माझा दादा


माझा
दादा

एखादा माणूस आपल्या नेहमी अवती भोवती असतो.  त्याचा आधार आपल्या सोबत कायम असतो.  शरीराने तो आपल्यासोबत सदैव नसेलही,  पण मनाने तो आपल्या सोबत असतो.  अगदी कधीही त्याला साधा फोन केला तरी तो किमान तासभर तरी तो आपल्याला वेळ देतो....मनमुराद बोलतो...आपले भरभरुन कौतुक करतो...आणि पुढच्या कामासाठी प्रेरणा देतो...अशा अनमोल व्यक्तींपैकी एक म्हणजे आमचा संजय दादा....संजय मुरलीधर बने....मुरलीधर बने माझे मोठे मामा...लोकसत्ता पेपरमध्ये ते कामाला होते.  त्यामुळे संजय दादा माझा मामेभाऊ....त्यातून चुलत वगैरे...पण दादाला हे वगैरे लागू होत नव्हतं...तो माझा मोठा आधार...कधीही,  काहीही लागलं तरी पहिला फोन दादाला...मग दादाही हवा तो संपर्क देणार आणि छानशा गप्पा मारणार...अगदी कालपरवा पर्यंत आमचं असं छान, साजीरं बोलणं सुरु होतं....पण आठ दिवसापूर्वी अचानक तो आमच्यातून गेला...कायमचा गेला...

खरंतर संजय दादाचं जाणं हे कधी अपेक्षीतच नव्हतं...तो असा कधी आजारी असल्यासारखा....किंवा वय झाल्यासारखा वागलाच नाही...नेहमी उत्साही...पॉझिटीव्ह एनर्जीनं भरलेला...त्यामुळेच सकाळी त्याच्या जाण्याचा वॉटसअपवर मेसेज आला तेव्हा मोठा धक्का बसला. आमच्या शैलेश दादाने मेसेज पाठवला होता.  काहीतरी मिस्टेक असेल, म्हणून मी त्याला फोन केला...हा आपला संजय दादाच आहे का...कसं शक्य आहे...तोही बळेबळेच हो म्हणाला...पुन्हा एकदा धक्का...पण मनाची खात्री होत नव्हती...म्हणून परत त्याला फोन करुन खात्री करुन घेतली...आणि ही वाईट बातमी खरी निघाली.
संजय दादा आणि माझा परिचय कधी झाला हे आठवत नाही.  संजय आणि अजय बने ही दोन नावं मराठी चित्रपट आणि मालिकांच्या पब्लिसीटी क्षेत्रातील मोठी नावं...आम्ही घरगुती समारंभात भेटायचो.  त्या दोघांचे कितीतरी कौतुक वाटायचे.  मी नुकतीच गांवकरी मधून पत्रकारितेची सुरुवात केली होती...अगदी वीस वर्षापूर्वीची ही गोष्ट...या दोघा भावांना त्याचं खूप कौतुक होतं...पुढे अजय दादा अचानक गेला. तोही मोठा धक्का होता.  संजय दादा घरगुती समारंभात कायम असायचा.  त्याच्याबद्दल पहिल्यांदा आदरयुक्त भीती वाटायची.  एवढा मोठा माणूस आपला भाऊ आहे, ही भावना सुखद असायची.  पण बोलतांना मात्र संकोच वाटायचा.  पण जसजसं त्याच्याबरोबर परिचय वाढला तसं कळायला लागलं की, संजय बने म्हणजे एक मॅग्नेट आहे.  त्यांच्या जरासं जवळ गेलं की त्यांच्या गोतावळ्यात आपण कधी ओढले जातो हे समजायचंच नाही.  माझंही तसं झालं.  दादाबद्दलची भीती गायब झाली.  आदर आणि आधाराची भावना वाढली. 

कोणत्याही गोष्टीचं भरभरुन कौतुक करावं ते त्यानेच....पब्लिसीटीच्या कामासाठी हा कायम दौ-यावर...यात मध्येच कोणीतरी त्याला ओळखीचा भेटायचा....माझं आणि त्याचं नातं विचारायचा...मग माझी धाकटी बहिण म्हणून हा अभिमानानं सांगायचा...आणि त्याच अभिमानाने मला फोन करायचा...या गावाला आलोय...अमूक-तमूक भेटला होता...तुला विचारत होता...तुझं कौतुक केलं...मग मीही भाव खाल्ला...हो तर माझी बहिण आहे धाकटी असं सांगितलं बरं...हे सांगतांना त्याचा आनंदी स्वर सुखवून जायचा.  खरंतर दादा या क्षेत्रातला खूप मोठा...पण आपल्या या मोठेपणाचा त्याने कधी बाऊ केला नाही.  आपल्या धाकट्या बहिणीचं कोणी साधं नाव जरी विचारलं तरी त्याला आनंद व्हायचा...बरं हे लगेच मला फोन करुन सांगायची गरज नसायचीच...पण माणसं जपण्याचं वेड काही जणांना असतं.  त्यापैकी संजय दादा एक होता.  त्यामुळे कोणी असं नाव जरी घेतलं तरी ते सांगण्यासाठी तो फोन करायचा...वॉटस्अप वगैरे नाही...हे सांगतांना त्याला कोण अभिमान वाटायचा...मग तासभर गप्पा मारायचा...मी कशी आहे...छोकरा कसा आहे....नवरा कसा आहे...या सर्वांची चौकशी व्हायची...मग बरं वाटतं फोन केला की...बोलता येतं ग...असं म्हणत हळवा व्हायचा....
आता तो नसतांना मागे वळून जेव्हा बघते तेव्हा जाणवतं,  त्याला अनेकदा गरजेला फोन करायचे.  कोणाचा नंबर हवा आहे, अशावेळी मदत कोण करणार तर संजय दादा...त्याला फोन करतांना वेळ बघायची नाही.  तोही खूप कामात असेल...अगदी मिटींग मध्ये असेल तरीही त्याने फोन टाळला नाही.  कितीही धावपळीत असला तरी फोन उचलणार...अग जरा बाहेर आहे...मोकळा झालो की लगेच करतो...अशी दोन वाक्य आणि बरी आहेस ना...हे मायेचे शब्द ठरलेले...पण अर्जंट काम आहे का...असेल तर लगेच बोलूया...असंही विचारणं असायचं...मग नंतर बोलू, सॉरी म्हणत मी फोन ठेवायचे...त्यातही सॉरी बोललं तरी तो ओरडायचा.  मग त्याने सावकाश फोन केला की हवा तो नंबर त्याच्याकडून मागून घ्यायचा....मग तास-दीडतास फोनवरुन गप्पा....कोणाचा फोन नंबर दिला तर त्याचं त्यावर समाधन कधी झालं नाही....काही वेळानं हा पुन्हा फोन करुन विचारणार....झालं का तुझं काम....दुसरं कोण हवं असेल तर सांग लगेच देतो नंबर...अग दादा आहे तुझा...त्या माणसाला बिनधास्त सांग संजय बनेची धाकटी बहिण आहे म्हणून...हे असे आधाराचे शब्द....

पब्लिसीटीच्या कामासाठी दादाची नेहमीची धावपळ असायची.  पण या सर्वातही त्याने नातेसंबंध जपले.  कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे आमंत्रण त्याला दिले आणि तो आला नाही असे कधी झाले नाही.  अशा कार्यक्रमात तो दिसला की खूप समाधान व्हायचे.  माझा ब्लॉग सुरु झाला तेव्हा कुटुंबातील कोणी पहिल्यांदा फोन करुन कौतुक केले असेल तर तो संजय दादा पहिला होता.  वॉटस्अपवर हाय हॅल्लो त्याने कधी म्हटलं नाही...त्याला बोलायला आवडायचे...मग कधी लिखाणावर, कुठल्या घटनेवर तासभर गप्पा झाल्या की त्याचे समाधान व्हायचे...
असा माझा हक्काचा भाऊ गेल्याचं दुःख कधीच शब्दात व्यक्त करता येणार नाही.  संजय दादाचे जे मानाचे स्थान माझ्या आयुष्यात आहे, ते कधीही पुसता येणार नाही.  दुस-याचे कौतुक करुन त्याला पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देण्याची दिलदार   वृत्ती त्याची.  कुठेही दिखावूपणा नाही की नातेवाईक म्हणून कृत्रिम बंध नाही...त्याचा हा स्वभाव कायम स्मरणात राहणारा आहे. 
दादा कायम हसत्या चेह-याचा मी पाहिला आहे.  अशा माझ्या भावाला त्या हॉस्पिटलच्या पांढ-या चादरीत लपटलेल्या अवस्थेत बघणं कितीतरी वेदनादाई होतं.  पण त्यानंतर तो दिसणारच नव्हता...म्हणून त्या चेह-याकडे बघण्याचा प्रयत्न केला.  त्याच्या अंतिम यात्रेची तयारी होत असतांना कोणीतरी विचारलं, संजयचं वय काय होतं हो...काय माहित...आम्ही एकमेकांकडे बघत राहीलो.  दादाचं वय कधीच कळलं नाही.  तो कायम उत्साही असायचा.  बरं त्याचे प्रत्येक वयातील व्यक्तींबरोबर जमायचे...कधी बोलतांना त्याने त्याच्या वयाच्या मोठेपणाचा किंवा व्यवसायातील मोठेपणाचा तोरा मिरवला नाही . म्हणूनच दादाचं वय जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही.  तो जेव्हा जेव्हा भेटला आणि ज्याला ज्याला भेटला त्याला तो त्याच्यासारखा आणि त्याच्याच वयाचा भासला...दिलदार...रुबाबदार....
हे लिहितांनाही डोळे भरुन येतात...काय मस्त लिहिलंस ग...तु छानच लिहितेस...अशा शब्दातील त्याची भरभरुन दाद आता कधी मिळणार नाही...या जाणीवेबरोबरच आता आपल्याला नेहमी प्रेरणा देणारा दादा हरवून गेलाय ही भावना खूप क्लेशकारक ठरतेय. 


सई बने
डोंबिवली

------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

  1. भावना मनापासून व्यक्त केल्या आहेस. त्यामुळे भावल्या.

    ReplyDelete
  2. दादाना त्रिवार नमस्कार

    ReplyDelete
  3. मार्मिक लेखन...रमेश भाई कडून कळलं होतं..पण अशी व्यक्ती आपल्यातून गेली..हे तुझ्या लेखातून तिव्रतेने जाणवलं..माझी भावपूर्ण श्रद्धांजली..

    ReplyDelete
  4. आत्या तुम्ही खरंच खुप छान प्रतिक्रिया ह्या लेखनातून दर्शविली आहे, आणि एक एक शब्दामध्ये त्याची आठवण आहे, खुप छान 😢😢

    ReplyDelete
    Replies
    1. दादाची आठवण ही कायम रहाणार....

      Delete
  5. अजून हि विश्वास बसत नाहीय कि दादा आपल्यात नाहीय😢

    ReplyDelete
  6. हो...ना...संजयदादासारखा साधा आणि सच्चा माणूस पहाण्यात नाही.

    ReplyDelete
  7. सर्वप्रथम संजय दादाला भावपूर्ण श्रद्धांजली शिल्पा तुझी तुझ्या कुटुंबियांशी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे परंतु तू डगमगून न जाता संजय दादाच्या विचार आचार लक्षात ठेवून आयुष्यच मार्गक्रमण कर पुन्हा एकदा माझ्या कुटुंबियांच्या वतीने संजय दादाला भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete

Post a Comment