निमित्ताने...
टीव्हीवरील मालिका अनेक घरांमध्ये अगदी वेळ लावून बघितल्या
जातात. पण आमच्याकडे या रोजच्या मालिका
फार हौसेने बघितल्या जात नाहीत. मालिका
कितीही लोकप्रिय असली, अगदी टीआरपी टॉपवर
असेल तरी रोज मालिका बघणे शक्य होत नाही. लेकाला
डिक्सव्हरी, हिस्टरी, नॅशनल जिओग्राफी...आदी वर्गातील चॅनेलबद्दल आणि त्यावरील शोबद्दल कायमची ओढ. त्यात भरीसभर म्हणून स्पोर्ट चॅनेल... या
चॅनलवरील काही कार्यक्रमासाठी तो टायमर लावतो आणि बघतो. अलिकडे अभ्यासाचा वाढता जोर म्हणून त्याने
स्वतःच्या टीव्ही बघण्यावर बंधन घातले.
अभ्यासाच्या ब्रेकमध्ये, अगदी दहा मिनीटामध्ये या सर्वांचा तो धावता आढावा घेतो,
आणि रिमोट मोकळा होतो. मग चाळा म्हणून मी
असाच धावता आढावा आपल्या नेहमीच्या चॅनलवरील मालिकांचा घेते. त्यामुळे कुठलीही मालिका पू्र्ण बघणे
नाहीच. तरीही या अशा धावत्या फेरीमध्ये
एका मालिकेने माझी उत्सुकता चाळावली. त्या
मालिकेच्या वेळेवर रिमोटवर हात स्थिर व्हायला लागला. आणि बघता बघता मी, मुलगा आणि नवरा, आम्ही
तिघंही या मालिकेच्या प्रेमात पडलो. ती
मालिका म्हणजे स्वामिनी....
स्वामिनी मालिका रमा आणि माधवराव पेशवे यांच्यावर आहे. आतापर्यंत माधवराव आणि रमाबाई यांच्यावर काही
मालिका येऊन गेल्या...तसेच चित्रपटही झालेत.
माधवराव, पेशवे म्हणून उदयाला आले तो काळ अतिशय प्रतिकूल होता. पानिपतच्या लढाईतील अपयशाचा काळा शिक्का
पेशव्यांच्या माथी होता. आर्थिक हानी
पुष्कळ झालेली. तेवढीच मनुष्यहानी. या सर्वांमुळे आलेली निराशा, वाढलेले घरगुती वाद, पेशव्यांच्या गादीसाठी
चाललेले राजकारण...आदी अनेक बाबींनी माधवराव पेशवे आणि रमाबाई यांचे सहजीवन वेढले
गेले होते. माधवराव, पेशवे म्हणून आपला
ठसा उमटविण्यासाठी आणि बिघडलेली आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी, गेलेली पत परत मिळवण्यासाठी
मोहींमांसध्ये व्यस्त होते. त्याचवेळी रमाबाई
पेशवीणबाई म्हणून झगडत होत्या. मुळात
पेशवे कुटुंबात सामावून घेण्यासाठी त्यांचा बराचसा वेळ गेला. गोपिकाबाईंसारखी सासू...आगीबरोबर मैत्री
करण्यासारखे होते ते. या सर्वातून त्या
स्थिरस्थावर होतात तोच माधवरावांचा बळावलेला अस्थमा...त्यांचे आजारपण...त्यांची
सुश्रुषा...मग त्यांना अंतिमक्षणातही सोबत करण्याचा निश्चय...आणि सतीजाण्याचा त्यांचा
निर्णय...या सर्वांमुळे माधवराव आणि रमाबाई यांच्या प्रेमकहाणीला अधुरी प्रेमकहाणी
असा शिक्का बसला. पण तरीही या दोघांनी मराठी माणसांच्या मनावर
कायम अधिराज्य केले आहे. त्यांचे सुख-दुःख
आता, एवढ्या वर्षांनीही प्रत्येकाला आपलेसे वाटते. त्यामुळेच आता कलर्सवर सुरु असलेली मालिका
पसंतीस पडत आहे.
मला या मालिकेतील आणखी एक भाग खूप आवडला. तो म्हणजे,
यात
अनेक पदार्थांची नव्याने ओळख करुन दिली आहे. आपले अस्सल मराठमोळे पदार्थ इतिहासजमा
झाल्यासारखे झाले आहेत. त्यांची नावंही
नव्या पिढीला माहीत नाहीत...यात त्यांची कृती आणि चव माहीत असणं तर खूप दूर
झालं. स्वामिनी मालिकेनं हा धागा नेमका
पकडला आहे. आतापर्यंत झालेल्या भागांमध्ये
अनेक जुन्या आणि अमुल्य अशा पदार्थांची ओळख आणि कृतीही देण्यात आली आहे. आता हेच बघा ना, शिंगाड्याच्या पिठाचे
थालीपीठ... शेंगाड्याचे पीठ, शेंगदाण्याचे कूट, गुळ, मिठ, हिरवी मिरची आणि सोबतीला
लाल भोपळ्याचा खिस...अगदी सहजपणे मालिकेमध्ये रमाबाई शिंगाड्याच्या पिठाच्या
थालीपीठाची कृती सांगतात...तसंच आवळ्याच्या चटण्या, मोग-याच्या फुलांचे सरबत या अनोख्या पदार्थांची
माहिती मिळते. हे पदार्थ करण्याची
पद्धतीही कळते आणि त्यातील औषधी गुणही. मग
हळूच मिरचीचे भरीत येते. भाजलेली मिरची
हातांनी चुरुन करण्यात येणारे हे भरीत भारीच लागतं. या भरीताचा ठसका कमी करण्यासाठी केळ्याचे शिकरण येतं. त्याचीही सोप्पी...सुटसुटीत कृती मालिकेत आहे. ज्वारीच्या पिठाच्या आंबिलाचंही तसंच...थंडीमध्ये या ज्वारीच्या पिठाच्या अंबिलासारखा पौष्टीक पदार्थ शोधून सापडणार नाही. सूप घेऊन डायट प्लान सांभाळणा-यांसाठी अस्सल मराठी आणि हमीचा पदार्थ म्हणजे ज्वारीचे आंबिल...पण दुर्दैवाने त्यांची जागा ब्रोकली सूप...मिक्सव्हेज सूप...आदींनी घेतली आहे. हे पदार्थ वाईट नाहीत...पण त्याही पेक्षा कितीतरी कमी खर्चात होणारे ज्वारीचे आंबिल आपण आज विसरुन गेलो आहोत....या मालिकेने पेशवाईचा सोनेरी काळ आपल्या समोर आणला आहेच...पण त्याबरोबर या इतिहासात हरवलेल्या पदार्थांनाही उजाळा दिला आहे. आठवड्यापूर्वी बघितलेल्या भागात पंचरंगी घावण हा एक पौष्टीक पदार्थ आला. मुळा, दही, आलं,
मिरची, काळे तिळ यांचा समावेश असलेला हा पदार्थ सुरेख लागतो. तिकडे मालिकेमध्ये रमाबाई या घावणाची कृती सांगत असतांना मी लिहूनही घेतली आणि दुस-या दिवशी करुनही बघितली. एरवी मुळ्याला नाक मुरडणा-या माझ्या लेकाला यात मुळा आहे हे कळलेही नाही. अगदी कालपरवा आजारी गोपिकाबाईंना देण्यासाठी बनवलेली कणेर ही भाताची पेजही अशीच सुरेख....ताप किंवा सर्दी झाली असेल तर आजारी माणसाला तरतरी आणण्यासाठी या कणेरसारखा दुसरा पदार्थ नाही.
आतापर्यंत झालेल्या स्वामिनी
मालिकेच्या भागांमध्ये अत्यंत चपखलरित्या पेशवाईची ओळख करुन देण्यात आली आहे. त्यामुळे मालिका लोकप्रिय ठरली आहे. त्यासोबत या पदार्थांची नव्याने ओळख करुन दिल्याने
त्यातील अभ्यासपूर्ण लेखनाचेही कौतुक करावेसे वाटते.
कल्पेश कुंभार यांना याचे पू्र्ण श्रेय जाते.
कल्पेश कुंभार यांना याचे पू्र्ण श्रेय जाते.
बरं अजून एक...या स्वामिनी मालिकेने मी माझ्या मनात दडवून ठेवलेल्या
हळूवार आठवणी पु्न्हा जाग्या झाल्या. माझे
आजोबा, सुंदर शेलार हे अभ्यासू व्यक्तीमत्व.
त्यांनी हजारो पुस्तकं जमवली होती.
अनेक जुने ग्रंथ आणि इतिहासावर आधारीत पुस्तके...खंड...असं बरचं काही होतं. इंग्रजी भाषेत त्यांची मास्टरी होती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचे
इंग्रजीत भाषांतर केले होते. मराठी
पुस्तकामध्येच प्रत्येक वाक्याच्या मध्ये
असलेल्या जागेमध्ये पेन्सींलच्या आधाराने
त्यांनी भाषांतर केले होते. दु्र्दैवाने
मला त्यांना बघता आले नाही. त्यांच्या
पुस्तकांचा अमुल्य ठेवा अगदी निसटत्यावेळी माझ्या हाती आला. तेव्हा केवळ साफसफाई करुन या पुस्तकांना
वाचनालयांच्या हाती सोपवणे एवढेच मी करु शकले.
मात्र त्यातही मी एक बॅग भरुन पुस्तके बाजुला ठेवली होती. त्यात पेशवाईचे एकवीस खंड होते. अगदी पेशवाई सुरु झाली तेव्हापासून ते
पेशवाईच्या अंतापर्यंत....त्यातील प्रत्येक व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यापर्यंतच्या
माहितीने हे खंड परिपूर्ण होते. माझ्या
जीवनातल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या पेशवाईच्या खंडांनी मला खूप साथ
दिली. झपाटल्यासारखे हे खंड किमान पाच ते
सहा वेळा वाचून काढले होते. आताही,
पंचवीस-तीस वर्षांनीहीत्यातील पेशवाईच्या पात्रांचा संवाद आठवतो. हा अमुल्य ठेवा कायम आपल्या सोबत असावा अशी इच्छा होती. पण जागेअभावी हे खंड मी धुळ्याच्या राजवाडे इतिहास संशोधन केंद्राकडे सोपवले. वाचनालयात राहीले तर इतरांनाही त्याचा लाभ होईल आणि त्यांची काळजी घेतली जाईल हा उद्देशही त्यामागे होता. तरीही कधीतरी या पुस्तकांची आठवण होते. त्यांच्यावर हात फिरवावासा वाटतो. पुन्हा ते खंड तसेच झपाटल्यासारखे वाचावेसे वाटतात...ही स्वामिनी मालिका बघतांना या खंडांना नुसतं बघण्याची ओढ पुन्हा जागी झाली. अर्थात आता एवढ्या वर्षानंतर ही पुस्तके असतील का हा प्रश्नही पडतो. असो...तरुणवयात वाचलेली ही पेशवाई मोठी आधाराची झाली होती हे मात्र नक्की....
एकूण काय स्वामिनी मुळे जुन्या आठवणीं नव्याने येऊ लागल्यात. आणि घरी आपले अस्सल मराठी पदार्थ होऊ
लागलेत....
सई बने
डोंबिवली
---------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteधन्यवाद
Delete