वेलकम....घरी आल्या आल्या लेकाचे किंवा नव-याचे या वेलकम शब्दाने मी
जेव्हा स्वागत करते, तेव्हा दोघांचे चेहरे वाकडे होतात...का...असे विचाराल तर
वेलकम हा शब्द आमच्या घरात एक कोडवर्ड आहे.
वेलकम म्हणजेच घरात काढा केला आहे, याची खूण आहे. साधारण थंडी वाढली किंवा पावसाचा गारठा आला की सर्दी
खोकल्याची जाणीव होते आणि आपल्या सर्वांच्या घरात काढा करतात...तसाच आमच्याही घरात
होतो. आपला सर्वात फायदेशीर उपाय...हक्काचा
उपाय...पण हा काढा मुलाला प्यायला लावणं, म्हणजे मोठी कसरत...अशी बरीच कसरत करुन
झाल्यावर शेवटी मी त्याच्यासमोर काढा म्हणणं बंद केलं. नाव बदलायला काय जातंय...आणि नाव बदललं तरी गुण
थोडी कमी होणार आहेत, अशी माझी मी समजून करुन घेतली. काढ्याच्या ऐवजी वेलकम ड्रींक आहे, असं म्हणायला
सुरुवात केली. पण त्यांनी थोडाफार का
होईना फरक पडलाय. त्याबरोबर आपण कितीही टाळलं,
तरी आई काही सोडणार नाही, याची खात्री लेकाला झाली. त्यामुळे आता वेलकम ड्रींक असं म्हटल्यावर तो
म्हणतो, दे

त्याची ही सर्व नाटकं बघितली की मला नेहमी माझं बालपण आठवतं...माझी आई
तर या काढा संस्कृतीची राजदूतच...कुठले कुठले काढे ती करेल याचा नेम नाही...आणि
कधी करेल याचाही नेम नाही....बरं तिच्या या काढ्यांना तेव्हा नाही म्हणायची टाप नव्हती
आणि आताही नाही....रेवदंड्याला, आमच्या घराच्या आवारातच अनेक औषधी झाडं होती. तशी गावाला प्रत्यकेच्या वाडीत औषधी वनस्पती
असतात तशीच...चांगली थंडी पडली की मग हा काढ्याचा सोहळा व्हायचा...अंगणातील तुळस...मागच्या
दारात असलेले प्राजक्त...पिंपळ...यांची पानं...एखाद दुसरे बेलाचे पान...थोडी काळीमीरी...धणे....चवीसाठी
पातीचा चहा...आलं...असे आंधण मोठ्या पितळेच्या भांड्यात उकळायचे...घरभर त्या
काढ्याचा दरवळ सुटायचा...थंडीच्या दिवसात रात्री घराची दारं खिडक्या बंद झाल्यावर
हा काढ्याचा दरवळ घरात भरला की आम्ही समजून जायचो...साधारण संध्याकाळी किंवा
जेवणाच्या नंतर मग ग्लासभर काढा प्यायला मिळायचा...पिणार का...प्लीज पी...वगैर
मनधरणीचे शब्द कधीच नसायचे...आटपा लवकर...एवढं म्हटलं की तो ग्लासभर काढा संपवायलाच
लागायचा.
आता ही सगळी व्याख्याच बदललीय. साधी सर्दी झाली तरी अरे बापरे
म्हटलं
जातं. मग तुझं इनफेक्शन मला नको...माझं
तुला नको...अशी बोली सुरु होते. मुलांच्या
शाळा असतील, त्यातही भर म्हणजे परीक्षा सुरु असतील तर बघायलाच नको...सर्दी या शब्दाला आणि ज्याला सर्दी
झालीय त्याच्यावर कर्फ्यु लावला जातो...अर्थात आता आलेले नवीन नवीन तापाचे प्रकार
बघता अशी काळजी घेतली तरी वावगं वाटत नाही.
लहान असतांना अगदी नाक भरुन सर्दी झाली तरी कोणी मनावर घ्यायचं नाही. फारतर अजून एक ग्लासभर काढा दिला जायचा...जाईल
हळूहळू..एवढ्यावर आठवडा-पंधरा दिवस सर्दी असायचीच. काढ्याच्या सोबतीला हळद टाकून
छान उकळलेलं हळदीचं दूध यायचं...आणि जेष्टी मधाचे तुकडे चघळायला मिळायचे. पावसाळा..हिवाळा या ऋतूमध्ये सर्दी होणारच हे
गृहीत धरलेलं असायचं...त्यामुळे या सर्दीप्रकरणाला फार महत्त्व नसायचंच...सर्दी
झाली म्हणून शाळेला सुट्टी हा प्रकार तर नव्हताच.
सर्दीचं पुढचं पाऊल म्हणजे ताप...मग थोडा ताप आणि खोकला आला तर नेहमीच्या
काढ्यामध्ये अडूळश्याची पानं उकळवली जायची....हीच पानं आई डोक्यावर घालायची...मग आडूळश्याचा
काढा प्यायला मिळायचा. त्यानेही काही झालं नाही तरच डॉक्टर. गोरेगावकर डॉक्टरांकडे मग नेलं जायचं...गोरेपान...उंचपुरे...पिळदार मिश्यांचे गोरेगावकर डॉक्टर...त्यांना बघितलं की तो ताप की काय जायचा...आणि काही राहीला असेल तर तो त्यांच्याकडे मिळणा-या गुलाबी रंगाच्या, थोड्या जाडसर औषधाने पळून जायचा...त्याच्या सोबत हिरव्या, पिवळ्या, गुलाबी रंगाच्या औषधी गोळ्या...हा ताप तिथेच आराम करायला थांबायचा....शाळेला एक-दोन दिवस सुट्टी...बाकी पुन्हा सगळं निट...माझं इनफेक्शन तुला नको...तुझं मला नको....अशी काही भानगड नसायची...पण आता हे चित्र बदलंलंय...
आता सर्दी झाल्याची जाणीव झाल्यापासूनच कितीतरी
काळजी वाटायला लागते. शाळेत तर सूचना
असतात, मुलांना सर्दी झाली तर पाठवू नका...दुस-या मुलांना इन्फेक्शन होते...मग
इथपासूनच काळजी सुरु होते. नाही म्हणायला
काढे, चाटण असे प्रकार होतात...पण त्याच्यावर फार अवलंबून न रहाता थेट डॉक्टरचा मार्ग
धरावा लागतो. बरं डॉक्टरकडे गेल्यावर लगेच
आपला नंबर लागेल एवढे आपण सुदैवी कुठे...थंडी असो वा पाऊस डॉक्टरांचे दवाखाने बहर
आल्यासारखे फुलले असणार.
या बहरामध्ये
मध्येच घूसून आपला नंबर लावावा लागतो आणि एक-दीड तासांची प्रतीक्षा...बरं आपल्या
लहानपणीसारखं आता नाहीच...साथीही केवढ्या...त्यामुळे डॉक्टर पहिल्यापासून सर्व
तपासण्या करणार...आठवडाभर सर्दी आहे म्हटल्यावर तर काहीजण एक्सरेही काढायला सांगतात...मग
या सर्वातून बाहेर पडलं की भलीमोठी औषधांची यादी.
या सर्वांत लागणारा वेळ...होणारी धावपळ...सगळ्यांचा तापच खूप असतो. बरं हे सांभाळून परत घरचा दुसरा मेंबर याच
वाटेवर जाणार नाही ना, याचीही काळजी घ्यावी लागते. मुलांना सर्दी-ताप असेल तर शाळेलाही तेवढ्या
दिवस सांगून दांडी मारावी लागते. या
दरम्यान झालेला अभ्यास मिळतांना त्या आईची पुन्हा कसरत...त्यात ती कामाला जाणार
असेल तर तिलाही सुट्टी घ्यावी लागते. या सर्व
आघाड्या बघितल्या की सर्दी म्हटलं की नको रे बाबा म्हणण्याची वेळ येते.
अलिकडे फेसबूक आणि आपल्या वॉटस्अपबाबावर
सर्दीसाठी येणा-या काढ्यांच्या रेसिपींचा तर पूर आलेला असतो. काय काय टाकून हे काढे करण्यात येतात. सगळ्यांचा दावा एकच...हा काढा प्यायल्यावर
सर्दी लगेच गायब होणार...अर्थात यातील सर्व औषधी या आपल्या पारंपारिक असलेल्या
काढ्याच्या रेसिपीमधीलच असतात...त्याचा फायदाच होतो. पण माझ्या माहितीप्रमाणे काढ्याच्या एकाच कपात
सर्दी गायब होणे हा प्रकार नक्की होत नाही.
सर्दी ही वातावरण बदललं की होतेच.
आणि ती एकदा झाली की आपला छान पाहुणचार घेतल्याशिवाय जातच नाही, असा माझा
तरी अनुभव आहे. अजून एक गम्मत म्हणजे, सर्दीसाठी
तो हिरवा चहा...अर्थात
ग्रीन टी फायदेशीर असल्याचाही काहीजणांचा समज आहे. मला अलिकडेच एका मैत्रिणींनी या हिरव्या चहाची
ही नवी महती सांगितली. हिरवा चहा अर्थात
ग्रीन टी प्यायल्यावर सर्दी होत नाही. आणि
सर्दी झाल्यावर मध टाकलेला ग्रीन टी प्यायल्यावर सर्दी गायब होते. मला एकदा सर्दी झाली होती. त्या दरम्यान तिच्या घरी काही कामासाठी जावे
लागले. माझं गळणारं नाक बघून म्हणाली,
थांब, तुला मध घातलेला चांगला ग्रीन टी करुन देते. आता चहा प्यायल्या प्यायल्या सर्दी थांबेल
बघ....मुळात चहा या शब्दाबरोबर माझं कधी जमलच नाही...तर ते त्या पेयाबरोबर तर
नाहीच नाही...त्यामुळे तिची ही माझी झटपट सर्दी थांबवणारी ऑफर मी लगेच नाकारली
होती. गळणारं नाक चालेल पण चहा नको...मग
तो हिरवा असो वा पांढरा...कुठलाच नको...असं बाणेदार उत्तर मी तिला दिलं होतं.
एकूण काय सर्दी आणि त्यानिमित्ताने होणारे काढे
हा सुद्धा एक मोठा विषय असतो....
सई बने
डोंबिवली
--------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Comments
Post a Comment