या दादा-ताईंसाठी घरी थांबा....


या दादा-ताईंसाठी तरी घरी थांबा....
रात्री अभ्यास करणा-या लेकाला सोबत म्हणून विणकामाचं निमित्त काढून बसले.  पण डोळ्यावरची झोप काही थांबत नव्हती.  हातातील विणकामाची सुई दोनवेळा खाली पडली.  लेकानंही सुचवलं,  आई, तू झोपायला जा...माझं झालं की मी येतो...पण मन मानत नव्हत...शेवटी खिडकीच्या कठड्यावर बसले.  जाळीची खिडकी उघडली.  बाहेर छान थंड वारा होता.  त्याची झुळूक त्या जाळीच्या खिडकीमधून आली...थोडी झोप उडाली...म्हणून खिडकीजवळच बसले...शांत रस्ता...पण काही क्षणातच काही गाड्यांचे आवाज येऊ लागले.  एवढ्या रात्री...तेही लॉकडाऊनमध्ये गाड्या कोण घेऊन चाललंय....हा प्रश्न मनात येतोन् येतो तोच,  समोरुन एक अॅब्युलन्स गेली...आवाज नव्हता, पण लाल दिवा लागला होता...मागोमाग आणखी एक जीप होती...बहुधा आरोग्य विभागाची असते तशी...ती गाडी समोरुन गेली,  आणि डोळ्यावर होती नव्हती ती झोप उडून गेली.  चांगलाच घाम फुटला.  आमच्या भागातून गेली, म्हणजे आपल्या परिचितांपैकी कोणाला त्रास झाला का...मनात अनेक विचार सरु झाले...


रात्री बघितलेल्या अॅब्युलन्सने झोप पार उडाली.  अगदी पहाटे पहाटे कधीतरी डोळा लागला.  पण मनातून विचार काही जात नव्हते.  सकाळी व्हॉटसअपच्या माध्यमातून समजले,  आमच्या जवळपास रहाणा-या एका गृहस्थाला काही त्रास वाटू लागला, म्हणून तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.  शिवाय त्याच्या कुटुंबालाही वेगळे करण्यात आले आहे.  मग एक-एक मेसेज येऊ लागला...अस्वस्थ करणारी माहिती समजू लागली....हे गृहस्थ पोलीस दलात आहेत.  रेल्वे बंद आहेत.  पण ड्युटी गरजेची....त्यामुळे सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या वाहनांमधून रोज मुंबईपर्यंत प्रवास करतात...आपली ड्युटी करतात...कधीकधी रस्त्यावर आठ-आठ तास उभं रहावं लागतं.  वाहनांची तपासणी करावी लागते.  लॉकडाऊन तोडणा-यांना समज द्यावी लागते...प्रसंगी हात जोडावे लागतात...लोकं ऐकत नाहीत, मग काढीचा प्रसादही द्यावा लागतो...पण फरक काहीही नाही...ही नेहमीची तक्रार...त्यांचाही नाईलाज होतो...काहीवेळा शिव्या आणि दगडही खावे लागतात...हे सर्व नाईलाजांनं झेलत ड्युटी केली जाते.  का तर अंगावर घातलेल्या खाकी युनिफऑर्ममुळे...आपले कर्तव्य चोख पार पाडत होते...रोज सकाळी उजडायच्या आत घर सोडायचं...आणि रात्री उशीरा घरी यायचं...काल रात्री कामावरुन आल्यावर अचानक या गृहस्थांना त्रास होऊ लागला...रात्री उशीरा डॉक्टर आले...तपासणी झाली...आणि त्यांना पुढच्या तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला...त्यांच्या दोन मुलांना आणि पत्नीला घरातच वेगळं करण्यात आलं...आपल्या वडीलांना ही मुलं काही दिवसांपासून एक-दोन तासच भेटत होती...किंबहुना बघत होती...आता या आपल्या वडीलांना आपल्या समोरुन अॅब्युलन्समधून घेऊन जातांना बघून दोन्हीही मुलं रडत होती...पत्नीची तशीच स्थिती होती.  आसपासच्या इमारतीमध्ये राहणारे व्हिडीओ काढत होते.  दुस-या दिवशी सोशल मिडीयावर हे व्हिडीओ पडले होते.  त्यातले एक-दोन बघितल्यासारखे करुन मी सर्व डीलीट मारले...कारण हे व्हिडीओ अस्वस्थ करणारे होते. 

काय चूक आहे त्या गृहस्थाची...या कोरोना रोगाच्या युद्धातील ते एक सैनिक आहेत...सरकारने लॉकडाऊनच्या काळात काही नियम केले आहेत.  ते नियम कोणी तोडत असेल तर त्यांना रोखण्याचे काम ते करत आहेत.  आपली सुरक्षा करीत आहेत.  पोलीस आज जे आपल्या सर्वसामान्यांसाठी करत आहेत,  ते पहाता देव या वर्दीच्या रुपात आपल्यात आल्याची भावना होत आहे.  अनेक अपंग, वृद्ध, गरजूंना अन्नधान्य पुरवण्याचे काम ही मंडळी करत आहेत.  कोणी एकाकी असेल तर त्याच्या औषधांची सोय करत आहेत.  ही काय पोलीसांची ड्युटी आहे...पण या ड्युटीपलीकडे जाऊन या कोरोनाच्या युद्धात ही मंडळी काम करीत आहेत.  हे सर्व कोणासाठी आपल्या सर्वांसाठी....
पण या सर्वांत आपण कुठे आहोत हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे.  या लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणा-यांची संख्या कमी नाही.  पोलीसांनी त्याला अटकाव केला तर अत्यंत फालतू कारणं त्यांच्याकडे असतात.  काहीजण आपली गाडी खूप दिवस चालवली नाही, म्हणून ती चालवण्यासाठी रात्री बाहेर पडत आहेत.  कोणी भाजीच्या निमित्ताने तर कोणी औषधाच्या निमित्ताने...आमच्या समोरच्या इमारतीमधील जोडपं रोज सकाळ-संध्याकाळी चालण्यासाठी बाहेर पडलेलं असतं...पोलीसांची पेट्रोलींगची गाडी आली, की कुठेतरी आडोशाला लपतात...गाडी गेली की पुन्हा सुरु होतात....हे जोडपं प्रातिनिधीक आहे.   असे बरेच नग सध्या फिरत आहेत...अरे बाबांनो तुम्ही कोणाला फसवत आहात...पोलीसांना...की स्वतःला...हा प्रश्न विचारुन बघा...आज तुम्हाला काय होऊ नये म्हणून ही मंडळी जीवाची पर्वा न करता बाहेर खडा पहारा देत आहेत...कारणाशिवाय बाहेर फिरणा-यांनी निदान त्याची तरी लाज ठेवायला हवी...
आज परिस्थिती कठीण आहे.  जिथे काही लागलं सवरलं तर घड्याळ न बघता सरळ दुकान गाठलं जायचं तिथे आता आठवडा-आठवडा बिल्डींगच्या खाली उतरायलाही भीती वाटत आहे.  काही आवश्यक सामान आणायाल जेव्हा नवरा दुकानात जातो,  तेवढ्या वेळात मला कितीतरी कापरं भरतं...अशीच अवस्था आपल्यापैकी काहींची असेल...मग विचार करा ज्यांचा
नवरा अत्यावश्यक सेवा या लेबलखाली ड्युटीवर जात असेल त्या महिलांची काय अवस्था होत असेल.  पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी ही मंडळी स्वतः कामाला हजर आहे.  काही महिलांचाही यात समावेश आहे.  आपल्या लहान मुलांना कुटुंबाच्या ताब्यात देऊन या माता केवळ आपल्यासाठी खडा पहारा देत आहेत...अशावेळी वेळप्रसंगी आपल्यावरही या रोगाचा विळखा बसेल याची त्यांना जाणीव असते.  शिवाय आपल्यामुळे आपलं कुटुंबही या विळख्यात येऊ शकतं याचीही त्यांना कल्पना आहे.  तरी पण ही मंडळी आपली ड्युटी चोख पार पाडत आहेत...काही पोलीस, डॉक्टर, नर्स तर आपल्या कुटुंबाला आठवड्याच्या फरकाने भेटत आहेत....गाडीवरुन विनाकारण फिरतांना त्यांच्या मनाची,  कुटुंबापासून होणा-या दुराव्याची तरी कल्पना करा...
गेल्या काही दिवसात जे काही कोरोनाग्रस्त रुग्ण पुढे येत आहेत, त्यामध्ये शासकीय सेवेत असणा-या आणि रुग्णांची सेवा करणा-यांचे प्रमाण वाढत असल्याचे पहाण्यात आले आहे.  आपल्यातील काही लोकांच्या बेपर्वाईचे परिणाम या मंडळींना भोगावे लागत आहेत.  भाज्या-फळं, जीवनावश्यक वस्तू, औषधं यांचा पुरवठा सुरळीत आहे.  फक्त तो आपल्याकडे किती असावा यासाठी जो अट्टहास चालला आहे, तो चुकीचा वाटतो.  पुढे काय होईल,  या वस्तू महाग होतील,  टंचाई होईल....म्हणून काही मंडळी आज खराब करीत आहेत.  भविष्यात काय होईल त्यासाठी वर्तमानात कायदा मोडलात तर त्याचे परिणाम भिविष्यात निश्चितच भोगावे लागतील.
 
हल्ली फोन आला तरी हाच विषय असतो.  कालपरवा एका मैत्रिणींनं फोन करुन सांगितलं, त्यांच्या भागात संध्याकाळी सर्व खाली फिरायला येतात...घरात बसून कंटाळा येतो...संध्याकाळी थोडे पाय मोकळे करुन मग पुन्हा घरात जातात...मी तिला आवर्जुन सांगितलं...कोरोना, वेळ बघून येत नाही...तुमचा कंटाळा नक्की जाईल...पण अवघ्या कुटुंबावर हे कोरोनाचं वादळ घोंगावत राहील...या वादळाची चिंता करा...अजून किती दिवस घरात बसायचं...हा तर अनेकांचा आवडता प्रश्न...अहो, सरकारला तरी कुठे आवडतंय, की सर्व बंद करुन लोकांना घरात बसायला सांगायचं...पण या संकंटात दुसरा उपाय नाही...कोणाची हौस म्हणून आपण घरी नाही,  तर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे.   एक दिवस काम मिळालं नाही तर घरी जेवणाचे वांदे होतील, अशी अनेक कुटुंब आपल्या आसपास आहेत.  प्लंबर, इलेक्ट्रीकचे काम करणारे, रंगकर्मी, घरकाम करणा-या महिला अशा अनेकांना आज घरी बसावे लागत आहे.  त्यांनी काय करायचं...त्यामुळे  मंडळी अजून थोडे दिवस तरी घरीच बसा...शांत रहा...एक दिवस हा रोग नक्की जाईल...पूर्वीचे दिवस परत येतील....आतातरी आपल्यासाठी झटणा-या पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, बॅंकेचे कर्मचारी यांची साद ऐका....

सई बने
डोंबिवली
------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
 

Comments

  1. अगदी खरं आहे....

    ReplyDelete
  2. अगदी संवेदनशील पणे मांडले आहे ✍️👌👌👍🏻✍️

    ReplyDelete
  3. अगदी खरं आहे

    ReplyDelete

Post a Comment