शूर सरदार
लॉकडाऊन सरु झालं आणि मनात कितीतरी विचार सरु झाले. आता कसं होणार...काय होणार...कारण आपल्या
पिढीने हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता...त्यामुळे या शब्दाच्या मागे असलेल्या
परिणामांची चिंता लागून राहीली होती. या
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी...अगदी सकाळी गॅस गेला. अरे बापरे...मला टेन्शन आलं. आता तर लॉकडाऊन...गॅस बुक होईल का...आणि बुक झाला
तरी वेळेवर येईल का...या शंकांमुळे दुसरा गॅस लावण्याआधी गॅस बुकींगसाठी नंबर
फिरवला. ऑनलाईन बुकींग झालं. मेसेज आला.
आता धाकधूक सुरु झाली. गॅस कधी
येईल याची. पण साधारण चारच्या सुमारास बेल
वाजली. दारात गॅस ठेवल्याचा आवाज
आला. मी अगदी अधिरपणे दरवाजा उघडला. नेहमीचे गॅसवाले दादा गॅस घेऊन हजर होते. मी म्हटलंही त्यांना आजच बुक केला...आणि आजच
आला. गॅसची गाडी बहुधा उशीरा आली
होती. त्यामुळे माझी गॅसची ऑर्डर आजच्या
आज मिळाली असं त्यानं सांगतिलं. मी त्या
दादांना सांगितलं...काळजी घ्या...त्यावर ते सहज बोलले...आम्हाला नाय पकडत...आमच्या
अंगातून सतत घामाच्या धारा वाहत असतात ना....मी त्यांच्या या उत्तराकडे बघतच
राहीले. एकतर ते कोण पडणार नाही, हे
पहिल्यांदा कळलंच नाही. मग ते कोरोनाबद्दल
बोलत आहेत, हे कळलं.
त्याचक्षणी
माझ्या भोवतीचं एक कवच मोकळं झालं. किती
जपत होते मी...हे खायचं नाही...ते खायचं नाही...शरीराला जपण्यापेक्षा त्याचे
चोचलेच जास्त पुरुवले होते. त्यामुळे आता
एका किटाणूपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या चार भिंतीत लॉक करुन
घेण्याची वेळ आली आहे. आणि हे गॅसवाले
दादा....सकाळ, संध्याकाळ बाहेर फिरत असतात.
कितीतरी या मंडळींना मी दुपारी एका कोप-यावर बसून जेवतांना पाहिले आहे. मग आठवलं, कोरोनापासून बचावासाठी डॉक्टर काय
सांगतात, तुमची प्रतिकारशक्ती चांगली पाहिजे.
ती आपण सोफिस्टीकेटेड आयुष्य जगणा-यांपेक्षा या सर्वांकडे नक्कीच जास्त
आहे. कारण या लॉकडाऊनच्या काळात आपण
सर्वजणचं या सर्वांवर अवलंबून आहोत. मनोमन या माणसाचे लाखो आभार मानले. आज या माणंसांमुळे तुमच्या आमच्या घरात
पोटपाण्याची व्यवस्था होत आहे.
आपल्या आसपास अशी अनेक माणसं असतात, की ज्यांच्या कष्टाचे मुल्य आपल्याला
माहित नसतं. किंवा ते जाणण्याचा आपण
प्रयत्नच करीत नाही. आता या लॉकडाऊनच्या
काळात आपण ज्यांच्यावर अवलंबून आहोत अशा व्यक्तींच्या कष्टाची किंमत समजू लागली
आहे. आता आमच्या सोसायटीत गाडी पुसायला
येणा-या माणसांचेच बघा ना...गेली काही वर्ष
हा गृहस्थ सकाळी साडेपाचच्या सुमारास गाडी पुसण्यासाठी येतो. पण त्याचे साधे नाव जाणण्याची तसदी मी घेतली
नाही. दोन दिवसापूर्वी कितीतरी वेळ
त्याच्या कामाचं निरिक्षण
करीत होते. उगाचच...त्या माणसाला त्याची
कल्पनाही नव्हती. तो स्वतःचे काम करण्यात
गुंग होता. पहाटे पाणी टाकल्याच्या आवाजाने जाग आली. एवढ्या सकाळी कोण पाणी टाकत असेल, आणि तेही या वातावरणात...असा विचार मनात आला....खिडकीच्या
बाहेर बघितलं तर बिल्डींगच्या बाहेर उभ्या असलेल्या फोरव्हीलरची सफाई चालू
होती. या माणसाला गेली कित्येक वर्ष मी
बघतेय. रोज पहाटे रंगांच्या मोठ्या
डब्याचे बकेट तो घेऊन येतो. सायकल, हे
बकेट आणि गाडी पुसायला एक फडकं एवढं त्याचं साहित्य .सोसायटीमधील गाड्या साफ
करतो. पुसतो आणि पुढच्या सोसायटीमध्ये
रवाना होतो. एवढ्या वर्षाच मी या माणसाचं
अस्तित्व कधी लक्षात
घेतलं नव्हतं. त्याचं साधं नाव जाणण्याचा
प्रयत्न केला नाही याचं आता वाईट वाटत होतं.
एरवी माझा सकाळचा मॉर्निंगवॉक झाल्यावर त्याची आणि माझी भेट व्हायची. दररोज.
माझी गाडीही हाच माणूस साफ करतो.
त्यामुळे तो सकाळी भेटला की त्याला नको त्या सूचना देण्यात मी धन्यता मानत
होते. गाडीवर फार पाणी टाकू नको, गाडीच्या आरशांची पोजिशन बदलू नको, मुख्य स्टॅन्डवर गाडी उभी करु नको अशा एक ना
दोन अनेक सूचना मी त्याला करत असायचे. तो
नेहमी मान हलवायचा. आता वरुन तो माणूस कशा
पद्धतीने गाडी साफ करतोय, हे मी बघत होते.
आता कोणीही त्याला काही सांगत नव्हते.
पण त्याचं काम चालू होतं.
लॉकडाऊनमुळे काही गाड्या पंधरा ते वीस दिवस एका जागी उभ्या आहेत. त्यांचे मालक या गृहस्थाला नक्कीच गाडी एवढी
खराब का झाली अशी विचारणा करणार नाहीत. पण
तरही आपलं काम हा गृहस्थ प्रामाणिकपणे करतोय...खरं तर ही कृती डोळ्यात अंजन
घालणारी होती.


छोट्याश्या किटाणूमुळे पसरलेला रोग कधीतरी
पूर्ण थांबेल...सर्व परिस्थिती सुधारले.
त्याला थोडा वेळ द्यायला हवा. पण
या सर्वांत जे आपल्यासाठी झटत आहेत, त्यांचे उपकार मात्र सदैव लक्षात ठेवायला
हवेत.
सई बने
डोंबिवली
-----------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
अगदी सत्य, वास्तव, खूप छान.
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteKharach aahe. Chan Sai
ReplyDeleteVery true!
ReplyDeleteYeah It's true they are putting their life in danger for us
ReplyDeleteKhup Sundar lekh,
ReplyDelete