सावकाश ये...जरा उशीराच ये...रात्री नऊच्या नंतर आलीस तरी
चालेल....चालेल कशाला, तेव्हाच ये...पाहुण्यांचा रेटा कमी झाला असेल...आपल्याला आरामात
बोलता येईल...पाणीपुरी आहे, त्यामुळे खाऊन येऊ नकोस...लेकाला बघ ग...घेऊन ये...आणि
प्रेझेन्ट नको हो आणूस....अशा एक ना दोन अनेक सूचनांचा मारा करणारी ही माझी
मैत्रिण स्नेहल...नावाप्रमाणे प्रेमळ...लाघवी...तिच्या घराची वास्तूशांती होती...त्याचे
हे आमंत्रण...वास्तूशांती शनिवारी... दुसरा दिवस रविवार... त्यामुळे जरा
आराम...आम्ही सर्व मैत्रिणींनी रात्री तिच्या घरी राहण्याचाच बेत केला...तिला
कल्पना दिली...स्नेहलही खूष...
शनिवारच्या आमच्या छोट्या भेटीची तयारी केली. उत्सवमुर्तीच्या घरी पूजा, त्यामुळे तिने
कितीही नकार दिलेला असला तरी भेटवस्तू न्यायचीच असं ठरलं. मग काय घ्यावं यावर चर्चा...वॉटस्अप फूल...मग
ठरलं, नेहमीप्रमाणे वेगळी भेटवस्तू न्यायची.
दोन हॅन्डवॉशचे पॅक घेतले...चांगले डस्टर घेतले...टीश्यू पेपरही आले...आणि
स्नेहलला आवडते म्हणून एक पिंक शेडची लिपस्टीक, नेलपेंटचा सेंट, नेलआर्टचे सामान....आमचा
हा पाच जणींचा ग्रुप...त्यातील एकीनं पॅकींगची जबाबदारी घेतली...एकूण काय
शनिवारसाठी आम्ही स्नेहलपेक्षा अधिक उत्सुक होतो...शनिवार आला...लेकाची रविवारी परीक्षा...त्यामुळे
तो नाही...मग नव-यानं त्याच्यासोबत रहाण्याचं मान्य केलं...या दोघांच्या
स्वयंपाकाची तयारी...त्यातच साधारण सहाच्या सुमारास स्नेहलचा फोन...तू जमलं तर
आत्ताच ये...पाहुणे जास्त आहेत...माझी गडबड उडालीय...झालं...मग माझीही
गडबड....बाकीच्यांना फोन करून मी पुढे जातेय हा निरोप ठेवला...त्यांनाही शक्यतो
लवकर यायला सांगितलं...घरचं आवरुन मी स्नेहलंच घर गाठलं...
साधारण पाच-सहा वर्षापूर्वी स्नेहल या
आत्ताच्या घरात रहायला आली. माझ्या
घरापासून अगदी जवळ. तिचा नवरा
फोटोग्राफर. एका घरगुती कार्यक्रमात
त्याची भेट झाली. सोबत स्नेहलही
होती. कार्यक्रम झाला. पण हे जोडपं मनात भरलं. स्नेहल कधी खास मैत्रिण या गटात आली हे कळलंच
नाही. कधी कोणतीही मागणी नाही...की तक्रार
नाही. काहीवेळा तिच्यावर चिडण्याचा
प्रसंगही आला...पण बाई कूल...त्यामुळे आमच्या अशा खास गोटातल्या मैत्रिणींच्या
ग्रुपमध्ये ती सहज सामावून गेली...या घरात ती रहायला आली तेव्हा तिनंच घराची
थोडीफार सजावट केली होती. साधीशी पूजा
घातली होती. नव-याचा व्यवसाय...त्यामुळे
लगेच खर्च करणं शक्य नव्हतं...आता सहा वर्षानंतर या घराला तिनं आणि तिच्या नव-यानं
नवं रुपडं दिलं....पूर्ण घराचा कायापालट केला.
हल्ली सोशलमिडीयावर नवीन नवीन घर सजावटीचे व्हिडीओ येत असतात...त्या
व्हिडीओचा या बाई सहा महिन्यांपासून जणू अभ्यासच करत होत्या...आमचा तिला चिडवण्याचा
हा
कॉमन विषय...पण स्नेहल काही मागे फिरली नाही...आणि मुख्य म्हणजे सहा
महिन्यापासून तिनं आम्हाला तिच्या घरी यायला बंदी घातली...का...तर तिला आम्हाला
सरप्राईज द्यायचं होतं...रोज संध्याकाळी हे नवरा-बायको घरी आले की, घराची सजावट कशी
करायची याचे प्लान करायचे...कारगीर होते.
त्यांच्याबरोबर चर्चा...आणि ब-याच प्रसंगी त्यांना अगदी सि्मेंट
लावण्यापासूनची मदत...हे सर्व या दोघांनी केलं.
आम्हाला आतापर्यंत फक्त फोन रिपोर्ट होता..त्यामुळे आम्हीही उत्सुक...नेमकं
हिने घरात काय-काय केलंय हे पहायचं होतं...
मी धावपळत सात पर्यंत स्नेहलच्या घरी पोहचले. घर भरलं होतं.
सर्वत्र पाहुण्यांचा वावर...त्यात या आमच्या स्नेहलबाई कुठे हरवून गेल्या
होत्या...बहुधा आतल्या खोलीत असावी...मी सहज नजर टाकली...खरचं स्नेहल आणि तिच्या
नव-यानं घराचं रुपडं बदलून टाकलं होतं...अगदी प्रवेशद्वारापासून रंग, फर्निचर,
शोभेच्या वस्तू, पडदे, लाईटची व्यवस्था...सगळं कसं नेमकं, वेगळं, पण डोळ्यांना
प्रसन्न वाटेल असं...मी तशी वरवर नजर टाकली...स्नेहल काही समोर नव्हती...तिचा नवरा
समोर आला...स्नेहल आतल्या खोलीत आहे असं सांगून पुन्हा पाहुण्यांकडे वळला...मी
स्नेहलकडे जायला निघाले, इतक्यात एक खास डायलॉग कानावर पडला...सगळं काचेचच
केलंय...पोटी पोर नाही...मग कशाला काळजी...दोघांना एवढा किती पैसा लागतोय...सगळा
घरावर खर्च केला...शट्ट्...मला जाणवलं अचानक मला घाम फुटला...मनातला सर्व उत्साह
त्या बोलांनी कुठे हरवून गेला. स्नेहलनं
लवकर का बोलवलं हे समजलं...तिला कोणाची तरी सोबत हवी असणार...एवढ्या उत्साहानं वास्तूपुजा
केली...पाहुण्यांना बोलवलं...खरं तर हे निमित्त होतं...दोघांनी स्वकमाईतून
घेतलेल्या घराला त्यांच्या नजरेतून सजवलं...हे घर दाखवणं...आपलं, आपल्या
माणसांकडून नकळत कौतुक करुन घेणं, हा त्यामागचा साधा...सरळ उद्देश...पण या
कौतुकाऐवजी असले बोल ऐकावे लागणार याची थोडी या दोघांना कल्पना होती...
मी आतल्या खोलीत गेले. यापूर्वी मी ही रुम पाहिली होती. दोघांनाही वाचनाची आवड...त्यामुळे एका रॅकवर
पुस्तकच पुस्तक मांडलेली होती.
साधासा
रंग...दोन खुर्च्या...बस्स...आता या रुमला आकाशी, जांभळ्या, पांढ-या रंगात
अनोखेपणाने रंगवले होते. दोन रंगाच्या
त्रिकोणाला साधणारा पांढ-या रंगाचा पट्टा...एक भिंत पूर्ण पुस्तकांना दिलेली...एका
कोप-यात उघडलेले मोठेसे पुस्तक...स्टिकर होता को तो...मी शंका घेत त्या मोठ्या
पुस्तकाच्या चित्राला हात लावला...नाही..ते चित्रच होतं...आमच्या स्नेहलबाईंची
कला...मग बघितलं..या स्नेहलबाई आलेल्यांना भेटवस्तू देण्यात दंग होत्या...नाही
म्हटलं तर काहींनी भेटवस्तू आणल्या होत्या...महिलांच्या ओट्या भरणं...गज-यांचे
वाटप...असं नेहमीसारखं पुजेचं वातावरण...माझी आणि स्नेहलची नजरानजर झाली. छान गुलाबी रंगाची बनारसी साडी आणि मोग-याचा
गजरा...स्नेहल गोड दिसत असली तरी प्रसन्न नव्हती...कधी एकदा या सर्वांतून सुटतेय
असं झालं होतं...मी बाजुला पडलेल्या भेटवस्तू आवरायला घेतल्या...सगळ्यांची बोलणी
ऐकत होते...छान सजवलंस घर...आता घर झालंय...मुलांचं मनावर घ्या...पैसा असाच उधऴू
नका...चार बर्नरची शेगडी कशाला घेतलीस...घरी दोघंच तर आहात...ही मोठी कपाटं कशाला...अमुक तमुक
डॉक्टरकडे जा...घरी पुजा घातलीस ना...तिथे बोल पुढच्या पुजेला घरी बाळ असू दे
म्हणावं...एक ना दोन...सगळ्यांना सल्ला द्यायला काय जातंय...इथं जणू स्पर्धाच
लागली होती...अरे, तिने किती हौशेने घर सजवलंय, त्याचं तर कौतुक करा...स्नेहल
सगळ्यांना हो...हो...म्हणत होती..दुसरं काय करणार...मी सुद्धा हताशपणे तिच्याकडे
पहात होते. नशीबाने आमच्या बाकीच्या
मैत्रिणी भेटवस्तू घेऊन आल्या...आल्या त्याच आरडाओरडा करत...व्वा...व्वा...स्नेहल
जबरदस्तच हो...काय रंग...काय सजावट...तू आता ऑर्डरच घे...किचन बघ...काचेच
गं...व्वा...शेगडी किती मस्त...ए रात्री यावरच कॉफी करायची...आणि हे मग बघ...एक नंबर...या
काही आवरेनात...पण त्याचा एक परिणाम झाला.
या आत सल्ला देणा-यांना भुकेची जाणीव झाली...चल तुझ्या मैत्रिणीपण आल्या
सगळ्या...आता काय गोंधळ घालणार का तुम्ही...खाली जेऊन तसेच जाऊ...स्नेहल हो हो म्हणत दरवाज्यापर्यंत गेली...आमच्या मैत्रिणींनाही अंदाज आला होता...काहीतरी बिनसलंय...
काही वेळातच सर्व पाहुणे खाली जेवायला
गेले. त्यांच्यासोबत तिचा नवराही
गेला...जातांना नजरेतूनच स्नेहलला बघा अशी खूण करून गेला...हॉलमध्ये स्नेहल
हताशपणे उभी राहीली...आणि धो धो रडू लागली...आम्ही हताश झालो...मुल झालं नाही
म्हणून माझं महत्त्वच नाही का...मी या सर्वांच्या नेहमी मदतीला जाते...मी एकटी
आहे...मुलं नाहीत, म्हणून कोणीही कधीही हक्कानी कामाला बोलवतं...पुजा, सण, दुःखद
घटना सर्वांना मी हवी असते...मदतीला...का तर मी एकटी आहे...मुलांचा व्याप नाही
म्हणून...मला गृहित धरतात...मी पण जातेच ना...निदान त्याची तरी जाण ठेवायची
होती....एकीनं तरी माझं कौतुक करायचं होतं...आम्हीही हताशपणे स्नेहलकडे बघत
होतो...तिचा चेहरा रडून पार लालेलाल झाला होता...काय करावं...काय बोलावं ते सुचत
नव्हतं...तितक्यात आमच्यातल्या एकीनं आमचंच गिफ्ट फोडलं...काय करतेस हे विचारायच्या
आधी टिश्यू पेपरचा बॉक्स बाहेर काढला...तसचं ते डस्टर एकीच्या हातात कोंबले...घरात
काही ठिकाणी पाणी आणि खाऊ पडला होता ते पुसायला पाठवलं...मी स्नेहलचा चेहरा बळेबळे
पुसला...तिला काय चाललंय ते समजत नव्हतं...अजूनही हुंदके देत होती...मग एकीने ती
पिंक शेडची लिपस्टिक बाहेर काढली...स्नेहलच्या साडीला नकळत बरोबर मॅच झाली
होती...तिच्यावरचं पॅकींग काढलं...स्नेहला लावयला गेली...आता रडू नकोस...नाहीतर
पसरेल हं...म्हणत चक्क लिपस्टीक लावायला घेतली...रडत असलेली स्नेहल पहिली भानावर
आली...आणि हसू लागली...मग आम्ही...मग तसेच नकळत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी
आले...सर्वच निःशब्द...चल आता आम्हाला घर दाखव...घर दाखवायच्या आधी गिफ्ट
घेतलंस...हे बरं नाही....अजून काय हवं...स्नेहल मागचा सर्व भार
विसरली...नेहमीसारखी गोड हसली आणि घर दाखवायला लागली....
ती रात्र आम्ही स्नेहलच्या घरी घालवली...जेवण
मस्तच होतं...पण आम्ही सर्वांनी पाणीपुरीची स्पर्धा लावली...मग सर्व पसारा
आवरालयला त्या दोघांना मदत...तिचा नवरा झोपायला गेल्यावर आमच्या गप्पा
रंगल्या...दोनवेळा
त्या चार बर्नरच्या शेगडीवर कॉफी झाली...पहाटे थोडा वेळ डुलकी
काढून सकाळी सहा वाजता आपापल्या घरी आलो...काय मिळालं आम्हाला...एकीचा
विश्वास...स्नेहलला तसं आम्हीपण गृहीतच धरलं होतं की...अनेकवेळा आमची मुलं
तिच्याकडे असायची...जेवणाचे डबे घेऊन तिला बोलवले आहे...या नकळत केलेल्या चुकीची
जाणीव झाली...
नकळत स्नेहलला बोल लावणा-या...फुकटचे सल्ले
देणा-या बायकांबरोबर तुलना करुन बघितलं...त्यांच्यात आणि आम्हा मैत्रिणीत फरक होता
का...हो, नक्कीच होता...स्नेहलला असे फुकटचे सल्ले देऊन तिचं मन आम्ही कधीच दुखवलं
नव्हतं. शेवटी तो तिचा निर्णय होता...काही
निर्णय माझे मलाच घ्यावेसे वाटतात...त्यात इतरांची लुडबूड नकोशी वाटते...तसंच तर
तिचंच असेल...बाकी स्नेहलला आम्हीही गृहीत धरतो...आणि धरणारच...मैत्रीची हक्क
म्हणतात ना त्या हक्कातून....
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
शेवटी मैत्रिण ही मैत्रिणच असते आणि तीच समजवुन घेवू शकते.
ReplyDeleteमस्त सई लिहीत रहा 😘😘😘😍😍😍
Khup chhan lekh
ReplyDeleteKhupch Sunder Lekh immotional asun veleprasangi matrinichya group ne jo bhavanik support kelaya mule Snehal chi vastu shanti peksha hi manachi shanti adhik prabhavi zali.
ReplyDeleteOnce again thank for your group team to inspire all .