घरातल्या आजी आजोंबासाठी....


घरातल्या

आजी आजोंबासाठी....


गुरुवार...रामनवमी...नेहमीप्रमाणे लवकर जाग आली.  का आली...कशाला आली...काय माहीत...जेव्हा खूप झोपावसं वाटत होतं तेव्हा लवकर उठावच लागायचं...आता या विचारांच्या जंजाळात झोप आवश्यक आहे, तर ती येत नाही.  शरीराला काही सवयी झाल्या असतात, त्यापैकीच ही एक सवय.  बरं पहाटे चार वाजता उठून करु काय...तेही कळत नाही.  पुन्हा झोपायचा प्रयत्न केला.  पण नाही...शेवटी चाडेचारला उठले.  गरम पाणी पित खिडकीमध्ये बसले.  समोरच्या झाडावर पक्षांची किलबील सुरु झाली होती.  रस्त्यावरुन एखाद दोघे मॉर्निंग वॉक करतांना दिसत होते.  गेले कित्येक वर्ष मी नियमीत सकाळी चालायला जाते.  त्यामुळे असे अनेक चेहरे ओळखीचे आहेत.  काहींच्या सवयी, काहींचा पोशाख, काहींची चालायची पद्धत यामुळे ही मंडळी ओळखीची झाली आहेत.  त्यापैकी काही व्यक्ती दिसत होत्या.  तितक्यात एका आजोबांवर नजर गेली.  शुभ्र पांढरा झब्बा, लेंगा, टोपी घातलेले हे आजोबा आज तोंडावर मास्क लावून पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास चालत होते.  या आजोबांना बघून मला कोणीतरी ओळखीचे दिसल्याचा आनंद झाला...पण काळजीही वाटली.  

गेली काही वर्ष मी या आजोबांना फक्त त्यांच्या पोशाखावरुन ओळखते.  अगदी पावसाळ्यातही ते असा पांढरा शुभ्र झब्बा-लेंगा घालून फे-या मारतात.  गुरुवारी मी वरुन, ओ आजोबा...म्हणून हाक मारली.  तेव्हा त्यांनी वर पाहिलं, ओळखीचे हसले.  थोडावेळ थांबले.  मी म्हटलं, आजोबा आता चालू नका.  काळजी घ्या.  घरी व्यायाम करा.  ते हसले.  म्हणाले, आता घरी गेल्यावर कडक पाण्याने आंघोळ करणार.  मिठाच्या पाण्याने गुळण्याही करणार...पण पोरी घरात चोवीस तास करमत नाही ग...म्हणून मोजून दहा-पंधरा मिनीटं बाहेर पडतो.  कधी पाचला बाहेर पडतो.  कधी थोड्यावेळानंतर...पण फक्त दहा मिनीटांसाठी बाहेर येतो.  चल, आता जातो...मी हो म्हटलं...वरुनच नमस्कार केला.  आजोबा परत गेले.  आमच्या बिल्डींगच्याच पुढची त्यांची बिल्डींग.  पाच मिनीटं ते गेले त्या वाटेकडे बघत होते.  अजून तसा काळोख होता.  सर्व शांत.  आजोबा घरी पोहचले असणार बहुधा.  मला सहज म्हणून आठवलं,  या लॉकडाऊनच्या काळात आपण किती कंटाळलो आहोत.  हाती सोशल मिडीया चोवीस तास आहे.  झालंच तर टिव्ही आहे.  एखादा चित्रपट-नाटक हवं असेल ते बघण्याची सोय आहे.  पण या सर्वांत घरातील ही ज्येष्ठ मंडळींचा मात्र खूप कोंडमारा होत आहे. 
सकाळी सर्व आवरल्यावर मैत्रिणीला आणि तिच्या सासूला फोन केला.  मैत्रिण नेहमीचं बोलली.  ती घरातून काम करतेय.  त्यामुळे तशी बिझीच.  दोन मुलांकडे फोन.  त्यामुळे त्यांचे मोबाईलवर गेम खळणे, चॅट करणे, शिवाय टीव्ही चालू असे उद्योग सुरु.  मैत्रिण आणि तिचा नवरा समोर लॅपटॉप घेऊन ऑफीसचं काम.  काही आणायचं असलं तर नवरा सकाळी जातो, मग सर्व दिवसभर घरी.  बरं रिमोटही मुलांच्या हाती.  या अशा वातावरणात मैत्रिणीची सासू पार वैतागलेली.  मी तिच्याबरोबर बोलायला लागले तेव्हा, तिने हव्या तेवढ्या त्या कोरोनाला शिव्या दिल्या.  या कोरोनामुळे सर्वच अडलंय बघ, बरं तो दिसतपण नाही.  काय करावं ते कळत नाही.  हे तिचे बोल कमी होत नव्हते.  या सासूबाई घरी बसून कंटाळलेल्या.  नेहमी सकाळी नातवंड लवकर शाळेत जातात.  ती पार एक वाजता येतात.  मग त्यांना जेवण द्यायचं.  की ती क्लासला.  सायंकाळी आली की खाऊ.  मग त्यांना अभ्यासाला बसवायचं...वेळ असेल तर खेळायला जाऊ द्यायचं.  इकडे सून आणि मुलगा नऊ-दहाच्या सुमारास नोकरीसाठी बाहेर पडणार.   ते रात्री आठ-नऊ पर्यंत येणार.  तोपर्यंत घरचे सर्व निर्णय या सासूबाई घेणार.  भाजी, सामान, फळं, काही खाऊचं सामान, दूध हे सर्व आणण्यासाठी त्यांच्या किमान चार फे-या तरी घराबाहेर होणार.
  ताजी भाजी हवी म्हणून सकाळी बाहेर पडणार.  मग भाजी घेतल्यावर गार्डनजवळ मैत्रिंणीबरोबर गप्पा मारत बसणार.  शिवाय त्यांचं महिलामंडळ.  नातवंड दुपारी क्लासला गेली की आजी चार वाजता चहा करुन भजनासाठी जाणार.  मग सायंकाळी नातवंडासोबत घरी...आजींचा हा सर्व दिनक्रम.  दुपारी जेवतांना त्या एकट्या असतात.  पण यावेळी रात्री बघायच्या राहिलेल्या मालिका आवर्जुन बघतात.  त्यात मुलाचा आणि सुनेचा फोन आल्यावर थोडावेळ आराम करणार...आता त्यांचं हे सर्व वेळापत्रक बिघडून गेलंय.  पहिले काही दिवस सर्व घरी आहेत याचा त्यांना आनंद झाला.  पण नंतर सर्व असूनही कोणी बोलयला मोकळं नाही, म्हणून त्या वैतागल्यात.  त्यातल्यात्यात टीव्हीवर रामायण आणि महाभारत पुन्हा सुरु झालंय हा आनंद.  पण त्यावेळी रिमोट नातवांच्या हातातून घेतांना तारांबळ होतेय.  या सासूबाईंबरोबर जवळ जवळ अर्धा तास बोलले.  जाणवलं, आपण सहज मोकळं होऊ शकतो.  पण या लॉकडाऊनचा परिणाम वयोवृद्धांवर अधिक झालाय.  पण त्यांना बोलता येत नाही.  मग अशाच काही ज्येष्टांचा नंबर काढलाय.  आता रोज एकाला तरी फोन करायचा हे ठरवलंय.
आमच्या सोसायटीच्या खाली सकाळी एक आजींबाईंचा ग्रुप व्यायामासाठी जमतो.  त्यातल्या एका आजीचा नंबर मिळाला.  त्यांचीसुद्धा कोरोनाच्या नावाने ओरड.  त्या सकाळी अगदी सातच्या सुमारास घराबाहेर पडतात.  व्यायामाच्या निमित्ताने, समवयीन महिलांना भेटतात.  आता तर त्या त्यांच्या मैत्रिणी झाल्या आहेत.  घरी अगदी नऊच्या सुमारास जातात.  तोपर्यंत नोकरी करणा-या सुनेची गडबड घाई सरु असते.  त्या गडबडीत आपण नको म्हणून या आजी सकाळी बाहेर थांबतात.  सून तिचं आवरुन बाहेर पडली, की मग घराचा ताबा आजींकडे.  मग सरळं घर आवरायचं.  कामाला येणा-या बायकांचे नियोजन.  स्वतःचे आवरणे.  पुजा.  मग नातंवंडांना शाळेत पोहचवणे.  अशी कामांची त्यांची यादी चालू असते.  आता सर्व घरात.  त्यांना बाहेर जाता येत नाही.  शिवाय मुलगा, सून यांच्यासमोर व्यायाम कसा करु म्हणून संकोच वाटत होता.  मी समजवलं.  संकोच नको...वाटल्यास दुस-या खोलीत करा, पण व्यायाम करा.  अगदी काल त्यांच्याबरोबर बोलले.  सायंकाळी लगेच त्यांनी फोन केला.  बरं वाटलं.  सूनेनंही कौतुक केलं.  लहान नातूही सोबत करणार म्हणाला व्यायाम.  बस्स.  अजून काय हवं. 
प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवून जाते.  हे कोरोना प्रकरणही तसंच आहे.  आपल्याला यातून खूप शिकायला मिळाले आहे.  मुळात म्हणजे माणसाची किंमत.  आपल्या आसपास वावरणा-या प्रत्येक माणूस महत्त्वाचा असतो.  घरातील ज्येष्ठ मंडळी तर आधार असतात.  त्यांना कोणाच्या मदतीची गरज असते यापेक्षा आपल्यालाही त्यांच्या सोबतीची, आधाराची तेवढीच गरज आहे.  या लॉकडाऊन काळात या वयोवृद्धांचा सहवास ज्यांना लाभलाय, त्यांनी नक्कीच त्यांचा फायदा घ्या.  त्यांना वेळ द्या.  आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करा.

 
सई बने
डोंबिवली
---------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा






Comments

Post a Comment