मना....
नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता जाग आली...मनात आलं आज तर पाडवा....आपला
नवा दिवस...पटपट आवरलं पाहिजे...पण लगेच दुस-या विचारानं थांबवलं...अरे आपण तर
थांबलोच आहोत...एका किटाणूनं अवघं जग थांबवलंय...आपणही थांबलोय...एकवीस दिवस...आता
घरात...कुठेही जायचे नाही...पाडव्याची मिरवणूक नाही...की देवाचे दर्शन नाही...धावपळ
थांबली...मनात असे निराशेचे विचार यायला सुरुवात झाली...बाहेर कमालीची
शांतता...अगदी एखाद दुसरी गाडी...तीही दुधवाल्याची जायचा आवाज...झोप गेलेली...मग
नको ते विचार..काय होईल...कसं होईल...तेवढ्यात कोकीळेचा आवाज यायला लागला...मनातले
विचार हळूहळू जायला लागले...तिच्या आवाजाचा वेध घ्यायला लागले...थोड्यावेळात
जाणवलं, या कोकिळेच्या सोबत अनेक असेच पक्षी आहेत...त्यांचाही दिवस सरु झालाय...छान
आवाज येतोय...एरवी कधी घड्याळ्याच्या मागे धावण्याचा गडबडीत हे निसर्गाचे गायन
हरवले होते. आता घरी बसावे लागल्याने हे निसर्गाचं
गाणं ऐकता आलं...मन पुन्हा उमेदीकडे वळलं...

मी जेव्हा या शांततेत बसले तेव्हाही मन अस्वस्थ
होते. आपल्या शरीराला काही सवयी झालेल्या
असतात. माझ्यापुरते बोलायचे झाले तर पहाटे
चारला जाग येणारच...मग आपल्याला दिवसभरात काय काय करायचे याची उजळणी...आणि मग सरुवात...एखादा
मिनीट इकडे तिकडे झाला तरी घालमेल...अरे आपल्याला उशीर होणार नाही ना...मग अजून
घाई...आजूबाजूला काय चालंलंय याचं भान नाही...नाही म्हणायला येणारे मोठे आवाज कान
टिपत असायचं...आमच्या समोरच्या गोडावूनमध्ये पाच सव्वापाचच्या सुमारास मोठा ट्रक
येतो...त्याचा आवाज...मग दुधाचा टेम्पो जातो...झाडाच्या फांद्यामधून जातांना होणार
या टेम्पोंचा आवाज...त्यानंतर आमच्या ओंकार शाळेची बस सकाळी सहा तीस-पस्तीसच्या
समुारास गार्डनजवळ येते. तिच्या ब्रेकचा
वेध बरोबर मन घेत असतं. बसचा आवाज घरी
बसून ऐकला म्हणजे खूप उशीर झाला....लेकाला पटपट आवर म्हणून आरडोओरडा...मग गाडीची
चावी घेऊन खाली पळायचे...लेक मागून धावत...त्याला गाडीवरुन स्टेशनला सोडले की एक
टप्पा संपणार...मी आता शांतपणे बसून माझे हे शेड्यूल आठवत होते...किती धावपळ केली...अजूनही
करायची आहे...पण कधीतरी...कुठेतरी थांबायला हवे होते...या सर्व वेळात फक्त माझ्या
कामाचे आवाज मी ऐकत होते...पण त्यापेक्षाही काही तरी छान होते...जे हातातून सुटले
होते...आता त्या पक्षांचा चिवचिवाट ऐकतांना मन भरुन आले...काहीतरी हातातून सुटलेले
पुन्हा सापडल्याचा आनंद मनात आला....
पाडव्याची तयारी केली...सर्व आरामात
उठले...सकाळचा मॉर्निंग वॉक बंद
झाल्याने घरीच व्यायाम सुरु झाला होता...मी आणि
नवरा व्यायाम करतांना मुलगाही जॉईन झाला...सकाळची सुरुवात छान झाली...सर्वांची
आवराआवर झाल्यावर मिळून पुजा केली...एरवी त्यातही किती धावपळ असायची...इकडे
जायचंय...तिकडे जायचंय...आवर पटापट म्हणून गडबड चालू असायची...आता तिच पूजा
निवांतपणे करता आली...पुजा, नाष्टा झाल्यावर नवरा कामाला बसला...वर्क फ्रॉम
होम...त्याचा लॅपटॉप सुरु...लेकानंही अभ्यासाला सुरुवात केली...ते दोघंही व्यस्त
झाल्यावर पुन्हा मी मोकळी...करु काय...पण तेवढ्यात माझा नेहमीचा सहकारी आला...कावळा...हा
कावळा...हा रोज येतोय...गेली काही वर्ष...त्याच्या वेळी त्यांनी ठरवल्या आहेत...सकाळी
नऊ वाजता...नंतर अकराच्या सुमारास आणि नंतर एक नंतर...आला की खिडकीवर बसून विशिष्ट
आवाजात हाक मारणार...मग मी दिसले की थांबणार...त्याला सकाळी तांदूळ मग नंतर चपाती
घालायची...एरवी त्याला दाणे टाकून मी पुन्हा माझ्या कामात गुंतायचे...आता वेळ होता
म्हणून त्याच्याकडे बघत बसले...दाणे संपवून तो उडाला आणि सोसायटीच्या भिंतीला
लागून असलेल्या झाडावर गेला...निट बघितलं तर तिथे त्याचं घरटं होतं...त्याच्यासोबत
आणखी एक घरटं दिसलं...व्वा...इतके दिवस हे माहितच नव्हतं...
पाडवा असल्यामुळे व्हॉटस्अपवर शुभेच्छांचा ढीग
पडला होता...निवांत वेळ मिळाल्यावर ते बघायला घेतलं...पण या लेखी शुभेच्छा देणं
टाळलं...हे व्हॉटस्अप यायच्या आगोदर फोनाफोनी व्हायची...मग फोन करायला सुरुवात
केली...आलेल्या संकंटावर बोलायचं नाही...काहीतरी छान बोलायचं...एकमेकांना सोबत
करायची हे मनी ठरवलेलं होतं...तसे फोन करायला सुरुवात केली...सोसायटीच्या काही
मैत्रिणींना फोन केला. नातेवाईकांना फोन
केला...काही मैत्रिणींनाही फोन केला...आता हे काम करायचं ठरवलंय...नेहमी ज्यांना
फोन करता येत नाही, त्यांना फोन करायचा...सोसायटीमध्ये फोनाफोनी झाली...एरवी आम्ही
रोज भेटणा-या...शेजारच्या काकूंनाही फोन...हलकेच डोळ्यात पाणी आले...पण तेवढ्यात
आमच्या रुपाली नावाच्या मैत्रिणींनी उपाय सांगितला...आता भेटता येत नाही ना, मग ठिक
आहे, आपण कॉन्फरन्स कॉल करुया...न भेटतांही बोलता येईल...चला एक मार्ग सापडला
म्हणून मोकळं वाटलं...
बरं या घरी बसण्याच्या काळात बरंच काही शिकता
येतंय....त्यातलं प्रमुख म्हणजे अन्नाचे महत्त्व...आपण हे प्रमुख काम विसरुन
गेल्यासारखे होतं...घर एक, पण प्रत्येकाची आवड वेगवेगळी...मग ज्याच्या त्याच्या आवडीचे
बनवायचे...का तर..आहे ना उपलब्ध...आता हे उपलब्ध असण्यावर काही बंधने आली...मग आहे
त्यात अॅडजेस्ट करावे लागणार...शिवाय हा एकवीस दिवसांचा काळ सुरु झाला तेव्हाच
मनात विचार आला होता...आपण निदान काही दिवसांचा किराणा तरी साठवून ठेऊ शकतो...पण
ज्यांना हे शक्य नाही त्यांचे काय...त्यामुळे आता उधळपट्टी करायची नाही...घरातही
हा विचार सर्वांना पटला....
जेवणाची आवराआवर झाल्यावर पुन्हा नवरा
कामावर...मुलगा अभ्यासाला...टिव्हीवर ठराविक बातम्या बघितल्यावर टिव्ही शांत
झाला...पुन्हा शांतता...आता करायचे काय...सहज म्हणून माझ्या कपाटाचा ठेवणीतला
कप्पा उघडला...हा कप्पा म्हणजे माझा खजिना...कितीतरी मणी...टीकल्या...त-हेत-हेचं
धागे...सॅटीन रिबिनी इथे पडलेल्या...हा कप्पा आवरला...बघता बघता कळलं की हे एक
दिवसाचं काम नाही...मग ठरलेल्या शेड्यूलमध्ये थोडा फेरफार केला...आणि हे कपाट
आवरायचं काम मध्ये घातलं...आता या कामात तब्बल आठवडा तरी जाणार आहे...
मग हाती पुस्तक घेऊन खिडकीत वाचायला
बसले...एरवी सतत गाड्यांचे आवाज..शाळांच्या बसेसची ये जा...रिक्षांचा आवाज...आज
शांत होतं...मध्येच पक्षांचा आवाज कानी पडत होता...त्यामुळे छान वाचन झालं...काही
वेळानं सकाळच्या अस्वस्थेचं उत्तर सापडलं...आपण का अस्वस्थ आहोत...का तर मंडळी या
शांततेची आपल्या मनाला सवयच नाही...आपण आवाजाने भरलेल्या या जगात रहातोय...रोज
आवाजाचे प्रदूषण, हवेतील प्रदूषण किती वाढलेय यावर चर्चा व्हायची...आता लक्षात
आलंय का हे दोन्हीही थांबलेय...काही दिवस तरी थांबलेलं रहाणार आहे...ज्याची
आपल्याला गरज होती...मंडळी या शांततेचा आनंद घ्या...मान्य आहे, पहिले काही दिवस
त्रासदायक जाणार...पण नंतर सवय होईल...आनंद वाटू लागेल...आणि मग जेव्हा आपली
पूर्वीसारखी धावपळ सुरु होईल...तेव्हा हे शांततेचे दिवस आठवतील...
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसई या लेखात आपण प्रत्यक्ष पने आपल्या सकारात्मतेने स्वतः, इतरांची, कुटुंबाची काळजी घेतली त्याच प्रमाणे या प्रसंगाशी क श्या प्रकारे प्रत्येकाचे आचरण , वागणूक असावी या लेखात आपण प्रत्यक्ष मांडली.
Deleteधन्य वाद
रमाकांत बारी
अतिशय सुरेख व्यक्त केलं आहे. अप्रतिम.
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteसुरेख शब्धाकंन
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteधन्यवाद कृष्णाजी
ReplyDelete