विज्ञानाच्या वारीची गम्मत न्यारी


विज्ञानाच्या
वारीची
गम्मत
न्यारी
दरवर्षी एका वारीला मी न चुकता जाते...मनसोक्त भटकते...तल्लीन होते...ही वारी म्हणजे विज्ञान वारी...मुंबई आयआयटीमध्ये दरवर्षी होणा-या टेकफेस्टची वारी....मुंबई आयआयटीमध्ये दरवर्षी हे टेकफेस्ट भरतं...साधारण तीन दिवस चालणा-या या तंत्रज्ञानाच्या उत्सवात कितीतरी नवीन प्रकारची उपकरणं, गाड्या, रोबोट पहाता येतात...हे तंत्रज्ञान विकसीत करणा-या मुलांना भेटता येतं...बोलता येतं...अनेक मान्यवर शास्त्रज्ञांबरोबर संवाद साधता येतो...आणि मुख्य म्हणजे तरुणाईच्या या अनोख्या उत्सवात आपल्यालाही वय विसरुन सामिल होता येतं....

भारतीय तंत्रज्ञान संस्था या आपल्या देशातील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत.   आय.आय.टी. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. देशात एकूण २३ आय.आय.टी. आहेत. त्यात प्रवेश मिळवण्यासाठी लाखो तरुण दिवसरात्र एक करुन तयारी करत असतात...आयआयटीत मुलाला प्रवेश मिळाला म्हणजे पालक स्वतःला कोण भाग्यवान समजतात...देशातील अनेक क्षेत्रातील नामवंत या आयआयटीनं दिले आहेत...त्यात फक्त शास्त्रज्ञांचा समावेश आहे असेही नाही....अनेक राजकारणी, लेखक, उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या आयआयटीतून आले आहेत.  कारण आयआयटी म्हणजे फक्त विज्ञान नाही...तर आयआयटी म्हणजे मेहनत...आणि मेहनत...कुठल्याही क्षेत्रात जा...प्रामाणिकपणे मेहनत करा...यश तुमचचं आहे...हा मंत्र जणू इथे दिला जातो....मुंबईमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी ही तर देशातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे.  युनेस्को कडून रशियन रूबेल्सच्या स्वरूपात निधी या संस्थेसाठी मिळवण्यात आला. १९६१ मध्ये या आयआयटीला "राष्ट्रीय महत्त्वाची संस्था" असा दर्जा देण्यात आला.  पवईला मोठ्या परिसरात या आयआयटीचा पसारा आहे.  एरवी अभ्यास एके अभ्यास असा दिनक्रम असणा-या या संस्थेत या टेकफेस्टच्या निमित्ताने अवघा माहौल बदलून जातो...लाखो विद्यार्थ्यांची

पावलं या परिसरात वळतात...माझ्यासारखे उत्सुक पालक...विज्ञानाची गम्मत अनुभवण्यासाठी तसेच उत्सुक असलेले शालेय विद्यार्थी...फार काय
पंचाहत्तरी ओलांडलेले आजी आजोबाही हा विज्ञानाचा,तंत्रज्ञानाचा सोहळा बघायला हमखास येतात...आणि भान हरपून जातात...
साधारण 1998 पासून या टेकफेस्टची सुरुवात झाली...विद्यार्थ्यांनी केलेले नवनवीन शोध पुढे यावेत...त्यायोगे आणखी काहींना प्रेरणा मिळावी हा त्यामागचा हेतू होता...भारतभरातून साधारण अडीचहजार कॉलेजमधले विद्यार्थी आणि परदेशातील पाचशे विद्यापीठातील विद्यार्थी या टेकफेस्टला भेट देतात...हा आकडा अडीच लाखाच्या आसपास जातो....यावरुनच त्याची भव्यता ओळखता येते....
म्हणजे बघा ना, काय उत्सव असेल हा....गेले काही वर्ष मी नित्यनियमानं या उत्सवाला जातेच...मी, वरद आणि नवरा...सुट्टीच्या दिवशीही पहाटे न कुरकुरता उठणार...घरातून सकाळी सात वाजता तरी आवरुन बाहेर पडायचंच हा न सांगता झालेला नियम....मग ट्रेनचा प्रवास...आणि कांजूरमार्गपासून रिक्षा...मग आयआयटी बाहेर लागलेल्या भल्यामोठ्या रांगेचा एक हिस्सा व्हायचं...सकाळी नऊ पासून आत प्रवेश मिळतो...सकाळी लवकर जायचं, कारण आत एवढं काही असतं की दिवस संपला तरी मन भरत नाही...हा आम्हाला पहिल्याच फेरीत आलेला अनुभव...त्यामुळे नऊच्या सुमारास आत प्रवेश मिळाला की आपण मनसोक्त फिरायला मोकळं....पण यावर्षी आमचं गणित चुकलं...लेकाला अभ्यासाचा भाग म्हणून मित्रांबरोबर टेकफेस्टला जायला लागलं...त्यामुळे आम्ही नवरा-बायको जाणार असा बेत केला...तर नव-याला ऑफीस टूरसाठी जाव लागलं...मग मी एकटीनं बेत केला...काहीही झालं तरी टेकफेस्ट चुकवणार नाही असा नेम ना...सहज म्हणून एका खास सखीला फोन केला...ती आनंदानं हो म्हणाली...मग आम्ही दोघी निघालो...डोंबिवली पासून कांजूरमार्ग आणि तिथून रिक्षा...खरतर कांजूर स्टेशनला उतरलं की या टेकफेस्टचा फिल यायला लागतो...कारण या स्टेशनवर थांबणा-या प्रत्येक ट्रेनमधून हजारो विद्यार्थ्यांचा...माझ्यासारख्या पालकांचा लोंढा उतरत असतो...आणि सर्वांची पावलं या आयआयटीकडे जात असतात...यावेळी थोडा उशीर झाला...रांग खूप मोठी...साधारण अर्धा तासाच्यावर रांग लावली...मग आत प्रवेश झाला...नेहमीच्या प्रथेप्रमाणे गुलमोहर भेट...गुलमोहर
हे मुंबई आयआयटीमधील खवय्यांचं हॉटेल...लाजवाब चव आणि माफक दर...साऊथ इंडीयन पदार्थ तर विचारुच नका...आपली मिसळही तेवढीच रुचकर...शिवाय मोकळा परिसर...आयआयटीमध्ये बसल्याचा फिल....त्यामुळे टेकफेस्ट अनुभवायला सुरुवात करण्याआधी पेटपुजा करायची...ती सुद्धा गुलमोहरमध्ये हे ठरलेलं...
गुलमोहरमधून बाहेर पडलं की सुरुवात करायची...सगळीकडे मार्गदर्शक फलक लावलेले असतात...शिवाय काही विद्यार्थी आपल्या विभागाची पत्रकं घेऊनही उभे असतात...कुठे काय आहे याची माहिती देतात...ही पत्रकं बघितली की समजतं कुठे काय आहे...प्रत्येक विभागात प्रवेश करण्यासाठी थोडीफार रांग असते...पण त्यात प्रवेश झाला की आत असणारी विविधांगी माहिती बघितली की हा रांगेत आलेला कंटाळा कुठल्याकुठे पळून जातो...आम्ही दोघींनी सुरुवात केली ती व्हर्चुअल क्रिकेटपासून...डोळ्यावर व्हीआर ग्लासेस लावून खेळायचे...एरवी क्रिकेट आणि मी कोसो दूर...पण इथे अनुभव घेतला...सहा बॉल...टाकणारा कोण तर शेन वॉर्न...या पठ्ठ्यासमोर सहा बॉलमध्ये सहा धावा केल्या...नुसती गम्मत...माझ्या पुढे नंबर असलेल्या मुलानं दहा धावा केल्या...त्याला ऑरेंज कॅप मिळाली...आम्ही दोघीही खेळल्यावर त्या कॉलेजच्या मुलानं आणि त्याच्या ग्रुपनं टाळ्या वाजवून कौतुक केलं...शेन वॉर्नसमोर खेळलो म्हणून...पण हेच तर इथल्या
वातावरणाचं गुपीत आहे...इथे वय हा फॅक्टर नसतो...तुम्ही विज्ञानाबरोबर...तंत्रज्ञानाबरोबर किती समरस होता हे महत्त्वाचं ठरतं...
मग पुढचा प्रवास सुरु झाला...कुठे भन्नाट धावणा-या गाड्या....रिमोटच्या सहाय्यानं होणारे त्यांचे वॉर...तर कुठे गाड्याचे स्केचेस करणारा तरुण....एके ठिकणी दगडांचे प्रकार...त्याची माहिती सांगणारे विद्यार्थी...त्याच्या पुढे समुद्रात मिळणारे दुर्मिळ शंख शिंपले...त्याच्या आतील रचना...कितीतरी सुबक आणि कलाकुसरीची...या शिंपल्याच्या आतील रचनेवरुन म्हणे सबमरीन करण्याची प्रेरणा मिळाली...परदेशात अशा काही सबमरीन बनवण्यात आल्या आहेत....पुढे एका स्टॉलवर भविष्यातील गाड्या होत्या...पेट्रोलशिवाय चालणा-या गाड्या....मग सेफ्टी हेल्मेट...त्यातील टेक्नोलॉजी...एके ठिकाणी लिक्वी़ड नायट्रोजनची कमाल...मग जाणीव होते ज्यांनी आपल्या शरीराचा एखादा अवयव गमावला आहे, त्यांच्यासाठी तंत्रज्ञान किती महत्त्वाची भूमिका करत आहे.  अगदी शरीरासारखेच अवयव तयार करुन अनेकांना सुकर आयुष्याचा अनुभव घेता आला आहे.  एके ठिकाणी 3डी पेन्टींगचा अनुभव घेता आला....तर भाजी उगवण्याची आधुनिक पद्धतही बघता आली...तरुणांची सर्वाधिक गर्दी होती ती फॉरम्युला गाडीच्या ठिकाणी....इस्त्रोची प्रगती दाखवणारा विभागही होता...त्यातही अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी गर्दी केली होती...त्यात सॅटेलाईट
, रॉकेटेचे मॉडेल, जीएसएलव्ही.मार्क 3, मंगळयानचे मॉडेल असे बरेच काही...पुढे शेकहॅन्ड करणारा रोबोट आणि एअरटॅक्सीचे मॉडेल...शेतीला उपयोगी पडणारे ड्रोण....बापरे कसल्या भन्नाट जगामध्ये घेऊन जातात ही माणसं...तहानभूक हरवून बघावं असं बरचं काही असतं या टेकफेस्टमध्ये...मुख्य म्हणजे यातील प्रत्येक विद्यार्थ्याला सलाम करावासा वाटतो.  तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत प्रदर्शनाची वेळ असते.  या वेळेत रोज हजारो विद्यार्थी भेट देतात.  आपल्या विभागाला भेट देणा-या प्रत्येकाला सविस्तर माहिती ही मंडळी देत असताता...न थकता...न कंटाळता...शिवाय आपल्या शंकांचेही तेवढ्याच आत्मियतेनं निरसन करतात...इथे या माहितीज्ञानासोबत गम्मत...जम्मतही खूप असते...आरसी कारची रेस ही त्यातील मुख्य गम्मत...माझी आवडती...दरवर्षी या छोट्या गाड्यांची रिमोटच्या सहाय्यानं होणारी रेस मी भानहरपून बघते...किती मजा असते...कंट्रोल तरी
किती...छोट्या ट्रॅकमधून...वाटेत केलेल अडथळे पार करत या गाड्या एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात...तसेच तो बलून गेम...लेझर टॅग पेन्ट बॉल...असे कितीतरी प्रकार या टेकफेस्टमध्ये असतात...जे वय आणि भान हरपायला लावतात....फोटो काढण्यासाठी किती जागा ते विच्चारुच नका...कुठे रोबोमॅन..तर कुढे डोयनासोरचं डोकं...आणि भिंत्तींवरील भव्य, सुंदर पेंटींग....साधारण पाच वाजेपर्यंत अशीच भटकंती...मग वेळेची जाणीव होते...भूक लागल्याचं समजतं...पुन्हा एकदा गुलमोहर...तरीही मन कुठेतरी या कॅम्पसमध्येच असंत...पुन्हा एक हलकीशी फेरी...सर्व मनात साठवत या कॅम्पसचा निरोप...
मला नेहमी जाणवतं,  पंढरपूरला जाणारी वारी आणि ही विज्ञानाची वारी यात कमालीचं साम्य आहे.  वारीत सहभागी झालेले वारकरी देहभान विसरुन आपल्या पांडूरंगाच्या चरणी लीन होतात...त्याला भेटण्यासाठी कितीतरी मैल चालतात...तहान भूक विसरतात...या वारीत कोणी गरीब नसतो की श्रीमंत...सर्व एकाच माळेत बांधले असताता...भक्तीच्या...आणि सर्व एकाच नावाने ओळखले जातात...माऊली...माऊली...हाच नामजप...इथे सर्व वयाची माणसं आनंदानं नाचतात...बागडतात...कोण कसं आहे...याला महत्त्व नसतं...तर कोण आपल्या विठ्ठलाचे भजन रंगून करतो...कोण कीर्तनात देहभान हरपतो...याला महत्त्व असतं...इथे सर्व जातीपातीच्या भींती दूर होतात....बरं एवढं सगळं होत असताना कुठेही गोंधळ नाही की आरडोओरड नाही...अगदी तसंच या विज्ञानाच्या वारीत असतं बर का...
इथे तंत्रज्ञानाच्या चरणी सर्व लीन झालेले असतात...लाखो विद्यार्थ्यांचे लोंढे तीन दिवस देहभान विसरुन आयआयटीच्या कॅम्पसमध्ये फिरत असतात...प्रत्येक विभागाला भेट देतात....तेथे सादर झालेले प्रोजेक्ट बघतात...ते प्रोजेक्ट ज्यांनी केले असतील तो ग्रुपही आपला अविष्कार, त्याचा उपयोग समोरच्याला समजेल असं सोप्प करुन सांगत असतो...बरं हे सादर करणं एक-दोन वेळा नसतंच कधी...सकाळी सुरु झालेली ही वारी सायंकाळी पाच वाजता बळेबळे संपते...तोपर्यंत ही प्रोजेक्ट सादर करणारे विद्यार्थी,  स्वयंसेवक म्हणून काम बघणारे विद्यार्थी न थकता उभे असतात...बरं इथेही वयाची अट नाही...अगदी शाळकरी मुलांपासून ते एखाद्या आजी-आजोबांपर्यंत कोणीही येऊन मनसोक्त भटकू शकतं...आणि नवनव्या तंत्रज्ञानाच्या या वारीत मुक्त संचार करु शकतं...इथेही कसला गोंधळ नाही की गडबड नाही...
म्हणूनच या दोन्ही वा-या मला थोड्याफार सारख्या वाटतात...दोन्ही ठिकाणी एकच समान धागा....तो म्हणजे समर्पणाचा...एकीकडे वारकरी आपल्या विठ्ठलाच्या प्रती समर्पित भावानं सहभागी होतात....आणि या विज्ञान वारीचे वारकरी, म्हणजे हे विद्यार्थी तंत्रज्ञानाला त्याच भावानं विकसीत करीत असतात....पंढरीच्या वारीत अद्याप जाता आलं नाही...पण या विज्ञानाच्या वारीत मात्र मी दरवर्षी मनसोक्त फिरते...मंडळी आपल्यापैकीही अनेकजण ही विज्ञानवारी अनुभवत असतील....आणि  जर कोणी हा अनुभव घेतला नसेल तर पुढच्या वर्षी नक्की घ्या...आणि मग बघा, कितीही पाहिलं तरी मन भरणार नाही...आणि तेव्हा लगेच पुढच्या वर्षा या विज्ञानवारीत यायचंच असं आपण मनाशी नक्की करतो....

सई बने
डोंबिवली



----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा



Comments

Post a Comment