आणि
माझे
व्हॅलेंटाईन
व्हॅलेंटाईन डे...काय गम्मत आहे ना...प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवशी जणू स्पर्धाच लागलेली असते...अगदी बाजार सुद्धा व्हॅलेंटाईनमय झालेला...प्रेमाचा रंग कुठला तर लाल...सगळ्यांचा ड्रेसकोड नकळत लाल रंगाचा झालेला....अगदी कपड्यांच्या दुकानात ते पुतळे उभे करतात ना, त्यांनाही लाल रंगाचे कपडे घातलेले...सर्वत्र फुगे...हार्टशेपची बरसात...पताका..कसली कसली सजावट...गुलाबाची फुलं तर विक्रमी भावात...पण प्रेमापुढे पैशाची किंमत कुठे करणार...एकुण काय सगळा माहौल प्रेमाचा...हा सगळा रागरंग बघतांना...अनुभवतांना मला गेल्या महिन्यात माझ्याबरोबर झालेल्या एका अपघाताची पुन्हा पुन्हा आठवण झाली. अपघात हे नकळत होतात...तसाच हा अपघात झाला...पण त्या अपघातांने किती जणांबरोबर आपण प्रेमाने बांधले गेलो आहोत, याची जाणीव झाली...ब-याच व्यक्तींना आपण नकळत दुखावतो...किंवा समोरच्याला आपली किंमतच नाही, असा समज...गैरसमज करुन घेतो...तसाच माझाही झालेला...पण या अपघाताने जाणवलं की मी किती चुकीची होते...ज्या व्यक्ती आपल्यावर प्रेम करतात...त्यांना रागवण्याचाही अधिकार असतो...काहीवेळा त्या आपल्यावर प्रेम व्यक्त करत नाहीत...पण आपली काळजी त्यांना असते...मग अशा नकळत झालेल्या अपघांतांमुळे या व्यक्ती हळव्या होतात...आपल्याबद्दलच्या भावना व्यक्त करतात...जिव्हाळा...आपुलकी...प्रेम व्यक्त होतं...इथे कुठलाही व्हॅलेंटाईन बाबा नसतो...पण प्रेम असतं...आपलेपणा असतो...असा अनेक प्रियजनांचा
जिव्हाळा मी गेल्या महिन्यात अनुभवला...
सकाळी चार वाजता उठून मुलाचा आणि नव-याचा डबा बनवणे हा माझा नेहमीचा दिनक्रम...साधारण दहा वर्षापासून हा दिनक्रम माझ्या अंगवळणी पडला आहे. इतका की कुठे फिरायला गेलो, तरी लेक आणि नवरा आठवणीने सांगतात...प्लीज लवकर उठू नकोस...आपण बाहेर फिरायला आलोत...असो...यातला मजेचा भाग सोडला तर...सकाळी उठण्याचे माझ्या दृष्टीनं फायदेशीर आहे. सगळं जेवण...नाष्ट्याचे प्रकार सकाळी झालं की किचनच्या कामापासून आराम मिळतो...मग मॉर्निंग वॉक...व्यायाम...पेपर वाचन आणि कॉफी...असे क्रम...अगदी क्वचित रविवारी हा क्रम बिघडतो...गेल्या महिन्यात, जानेवारीमध्ये मात्र या क्रमाला चांगलाच ब्रेक लागला...साधारण सकाळी पाच वाजता...सगळी कामं आटपली होती...फक्त लेकाचा डबा भरायचा बाकी होता...आणि ओटा आवरायचा...काय झालं कोणास ठाऊक तासाभरापूर्वी पिण्याच्या पाण्याचा गरम केलेला टोप उचलायला गेले, आणि तो टोप हातातून निसटला...या टोपातलं गरम पाणी पायावर पडलं...दोन्ही पाय चांगलेच भाजले...तो दाह एवढा होता की मी जोरात किंचाळले...नवरा आणि लेक घाबरुन उठले...दरम्यान पाय भाजले हे लक्षात आल्यावर मी त्यावर थंड पाणी ओतायला सुरुवात केली...काही मिनीटातच भाजलेल्या जखमा दिसायला लागल्या...काही ठिकाणी फोड यायला सुरुवात झाली...
माझी होणारी तडफड बघून लेक एकदम शांत झाला...तर नवरा खूप घाबरला...थेट हॉस्पिटलमध्येच जाऊया म्हणून बोलू लागला...त्यादिवशी थंडीही खूप होती...माझं जेवढं भाजलेल्या जखमांवर लक्ष होतं तितकंच आमच्या ओंकार शाळेच्या व्याख्यानमालेवर....मी सकाळी सहा-सव्वासहाच्या सुमारास या व्याख्यानमालेसाठी निघणार होते...सर्व ठरल्याप्रमाणे चालू होतं...आणि नेमका हा अपघात झाला...त्यातच लेकाची परीक्षाही होती...तोही माझ्याबरोबर सकाळी सहा वाजता निघणार होता...आईला एवढं भाजलेलं बघून तोही घाबरुन गेला...माझ्याजवळ बसून राहीला...एकीकडे नव-यानं आमच्याच सोसायटीमध्ये राहणारे डॉ. बकुल पाटील यांना फोन लावला...पहाटे पाचची वेळ...वास्तविक आमच्या सोसायटीमध्ये रात्री दोन वाजताही हाक मारली तरी सर्व घरं एक होतील...तरीही एवढ्या लवकर डॉक्टरांना फोन कशाला केलास म्हणून मी बोलेपर्यंत डॉक्टरही हजर झाले...त्यांनी जखमा बघितल्या...इंजेक्शन दिलं...औषधं लिहून दिली...बरं होईल म्हणून नव-याला धिर दिला...पण तो काही शांत होईना...बाहेर थंडी
मी होती...थोड्या वेळानं औषधं आण म्हणून मी त्याला सुचवलं...पण त्यापेक्षा तू थेट हॉस्पिटलमध्ये भरती हो, असा त्याचा घोषा चालू होता...त्यापेक्षा औषधं बरी म्हणून मी त्याला सांगितल्यावर तो बाहेर पडला...तो बाहेर पडल्यावर लेकाची समजूत काढली...परीक्षेला जायला सांगितलं....माझी आईसुद्धा लवकर उठते...कितीही मोठं झालं तरी आधाराला आई लागते...त्यामुळे जरा निवांत झाल्यावर पहिला आईला फोन केला...परिस्थिती सांगितली...ती माऊलीही ग्रेट...पहाटे साडेपाचला त्या थंडीत हजर...आई आल्यावर थोडा आधार वाटला...औषधंही आली...एकीकडे पायाचे फोड वाढले होते...ते पाहून नवरा आणि आईही हॉस्पिटलमध्ये जाऊया म्हणून मागे लागले...एव्हाना नव-यानं सोसाटीत...शेजा-यांना झालेली घटना सांगितली...त्यामुळे त्यांचीही वर्दळ वाढली...मला झालेल्या जखमा पाहून सर्वांना वाईट वाटतं होतं... शेवटी नवरा मला हट्टाने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला...आणि अॅडमिट केलं...
इथं मला झालेल्या अपघाताचा पहिला अंक संपला...मला दुखत होतं...पण जे झालंय त्याला पर्याय नव्हता...म्हणून मी स्थिर होते...पण जेव्हा या वेदनांमध्ये मी माझ्या आजुबाजुला जमलेल्या माणंसांकडे बघत होते तेव्हा जाणवलं की माझ्याएवढी वेदना त्यांनाही होत आहे...माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनाही भाजल्याची झळ पोहचत होती...तीन दिवस हॉस्पिटलमध्ये मुक्काम. दरम्यान आमच्या ओंकार शाळेतील ज्ञानोत्सव व्याख्यानमाला चालू होती. मला जाता आले नाही. पण बोलावलेल्या वक्त्यांबरोबर फोनद्वारे संवाद साधला...सर्वांचीच व्याख्याने सुरेख झाली. पण मला जाता आले नाही, याची रुखरुख मनात होती. त्यातही मी का जात नाही हे शाळेत सामंत मॅडमना कळवू नये, अशी सक्त ताकीद मी नव-याला दिली होती. आमच्या सामंत मॅडमना जे ओळखतात ते त्यांचा
स्वभाव जाणतात...मॅडम, अतिशय हळव्या स्वभावाच्या...पहिल्याच दिवशी त्यांना माझ्या अपघाताबद्दल कळले असते तर त्यांना खूप वाईट वाटले असते याची जाणीव मला होती. पण शेवटच्या दिवशी मॅडमना हे कळले, व्याख्यान संपल्यावर त्या थेट हॉस्पिटममध्ये आल्या...खूपच भावूक झाल्या...त्यांच्या सोबत आलेल्या अर्चना मॅडम आणि अन्य शिक्षीकाही तशाच भावूक...मला बघायला प्रत्येकाची अशीच अवस्था होती...दादा-वहीनी...रात्री हट्टाने सोबतीला राहणा-या जाऊबाई...मावशी-मामी-बहिणी...सोसायटीतील मैत्रिणी...ज्यांना ज्यांना समजत होतं...ते भेटायला येत होते. सोसायटीमधील मैत्रिणी....सर्व आप्तजनांची रांग लागली. शेवटी डॉक्टर म्हणाले, आता पाहुणे जरा कंट्रेल करा...तेव्हा फोन करुन येणा-यांची माफी मागितली...त्यांना घरी येण्याचा सल्ला दिला...तीन दिवसात भाजल्याच्या जखमा ब-यापैकी सुकल्या...डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली...घरचा सर्व नूरच पालटला होता...एरवी घरी माझा नेहमीचा आरडाओरडा चालू असतो...लेकाच्या मागे...नव-याची तयारी...पण ही दोघं माझ्या सेवेत उभी होती...पिण्यासाठी गरम पाणी करण्याचा प्रश्न सुटला होता...कारण घरी वॉटर प्युरीफायर लागलं होतं...घरात विचारपूस करण्यासाठी येणा-या पाहुण्यांची रिघ लागली....त्यांनी खास बनवून आणलेल्या खाऊने डबे भरले...शनिवार-रविवार तर किती चहा-कॉफी झाली याचा हिशोब नाही...फोनही सतत वाजता...
काल व्हॅलेंटाईन डे निमित्त सजलेल्या बाजारपेठा बघितल्या आणि मागच्या काही दिवसातील माझ्या घरातील पाहुण्यांची-मित्रमंडळींची लगबग आठवली...हे सर्वच तर माझ्यासाठी व्हॅलेंटाईन आहेत...भाजल्याच्या काही जखमा अजूनही आहेत...हळूहळू ब-या होणार...पायाला डागही पडलेत...हे डागही कालांतराने पुसटही होतील....पण या सर्वांदरम्यान मला जाणवलेला प्रेमाचा ओलावा कधीही पुसला जाणार नव्हता...आपल्या आजूबाजूला असलेली माणसं आपल्यावर कितीतरी प्रेम करतात...प्रत्येकवेळा ते प्रेम व्यक्त करत नाहीत पण आपलेपणा...आपुलकी...जिव्हाळा...प्रेम....व्यक्त करण्यासाठी कुठला मुहूर्त लागतो का...ठराविक दिवस असतो का...आपल्या आवडीच्या माणसांना, तुम्ही मला आवडता...हे सांगण्यासाठी एखादा दिवस ठरलेला नसतो...लेकीच्या काळजीनं भर थंडीत येणारी आई, पहाटे साडेपाचला भाचासाठी डबा बनवणारी आणि दिवसभर दवाखान्यात सोबत करणारी माझी वहीनी, पहाटे तयार होणारे डबे माझ्याघरी सक्काळी साडेपाचाल पोहचते करणारा माझा भाचा...मी घरात नसतांना लेकाची काळजी घेणा-या आमच्या जाधव काकू, मैत्रिणी, मनोज भाभी अशा कितीतरी नात्यांमध्ये मला माझे व्हॅलेंटाईन दिसले...आमच्या सामंत मॅडम तर विचारु नका...एवढ्या मोठ्या पदावर असणा-या...पण किती भावूक...प्रेमळ...काळजी करणा-या..अशी माणसं आपल्या अवतीभोवती असली की खरंतर वेदनेतही सुखाचा आनंद मिळतो...
या आपल्या माणसांना कुठल्या खास दिवसाची गरज नसते...कुठलाही विशिष्ट रंग त्यांच्या प्रेमाचा नसतो...त्यांचा प्रेमाचा रंग पाण्याच्या रंगासारखा असतो...कशातही मिसळणारा...आणि त्या रंगाचा होऊन जाणारा...अशा प्रेम करणा-या...जिव्हाळा लावणा-या माणसांमध्ये मला व्हॅलेंटाईन दिसतो...या व्हॅलेंटाईनला कसलीही अपेक्षा नाही...फक्त आपल्या प्रेम...जिव्हाळ्याच्या बदल्यात त्यांना चेह-यावरचं हासू हवं असतं...बस्स...या जिवाला जीव लावणा-या सर्वांचे कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानायचे...अशावेळी शब्दांचा कोष कमी पडतो...मन आनंदाने भरुन येतं...आधार वाटतो...आपण एकटे नाहीत ही सुखाची जाणीव सर्व देऊन जाते....
सई बने
डोंबिवली
---------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Class
ReplyDeleteछान
ReplyDelete