रंगात रंगला वेद


रंगा
रंला
वेद

काही वर्षापूर्वी ठाण्यात, गांवकरी या वृत्तपत्रात काम करतांना अनेक मान्यवरांचा परिचय झाला.  बातमी देण्यासाठी अनेकजण कार्यालयात यायचे.  पण एक माणूस असा होता की, जो बातमी देण्यासाठी यायचाच पण बातमी आल्यावर धन्यवाद म्हणायलाही यायचा.  हे गृहस्थ म्हणजे वेद कट्टी.  रांगोळी, वारली पेन्टींग यांची शिबीरं ते आयोजीत करायचे.  मी त्यांना एक कलाकार म्हणून ओळखायचे.  बातमीच्या माध्यमातून ओळख झाली.  त्यांच्या आग्रहाखातर एकदा त्यांनी आयोजीत केलेल्या वारली चित्रकलेच्या शिबिराला गेले.  ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्याच्या आदिवासी बांधवांची ही कला.  वेद ही कला शिकवण्यासाठी या तालुक्यातील काही आदिवासी कलाकारांना बोलवायचे.  ही मंडळी मग शहरातील मुलांना, महिलांना वारली चित्रकला शिकवायची.  या शिबिरातून झालेला सर्व फायदा या आदिवासींना दिला जायचा.  वेद यांच्या माध्यमातून वारली चित्रकलेचा आणि माझा परिचय झाला.  त्यांनी दिलेली शिकवण इतकी पक्की की मी माझ्या घराच्या भिंती या वारली चित्रांनी भरुन टाकल्या....पुढे काही वर्षांनी गांवकरी समुहातून बाहेर पडले...आणि ही सर्व मंडळी दुरावली...

मात्र नंतर फेसबूक आणि अलिकडे वॉर्टस्अपच्या माध्यामातून या दुरावलेल्या मंडळींबरोबर पुन्हा संवाद सुरु झाला.  यात पहिला संपर्क झाला तो वेद यांचाच...त्यांनी स्वतःहून संपर्क केला.  मला खूप आनंद झाला.  कारण त्यांनी मला शिकवलेल्या वारली चित्रकलेचा वापर मी थेट घराच्या भिंतीवर केला.  शिवाय अनेक भेटवस्तूंवरही ही चित्रकला साकारली.  त्याचे कायम कौतूक व्हायचे.  या सर्वांमध्ये वेद यांनी दिलेले धडे कायम आठवायचे...त्यामुळे पुन्हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले गेल्याने समाधान वाटले.  या सर्वांत किमान दहा वर्षाचा काळ गेला असेल...मला उत्सुकता होती ती आता वेद यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाची...त्यांची रांगोळी बाबतची आत्मियता कशी आहे याची....
वेद यांची भेट झाली आणि त्यांची रांगोळी या कलेमागची असलेली आत्मियता प्रत्यक्ष पाहता आली.  येवढ्या वर्षानंतर भेटल्यावर जाणवले की, या कलाकारने काळाबरोबर आपली कला पुढे नेली आहे.  नवे तंत्रज्ञान आणि रांगोळी यांची सांगड घातली आहे.  वेद खरंतर सायन्सचे विद्यार्थी...फिजीक्स, केमिस्ट्रीमध्ये रमणारे.  त्यांची पदवीही याच विषयांमधील.  या शिक्षणानुसार त्यांना नोकरीही त्याच क्षेत्रातील मिळाली.  मुळात वेद हे चित्रकार...रंगात रमणारे...त्यामुळे या साचेबद्ध नोकरीत त्यांना अडकल्यासारखे वाटले.  तरीही दोन वर्ष नोकरी केली.  नंतर चक्क दोन महिन्याचा ब्रेक घेतला.  काय करायचं...हा प्रश्न होता...पण त्याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते.  दोन महिन्याच्या सुट्टीच्या काळात एका मित्राने जाहीरात एजन्सीमध्ये काम करतो का असं विचारलं.  या क्षेत्राचा वेद यांना अनुभव नव्हता.  पण काहीतरी वेगळं होतं आणि त्यांच्या रंगाच्या प्रेमाला थोडातरी वाव मिळेल अशी आशा होती.  त्यामुळे जाहीरात एजन्सीमध्ये नोकरी सुरु केली.  इथे त्यांचं मन रमलं.  कारण ब्रशचा मनमुराद वापर करता आला.  कल्पना शक्तीला वाव मिळाला. 
आठ वर्ष नोकरी करुन मग वेद यांनी फोर्टला स्वतःची जाहीरात एजन्सी सुरु केली.  एकूण काय, तर आयुष्य चांगलं स्थिर स्थावर झालं होतं.  असं असल्यावर माणूस गप्प बसेल ना...पण नाही...वेद यांनी आपली चित्रकला आणि रांगोळी यांचा मेळ घातला आणि रांगोळीच्या प्रसारासाठी काम सुरु केले. 
ठाण्यात संस्कार भारतीच्या एका शिबीराला ते सहज म्हणून उपस्थित होते.  त्यावेळी त्यांना रांगोळी या कलेच्या ताकदीने भूरळ घातली.  संस्कार भारतीची रांगोळी शिकल्यावर त्यांनी त्याचा प्रसार करण्यासाठी अनेक शिबीरांचे आयोजन केले.  साधारण 1995 पासून वेद संस्कार भारतीबरोबर जोडले गेले.  पुढे त्यांनी या कलेचा शास्त्रीय अभ्यास केला.  रांगोळीची व्याप्ती कळली.  रांगोळीने फक्त सजावट होते असं नव्हे तर रांगोळी काढतांना मनाची एकाग्रताही वाढते.  त्यामुळे काही प्रमाणात निराशेवर मात करता येते हे वेद यांनी जाणले.  आणि त्यातूनच.  रंगवल्ली परिवाराची २००२ मध्ये स्थापना झाली.
वेद यांनी रांगोळी कलेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी रंगरसिक या संस्थेची स्थापना केली.  रांगोळी फक्त ठराविक सणांपूरती त्यांनी मर्यादीत ठेवली नाही.  ठाण्याच्या गजानन महाराज मठ आणि ज्ञानेश्वर मंदिरात वेद ठराविक दिवशी मोठ्या रांगोळ्या काढत.  काही दिवसांनी मंदिरात येणा-या भक्तांना या रांगोळ्यांची सवय झाली.  रांगोळी कोण काढतं याची चौकशी होऊ लागली.  त्यातून रांगोळी काढण्याचे शिक्षण देण्यासाठी शिबीर घेण्याची मागणी येऊ लागली.  वेद यांनी 2002 मध्ये पहिले शिबीर घेतले.  साधारण शंभर जणांनी त्यांच्याकडून रांगोळीचे तंत्र जाणून घेतले.  हे शिबीर संपल्यावर लगेच पुढच्या शिबीराची नोंदणी सुरु झाली.  तेव्हा वेद यांना जाणीव झाली ती लोकभावनेची.  अनेकांना रांगळीचे काढण्याचे तंत्र शिकायचे होते.  यातून वेद आणि आणखी एक पाऊल पुढे टाकले. २०‍१४ मध्ये त्यांनी रांगोळी प्रेमींना एकत्र करत
रंगरसिक ट्रस्टची स्थापना केली.
वेद वर्षातून किमान 25 बेसिक रांगोळी काढण्याची शिबीरं घेतात.  याशिवाय ते अॅडव्हान्स, कॅलिग्राफी, वॉलपेंटींग यासारख्या शिबीरांचे आयोजन करतात.  रांगोळी शिबीरात फक्त रांगोळी काढायची कला शिकवण्याबरोबर वेद यांनी अन्य दुर्लक्षित गोष्टीही शिकवल्या.  मुख्य म्हणजे मोठी रांगोळी काढायची असेल तर कमीतकमी दोन ते चार तास उभं रहावं लागतं.  ओणव्याने या रांगोळ्या काढाव्या लागतात.   ब-याचवेळा त्यानंतर कलाकारांची पाठ, गुडघे, मान दुखते.  यासाठी उभं राहण्याची योग्य पद्धत,  रांगोळी हातात कशी धरावी, रांगोळी काढतांना एका बाजुला कसे जावे, शुद्धलेखन, कुठे आणि कधी रांगोळी काढायची, जागेचा वापर, त्यानुसार रंगरचना आदी अनेक बाबी वेद त्यांच्या शिबीरात शिकवतात.  त्यामुळेच आत्तापर्यंत तब्बल अडोतीस हजाराच्यावर त्यांचे विद्यार्थी झाले आहेत.  बरं रांगोळी काढायला शिकवून वेद शांत रहात नाहीत.  आपल्या विद्यार्थ्यांना त्यातून काही आर्थिक मदत होईल याचीही काळजी घेतात.  ब-याच ठिकाणी रांगोळी काढणे, ही शुल्लक बाब मानली जात होती.  रांगोळीचे पैसे....म्हटलं की लोकं नाराजी व्यक्त करायचे.  पण वेद यांनी रांगोळी काढण्यामागचे कष्ट, रांगोळी काढण्यासाठी लागणा-या सामानाचे मुल्य याची जाणीव करुन दिली. त्यामुळे आज त्यांच्याकडचे कलाकार पाच-सहा हजार रुपयांची कमाई करतात. 

रांगोळी ही खरंतर आपली संस्कृती आहे.  अवघ्या भारत देशाच्या कानाकोप-यात रांगोळी काढली जाते.  तिची पूजा केली जाते.  ही आज-कालची नव्हे तर आपल्या पूराण कथांमधूनही रांगोळीचा उल्लेख आढळतो.  आपल्या देशाच्या प्रत्येक प्रांताची वेगळी रांगोळी आहे.  त्यामागे वेगवेगळी परंपरा आहे. कथा आहे. पण भावना एकच आहे...मांगल्याची...या अशा उज्ज्वल परंपरा असलेल्या कलेचा तेवढाच आब राखला पाहिजे.  रांगोळी रेखाटणा-या कलाकारांना तेवढाच  मान मिळाला पाहिजे यासाठी आज वेद झटत आहेत.  त्यांनी आज अनेक टूल्स विकसीत केले आहेत.  जेणेकरुन रांगोळी सहज, सोप्पी आणि अधिक आकर्षकरित्या काढता येईल.  तसेच कॅलिग्राफीचाही वापर रांगळीमध्ये सुरु केला आहे.  या दोन्हीही वेगवेगळ्या कला आहेत.  त्यांचा संगम केल्याने रांगोळी अधिक नयनरम्य होत आहे.  त्यांच्या रंगरसिक संस्थेत अनेक डॉक्टर्स, इंजिनीअर, प्रोफेसरही आहेत.  वेद यांच्या मते रांगोळी काढणे म्हणजे मनाच्या समृद्धीसाठी केलेला व्यायामच आहे.  रंगासारखेच माणसांचे स्वभाव असतात.  प्रत्येकाच्या स्वभावात एक वेगळी छटा असते.  रांगोळी काढली की रंगाच्या सर्व छटा एकत्र येतात.
तसंच माणसांचंही असतं असं वेद मानतात.  सध्या डीजीटल युग आहे.  आणि तेच वाढत्या मानसिक ताणाला कारणीभूत ठरत आहे.  मोबाईल, सोशल मिडीया यामुळे प्रत्येकजण आत्मकेंद्री झाल्यासारखा झाला आहे.  यातून बाहेर काढण्यासाठी रांगोळीसारखा पर्याय नाही असं वेद यांना वाटतं.  त्यामुळे त्यांच्यासंस्थेतर्फे रांगोळी या आपल्या कलेचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा प्रयत्न सरु आहे.  काही शाळांमधून ते रांगोळी काढण्याची कार्यशाळा घेतात.  हल्ली लहान मुलं मातीत खेळत नाहीत.  त्यामुळे स्पर्शातून जाणवणा-या मातीच्या संवेदनाच नाहीशा होत आहेत.  अशावेळी रांगोळीचा पर्याय म्हणून वापर केला तर या संवेदना जागृत होतील असा वेद यांना विश्वास आहे.  रांगोळीच्या ठिपक्यांच्या माध्यमातून माणसांना जोडण्याचा अनोखा प्रयत्न हा मनस्वी कलाकार करत आहे.  विशेष म्हणजे रांगोळी विक्रेत्यांनाही त्यांच्या या कलेनं मोठा आधार दिला आहे.  कारण काही वर्षापूर्वी जे विक्रेते रांगोळीचा खप नाही म्हणून विक्रीस रांगोळी ठेवत नसत तेही आता आवर्जून रांगोळी विक्रीसाठी ठेवतात.  
आतापर्यंत वेद आणि त्यांच्या साथीदारांनी अनेक भव्यदिव्य रांगोळ्या साकारल्या आहेत.  त्यात बोरीवली येथील पंचवीस हजार स्केअरफूटावर साकारलेली रांगोळी सर्वात मोठी ठरली आहे.  राज ठाकरे यांनीही वेद यांना भेटून त्यांच्या कलेचं कौतुक केलंय.  आपल्या देशाच्या प्रत्येक प्रांतात रांगोळी काढत असले तरी त्याची पद्धती वेगळी आहे.  नावं वेगळी आहेत. वेद यांना प्रत्येक प्रांताच्या रांगोळीची माहिती आहे.  रांगोळी ही आपली समृद्ध संस्कृती आहे. या संस्कृतीला जोपासण्यासाठी आणि भावी पिढीला तिचा परिचय करुन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. 
खरंतर रांगोळी म्हणजे महिलांचा हातखंडा...आणि आता तर फ्लॅट संस्कृतीमध्ये रांगोळी फक्त सण-समारंभापूरतीच मर्यादीत राहीली आहे.  पण परंपरा म्हणजे जे पूर्वापार चालत आलंय ते तसच्या तसंच स्विकारावं असं नसतं....परंपरा म्हणजे ज्यात काळानुसार बदल करत ती कला, संस्कृती अधिक समृद्ध करणं...आणि नव्या पिढीकडे हा समृद्ध वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी देणं....वेद कट्टी यांनी त्यांच्या कामातून हेच साध्य केलंय...रांगोळीच्या कलेला...परंपरेला त्यांनी अधिक समृद्ध, संपन्न केलंय....आणि भावी पिढीला या समृद्ध कलेच्या मोहात पाडलंय. 


सई बने
डोंबिवली
-----------------------------------------------------------------------------------------------------


ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

  1. अभिनंदन वेदजी कट्टी! यथायोग्य लेख!

    ReplyDelete
  2. Khup chan👍👌👏👏👏ved sir abhinandan

    ReplyDelete
  3. Abhinabdan👍👏👏👏👏👏

    ReplyDelete
  4. Shilpa such a beautiful article you wrote about Ved Katti. What he did is an amazing work putting talent at great use of social work.

    ReplyDelete
  5. Ved, tuzya kalela.. Varli painting, rangoli, calligraphy yala Tod nahi. Excellent.

    ReplyDelete
  6. thanks to Sai. she is wonderful blog writer.

    Ved

    ReplyDelete
  7. रंगाचं ved असलेले वेद सर.

    ReplyDelete
  8. Khup sunder lihalay...aani agadi yogya tech...thank u ved sir...aaj tumchyamule aamhi kahitari navin kala shiku shaklo...

    ReplyDelete
  9. Sai khup chaan lihile aahe. Tyanchi shikavanyachi method pan khup chaan aahe. Sir Thank you

    ReplyDelete
  10. Sir is truly a great personality in Rangoli art. The relentless efforts he has taken towards the development of we artists is beyond words. Salute to Sir and the blog writer .

    ReplyDelete

Post a Comment