मानसीक
शांतीचे
औषध
हा कॉलम लिहायला घेतला गुरुवारी...साधारण दुपारी दोन ते अडीचचा सुमार
असावा...बाहेर कुल्फी घेऊन आलेला भय्या बेल वाजवत होता...सहज म्हणून गॅलरीमध्ये
डोकावलं...डोक्यावर कुल्फीचे मटके घेऊन भय्या फिरत होता...एरवी त्याच्या बेलचा
आवाज ऐकताच मुलांचा गलका व्हायचा...पण आता कोणीच नव्हतं...तो बिचारा कुल्फीवाला
बेल वाजवून पुढे गेला...हे दृष्य बघून मला अधिक निराश व्हायला झालं...त्या
कोरोनानं पार वाट लावलीय...किती माणसांना ग्रासलंय...सर्वत्र कोरोना...दुकानं
बंद...भयाचं वातावरण...बातम्या लावल्या की भीतीच वाटते...करावं काय या विचारात
असतांना कंम्प्युटरच्या टेबलावर असलेल्या पुस्तकांवर नजर पडली....चंद्रशेखर टिळक
सरांचं जन्मझुला समोर होतं...सोबतीला अर्थस्वरही होतं...दोन्हीही पुस्तकं एकदा
वाचून झालेली...नितांत सुंदर..सुटसुटीत भाषा..आणि मन गुंतवणा-या गोष्टी....पुन्हा
एकदा या पुस्तकांचं वाचन चालू करायचं होतं...आता या अस्वस्थ स्थितीत ही पुस्तकं
नजरेस आली....आणि खरं सांगू वेळ कसा गेला हे कळलंच नाही...मनाला चांगलंच औषध
मिळालं....
मंडळी या कोरोनामुळे खरंतर आपल्यातला प्रत्येकजण अस्वस्थ आहे. प्रत्येकाला आपली, आपल्या आप्तांची...कुटुंबाची
काळजी लागली आहे...चीनमधून आलेल्या या रोगानं अवघ्या जगाला आपल्या कवेत
घेतलंय....त्यामुळे कुठे जावं आणि कुठं नाही असं झालंय...बरं एवढं होऊनही अद्याप
औषध आलेलं नाही...त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर कुठलीही पोस्ट आली...हे करा...ते
करा...की त्यावर लगेच विश्वास बसून ते उपाय फॉलो करावे वाटावे असं वातावरण...त्यातून
अफवांचे पेव...कधी सर्व बंद होणार...कधी त्या इटलीच्या पोस्टची दहशत...सर्व बंद
होणार...त्यामुळे मनाची अस्वस्थता लपवता येत नव्हती...अशावेळी करायचे तरी काय हा
प्रश्न मनात होता...बरं करण्यासारखी कितीतरी कामं चालूही होती. साडी आणि चादरीवर पेंटींग चालू आहे. मसाले बनवणे चालू आहे. घराची आवराआवर झाली...पण यात गुंतून गेल्यावर
कुठूनशी ती कोरोनाची काहीतरी बातमी कानी यायची मग पुन्हा अस्वस्थता...शेवटी
लिहायला घेतलं...तर तो कुल्फिवाला आला...त्याची बेल कानी आली...पण मुलांची गर्दी
बघायची सवय झालेली...आता मुलं घरी बसलेली...किंवा त्या कोरोनानं बसवलेली...पुन्हा
नाराज मनाने कॉम्प्युटरजवळ आले...टेबलावर एका बाजुला सर्व पुस्तकांची रांग...त्यात
अर्थस्वरचा हिरवा रंग ओळखीचा वाटला...चंद्रशेखर टिळक सरांचं अर्थस्वर डोकावत
होतं...सहज म्हणून हातात घेतलं...पुस्तक एवढं सुंदर की माझ्या अस्वस्थ मनाला
पुस्तकातील भाषा...कथा औषधासारखी ठरली...छोट्या-छोट्या पन्नास कथा...कथा किंवा सहज
सुलचलेलं...मनातलं...आपल्या प्रत्येकाच्या मनातलं...सहज सोप्या भाषेतलं...आणि
मनाला भावणा-या भाषेतलं बरं....या अर्थस्वरमध्ये मी रमले...अवघी दुपार निघून
गेली...मन कधी शांत झालं हे कळलंच नाही...या अर्थस्वर ने एक मार्गही दिला...या
अस्वस्थ परिस्थितीत मनाला विरंगुळा दिला...चांगली मलमपट्टी झाली....पुस्तकं वाचण्याची
मलमपट्टी...या पुस्तक संग्रहालयाबाबत मी बरीचशी नशीबवान...सणाच्या दिवशी आम्ही कधी
सोनं घ्यायला जात नाही...पण पुस्तकं मात्र नक्की घेतो...हा खजिना आज कामी आला....
टीव्हीच्या बातम्यां फक्त ठराविक तासांनी बघायच्या, यासाठी वेळ
लावली...सायंकाळी कुठेही जायचं नव्हतं...मग पुस्तकांचं नियोजन केलं...चंद्रशेखर
टिळकांचं आणखी एक कोरं पुस्तक हातात आलं...जन्मझुला...या पुस्तकाच्या कव्हर पेजवर
नजर टाकली की प्रसन्न वाटतं...आत काय असेल हे प्रतित होतं...छोट्या सत्तेचाळीस
गोष्टी...भाषा ही चलनातली...सध्याची...नवीन पिढीलाही वाचण्यासाठी आपल्यात
ओढणारी...आणि आपल्यातलीच वाटणारी गोष्ट...त्यातली दिन आणि दीन वाचतांना त्यात मीच
असल्याचा भास झाला. सजदा ही
तशीच...व्हॉट्सअॅप मेसेजवर मनाची अवस्था...आणि शेवटची सायही तशीच...इनमीन
सत्तर-पंचाहत्तर शब्दांची...पण पुन्हा मला माझ्यात नेणारी...मलाही साय आवडत
नाही...पण हे असं लिहायला कधी सुचलं नाही...खूप कौतुक वाटलं टिळक सरांचं...पुन्हा
एकदा ती साय वाचली...या पुस्तकांनी टिव्ही....व्हॉट्सअॅपशिवाय संध्याकाळ छान
गेली...रात्रीच्या जेवणाची तयारी...नवरा बारा तासांच्या कामावर....तो खूप उशीरा
आला...त्यामुळे त्याची वाट पहातांना होणारी तगमग थांबविण्यासाठी पुन्हा या
पुस्तकांचा आधार...या पुस्तकांमध्ये एक उत्तम गोष्ट म्हणजे, छोटेखानी लेखन...छोटी
वाक्य...कुठेही गुंता नाही की क्लिष्ठता नाही...आज कोरोनामुळे जी पॅनिक अवस्था
आहे, ती थांबवण्यासाठी अशा पुस्तकांचा मोठा आधार होणार आहे...
अजून एक कौतुक करायचं म्हणजे आमच्या डोंबिवलीच्या पै काकांचे...पुंडलिक
पै यांचे पै वाचनालय म्हणजे वाचकांसाठी अलीबाबाची गुहा...आज या वाचनालयाच्या सात
शाखा आहेत. या सर्व शाखांमध्ये वाचकांची
तेवढीच गर्दी असते, यावरुन या वाचनालयाचा दर्जा लक्षात येतो. बरं फक्त वाचनालय काढून....शाखा काढून, पै काका
स्वस्थ बसलेले नाहीत...तर आपल्या सभासदांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यावर
त्यांचा भर असतो. हे कोरोना व्हायरसचं
प्रकरण आल्यावर पै काकाही सजग झाले. गर्दी
टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून सर्व बंद रहाणार...माझ्यामते
पुस्तकही जीवनावश्यकच...असो...जवळपास दहा दिवस सर्व बंद रहाणार...म्हणून पै
काकांनी आपल्या सर्व शाखांमध्ये सभासदांना चार ते पाच पुस्तकं द्यायला सुरुवात
केली. नुसतं घरात बसणं ही काहीजणांना शिक्षा
वाटते...कंटांळा येतो...मग चिडचिड...वैताग...वरुन कोरोनाचा पुढचा नंबर कोणाचा हे
टेन्शन....या सर्वांतून येणारी पॅनिक अवस्था टाळण्यासाठी पुस्तक वाचन हा रामबाण
उपाय...हे जाणूनच बहुधा पै काकांनी सभासदांना आवाहन केलं...अगदी फोन करुन पुस्तकं
नेण्यासाठी सांगण्यात आलं...त्यांच्या या आवाहनाला साद देत टिळकनगर येथील शाखेतून
पहिल्याच दिवशी 1700 पुस्तके वाचकांनी नेली.
आणखी एक कौतुक म्हणजे पै वाचनालयाच्या गांधीनगर शाखेतील रेवती
मॅडमचं...सकाळी साडेआठच्या सुमारास मी काही गरजेच्या वस्तू आणण्यासाठी या भागात
गेले होते. गांधीनगर वाचनालयाच्या बाजुलाच
असलेल्या भाजीवाल्यांकडून भाजीची खरेदी करत होते...काळजी म्हणून चेह-यावर स्कार्फ
बांधलेला...पण रेवती मॅडमनी

त्यातही ओळखलं...पुस्तकं घेतलीत का, ती आधी घ्या
म्हणून आग्रहानं वाचनालयात घेऊन गेल्या...त्यांनी आणि संदिप कामत यांनी मला हवी ती
पुस्तकं निवडायला मदत केली...मी चार पुस्तकं घेतली...त्याची त्यांनी नोंद
केली...अगदी पाच मिनीटात मला मोकळं केलं...31 तारखेपर्यंत वाचनालय बंद रहाणार...या
कालावधीत वाचकांची गैरसोय होऊ नये म्हणून पै काका आणि त्यांच्या सहकार्यांनी हाती
घेतलेला हा उपक्रमी कौतुकास पात्र आहे.
घरी
आल्यावर पै वाचनालयाच्या चार पुस्तकांसोबत
सुमित्रा महाजन यांचं मातोश्री,
अमिषची राम, सीता आणि रावण, जीजाबाईंवरील अग्निरेखा...ही पुस्तकंही शेल्फबाहेर
काढली...टेबल पुस्तकांनी भरुन गेलं...मनावरची सर्व काळजी दूर झाली...ही सोबत खूप
सुखदायी ठरणार...
कोरोनामुळे काळजी वाटत असली तरी, मनस्वास्थ
राखणं गरजेचं आहे, असं मला वाटतं...यासाठी छंद असणं आणि ते जोपासणं सर्वात
उत्तम...आणि वाचनाचा छंद नाही असा माणूस सापडणार नाही...ब-याचवेळा काही गोष्टी
हुकल्या असतात...वाचायच्या राहून गेल्या असतात...अशा वाचनात हा वेळ लावला तर फायदा
होईल...कोरोनाचा उपाय करण्यासाठी सरकार आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे...या
सर्वांवर सोशल मिडीयावर काहीही जोक टाकून वेळ घालवण्यापेक्षा वाचन केलेलं केव्हाही
चांगलं...याबाबतीत काही सबबीही चालणार नाहीत...कारण आता पीडीएफ रुपातही चांगली
पुस्तकं उपलब्ध आहेत...शिवाय ऑनलाईन बुकींगचा पर्यायही आहेच...
त्यामुळे चांगली पुस्तकं वाचा...आणि स्वस्थ
रहा....
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
सोन्या पेक्षा चांगल्या विचाराची पुस्तके खरेदी करून aathmik आनंद घेऊ शकतो हा विश्वास आज chya लेखनातून दिला,dhanywad
ReplyDeleteKhup chhan lekh.sarvani vachanachi avad jopasavi.
ReplyDelete