डराव डराववाल्या गाड्या....


डराव
डराववाल्या
गाड्या....


दुपारची कमीत कमी अर्धा तासाची डुलकी, म्हणजे माझ्या आवडीचा विषय....त्यातून हल्ली लेक आठवड्याचे चार दिवस सायंकाळी सहा-सात दरम्यान येतो...त्यामुळे भल्या पहाटे सुरु झालेला माझा घाईगडबडीचा दिवस साधारण दुपारी दोनच्या सुमारास निवांत होतो...मग आरामात जेवण...सायंकाळच्या लेकाच्या नाष्ट्याची तयारी आणि पेपर वाचून अर्धा तासाची डुलकी...कुणी याला वामकुक्षी म्हणतं...तर कोणी अजून काही...कोणाच्या मते दुपारी झोपलं की माणूस आळशी होतो...पण माझं मत ठाम आहे.  पहाटे चारला उठल्यावर, आणि घरातील सगळी कामं पार पाडल्यावर गृहिणीला हक्काचा आराम हवा असतो ते म्हणजे ही डुलकी....तर ही डुलकी माझ्या लाडाची...पण हल्ली ब-याचवेळा ही आरामाची वेळ आणि जागा बदलण्याची वेळ माझ्यावर आली आहे...ती पण काही गाड्यांच्या आवाजामुळे....

आम्ही रहात असलेल्या इमारतीच्या मागील बाजुला मोठा रस्ता आहे.  वाहतुकीला सुटसुटीत, मोकळा रस्ता...पण काही मोटारबाईक चालवणा-या युवकांना तर तो रस्ता जणू त्यांच्या रेसर गाड्यांसाठीच मोठा केलेला आहे, असा समज झाला आहे.  साधारण दुपारी सर्व शांत झालं की या मुलांना काय सुचतं काय माहीत,  आपण आणि आपल्या मोटार बाईकच या जगात एकमात्र आहोत असं समजून ते गाडया चालवतात...एक हात एक्सीलेटरवर आणि दुसरा हॉर्नवर....भन्नाट स्पिड...बरं गाड्या जोरात चालवा...आमची ना नाही...पण त्या चालवतांना तो एवढा आवाज कशाला...मुळात या गाड्या चालवतांना होणारा आवाजच एवढा त्रासदायक असतो की, रस्त्यात कुणी चालत असेल वा माझ्यासारखा सांभाळून गाडी चालवत असेल, तर दूरवरुन या गाड्यांचा आवाज आला की बाजुलाच होतो...नको ती झंझट म्हणून...पण या कृतीतून या गाडी चालवणा-यांना चेव येतो, असं मी ब-याच वेळा बघितलं आहे.  आमच्या आसपासही अशा भन्नाट...आणि खरं बोलायचं तर तापदायक ठरलेल्या गाड्यांची संख्या अधिक आहे.  दुपारी आणि रात्री त्यांना कोण चेव येतो आणि ते जोरात गाडी चालवायला लागतात...बरं हळू चालवा असं सांगितलं तर आमच्या गाडीचा आवाजच तेवढा आहे, आम्ही काय करायचं...असं बोलून ही मंडळी आपल्याच समोरुन तेवढाच स्पीड घेऊन, नकोसा वाटणारा आवाज आणि प्रचंड धूर सोडत निघून जातात....या सर्व तापदाय आवाजांमुळे मी माझी दुपारची पेपर वाचनाची आणि डुलकीची जागा बदलली....

गेल्या काही वर्षात या अशा मोटारबाईकची संख्या वाढली आहे.  मी माझ्यापरीने या मोटारबाईबाबत असलेली उत्सुकता आणि मुलांना या आवाजाची क्रेझ का आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला.  अर्थात त्याबरोबर त्याचे होणारे परिणामही जाणण्याचा प्रयत्न केला....या गाड्यांची किंमत काही हजारात नाही तर लाखात असते.  बरं कंपनीकडून एकदा ही गाडी मिळाली, म्हणजे हातात आली की काही हौशी मंडळी त्या नव्याको-या गाडीची रवानगी थेट गॅरेजमध्ये करतात....आपल्यासारखी मंडळी गाडी खराब झाल्याशिवाय गॅरेजमध्ये जात नाहीत...पण ही मोटारबाईकच्या आवाजाची क्रेझ असलेली मुलं नव्या गाडीला गॅरेजमध्ये भरती करतात...आणि त्या चांगल्या गाडीच्या ऑपरेशनची वेळ येते....गाडीचा आवाज कंट्रोल करणारा सायलेंसर फाडला किंवा फोडला जातो...काही जण हॉर्न बदलतात...लाईटही बदलतात...या अशा नुतनीकरणासाठी लाखो खर्च होतात...मग ही आवाजी मोटारबाईक रस्त्यावर येते.  अर्थात एवढे लाखो रुपये खर्च केल्यावर चालवणारा गुर्मीतच असणार....त्याला समोरच्याचा मनस्तापाची आणि त्या होणा-या आवाजीची काहीही फिकीर नसते. ना त्यांना आपल्या गाड्यांच्या आवाजामुळे वृद्धांना, आजारी व्यक्तींना किती मनस्ताप होतो याची कल्पना नसते. आमच्या भागात चालवणा-या गाडीवाल्या एका मुलाला मी रस्त्यात अडवून जोरात गाडी चालवू नको, म्हणून विनंती केली होती...पण त्याचा परिणार अवघा दोन दिवस राहीला...बाकी परिस्थिती जैसे थे....
असो, गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉटस्अपवर एक फोटो आला होता...एका आवाजी गाडीवाल्याला वाहतूक पोलीसांनी पकडले होते.  त्याला गाडीच्या फोडलेल्या सायलन्सर जवळ बसवले होते.  एक पोलीस त्या गाडीला रेस करत होता...त्यामुळे गाडीतून पडणारा धूर आणि त्याचा तो आवाज त्या तरुणाला सहन करावा लागत होता...मला प्रथम हा आतातायी उपाय वाटला....पण जेव्हा मला घरात बसून रस्त्यावर चालणा-या गाड्यांचा आवाजाचा त्रास व्हायला लागला...तेव्हा जाणवलं या फोटोतल्या युवकांनं किती लोकांना त्रास दिला असेल....
तसंच बंगलोरच्या ट्रॅफीक पोलीसांनी अशा आवाज करणा-या मोटारबाईकवर चक्क रोड रोलर चालवला.  हा व्हिडीओ काही दिवस सोशल मिडीयावर फिरत होता....मला त्या पोलीसांच्या हिम्मतीचे कौतुक वाटलं... आवाजाच्या प्रदूषणाचा किती परिणाम होतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.  कारण या आवाजी गाड्यांचा सर्वांधिक त्रास कोणाला होत असेल तर तो वाहतूक पोलिसांना...उन, पाऊस, थंडीमध्ये आपली ड्युटी करण्यासाठी कमीतकमी आठ तास उभे असणा-या या पोलीसांना या असल्या भन्नाट स्पिडच्या गाड्यांमधून येणा-या धुराचा....त्याच्या आवाजाचा आणि काहीवेळा गाड्या चालवणा-या उर्मट चालकांचाही सामना करावा लागतो...ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो.  शारीरिक आणि मानसिक ताण वाढतो.  चिडचिड वाढते.  राग येतो...
या गाड्यांच्या आवाजाचा त्रास बहुतांश सगळ्यांनाच होतो.  अपवाद फक्त ते गाडी चालवणारे असतात...त्यामुळे आता या आवाजी दुनियेबाबत काहींनी मोहीम हाती घेतली आहे.  डोंबिवलीच्या पै लायब्ररीचे पुंडलिक पै हे त्यापैकीच एक....पै दिवसभरात 35 किलोमिटरचा प्रवास करतात....अनेकवेळा ट्रॅफीक सिग्नलजवळ थांबलेल्या गाड्या बघतात...वाहनांची लागलेली मोठी रांग बघतात...पण या सर्वांत तापदायक ठरतात, त्या मोठ्याने हॉर्न वाजवणा-या गाड्या.  ट्रॅफीक आहे. थोडा वेळ थांबा...पण नाही...काही मंडळी जणू हॉर्नवर बोट ठेऊनच जन्माला आलेली असल्यासारखी वागतात....याच आवाजी लोकांमुळे पाहुण्यांसमोर काहीवेळा मान खाली घालण्याचा प्रसंग पै यांच्यावर आला.  त्यामुळे गाड्यांच्या वाढत्या प्रदूषणावर त्यांनी उपाय म्हणून 26 तारखेला, अर्थात आपल्या प्रजासत्ताक दिनी नो हॉर्न डे करावा असे आवाहन केले आहे....एका दिवसाच्या या प्रयोगामुळे त्याचे फायदे लोकांना कळतील.  आणि एक दिवसाचा कालावधी वाढून हळूहळू अवाजवी कारणासाठी गाड्यांचे आवाज करणा-यांवर अटकाव बसेल अशी पै यांना आशा आहे.

पै यांची ही कल्पना खरोखर वास्तवात आली पाहिजे.  त्यासाठी सर्वांचेच सहकार्य गरजेचे आहे.  आज या गाडीचालकांना त्यातील त्रुटी जाणवत नाहीत.  पण ते स्वतःच्या आरोग्याबरोबरही खेळ करुन घेत आहेत.  या आवाजाचा त्यांच्यावरही परिणाम होत आहे.  पण आता फक्त धुंदीमध्ये तो परिणाम दिसत नाही.  चला आशा करुया हा नो हॉर्न डे यशस्वी होईल.  माझी...आणि आपली सर्वांचीच या डराव...डराव...करणा-या गाडयांपासून सुटका होईल....

सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा



Comments

  1. सुंदर लेख,या विषयावर प्रकाश टाकणारा आजचा तुझा लेख वाचला आणि मग वाटलं की आरटिओ कडुन या आवाजावर काही निर्बंध असले पाहिजेत.sound pollution under act ने कडक कार्यवाही करण्यात यायला पाहिजे. License seize केले पाहिजे.
    आपल्या महाराष्ट्रात ही क्रांती घडवून आणली पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. आशिष धन्यवाद....गाड्यांचे आवाज...वेग...आणि आता नव्याने बसवण्यात येणारे लाईट यांच्यावरही निर्बंध असायला हवेत खरतर...मी स्वतः चार दिवस हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा जाणवलं...रात्री जोरात आवाज करत बाहेरुन गाडी गेली की, झोप गायब होते....मग चिडचिड....मात्र ते करणारे कशातच नसतात...हे नक्कीच थांबवायला हवं...
      मनापासून धन्यवाद....

      Delete

Post a Comment