भेटवस्तूंची
चौकट....
हे ग काय...काय हे...एवढया मोठ्या पाकीटात काय आणलंस तर डायपर....ही
काय भेट आहे का....काहीही....ही माझी आणि माझ्या भेटवस्तूची चिरफाड चालली होती,
एका नातेवाईकांच्या घरी...त्यांच्या मुलीला मुलगा झाला. दोन महिन्यांनी बारसं थाटात झालं...बारशाला
नेहमी नेतात त्या वस्तू मी घेऊन जात नाही.
आईला छान पौष्टीक लाडू...तेही करता आले नाही तर साखरी खारका...आणि बाळाला
ते टीपीकल कपडे न घेता डायपर...घरगुती केलेल्या छोट्या गोदड्या...असं काही
नेते...ते बॉक्समधले पावडर आणि तेल याचा फारसा उपयोग होत नाही हा माझा स्वतःचा
अनुभव...त्यामुळे या साच्यातल्या वस्तूंना फाटा देण्याचा प्रयत्न...या
नातेवाईकांकडेही अशाच मोठ्या पॅकमधले डायपर...गोदड्या घेऊन गेले होते...पाहुणे गेल्यावर
गिफ्ट बघण्याचा कार्यक्रम झाला. मोठं पॅक
म्हणून माझीच भेट पहिली उघडली...त्यात डायपर बघून काकू वैतागल्या...त्यांनी तो बॉक्स
तसाच बाजुला ठेवला आणि त्या दुस-या भेटवस्तूंकडे वळल्या...पण त्यांची सून मात्र
हसत आली...डायपर उघडले...वेगवेगळ्या प्रकारचे डायपर बघून खूष झाली...त्यातलेच
पॅकेट फोडून एक डायपर बाहेर काढला...मुलाला घातला...आणि गोदडी पसरुन त्या लहानग्याला
त्यावर ठेऊन पुन्हा आत गेलीही....
काकू तिच्या या छोट्या कृतीकडे बघत होत्या...मग हसून मला
म्हणाल्या...बघ मी म्हातारी झाले...आणि आमचे विचारही...हे असलं काही भेट म्हणून
उपयोगी पडेल असं ध्यानातही येत नाही...छान हो...त्यांच्या या सहज बोलण्याने काहीसा
आलेला ताण निवळला...सर्वजणं मिळून मग बाळाचे गिफ्ट बघायला लागले...बरेच बॉक्स
होते. त्यात एका रंगाचे बाळाचे कपडे...पावडरचे
डबे तर 17-18 झाले...मग तेल...त्या छोट्या चावण्यासाठी असतात तशा चाव्या...खुळखुळे...फार
काय साबणही याच संख्येत झाले...बाळासाठी खरंतर वर्षभर पुरेल इतका हा साठा होता....पण
त्याचबरोबर काहींची एक्सपायरी डेट बघितली तर ती एखाद-दुसरा महिना अशीच होती...त्यात
बाळाच्या बाबांनी जाहीर केलं की त्यांनी आधीच बाळासाठी नेहमी लागणा-या वस्तू आणल्या
आहेत...त्याचा म्हणे वेगळा ब्रॅन्ड होता...आणि बाळाच्या आजीनं त्याच्यासाठी घरगुती
तेल केलेलं...त्यामुळे या अतिरिक्त वस्तूंचं काय करायचं हा प्रश्न आला...घरात
मदतीला आलेल्या बाईला काही पावडर, साबण आणि तेल देण्यात आले...बाकीच्या वस्तू तशाच
वारसदारांच्या प्रतिक्षित
होत्या...नाही म्हणायला काहीजणांनी माझ्यासारख्या वेगळ्या वस्तू भेट म्हणून आणल्या
होत्या...एकानं छान पॅक सुकामेवा आणला होता...त्याला काही एक्सपायरी डेट
नव्हती...एक मुलाच्या वाढीबरोबर त्याला काय आणि कसा खाऊ द्यावा
हे सांगणारं पुस्तक
होतं...तर एकानं छान कार्टूनच्या आकाराच्या दुलया दिलेल्या....
भेटवस्तू या शब्दाची आता व्याख्या बदलली आहे,
हे लक्षात घेतलं पाहिजे. भेट देतांना कार्यक्रम आणि त्या यजमानांची गरज
जशी लक्षात घेतली पाहिजे, तसेच बदलत्या
काळाचा, आधुनिक तंत्राचा वापरही लक्षात घ्यायला हवा. नाहीतर आपल्या भेटवस्तू या ब-याचवेळा
यजमानांच्या पोटमाळ्याची शोभा वाढवण्यासाठी जमा होतात. काही वर्षापूर्वी लग्नात भांड्याशिवाय दुसरं
काही भेट म्हणून देता येतं, हे गावीही नव्हतं...मोठ्या स्टिलच्या टाक्या, कळश्या,
पाण्याचे जग, ताटं-पेले...यापासून ते किचन रॅक सुद्धा भेट म्हणून दिलेले मी पाहिले
आहेत...माझ्या लग्नातही माझ्या मामानं गॅसची शेगडी आणि आजीनं स्टीलची कळशी मला भेट
म्हणून दिली होती...अर्थात या दोन्हीही वस्तू मी आजही आवडीनं जपत आहे. पण या गोष्टीला वीस वर्ष होऊन गेली आहेत. भेट देतांना या वस्तूंमुळे आपल्या प्रिय
माणसांना त्यांचा उपयोग होईल असाच हेतू असतो.
त्यामुळे आता हे भांडीभेट देण्याचे
प्रकार कमी झाले आहेत...त्याऐवजी पैसे देऊन मोकळे होतात...तुम्हाला हवं ते
घ्या...हवं तसं घ्या...कारण आता अशा गृहोपयोगी भेटवस्तू देतांना त्यांचा रंग,
ब्रॅन्ड, जागा आदी सर्व बाबींचा विचार करावा लागतो. घराच्या फर्निचरला अनुसरुन केलेली
सजावट...त्यात आपली भेट अडचण तर ठरणार नाही ना याचाही विचार करावा लागतो...काही आठवड्यापूर्वी
एका मैत्रिणीच्या वास्तूपुजेला गेले होते,
तिथे तिला भिंतीवर लावण्याच्या चार फ्रेम आलेल्या...वास्तविक त्यांनी घराचे
नुतनीरण केलेले...त्यामुळे कुठेही खिळा मारला जाईल अशी शक्यता नव्हती...मग या फ्रेम
तशाच पॅक करुन राखीव भेटवस्तूंमध्ये भरती झाल्या...त्याऐवजी आम्ही छान, चांगली
डस्टर, हात पुसण्याचे रुमाल, सिंक डस्टर, सॅनीटायझर असे काही नवीन प्रकार नेले
होते...ते खूप उपयोगी पडतात...असं ती मैत्रिण जेव्हा जेव्हा भेटली तेव्हा तीनं
सांगितलं आहे.
ब-याचवेळेला अशा नवीन वस्तू आल्यावर त्यांना
भेट म्हणून स्विकारायची आपलीही मानसिकता नसते...पण जरा विचार केला तर त्यांची
उपयोगीता लक्षात येते. भेट आलेल्या वस्तू तशाच
पॅककरुन ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. अनेकजण
सांगतात, आमच्या अमूक तमूकने दिलेला हा डीनर सेट आहे...एवढी वर्ष झाली...तसाच आहे. मी म्हणते, का तस्साच रहाणार नाही. तो कधी बाहेरच आला नाही. वापरला गेला नाही. अशा वस्तू वापरात आल्या तर फुटतात...त्यामुळे
त्या कपाटात बंद रहातात...पण असे सेट वापरतांना फुटणारच....आणि फुटल्यावरच नवीन
पद्धतीचे...रंगाचे सेट घरात येणार...मध्यंतरी मला कोणीतरी छान छोटा कॉफीमेकर आणला
होता...वापरायला अगदी सोप्पा...पोर्टेबल...इलेक्ट्रीकवर...फक्त कॉफी झाली की
एक-दोन भांडी साफ करायला लागायची...तेव्हा खुप कंटाळा यायचा...पण आता लेकाचा आणि
माझाही रात्री अभ्यास असतो तेव्हा हे कॉफी मशीन कितीतरी उपयोगी पडते...

भेट कशी असावी...याची कधी व्याख्या करता येणार
नाही...आपल्या आसपास ऐवढ्या काही वेगवेगळ्या वस्तू असतात, फक्त आपली नजर आणि भेट
म्हणून द्यायची ही मनातली समजून बदलली पाहीजे.
खरंतर त्या मॉलमध्ये फिरायला मला आवडत नाही. पण गेलेच तर अशा वस्तू असतात तिथे हमखास
जाते...कितीतरी वेगळे प्रकार पहायला मिळतात...इलेक्ट्रीक धुपारत, तो गरम जेवण करता
येईल असा डबा, उशांचे अनेक प्रकार...आता तर जेवणाच्या डिशही त्रिकोणी, चौकोनी
प्रकारात मिळतात...मुलं बाहेर शिकायला असतील तर त्यांना स्वयंपाक सहज करता येईल
अशी वेगळी भांडी...असे एक ना दोन अनेक प्रकार...फक्त आपली नजर आणि समजूत बदलली
पाहिजे...
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
उत्तमोत्तम 👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंयस खरचं, गिफ्ट देताना विचार करून द्यावी.
ReplyDelete