाच...दारावर लावलेल्या पाटीवर अल्सेशियन जातीच्या कुत्र्याचा फोटो होता.  हा मात्र वेगळा होता. 
बहुधा लॅब्रेडोर...एकदम जाडा-जाडा...थॉर थेट माझ्या पायाजवळच येऊन उभा राहिला....मी अजून अखडून गेले.  काकूंच्या हे लक्षात आलं...त्यांनी मला काहीही करणार नाही म्हणून निट बसायला सांगितलं...त्या सांगत होत्या, थॉर त्यांच्या घरातल्या सारखाच आहे.  सर्व समजतं त्याला.  त्यांच्या घरातला एक मेंबरच झालाय तो....वगैरे वगैरे...मला थॉरची बरीच माहिती मिळाली.   मी दिलेली पत्रिका बाजुला ठेवली होती.  आता थॉर राजे माझ्या जवळपास पायावरच बसले होते...माझं मात्र हातात असलेल्या कॉफीकडेही लक्ष नव्हतं...सर्व थॉरची महती चालू होती...काही वेळानं काकूंनी त्यांच्या ड्रायव्हरला हाक मारली आणि थॉरला बाहेर घेऊन जायला सांगितले...तेव्हा कुठे मला हायसं वाटलं...आता शी..सू...करुन आला की त्याचा चार तास काही त्रास नाही बघ...म्हणून काकूंनी थॉरची नवीन माहिती पुरवली...दहा मिनीटात होणारं माझं काम या थॉरच्या गोष्टी ऐकतांना तासभर झालेला होता...त्याच्यापाठोपाठ मीसुद्धा काकूंचा निरोप घेऊन बाहेर पडले...बाहेर घरच्या मेंबरसारखा असलेला थॉर दिसला...कोणाच्या तरी गाडीमागे जाऊन सू...शी...करत होता...माझ्या मनात सहज प्रश्न आला, घरच्या सारखा आहे ना, मग त्याला सू..शी...घरी करायला काय झालं...अर्थात आपल्याकडे तरी या प्रश्नाला काही उत्तर असेल याची खात्री नाही.
मध्यंतरी परदेशातून आलेली मंडळी आमच्याकडे पाहुणचाराला होती.  त्यांनी त्यांच्याकडे प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत छान माहिती सांगितली.  ही मंडळी रहायला असतांना आम्ही किमान दोनवेळा तरी मॉर्निंग वॉकला गेलो होतो.  तेव्हा अनेक मंडळी त्यांच्या कुत्र्यांसह फिरायला आली होती.  मुळात फिरायला येणे हा या मंडळींचा उद्देश नव्हता, तर त्यांच्या कुत्र्यांचे सू...शी...उरकायचे होते.   आपल्याला हा प्रकार नेहमीचा...बहुधा त्यात आक्षेप घेण्यासारखे काही आहे, हे आपल्याला जाणवतच नाही.  पण माझ्यासोबत असलेल्या या परदेशी पाहुण्यांनी मला त्याबाबत प्रश्न विचारला होता.  त्यांच्याकडे या संदर्भात कडक नियम आहेत.  पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक जागी अशी घाण केली तर ती साफ करायची जबाबदारी त्याच्या मालकाची असते.  बहुधा या प्राण्यांचे पालक बाहेर निघतांना आवश्यक ती काळजी घेतात.  आणि चुकून त्यांच्या पाळीव प्राण्यांनी बाहेर शी केली तर ती साफ करायची जबाबदारीही ही मंडळी घेतात...शिवाय पाळीव प्राणी पाळल्यावर त्यांचा आवाज फार झाल्यास शेजारचा त्याबाबत तक्रारही करु शकतो.  आपल्याकडे याबाबत काही नियम नाही आहेत का, या त्यांच्या प्रश्नावर मी पुरती निरुत्तर होते. 
लेक शाळेत असतांना सकाळची खूप घाई असायची...शाळेची बस पकडायला निघालं की नेमका असाच एका प्राणीमित्रांचा कुत्रा आमच्या सोसायटीच्या गेटसमोरच शी करायचा...गेटबाहेर पडतांना त्यावर पाय पडण्याची शक्यता असायची...त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मालकीणीला मी फक्त कुत्र्याला जरा बाजुला धरा...आमच्या गेटसमोर कशाला घाण करतो...असं म्हटल्यावर त्यांना केवढा राग आला होता...कुत्रा आहे तो..त्याला काय समजतं...असं उत्तर मिळालं...अर्थात त्याला नाही कळत...पण तुम्हाला कळतं ना...मग तुम्ही निट सांभाळा त्याला...असं उत्तर देऊन मी बस पकडायला गेले.   आता या घटनेला चार-पाच वर्ष झाली असतील...अजूनही त्या बाई आपल्या कुत्र्यासह सकाळी फेरफटका मारतात.  आता त्यांनी नवीन कुत्रा घेतला आहे.  त्यांची त्या खूप काळजी घेतात आणि त्यांचे शी...सू...अर्थातच बाहेर मोकळ्या जागेत होते, हे सांगायला नकोच.
 
आमच्या घरच्यासारखाच आहे...या लेबलखाली आज अनेकजण घरात कुत्रा किंवा मांजर पाळतात...पण या घरच्या मेंबरच्या स्वच्छतेचा प्रश्न आला की बाहेर पाठवण्यात येतं...का...तो घरच्या सारखा आहे ना...मग त्याला त्याचे प्रशिक्षण दिले तर काय बिघडणार आहे...पण हा मुद्दा फार कमी जणांच्या लक्षात येतो.  अलिकडे मुंबई-पुण्यात काही मोठ्या सोसायट्यांमध्ये याबाबत कडक नियम केले आहेत.  पाळीवप्राण्यांनी सोसायटीच्या आवारात घाण केली तर ती जागा साफ करायची जबाबदारी त्याच्या मालकावर येते.  पण हे काही ठराविक ठिकाणीच आहे.  अर्थात किती नियम करणार आणि किती कसोशीने ते पाळणार....आपण आपले सुधारणार कधी...आणि स्वच्छतेचे नियम मनाने स्विकारणार कधी हाच प्रश्न आहे.....

सई बने
डोंबिवली
-----------------------------------------------------------------------------
       ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

  1. Replies
    1. आदरणीय सई जी
      आपल्या लिखानातला मतितार्थी जनमानसाने ध्यानात घ्यायला हवा
      ह्यात स्वछ्यतेचा संदेश अपन सुंदर मांडलेला आहे

      Delete
  2. Nice subject regarding social aspect

    ReplyDelete

Post a Comment