एबी आणि सीडी आणि मी आणि आजी


एबी आणि सीडी
    आणि
मी आणि आजी
विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला एबी आणि सीडी  या चित्रपटाचा प्रोमो कालपरवा बघितला...पुन्हा पुन्हा बघितला...कारण विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं...अप्रतिम गाणं...असा हात हाती, असावा सुखाचा..जसा की मनाला दिलासा मनाचा....जीवनाच्या सायंकाळी सुखाची लहर आणणारं गाणं....एका आजोबांची गोष्ट यात आहे...तशी आपल्या आसपास घडणारी...त्यामुळे परिचयाची...अशाच एका एकाकी आजीला मी डिसेंबर महिन्यात हॉस्पिटलमध्ये मुक्कामी असतांना भेटले होते...भरल्या कुटुंबात या आजी एकट्या होत्या...हा एबी आणि सीडी चा प्रोमो बघतांना त्या आजींची आठवण येत होती..
.
एबी आणि सीडी ही एका वयोवृद्धाची कथा आहे.  त्याचं कुटूंब आहे.  पण भरल्या घरात तो एकाकी आहे.  आता वय झालंय...या एका कारणामुळं त्याला कुटूंबापासून अलगद वेगळं करण्यात आलंय.  त्यामुळे सीडी अर्थात चंद्रकांत देशपांडे एकाकीपणे आपलं मन रमवू पहात  आहेत.  ते चित्रकार आहेत....त्यांची जुनी चित्र...जी आता घराच्या भींतीवरही जुनी वाटल्यामुळे खाली काढण्यात आली आहेत, त्या चित्रांसोबत आपल्या पत्नीच्या आठवणी काढत ते दिवस काढत आहेत.  नाही म्हणायला त्यांचा नातू त्यांना सोबत करतो.  एकाकी आजोबांचे दुःख तो जाणून आहे.  अशातच या सीडींना चक्क अमिताभ बच्चनचं पत्र येतं.  तो त्यांचा मित्र असल्याचा साक्षात्कार होतो.  मग काय एका चुटकीसारखं सगळं चित्र बदलतं.  आतापर्यंत तुमचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट चा जमाना आहे असं सांगणारे आप्तजण सीडींचं आयुष्य पुन्हा रंगीबेरंगी करण्यासाठी पुढे येतात.  कुटूंबातच काय पण मित्रपरिवारातही सीडींचं मन जिंकण्याची स्पर्धा चालू होते.  हे सर्व एबी मुळे...अर्थात अमिताभ बच्चनच्या करिष्म्यामुळे.  त्यातच सीडींच्या एका सत्काराला एबी येणार निरोप येतो...मग अजून काय हवं...यानंतर सीडींचं मन जिंकण्याची कशी स्पर्धा नातेवाईक...मित्रमंडळीत लागते हे सर्व या एबी आणि सी़डी या चित्रपटात रंगवण्यात आलं आहे.  खुसखुशीत डायलॉग...आणि मार्मिक टिपण्णी यांनी चित्रपटाचा दर्जा वाढवलाय.  मला मात्र या चित्रपटाचा प्रोमो बघतांना राहून राहून एका आजींची आठवण येत होती...
मी डिसेंबर महिन्यात हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होते.  मी सकाळी अकराच्या सुमारास दाखल झाले.  दोन बेड असलेली रुम मला मिळाली.  अगदी रात्री साडेदहापर्यंत त्यातला दुसरा बेड खाली होता.  माझा पहिला दिवस असल्यानं सोबतीला जाऊबाई आल्या होत्या.  आम्हा दोघींच्या गप्पा होऊन झोपायची वेळ झाल्याच्या नेमक्या वेळी, त्या दुस-या बेडवर एक पेशंट दाखल झाला.  पंचाहत्तरीच्या आजी होत्या...त्यांच्याबरोबर दोन महिला...रात्री साडे दहानंतर त्यांना दाखल केले म्हणजे काहीतरी जास्ती त्रास झाला की काय म्हणून आम्ही बघू लागलो.  पण त्या आजीसोबत आलेल्या महिला बोलायला जास्त उत्सुक नव्हत्या...त्यामुळे आम्ही मधला पडदा लावून घेतला...पेशंट दाखल केल्यावर सगळे सोपस्कार होतात ते त्या आजींवर होऊ लागले.  नर्स आल्या....आयव्ही लावण्यात आलं...रक्ताच्या तपासण्यांसाठी रक्त काढलं.  मध्येमध्ये त्या आजींचा व्हिवळण्याचा आवाज येत होता.  साधारण साडेअकरा पर्यंत हे सर्व चालू होते.  तोपर्यंत आम्ही दोघीही जाग्या ..आमच्यात हळू आवाजात गप्पा चालू होत्या.  साडेअकरानंतर तो दुसरा भाग शांत झाला.  त्या आजींबरोबर आलेल्या दोघी महिला निघून गेल्या.  आजी एकट्याच रहाणार होत्या...आम्ही दोघींनीही एकमेकींकडे काळजीनं बघितलं...आणि झोपायची तयारी करु लागलो...रात्री दोनवेळा तरी आजी बाथरुमला जाण्यासाठी उठल्या...त्यांची बहुधा शुगर वाढली होती.  बाथरुमला जाण्यासाठी त्यांना  प्रत्येकवेळी  आयांना बोलवायसाठी बेल मारायला लागायची...त्या आल्यावर दाराचा आवाज...लागणारे लाईट...नंतर त्या आजींचं व्हिवळणं...या सर्वांमुळे आम्हा दोघींनाही झोप निटशी लागली नाही.  सकाळी जाऊबाई गेल्या...माझे आवरुन झाले.  सकाळी चेकअपसाठी येणारे डॉक्टर येऊन बघून गेले.  त्यानंतर नर्स आली...तिने दिवसभरात लागणा-या औषधांची लिस्ट दिली. 
सलाईन चालू झालं...एव्हाना सकाळचे आठ वाजून गेले होते.  तरीही त्या शेजारच्या आजी झोपलेल्या...एकदा आलेली नर्स परत गेली.  मात्र ती थोड्यावेळानं आली आणि तिनं त्या आजींना उठवलं...रात्रपाळीच्या या नर्सची घाई सुरु होती.  तिनं आजींना उठवून औषधांची लिस्ट दिली...आजींची सर्व तपासणी करण्यात आल्या.  नर्स गेली.  आता आजी उठल्या...आवरु लागल्या...सकाळची चहाची तलप...मला त्यांनी चहाबद्दल विचारलं...हॉस्पिटलमध्ये नाष्टा आणि जेवणाची सोय होती.  त्यात चहाही होता...पण मी चहा घेत नाही, त्यामुळं मी त्याला सकाळी परत पाठवलं होतं...आणि तेव्हा आजी झोपलेल्या...मग काय करायचं म्हणून आजी मला विचारु लागल्या...मला तरी कुठे माहीत...नाष्टा येईपर्यंत थांबा म्हणून मी त्यांना सांगितलं...नाष्टा आला आणि त्या मुलाने आजींसाठी चहाही आणला...आजी चवीच्या...पहिल्याच घोटात सांगितलं चहा बरोबर नाही...म्हणून तू घेतला नाहीस का म्हणून मला विचारले...मी चहा घेतच नाही, असं सांगितल्यावर म्हणाल्या बरं झालं...हा बोगस चहा आहे...नाष्ट्याला ईडली चटणी होती.  माझी खाऊन झाली.  आजी त्यावरही नाराज दिसल्या...माझा नाष्टा झाल्यावर दिलेल्या औषधांमुळे आणि रात्री झालेल्या जागरणामुळे झोप लागली...मध्ये मध्ये जाणवायचं त्या आजींची खुडबूड चालू होती...दरवाजा उघडला बंद होत होता....तासाभराने नवरा घरचं आवरुन आला..माझी तासाभराची झोप झाल्यानं मी सुद्धा फ्रेश झाले होते...जखमांना ड्रेसिंग केल्यामुळे तो एक भागही झाला...त्यात पाहुण्यांची वर्दळ चालू होती...अगदी दुपारला सोबत म्हणूनही पाहुणे होते.  ते रात्री अकरापर्यंत...तोपर्यंत शेजारच्या आजींबरोबर बोलायला वेळ मिळाला नाही...त्या दिवसभर एकट्या होत्या...सायंकाळीही त्यांच्याकडे कोणी आलं नाही.  नर्सने दिलेली औषधे केमिस्टनं आणून दिली होती.  मध्येच त्यांचा हात सुजल्याचं नर्स बोलत होती...मग आयव्हीची जागा बदलली...रात्री बाराच्या सुमारास हे सर्व चालू होतं...आजींचा आवाज येत होता...मी मात्र दिवसभराच्या थकव्यानं झोपेच्या आधीन झाले...
तिसरा दिवस रविवार असल्यानं वर्दळ खूप होणार म्हणून मी सक्काळीच आवरुन घेतलं...ड्रेसिंगही लवकर झालं...रात्री झोपही चांगली मिळाल्यानं पुस्तकं वाचत बसले.  आजींचंही आयानं आवरुन दिलं.  या दोन दिवसात त्यांच्याकडे कोणी आलं नव्हतं...आता तर खाली केमिस्टनंही पहिले पैसे भरा मग औषधं असं सांगितल्याचं नर्स त्यांना सांगत होती...नर्स गेल्यावर त्यांनी मला फोन आहे का म्हणून विचारलं...मी हो म्हटल्यावर माझ्या सुनेला फोन कर म्हणून मला विनंती केली.  त्यांनी दिलेला नंबर मी दोनवेळा तरी लावला पण पलिकडून उचलला गेला नाही...मग आजीच म्हणाल्या, आज रविवार आहे ना, आमच्याकडे सगळे दहा नंतर उठतात...त्या गपचूप बेडवर बसल्या...चहा आला, पण त्यांनी घेतला नाही.  मी खाली असलेल्या चहावाल्याला कॉफी आणायला सांगितली...आजींनाही विचारलं..त्या चहा चालेल म्हणून बोलल्यावर त्यांच्यासाठी चहा सांगितला...त्या चहाचा पहिला घोट घेतल्यावर म्हणाल्या...व्वा...छान आहे चहा...आजी चहा घेता घेता सांगत होत्या...त्यांना तीन मुली..एक मुलगा...आता सगळ्यांची लग्न झालेली.  मुलींच्या तर मुलांचीही लग्न झालेली आहेत.  फक्त एक मुलगी गावाकडे असते...बाकी सगळे याच शहरात...फक्त वेगवेगळे...मुलगा कामानिमित्त बाहेर असतो.  त्या मुलाकडे असतात...मुलाला दोन मुली...त्याही कॉलेजमध्ये जाणा-या...दोन्ही मुलींच्या मोठ्या मुलींची लग्न होऊन त्याही याच शहरात संसार करत आहेत...पण आता सगळे बीझी आहेत...प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप...त्यामुळे इथे यायला कोणाला जमलं नसेल...आजी स्वतःची समजूत काढत माझ्याशी बोलत होत्या...मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं...साधारण बारा वाजता माझ्या फोनवर आजींच्या सुनेचा फोन आला...आजी बोलल्या...थोडा वेळ ये, म्हणून सुनेला सांगत होत्या...ती काय बोलली हे माहीत नाही...पण नंतर आजी खूप वेळ गप्प होत्या...दुपारी परत त्यांचा हात सुजला...आयव्हीची जागा परत बदलली...आजी व्हिवळत होत्या...दुपारी तीन नंतर आजींची सून आली...केमिस्टचे पैसे तिने दिले होते...दुस-या दिवसाचेही देऊन आली होती...तिने आजींना सांगितलं...नर्सला बोलावून पैसे भरलेत असं ठणकावून सांगितलं...अर्धातास थांबली आणि गेली...आजी पुन्हा एकट्या...सोमवारी डॉक्टरांनी मला डीस्चार्ज दिला...घरी जाणार म्हणून मी खूष...पण आजी नाराज दिसल्या...त्यांचेही रिपोर्ट ठिक आले होते...वयानुसार असे चढउतार होणार असं डॉक्टर त्यांना सांगून गेले.  त्यांनाही डीस्चार्ज हवा तर घ्यावा, असं डॉक्टर म्हणाले...पण त्यांचा निर्णय त्या कुठे घेऊ शकत होत्या...सून किंवा मुलगी कोणाचाही पत्ता नव्हता.  शेवटी सुनेला नर्सनं फोन केला...तिला डॉक्टरांचा निरोप सांगितला.  तेव्हा तिनं आता वेळ नाही...मंगळवारी डीस्चार्ज द्या...तेव्हा हाफ डे टाकून येते असा उलटा निरोप सांगितला...नर्सनं तो निरोप आजींना सांगितला तेव्हा त्यांचा चेहरा अजून उतरला...तू जाणार म्हणजे मी आज एकटी...असं बोलून झोपल्या...मी त्यांच्यासाठी चहा मागवला...मला काळजी घे...हळू काम कर...असं सांगून त्या डोळे मिटून पडून राहिल्या...निघतांना मी आणि नव-यानं नमस्कार केला...आम्हाला नाही म्हणता सायंकाळ झाली होती..मला घरी जायची ओढ लागली होती...मी त्या रुमबाहेर पडतांना आजींचा चेहरा बघितला...हा चेहरा मी कधीच विसरु शकणार नाही...खूप करुण...दिनवाणा असा चेहरा होता तो...त्या रात्री बहुधा वॉर्डमध्ये त्या एकट्याच रहाणार होत्या...
तेव्हा माझ्या मनात विचार आला होता...एवढ्या मोठ्या कुटूंबात त्या याधीच एकट्या पडल्या होत्या...आता तर ही छोटीशी खोली आहे...एबी आणि सीडी चा प्रोमो बघतांना मला वारंवार त्या आजींची आठवण येत होती...निघतांनाचा त्यांचा तो करुण चेहरा दिसत होता...आता त्या आजी काय करत असतील...हॉस्पिटलमध्ये आपल्याला कोणीतरी भेटायला येईल म्हणून दरवाजा उघडला की उत्सुकतेनं त्या बघत असत....आता घरात तरी त्यांना कोणी भेटत असेल का...असे प्रश्न मनात येऊ लागले...सीडी नशिबवान...त्यांना एबींच्या रुपात देवदूत भेटला...असा देवदूत प्रत्येक एकाकी होत असलेल्या सीडींच्या आयुष्यात यायला हवा हे नक्की....

सई बने
डोंबिवली

----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

  1. हल्ली असे आजी-आजोबा घरोघरी आहेत.खूप मोठा विषय आहे. तू खूप प्रामाणिक लिहीलं आहेस.

    ReplyDelete

Post a Comment